Wednesday, 17 May 2017

लेक माझी !

लेक माझी !
जन्माला आली तेव्हापासूनच कौतुक होते सगळ्यांना आणि अगदी दुपट्यात असल्यापासून सगळ्यांनी ती माझी लेक कशी नाहीये , हे अगदी उदाहरणे , स्पष्टीकरणे देत हजारो वेळा अधोरेखित केले होते. माझं एकच उत्तर असायचे अशा वेळी , तिचा जन्म खाजगी रुग्णालयात झाला, त्या दिवशी तिथे मी एकच पेशंट डिलिव्हरी साठी ऍडमिट होते , त्यामुळे अदलाबदली , बिछडने असा काही बॉलीवूड घोळ नाहीये, माझीच लेक आहे ती . बरीच शांत , सालस आणि सुंदर आहे , हे खरं आहे आणि माझ्या लहानपणच्या माहित आणि अर्धमाहित असलेल्या सुरस चमत्कारिक कथांमध्ये ती बसत नाही , हे हि कबुल आहे , पण ती माझीच लेक आहे. आताही वीस वर्षे हाच अनुभव अगदी पदोपदी येतो. ऑफिस किंवा इतर ठिकाणी माझ्याबरोबर असली की लोकांचा पहिला उदगार , ' is that your daughter? She is so pretty !'. थोडं हसून , थोडं ठासून ,yeah she is my daughter. म्हणलं की कधी कधी ओशाळवाणं , no, you also look nice. यावर , yeah, but you never told me that before...यावर हसून , कधी विषय बदलून मग पुढच्या चौकशा होतात.
मुलगीच पाहिजे असा काही माझा आग्रह नव्हता, पण तिच्या जन्माआधी जिथे काम करायचे तिथल्या महिला मंडळात आम्ही ,' मुलगी झाले हो ' चे प्रयोग करायचो , त्यामुळे इतक्या वेळेला नसलेल्या ताल सुरात मुलगी झाली हो ची सगळी गाणी कोकलून झाली होती आणि त्या अनुषंगाने त्याच्या मागचे विचार कोळून पिऊन झाले होते त्यामुळे दुसरं काही होणं अगदी अनैसर्गिक असावं. लग्न करावं यापेक्षा कोणाशी करणार नाही आणि त्या संसारात काय चालणार नाही यावरच लहानपण ते किशोरवयात सगळी स्व - चिंतने झाली होती. या सगळ्यात फार कधी मुलाचा , आई होण्याचा विचार फारसा प्रभावी नव्हताच. लग्न केले ते पण दोघांच्या घरच्यांचा विरोध पत्करून आणि सगळ्यांनी आपल्याशी असलेले संबंध तोडले तर तो आपल्या क्रांतिकारी विचार आचारांचा परिपाक म्हणून आनंदाने स्वीकारलेला परिणाम म्हणून . त्यामुळे पारंपरिक संसारात मूल झाले पाहिजे, मुलगा पाहिजे असल्या काही भानगडींना सामोरे जायचा प्रश्न नव्हता. त्यावेळी काम , नोकरी आणि करियर यांनी पण पछाडलेले होतेच, त्यामुळे मुलाचा विचार तेव्हाही वेगळा केला नव्हताच. शिक्षण संपवून मी, ८-१० महिने काम करून असलेली सगळी कर्ज फेडून झाल्यावर पुन्हा आय ए एस व्हायच्या मनीषेनें डोके वर काढले होते. पुण्यात एका स्नेह्यांच्या घरी राहून तेव्हा पुन्हा एकदा अभ्यास करायला सुरुवात केली होती. त्यांची तेव्हा दोन - तीन वर्षाची चिटुकली अगदी बिलगून असायची. एका रविवारी दुपारी मी अभ्यास करताना माझ्या शेजारी खेळता खेळता झोपली आणि मलाही झोप लागली . थोड्या वेळाने जाग आली , तेव्हा ती इतकी शांत माझ्या कुशीत झोपली होती , तो पहिला क्षण जेव्हा खूप तीव्रतेने मूल हवं असं वाटलं होतं. जवळ जवळ २२ वर्षाआधीच्या त्या दुपारच्या वेळी त्या चिमुरडीच्या शांत चेहऱ्याने आणि ज्या विश्वासाने ती शेजारी विसावली होती त्या विश्वासाच्या जाणीवेने मला कसोटीच्या काळात बरेच बळ दिलेले आहे. तीच निरागसता मला मुलांच्या बाबतीतली जबाबदारी सक्षमतेने घेण्यास एका अर्थाने प्रेरणादायक ठरली आहे.
