दोन आठवड्यापूर्वी भारतातून आयुर्वेदिक औषधे आली आणि त्याचबरोबर वैद्यबुवा- खरेतर वैद्यापोरगाच -ने लिहिलेली सुवाच्च अक्षरातील मराठीतील चिट्ठीही . कित्येक वर्षांनी असं हस्तलिखितातलं पञ हाती आलं या आधी २००५ सालच्या जुलैमध्ये बाबांचे शेवटचे आंतरदेशीय पञ आले होते , ते अजून जुन्या फाईलमध्ये आहे. त्यानंतर फोन इतके स्वस्त झाले आणि त्याचबरोबर संवाद संपून फक्त कोरड्या चौकशा नियमित होत राहिल्या. औषधांचे वेळापञक असली तरी हस्तलिखितातली ही 'वतन की चिठी फारच अस्वस्थ करून गेली. शनिवारची घरची सगळी कामं करताना होस्टेलला असताना आणि नंतर नोकरीनिमित्त इतर ठिकाणी नियमित माँ आणि बाबांची आलेली पञ राहून राहून मला आठवत होती. असं काही असलं की इथे कोणाशी बोलता येत नाही मग कुठेतरी लांब फेरफटका मारत आपलं आपल्याशीच बोलायची सवय झाली आहे आता. शनिवारची दुपार अशीच पूर्ण ब्रायटन मध्ये फिरत घालवली. पायाचे भ्रमण आणि आतले भ्रमण काहीही destination न ठरवता केले की अनेक नेहमीच्या वाटेवर असणाऱ्या पण इतर वेळी न जाणवणाऱ्या गोष्टी समोर यायला लागतात. या पत्रा तुन बाबा असेच जाणवायला लागले , त्यांची सुरेख वळणदार अक्षरातील वेगवेगळी पत्रे, त्यातला मजकूर , खाली केलेली सही यातून त्या जवळ जवळ वीस वर्षातल्या त्यांच्या आयुष्यातल्या घडामोडी आठवायला लागल्या. बाबा आणि माँ दोघांची पत्रे फार वेगळी असायची - दोघेही आपापल्या परीने आदर्शवादी. पत्रे जरी आम्हाला लिहिली असली तरी त्यांचे स्वतःचे मुक्तचिंतन त्यातून असायचे. बाबांच्या लिखाणात साने गुरुजी डोकावयाचें तर माँची पत्रे म्हणजे सुहास शिरवाळकरांना प्रेरणा देतील असे उताऱ्यावर उतारे असायचे . शनिवारी असे खूप उतारे, उपदेश , घरी चाललेल्या आणि आम्हाला कळवलेल्या घडामोडी , दोघांच्या अपेक्षा ,काही व्यथा असं सगळं डोळ्यासमोर यायला लागले होते . इतकी वर्ष डोक्याच्या कुठल्यातरी कप्प्यात नीट रचून ठेवलेला हा खजिना समोर येत होता , अजूनही बरंच काही आठवत होते. शनिवार -रविवारचा धबडगा संपून सोमवारपासून ऑफिस सुरु झाले पण मन असेच कुठेतरी भरकटत होते. बरेचसे हसवत होते पण खूप विषन्नहि वाटत होते.
काळ सकाळी सगळे आवरून ऑफिसला निघत होते , चहा घेताना घड्यलाकडे बघितले , २६ जानेवारी सकाळचे ७.३० . यादिवशी सकाळी वेगळीच गडबड घरी असायची. सात वाजताचे झेंडावंदन , माँ त्याआधी गुळातला शिरा करायची, बाबा तिच्या पांढऱ्या साडीला इस्त्री करत असायचे , कोपऱ्यात रेडिओवर आकाशवाणीवरून दिल्लीला चाललेल्या कार्यक्रमाचे निवेदन सुरु असायचे .. नेहमीच २६ जानेवारीला सकाळी हा सीन आठवतोच , काल अगदी रडायला आले. तेव्हापासूनची अस्वस्थता काही जात नव्हती. ऑफिस , घर , कामे , माहीचा अभ्यास , क्लास, फेसबुक , जुने फोटो सगळे करून झाले तरी सतत डोळे भरून येत होते. नाहीतरी इतकी थंडी आणि बाहेर उदासवाणं वातावरण आहे त्यामुळे seasonal disorder आहे , उद्या d vitamin घेतले कि बरे वाटेल असं म्हणून झोपायला गेले आणि एक एक लिंक लागायला लागली . शांतपणे दोन तास रडून झाले तेव्हा जाणवले गेल्या चार वर्षात बाबा गेले तेव्हापासून हे सगळे साठले होते. त्या दिवशी सकाळी साडेचारला तैयबचा फोन आला तेव्हा पहिला कोरडा प्रश्न तिला ," तू कसं घेऊन जाशील सांगलीहून पाचगणीला "? तिने पण नेहमीप्रमाणे " तू काळजी करू नकोस , ऍम्ब्युलन्स बोलावली आहे , मी घेऊन जाईन, तू माँ शी बोल ती घरी आहे, " अगदी शांतपणे सांगून पुढची सगळी तयारी तिने केली. नाहीतरी तीन महिन्यापासून बाबांना उचलून घेऊन हॉस्पटिटलमध्ये नेण्यापासून ते त्यादिवशी त्यांचा मृतदेह पाचगणीला घेऊन जाईपर्यंत तिनेच सगळे काही केले होते. मी सगळ्यापासून दूरदेशी त्यामुळे इतकी वर्षे घरच्या सर्व गोष्टी तिनेच समर्थपणे सांभाळल्या होत्या. दीड महिन्याआधी बाबा icu त गेले तेव्हा फोन करून मला सांगितले होते की आता तू येऊन जा, बाबा 'लाडक्या लेकीची' वाट बघतायत. जेव्हापासून आठवतं , तेव्हापासून 'बाबांची लाडकी' हे बिरुद नावामागे लागले आहे . हॉस्पिटलमधली पुढचे तीन आठवडे अनेक नातेवाईक ज्यांना मी २०-२५ वर्षे भेटले नव्हते आणि जे माझं नाव घ्यायला ही तयार नव्हते त्या सगळ्यांकडून पुन्हा पुन्हा तो शब्द ऐकत होते. बाबांची अवस्था मात्र बघवत नव्हती . सगळ्या नातेवाईक आणि बघायला येणाऱ्या गाववाल्याच्या गराड्यात कॉटवर त्यांना हात पाय बांधून ठेवले होते. कोणी कुराणपठण करत होते, कोणी जुन्या आठवणी काढून रडत होते , त्यांचा क्षीण झालेला हात हातात घेऊन मी बराच वेळ बसून होते , त्यांनी एकदा डोळे उघडून बघितले आणि पुन्हा आजूबाजूच्या कोलाहलात ते शांतपणे पडून राहिले. एक दोन दिवसात थोडीशी हालचाल जाणवली, आधी असंबंध वाटणारी बडबड थांबून त्यांनी मला ओळखले , कधी आलीस विचारलं? दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला असं बांधून ठेऊ नका , आंघोळ करायची आहे अस आर्त स्वरात विनवत होते . सगळ्या पट्ट्या सोडून एका वॉर्डबॉय च्या मदतीने त्यांना गरम पाण्याने आंघोळ घातली , डायपर मध्ये अस्वस्थ वाटतंय म्हणत होते, ते काढून टाकले, बाबा हसून म्हणाले मला माहीत होतं तूच ऐकशील माझं म्हणून ! पुढच्या तीन आठवड्यात बाबा घरी आले , पूर्ण बरे नव्हतेच, पण हॉस्पिटल मध्ये ठेवायची गरज नव्हती. माझी तीन आठवड्याची इमर्जन्सी रजा संपली होती आणि मला परतणं भाग होतं . मुलांची सोय करून १-२ महिन्यांची बिनपगारी रजा घेऊन परत जायचा प्लॅन होता , पण तोपर्यंत बाबा गेले होते.