मनूच्या जन्माच्या आधी आणि नंतर आमचे स्वकुटुंबीय जरी जवळ नव्हते तरी मित्र मैत्रिणी , जिथे मी शिकले त्या इन्स्टिट्यूट मधल्या शिक्षिका , जिथे काम करायचे तिथले सहकारी असा प्रचंड गोतावळा होताच सोबतीला आणि आनंदात सामील, त्यामुळे कधी एकटेपणा वाटला नाही . तिच्या बारशाला एक माझी मा सोडली तर दुसरं घरचं कोणी नव्हतं , पण घर तुडुंब भरले होते आणि गेले १८ वर्षे तिच्या वाढदिवसाला ही हेच चित्र कायम राहिले आहे. एका अर्थानी मला तिचे संगोपन ज्या पद्धतीने करायचे होते , त्याला अनुकूलच ही सारी परिस्थिती होती. कुठल्याही धर्म , जात आणि समुदायाच्या परे मला जगायचे होते आणि तिला वाढवायचे होते. स्व विकासाच्या सगळ्या संधी तिला उपलब्ध करून द्यायच्या होत्या , शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन हे ध्येयही होतेच आणि गेले २० वर्षे बाकी घडामोडी असल्या तरी आयुष्य या एका सिंगल फोकस नी जगत होतो आम्ही दोघी. बरीच स्थित्यंतरे आली यात , काही आपले दुरावले, दूर गेले , माझ्या घरचे हळू हळू परत संपर्कात आणि लागेल तसे मदतीला धावून आले. नवीन ठिकाणे , नवीन संदर्भात आम्ही एकमेकींना जपत , सांभाळत मुंबई , मध्य प्रदेश , नवी मुंबई , लंडन , केंट असा प्रवास करत इथे स्थिरावलो . या सगळ्यात मला आनंदाच्या , कसोटीच्या , दुःखाच्या , निराशेच्या आणि रोजची धांदल सांभाळण्याच्या सर्व क्षणांना या लेकीने सक्रिय साथ दिली. स्वभाव म्हणा , परिस्थितीची जाणीव म्हणा, बौद्धिक आणि मानसिक परिपक्वता म्हणा , पण कधीही फालतू हट्ट , त्रास , किरकिर असं काहीच या लेकीनं माझ्या नशिबात आणले नाही . वाद विवाद भरपूर झाले आमचे -राजकीय, सामाजिक आणि आरोग्य विषयाला धरून. चौदा - पंधराच्या वयात आपली मम्मा बदलली पाहिजे या जाणिवेचे अयशस्वी रोपण करून झाले, स्वतःला आणलेले मेकअप चे रंग , नवीन फॅशन चे कपडे आधी मी बदलायला हवं म्हणून मला दाखवून आणि नंतर या दिखाव्याचा कंटाळा आला म्हणून आता टाकवत नाही , तू तरी वापर म्हणून माझ्या कपाटात ठेवून झाले . त्यानंतर माझ्या जुन्या फॅशनच्याच कपड्यांचा , कानातल्या डुलांचा नाद लागला आणि ते आपोपाप कपाटे बदलू लागले! या सगळ्यात माझ्या कामाच्या व्यापातून आणि थोड्या कंटाळ्यातून तिच्या अभ्यासाकडे माझे दुर्लक्ष झालेच - एक तर इंग्रजीत सगळे विषय त्यात निम्म्या विषयांशी माझं उभं वैर , स्वतः कधी रेटून अभ्यास केला नाही त्यामुळे स्वतःला नसलेली मूल्ये मुलांवर लादण्यातून येणारा दांभिकपणा मला झेपणारा नव्हता , त्यामुळे इतिहास आणि समाजशास्त्रे वगळली तर ती काय शिकते आहे हे मला फक्त पालक सभेत तिचे शिक्षक तिच्या कामाची स्तुती करू लागले की कळायचे , बऱ्याचदा शाळेच्या वार्षिक दिनी तिला सगळी राखीव बक्षिसे मिळाल्यावर कळायचे की असा पण विषय तिला होता आणि त्यात तिने विशेष प्राविण्य मिळवले आहे . त्या दिवशी संध्याकाळी सेलिब्रेशन म्हणून जेवायला बाहेर गेले की मग हि सांगायची , ' एवढं मनाला लावून घेऊ नकोस, त्यादिवशी जो वाद आपण अमक्या विषयावर घातला होता , तीच तर माझी सोशोलॉजीची असाईनमेंट होती , मला दोन्ही बाजू मांडायच्या होत्या आणि तू छान काँट्रीब्युट केलंस . किंवा ओरिएण्टल पोएट्रीवर तू जे मला तू शिकलेल्या कवितांबद्दल सांगितलेस तेच तर लिहिले होते, त्यालाच मला चेअरमन्स ट्रॉफी मिळालीये. त्या ट्रॉफी मला आणखीनच छान वाटल्या तर नवल नव्हते. अशी माझी लेक -- बारा तेरा वर्षांपासून अभिजात साहित्य, तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र , इतिहास कला या विषयात रमणारी, घरची आणि बाहेरची सगळी कामे जबाबदारीने सांभाळणारी, माझ्या कामात मला वेळ मिळत नाही म्हणून छोट्याच्या सगळ्या हॉबी , शाळेचे कार्यक्रम सांभाळणारी आणि कधी मधी माझी आई बनायचा प्रयत्न करून दमात घेणारी ...
नात्यागोत्यात फार रमलो नाही पण नानी , मावशांच्या घरी थोड्या सहवासातच सगळ्यांची लाडकी, वर्षानु वर्षे भेटी झाल्या नाहीत तरी आपली मुळे जाणून घ्यायची ओढ आहेच . स्वतःची स्वतःला ओळख होण्यातला हा पहिला टप्पा , खूप प्रश्न मग गप्पा गोष्टी आणि त्यातून जसे उमजेल , समजेल तसा स्वतःचा मी कोणचा प्रवास . यात सुरुवातीचे कुतूहलाचे प्रश्न जाऊन , थोडे तिरकस प्रश्न यायला लागले तेव्हा जाणवले की काहीतरी वेगळं पाणी मुरतंय . बऱ्याच वेळा हसत खेळत विचारलेल्या प्रश्नाचे अनपेक्षित रित्या एक दिवस उत्तर आले . माझा बॉयफ्रेंड आहे आणि मी त्याला घरी बोलावू का ? कोण , काय , कसा वगैरे झाले आणि अर्थातच स्वारी घरी आली , गप्पा झाल्या , जेवणं झाली आणि वर्ष सहा महिने त्या विषयावर जुजबी बोलणं झालं . सगळं नॉर्मलच या पिढीत , तेही इंग्लंडात आणि अजून कॉलेज चालू आहे , अभ्यासावर लक्ष आहे , मोकळं बोलते मग काय काळजी असं मनाला समजावत , त्याच्याबद्दलच्या काही न पटलेल्या गोष्टी फारशा न बोलता , मागे सारत दिवस जात होते . मग एक दिवस सुट्टीला त्याच्या घरी जाऊन आल्यावर आता त्याला पण आपल्या घरी राहायला येऊ दे असा सूर आला आणि मी लटपटले. प्रश्नांची सरबत्ती पुढे जेव्हा जेव्हा हा विषय आला तेव्हा आणि त्या सगळ्या वेळी मला पटेल असे उत्तर न देता आल्यामुळे माझी कोंडी . दोघींची घुसमट एके दिवशी ऐरणीवर आली मात्र ---
शनिवारची सकाळ , चहा झाल्यावर मला घेऊन गार्डन मध्ये अगदी समोरासमोर , आधीच मोठे असलेले डोळे आणखी मोठे करत - लेक विचारत होती , सांग मला काय प्रॉब्लेम आहे - त्याच्या जागी मुलगी असती तर तो घरी राहायला येऊ दिले असते . तुला कसली भीती वाटते ? morality चा प्रश्न असेल तर तसे सांग आणि काय morality ते हि स्पष्ट सांग . तुझ्या निम्म्या पेक्षा जास्त मैत्रिणी त्यांच्या बॉयफ्रेंड्स बरोबर तशाच राहतात आणि माझ्या इथल्या मैत्रिणी पण . भारतातलं म्हणशील तर सगळ्या तिथल्या माझ्या लहानपणच्या मैत्रिणी ज्यांना तू हि ओळखतेस त्या सगळ्यांचे बॉयफ्रेंड्स आहेत आणि लिविंग इन नसल्या तरी त्यांच्या रिलेशनशिप तू किंवा अमकी तमकी मावशीची जशी होती , तशी निश्चितच नाहीये . अभ्यासाचं म्हणशील तर तुला कधी त्याची काळजी मी करू दिली नाही आणि मला माझ्या , अभ्यासाच्या , घरच्या जबाबदाऱ्यांचं भान आहे . आणि बॉयफ्रेंड म्हणजे फक्त सेक्ससाठी हपापलेले आणि नाजूक वय बीय असं काही नाहीये. तुझ्यापेक्षा या विषयाची जास्त शास्त्रीय माहिती मला आहे , त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या हि मला समजतात कारण आठवी - नववी पासून आमच्या वर्गात कोणीतरी गरोदर मुलगी आहे आणि सगळ्या सुविधा मिळत असल्या तरी त्यांची होणारी फरफट मी बघितलेली आहे . आमच्या दोघांचे खूप इंटरेस्ट कॉमन आहेत आणि एकमेकांसोबत वेळ घालवायला आम्हाला आवडते. तो दुसऱ्या शहरात राहतो त्यामुळे रोज भेटता येत नाही म्हणून सुट्टी असेल तेव्हा एकत्र राहायला काही हरकत नसावी असं मला वाटतं . सांग आता तुझा नक्की आक्षेप कशाला आहे ते? --गेले सहा महिने या विषयावर अनेक पैलूनी बोलणे झाल्यामुळे मला कुठलाच मुद्दा खोडता येत नव्हता . सगळ्या समाजशास्त्रीय संकल्पना अगदी लहान वयापासून संभाषणात असल्यामुळे आणि संदर्भासहित स्पष्टीकरणावर आधारित सर्व चर्चा , त्यात भाषेवर प्रभुत्व त्यामुळे इतर वेळी आता मी दमलीये , नको परत तीच चर्चा अशी काही पळवाट ही नव्हती . मला जे वाटत होतं ते खरं होतं की मला एक तिऱ्हाईत व्यक्ती , जी तिला खूप प्रिय होती , ती घरात येऊन राहणे नको होते . यावर तुझे कित्येक मित्र , मैत्रिणी येऊन राहतात तेव्हा आम्ही नाही का ऍडजस्ट केलं , मुळात त्यांना कधी परकं मानलं नाही , हा मुद्दा आलाच . शेवटी वैतागून म्हणले , हे बघ हे घर मला चालवायचं आहे आणि त्यासाठी काही नियम, काही बाऊंड्रीज मला ठरवाव्या लागतील आणि त्यामुळे मला कम्फर्टबेल नाही वाटत आहे तू विचारत आहेस ते . यावर दोन मिनिटे शांत राहून- म्हणजे हे घर माझं नाही , ठीक आहे , असं म्हणून आमची मिटिंग संपवून गेली आपल्या रूममध्ये . असं काही मला म्हणायचं नव्हतं आणि अभिप्रेतही नव्हतंच पण तोंडातून निघून गेलं त्याला उशीर झाला होता . मुख्य परीक्षेच्या दोन महिने आधी लेकीचा घर सोडायचा निर्णय पक्का झाला होता . काही बोलणं , रागावणं , थोडे जमतील तसे नाटकी बॉलीवूड डायलॉग ( हे दोन्हीकडून असतात, काही सुचले नाही कि , भावनेचा अडसर नसतो यांना, आपसूक सुचतात) सगळं करून झाले , पण तिसऱ्या दिवशी पॅक करून , गळ्यात पडून निरोप घेतला . मधल्या दोन दिवसात थोडं सामोपचाराने घ्यावे म्हणून तिच्या मधून मधून येणाऱ्या तक्रारीवजा आरोप ऐकून अगदी हतबल व्हायला झाले होते. इतकी वर्षे आपण एका वेगळ्याच फसव्या जगात राहत होतो की काय , का खरंच आपण हिची आबाळ केली असे वाटायला लागले होते. राग तर नव्हताच पण बोलताही न येणे इतःपर बोलून झाल्यावर , तीच म्हणाली हे सगळं आपल्या दोघींसाठी फार त्रासदायक आहे , याची जाणिव आहे मला , पण हे बोलायलाच हवे, आता नको, मी सगळं लिहून पाठवेन. जायच्यावेळेस अर्धा तास सगळेच सुन्न अश्रू गाळत होतो , फक्त माहीचा टाहो काही थांबत नव्हता .