घरात बाबा आणि पाचगणीला कुठेही असले की गुरुजींच्या अनेक आठवणी निघतात . बाबा सोळाव्या वर्षी मास्तर झाले आणि सातारा जिल्ह्याच्या अनेक गावात त्यांनी शिकवले . त्यांच्या हाताखालून चार पिढ्या तरी शिकल्या असतील, पण त्यांचे शिकवणे आणि गुरुजीपण फक्त शाळेपुरते मर्यादित नव्हते . तस त्यांच्या पदाला फार किंमत नव्हती आणि बाबा काही फार करिष्मा असलेले व्यक्तिमत्व वगैरे नव्हते. जात , धर्म, अर्थ आणि राजकारण या सगळ्यातच खालच्या उतरंडीवर असलेला हा माणूस ना तर अधिकाराने मोठा आणि ना कुठलाही दबदबा असणारा . त्यांच्या जहाल , मुलुखमैदान बायकोपुढे तर बऱ्याच वेळा ते केविलवाणे दिसायचे. पण एक होतं की ज्या कोणाला गरज असायची ते गुरुजींकडे मन मोकळे करायला यायचे, पैसा अडका पण काही फार नव्हता पण कुणाच्याही अडचणीला ते कधी नाही म्हणायचे नाहीत- नातेवाईकच असलं पाहिजे असं नाही . गावच्या राजकारणात , समाजकारणात गुरुजींचा सल्ला भलेही ना मानोत , पण त्यांच्या उपस्थिती शिवाय मिटींगा व्हायच्या नाहीत . गुरुजी अगदी लहानपणापासून काँग्रेसचे समर्थक , सातारा जिल्ह्यातली काँग्रेस म्हणजे भाऊसाहेब भिलारे आणि यशवंतराव चव्हाण आणि पुढे राष्ट्रवादीवाले . पण निवडणूक आली कि सगळ्या पक्षाचे बॅनर रात्र रात्र बसून गुरुजीच बनवणार , बऱ्याचवेळा आपले रंग खर्च करून. सगळ्या खानदान मध्ये कोणाचे शिक्षण , दवाखाना निघाला की आधी निसार भाई पण त्याचबरोबर नवऱ्याने टाकलेल्या बहिणीला , विधवा मेव्हणीला त्यांच्या कुटुंबियांना सर्वपरे मदत करण्यात माँ आणि बाबा असायचेच. लहानपणी अशी एकही आठवण नाही की फक्त आम्ही आणि आमचे कुटुंब असे राहिलोय , कोणी ना नकोनी काका , मामा , मावशांची मुले आमच्याकडे शिकायला होती आणि त्या सगळ्यांचे ते बाबा होते , सगळ्या मुलांचा लाड करणारे आणि कधीही कोणालाही एका अक्षराने त्यांनी दुखावले नाही . माँ चा संघर्ष मात्र फार वेगळा होता , सामाजिक आर्थिक आणि काही अंशी धार्मिक प्रथा च्या विरोधात ती अगदी ठामपणे उभी राहिली, मुलींच्या शिक्षणासाठी सगळ्यांशी ती भांडली , त्यामानाने तेव्हा बाबांचा काहीच स्टॅन्ड नसायचा . बऱ्याचवेळा मा आणि इतर भावंडे त्यांना त्यावरून टाकून बोलायचीही , पण त्यांनी प्रतिवाद असा केला नाही. मनातून खूप दुखी व्हायचे आणि बऱ्याचवेळा बोलून दाखवायचे , त्यांच्या पात्रातून ही व्यथा खूप व्यक्त व्हायची. मागे वळून पाहताना आता जाणवते की त्यांनी स्वतः पुढाकार घेतला नाही पण माँ ला आडकाठी ही केली नाही , शांतपणे काही वेळा नाईलाजास्तव का होईना ते तिच्या पाठी उभे राहिले हे खरे . घरी त्यांना कुठलेही काम व्यर्ज नव्हते. शेवटपर्यंत आपले कपडे हाताने धुवायचे. लहानपणी शर्ट पॅंटीत बघितलेले बाबा आठवतात पण नंतरच्या वर्षात नेहरु शर्ट आणि पायजमा आणि डोक्यावर टोपी...आयुष्यभर गांधी ९२-९३ नंतर जमाती. पण टोपी बदलली म्हणून बाबा फार काही बदलले नव्हते...आजूबाजूच्या बदलत्या समाजकारणात त्यांच्यासारख्यांची घुसमट आणि फरफट बघणे कलेषदायकच होते.