पुढचे चार दिवस अगदी सुनसान होते , आवाज आला तर तो माहीच्या हुंदक्यांचा किंवा खूप रडून दमून झोपल्यावर सुस्कारण्याचा. मग शाळा , ऑफिस सुरु झाले , हळू हळू जवळच्या मैत्रिणींशी, बहिणींशी बोलले , प्रत्येक जण आपापल्या परीने विश्लेषण करत सांत्वनाचा प्रयत्न करत होता , जितक्या संमिश्र भावना माझ्या होत्या त्याच्या दुप्पट प्रतिक्रिया आल्या , कोण म्हणाले तिच्यावर खूप अकाली जबाबदारी होती, कोणाला प्रचंड राग, इतकं आयुष्यभर तू तिचं केलंस आणि आता असं सोडून गेली, कोण म्हणे बापाचं प्रेम नाही मिळालं , तुझ्या सगळ्या स्थित्यंतरात तिची आबाळ झाली ई . इ . काय खरे , किती खरे कोण जाणे पण जेव्हा अशी काही दुःखाची वेळ येते तेव्हा बरेच जण आपली पण , व्यथा व्यक्त करत असतात. या निमित्ताने बऱ्याच मैतरणी , नातेवाईक यांनी आपापली कहाणी ऐकवली , जितकी नाती तितक्या कथा . एकदा ऑफिसच्या मीटिंगमध्ये केस डिस्कशन मध्ये काहीतरी आठवले आणि आणि डोळे भरून आले , सगळ्या टीम मध्ये कळले , तिथेही बऱ्याच जणांनी त्यांचे मन मोकळे केले . हे सगळे ऐकताना एक गोष्ट जाणवली ,'देख के दुनिया की होली ( ओरिजिनल दिवाली ), दिल मेरा चुपचाप हुआ ... लेकीचं बंड फार काळ टिकले नाही . दोन आठवड्यांनी घरी आली काही तास , जेवली , बोलली , पुढचे प्लॅन सांगितले आणि परत गेली . दोन तीन आठवड्यांनी येणं होत राहिलं , एक दोन दिवस , मग चार , आठ असं करत आता येते वेळ काढून . मधल्या काळात सगळ्या परीक्षा सर्वोच्च नंबरांनी पास झाली , हव्या त्या युनिव्हर्सिटी मध्ये हव्या त्या विषयात स्कॉलरशिप मिळवून ऍडमिशन नक्की केले , मग एवढ्यात तीन वर्षाचा आणि एकूणच करियर करायचा निर्णय होत नाहीये म्हणून एक वर्ष गॅप वर्ष घेतले. नऊ महिने नोकरी केली , वर्षभराचा खर्च निघेल एवढी बँकेत जमा ठेवून चार पाच देश फिरून आली . आता ऑकटोबरला सुरु करेल डिग्रीचा अभ्यास. सगळ्या विद्यापीठांचा तुलनात्मक अभ्यास , तिथे राहण्याचा खर्च , डिग्रीच्या मोड्युलमध्ये काय विषय आहेत , त्यांचा पुढे करियर मध्ये काय उपयोग हेही सगळे तिथे जाऊन करून आलीये आणि पुढे काय करायचंय हेही बरंच स्पष्ट आहे .
यावर्षी ईस्टर ला वर्ष झालं आमच्यातल्या त्या तणावपूर्ण ताटातुटीला . सुरुवातीचं दुःख पचवत एकेक गोष्ट अलगद उलगडायला लागलीय . तेव्हा जे काही वाटलं - तिचं नातं , घर , माझी ऑथॉरिटी नाकारणं , स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडणं , त्यातून निघालेले वेगवेगळे अन्वयार्थ , आलेली विमनस्कता, अगतिकता आणि तिच्याशिवाय हळूहळू बसलेली माझ्या जीवनाची घडी .. यातल्या सगळ्या भावना , अर्थ आपापल्या परीने काही अंशी बरोबर होते पण आता वर्षभरानंतर कळलेली एकच गोष्ट -- हे होणं साहजिक होतं . माझं आणि तिचं जगलेलं जिणं कशाही प्रकारचं असलं तरी तिचं स्वतंत्र होणं , जी काही ऑथॉरिटी आहे , आणि तिच्या आयुष्यात कितीही समंजस असले तरी मीच ती ऑथॉरिटी होते , त्याविरुद्धच तिचं बंड करणं हे तिच्या नवीन अस्मितेच्या शोधायला पहिला टप्पा होता . माझ्याविरोधात जे जे तिला तेव्हा वाटलं ते त्या क्षणी जायज होतं कारण तिला त्या metamorphosis साठी लागणारी ऊर्जा कशाला तरी जोरदार नकार म्हणून येणाऱ्या प्रतिक्रियेतूनच येणार होती .
आताच गेली दोन आठवडे राहून , काही पूर्वीची मनू तर बरीचशी बदललेली आताची ही तरुणी मनू . छान वेळ गेला एकमेकींच्या संगतीत , लांबवर फिरून आलो , वाटेत दिसणाऱ्या अनेक नमुन्यावर यथेच्छ टीकाटिपण्णी करत खिदळत समुद्रकिनारी भटकलो . मस्त भाज्या आणून वेगवेगळे पदार्थ एकमेकांसाठी केले , तिनं पेंटिंग , माहीच गाणं आणि माझा स्वयंपाक अशा मस्त सांजा घालवल्यावर रात्री माझ्या बेडमध्ये घुसून रजई इकडची तिकडची ओढत आपापली पुस्तके वाचली. एकाच वेळी Gabriel García Márquez आणि JK Rowling बद्दल तितक्याच passionately दोघा मुलांकडून ऐकत झोप लागणं , यासारखं सुख नाही , हे पुन्हा अनुभवलं . एक शब्दही न बोलता तणावाच्या काळात आलेले मळभ दूर झालंय आणि नव्या जाणीवा , नव्या दिशा गवसलेल्या या वाढलेल्या मुलीबरोबर राहण्यात वेगळाच आनंद आहे . मोठी झाली आहे सर्वच अर्थाने , बऱ्याच गोष्टी स्पष्ट आहेत , आपली वेगळी मते ठाम मांडते आहे पण आधीचा अभिनिवेश गेला आहे , त्याजागी समंजसपणे मला असं वाटतं म्हणून मुद्देसूदपणे स्वतःला जे वाटतं ते सांगणं आणि इतरांना कदाचित का रुचणार नाही याची कारणमीमांसा करणं दोन्ही जमतंय . आणि खरं तर हे ऐकण्यात , समजण्यात इतकं गर्क व्हायला होतंय मला की आमचा दोघींचा एकाच वेळी एकमेकींशी संवाद आणि त्याचबरोबर स्वतःशी एक long epilogue चाललाय असं वाटतं.
माझ्यावरच्या आक्षेपात एक आक्षेप असाही होता की मी घरी पण फार मॅनेजर सारखी वागते आता तेच पालटून माझं घर आणि कामातलं व्यवस्थापन कसं agile आहे आणि त्यातून ती कसं काम , शिक्षण आणि तिचं रोजचं जीवन सांभाळायला शिकली हे ऐकलं की नकळत हसू येते. पण त्याचबरोबर पुढच्या चार वर्षाचं तिचं शिक्षण , logistics आणि फायनांस मॅनॅजमेण्ट बघितलं की ती तिच्या आणि माझ्या नकळत किती माझं बघून शिकली आहे आणि उगाचच सहा महिने आपण आपल्या करियर माइण्डेड वागण्याला दूषणे देत राहिलो याचे जास्त हसू येते . उच्च शिक्षणाच्या सगळ्या सोयी समोर असून हिला पुढे जाऊन शिक्षिका बनून शासकीय शाळेतच शिकवायचं आहे , याच्यामागची गरीब घरातून येणाऱ्या मुलांविषयीची कळकळ आणि तिच्या आजी आजोबांचे कामाचा जो काही तिला कळलेला आदर्श आहे , त्याबद्दल नवल वाटत नाही . जसजसा वेळ जातोय तसतसा तिच्या व्यक्तिमत्वाबरोबर आमच्या नात्याचा एकेक वेगवेगळा पैलू समोर येत आहे . एका अर्थाने आमच्या दोघींचा हा नवीन जन्मच आहे . पहिला जन्म असतो बाळ शारीरिक रित्या विलग होण्याचा , यातल्या वेदना आणि associated risks माहित आहेत पण हा दुसरा जन्मही तितकाच महत्वाचा , आपली भावनिक आणि authoritarian नाळ तोडण्याचा . पारंपरिक व्यवस्थेत एका अर्थी लग्न लावून मुलगी सासरी गेली की काही अंशी हे विलग होणं साधलं जायचं पण पूर्णतः यातून बाहेर पडता येत नाही . गेली वीस वर्षे मुलीचे संगोपन, शिक्षण