थोडी जाण आल्यावर नेहमी वाटायचे की आपले बाबा दुसऱ्या बापांसारखे नाहीयेत , आपल्याला मार्गदर्शन करणारे, पुढे होऊन हिरीरीने सगळं काही आखून रेखून देणार आपलं कोणी नाहीये . आज दोन मुलं वाढवतना हे अगदी प्रकर्षानं जाणवतं की असं आखून रेखून काही कोणाचं आयुष्य बनवू शकत नाही . बाबा प्रत्येक पावलावर सोबत होते , पुढचे पाऊल कुठे , कसे टाकायचे हे ना तर त्यांना माहीत होते ना मला . पण जशी पाऊले पुढे टाकत गेलो तसा मार्ग सापडत गेला . वाटेत बऱ्याच वेळा काटे लागले, वळणे लागली , स्वतःवरचा विश्वास कमी वाटला , मार्ग आणि आत्मविश्वास दिसला तरी आर्थिक कुवत कमी पडली अशा सर्व वेळी तारणहार म्हणून नाही पण सोबती म्हणून बाबा होतेच होते. या सर्व प्रवासात माझे सगळेच निर्णय त्यांना भावणारे , परवडणारे नव्हते त्या सगळ्याची किंमत हि त्यांनी मला न कळू देता चुकवली . तीन आठवडे हॉस्पिटल मध्ये आधी मला टाळणारे , टोमणे मारणअरे बरेचशे गावकी भावकी सांभाळणरे नातेवाईक जेव्हा माझ्याशी बोलू लागले तेव्हा मला माझ्या आंतरधर्मिय लग्नामुळे माँ बाबाना किती सामाजिक बहिष्कार आणि आर्थिक दंड बसला ते कळले. कितीही मनस्ताप झाला तरी जिथे जिथे मी नोकरीसाठी गेले तिथे बाबा माझ्या सोबतीला राहायला आले होते . त्यांचा आदर्शवादी उपदेश आणि राजकीय विश्लेषण याची आम्हा बहिणींनी कितीही खिल्ली उडवली तरी , बाबा बोलणारच आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचं त्यांना त्यामुळे कौतुक असायचे . इंग्लडला आल्यावर आमच्या भेटी साहजिकच कमी झालय . त्यात त्यांना कमी ऐक्याला येऊ लागले तेव्हापासून फोनवर संभाषण पण सीमित झाले. हॉस्पिटलमध्ये असताना बोलता येत नव्हते पण पेपरमधल्या शरद पवारांचा फोटो बघून हातवारे करत त्यांनी त्यांचे भाकीत करून टाकले होते. इस बात पे खुश होके , तैयबाची नजर चुकवून त्यांना खूप दिवस हवा असणारा चहाचा एक घोट मी त्यांना दिला होता -- इतना तो बाबा के लिये बनता है -आयुष्यभर त्यांनी मा ची असांख्य बोलणी खाऊन हि सगळ्या मुलांना बेकरीचेपदार्थ , गोळ्या बिस्किटे नियमित स्वरूपात दिली होती. साताऱ्याला गेले की माझ्या साठी पालेकर बेकरीचे टोस्ट आणि लक्ष्मिनारायण चिवडा आणल्याशिवाय ते यायचे नाहीत . घरात सगळ्या मुलांना हा चिवडा 'बाबावाला चिवडा' म्हणूनच माहीत आहे.