यातच तसं पाहिलं तर माझं आयुष्य फिरत होतं . एकल पालकत्व काही अंशी लादलं गेलं असलं तरी त्याची खंत किंवा विषाद नव्हताच , किंबुहना पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं मला , आपल्या परीने मुलांना वाढवायचं . त्यांनी त्रास दिला नाही किंवा त्यांच्या जबाबदारीचा त्रास मला झाला नाही कारण प्रत्येक टप्प्यावर मदत करणारे बरेच मित्रमैत्रिणी आणि स्वकीय मिळाले , पण तरीही एका परीने मी या जबाबदारीत बांधले गेले होते . गेल्या वर्षभरात खूप मोकळं ही वाटतंय . लेक मोठी झाली आहे आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र ही. त्या प्रक्रियेत नकळत मीही स्वतंत्र झाले आहे , तिच्या शिवाय बऱ्याच गोष्टी आधी अपूर्ण वाटायच्या आता वेगळ्या वाटतात. तिची वाटचाल अशीच स्वतंत्र चालत राहणार , संवाद मात्र चालू राहील, एकमेकींच्या स्वायत्त प्रवासांबद्दलचा, मधूनच येणाऱ्या सामायिक थांब्यांचा , नवीन वळणांचा , एकमेकींना समजण्याचा आणि त्यात स्व उमजण्याचा.
कितीही मोठी होवो , कुठेही राहो काही गोष्टी बदलणार नाहीत हे दोघीनांही पक्क माहित आहे आणि त्याच्यामागचे ठरलेले कारणही - माँ का दिल ! म्हणूनच आता दोन महिने ग्रीस , इटली तल्या कुठल्या शाळांमध्ये शिकवणार आहे , तिथले सगळे पत्ते , फोन नंबर पाठवलेत. केला तर फोन लगेच उचलणार नाही याची दोघीना खात्री आहे तरीही . किंवा जाताना खाण्यापिण्याच्या हजारो सूचना आणि आल्यावर कशी अशक्त झाली आहे यावरचे निरूपण -- हे सगळे आहे आणि तसेच राहणार . म्हणून मोठी झाली म्हणून आम्ही काही मैत्रिणी बैत्रिणी नाही होणार . कितीही स्वतंत्र , स्वायत्तपणाचा डंका पिटला तरी प्रत्येक वेळी निघाली की पोटात तुटतेच कुठेतरी - तो अदृश्य बंध अबाधितच आहे आणि तसाच राहणार - एक मुलगी म्हणून इतकी वर्षे अनुभवला होता एक आई म्हणून पुन्हा त्याचा वेगळा अनुभव आहे , वेदनादायी तितकाच सुखद ही ...

2 comments:

  1. अनेक ठिकाणी अगदी अगदी असं झालं. तर अनेक ठिकाणी थांबून विचार करावा वाटला. काही ठिकाणी हम असं तर काही ठिकाणी खरच असं मन घट्ट करावच लागतं असं झालं.
    तुम्हा मायलेकीचा बंध असाच टिकणार याची खात्री आहे. अन आईपणाचे सगळे तथाकथित संस्कार न देता अतिशय सजग संस्कारी मुलगी तुम्ही वाढवलीत. ब्राव्हो!
    हे सगळं शब्दात उतरवता येणं, फार फार अवघड. जमलय तेही! मी प्रेमात तुमच्या :) दोघींच्याही!

    ReplyDelete
  2. >>>एका अर्थाने आमच्या दोघींचा हा नवीन जन्मच आहे . पहिला जन्म असतो बाळ शारीरिक रित्या विलग होण्याचा , यातल्या वेदना आणि associated risks माहित आहेत पण हा दुसरा जन्मही तितकाच महत्वाचा , आपली भावनिक आणि authoritarian नाळ तोडण्याचा .<<< हे फार फार पटलंय

    ReplyDelete

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...