बाबांचा मला किंवा कोणालाच घरी धाक किंवा दरारा वाटलं नाही, मला प्रेम आणि कणव मात्र जाणवायची. हळव्या आणि आदर्शवादी माणसाचं जे होतं , तेच बाबांचेही झाले . वैयक्तिक आणि सामाजिक जगात त्यांच्या आदर्शाप्रमाणे गोष्टी होणाऱ्या नव्हत्याच , त्याचे वैषम्य त्यांच्या बोलण्यातून , लिखाणातून जाणवायचे . आपण फार दुर्बळ ठरू लागलो आहोत हे त्यांच्या मनात ठसले होते आणि त्यांच्याप्रती आपुलकी जिव्हाळा असला तरी त्यांच्या संकल्पनेनुसार काही कोणी जगणार नव्हते . निवृत्तीनंतर त्यांना आपण निरुपयोगी आहोत हे खूप वाटत राहायचं . त्याचवेळी आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यावर असताना कदाचित आपला बाप अधिक खंबीर असता तर आपल्या आयुष्यात काही गोष्टी वेगळ्या घडल्या असत्या असंही मला खूप वाटायचं . शेवटी आपला पितृसत्ताक समाज पुरुषाची , बापाची एक स्ट्रॉंग माचो अशीच प्रतिमा आपल्या मनात नकळत घडवत असतो . स्वतःच्या आयुष्याकडे बघताना जेव्हा psycho-dynamic perspective ने घटनांचे मूल्यमापन करताना आपल्याकडे strong male role model नाही अशी बऱ्याच काळ माझी धारणा होती.
मध्ये एक दोनद मनू फार विचलित झाली होती आणि फोनवर बोलताना म्हणाली आज बाबांची फार आठवण आली . लहानपणी खूप अस्वस्थ वाटले की मी त्यांच्या हाताला धरून बसायचे . त्यांच्या स्पर्शात एक दिलासा असायचा आणि मनूला आणि मला, दोघीना त्या स्पर्शाची , त्यांच्या रुजू नजरेची अशा वेळी आठवण येते. सगळी भावंडे - काका , मामा, मावशा, आत्या अशा सगळ्या भावंडांबरोबर बोलताना बाबांनी दिलेल्या ५/ १० पैशाच्या आठवणी, त्यांनी खांद्यावर बसून बाजार किंवा शाळेत नेल्याच्या आठवणी , कोणी ओरडले कि हळूच जवळघेऊन दिलासा देणाऱ्या त्यांच्या अनेक आठवणी निघतात . आमच्या सर्वांच्याच भावविश्वात या माणसाचे वेगळे आणि अढळ स्थान आहे कारण त्याच्यातले हळवेपण, जिव्हाळा आणि आपुलकीने आम्हा प्रत्येकातल्या ----it has touched our soul.
या सगळ्या गोतावळ्यात 'बाबांची लाडकी' म्हणवून घेण्यातलं सुख वेगळं च आहे आणि घराबाहेर पडलं की अजूनही 'गुरुजींची मुलगी' म्हणून पाचगणीत आणि पंचक्रोशीत मिळणारा भाव न्यारा आहे .
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपले आई बाप वेगळेपणाने कळू लागतात , बाबा असे आता उमगायला लागलेत आणि अधिकच जवळचे वाटू लागले आहेत. त्यांना हे सगळं काही सांगू नाही शकणार पण तशी संधी असती तरी कदाचित सांगू ही शकले नसते. आई बाप जसं लहान मुलाचं प्रत्येक नवं पाऊल , हसू, चालणं , उठणं , बोलणं अगदी मनात भरून ठेवतात , त्या प्रत्येक हालचालीबरोबर स्वतः पालक म्हणून घडत जातात, तसंच काही आता reverse process मध्ये माँ बाबा पालक म्हणून समजायला लागले आहेत and it is just so beautiful...
28th January, 2017
No comments:
Post a Comment