Wednesday 17 May 2017

अरिट्झ

त्या दिवशी संध्याकाळी माही थोडा उशिराच घरी आला . येता येता वाटेत इंग्लिश शिकवणाऱ्या इन्स्टिट्यूट मधून काही पत्रके त्याला हवी होती. वर्गात नवीन मित्र झाला होता आणि तो स्प्यानिश असल्यामुळे त्याचं इंग्रजी कच्च होतं . कोण हा मुलगा तर त्याचे नाव अरिट्झ , त्याच्या आईचे डोळे पेरूवियन आहेत . म्हणजे काय तर चायनीज, जापनीज लोकांसारखे नाही तर पेरूमधल्या लोकांसारखे आहेत . आई पेरूवियन आणि त्याचे वडील स्पेनचे आहेत . बरं बाबा , कुठे वाद घालता पेरुवियन आईजवर , नाहीतरी आपल्याकडे गुलाबी आखे असतातच की! चला आपलं काम करूयात , म्हणून मग उद्योगाला लागलो.
दुसऱ्या दिवशी ऑफिसात फोन, मी अरिट्झच्या घरी जाऊ का? त्याची आई आहे, तिच्याशी बोल. सगळ्या चौकशा करून, पत्ता विचारून मग अर्ध्या तासासाठी जा म्हणले . ऑफिसातून येताना त्यांच्या घरी जाऊन त्याला घेऊन आले. आई बाप फारच अगत्यशील आणि हसरे, सहसा इथे tight upper lip British culture मध्ये hi , hello नंतर एखादं वाक्य बोललं गेलं तर ते त्या दिवशीच्या हवा पाण्याबद्दल असते . मुलांच्या भेटी, खेळ, आठवडाभर आधी अपॉइंटमेंट घेऊन ठरलेल्या असतात. अगदीच प्ले डे असला तर घरी येणे जाणे , उठलं आणि दार वाजवून मित्राकडे गेलो असं कधीच नाही , त्यामुळे या रोजच्या भेटीगाठी मला अगदी कौतुकाच्या वाटल्या. अरिट्झ आणि माही प्रमाणेच त्याची आई योलांडा आणिवडील उनाउ दोघेही अशा संभाषणांना तरसले होते . त्यात तिला इंग्लिश नीट यायचे नाही आणि यु के चा अनुभव नाही म्हणून नोकरीही मिळत नव्हती. उनाउ सोलर आणि विंड एनर्जी या विषयावर कन्सल्टन्ट त्यामुळे त्याची जगभर भ्रमंती चाललेली असते. योलांडा आणि दोन मुले घरी . आजूबाजूच्या फ्लॅट मध्ये सगळे प्रोफेशनल किंवा रिटायर्ड लोकांत राहून ती वैतागलेली असायची . थोडं हळू आवाजात थांबून थांबून , मध्येच इंग्लिश शब्दांची खातरजमा करून तिचे संभाषण असायचे . उनाउ फारच उमदा, आणि कामानिमित्त जग फिरलेला. त्यामुळे वेळ मिळाला की बऱ्याच गप्पा रंगायच्या . माहीला इंग्रजी शिकवायला आणि मास्तरकी करायला संधी आणि त्यात सगळ्यांना बॅडमिंटनची आवड मग जेव्हा जमेल तेव्हा रविवारी सगळ्या मुलांना घेऊन कोर्टात तीन तीन तास खेळ , असा आमचा घरोबा इथे आल्या पासून चांगलाच जमलाय.
पहिल्या भेटीत सगळ्यांनाच भारताविषयी खूप प्रश्न असतात. अशा वेळी जबाबदारीच्या भावनेतुन शक्य तेवढी ब्यालेन्स्ड माहिती द्यायचा प्रयत्न असतो. उनाउ आणि योलांडा दहा वर्ष पूर्वी डेन्मार्क मध्ये दोन भारतीय मुलांबरोबर हाऊस शेअर मध्ये राहिलेले होते. मी काही सांगायच्या आधीच त्यांनी आपले अनुभव सांगितले .
सकाळी सकाळी सहा वाजता घरात करी आणि उदबत्त्यांचा वास आणि त्यात योलांडा ला दिवस गेले असल्यामुळे त्या वासांनी झालेल्या उलट्या हा अनुभव असल्यामुळे ती इथल्या इंडियन रेस्टोरंटची पायरी हि चढणार नाही, असा तिचा प्रण. आणि उनाउ ला सहा महिने आपल्याला इतक्या प्रेमाने संबोधित करताना जो शब्द वापरला जातोय त्याचा अर्थ त्यांनी घर सोडताना सांगितला होता- तो किस्सा सांगताना योलांडा अगदी रागात होती पण उणावू मस्त हसत होता. त्यांच्या मते ती दोन मुले त्याला ,' टकलू ' म्हणजे दोस्त , मित्र असे म्हणायची शेवटी निघताना त्याचा अर्थ कळला . उनाउच्या डोक्यावर शोधून केस नाही त्यामुळे त्याला काहीच वैषम्य नाही . त्या दोन मुलांना डिस्कोथेकमध्ये मुलींचे चोरून फोटो काढल्याबद्दल शिक्षाही झालेली!मग त्याने ओमान मध्ये भेटलेला कोणी जैन सद्ग्रुहुस्थ आणि त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी सांगितल्या आणि त्याच्या शरीर यष्टीकडे बघून कसं कधीच त्याला बॅडमिंटन खेळाशील का असं विचारावासं वाटलं नाही असेही सांगितले. भारतात विविधता आहे, हे कबूल , पण यांना असलेच नमुने का भेटले असा मला डिप्रेसिंग करणरा प्रश्न . त्यानंतर रुटीन बब्रेक्झिट, ट्रम्प , जागतिक अर्थव्यवस्था , राजकारण, ब्रिटन मध्ये मुलांचे संगोपन, इथल्या शाळा , अगदीच माणूसघाणे शेजारी आणि मग परत भेटायचे प्लॅन्स असं गेले काही महिने चाललं होतं . गेल्या आठवड्यात ऊनऊचा मेसेज, माझी बदली झाली पेरूला आणि दोन आठवड्यात आम्ही परत चाललो, शेवटचं बॅडमिंटन बुक करशील का ?
धक्काच होता , त्याच दिवशी संध्याकाळी परत भेटलॊ. जायच्या आधी सगळं सामान त्यांना विकायचे होते त्या गडबडीतूनही दोन तास गप्पा मारल्या . थोडा धीर करून योलांडा ला म्हणलं , तुझा अनुभव वाईट असला तरी एकदा भारतीय जेवण जेवून जा. उनाऊला कल्पना एकदम आवडली सकाळी बॅडमिंटन , दुपारचे जेवण आणि मग चहा असा आजचा बेत ठरला. आठवडाभर ऑफिस झाल्यावर पुन्हा वीकएंड ला सफाई वगैरे आवरून सगळ्यांचा स्वयंपाक जरा जास्तच होतं . त्यात कितीही सपक केलं तरी ज्यांना तिखट मसाल्याची सवय नाही, ते मिरचीच्या वासानेच घामाघूम होतात. आणि हाय स्ट्रीट ला पासरीभर इंडियन रेस्टोरंट आहेतच जी ब्रिटीश चवीचं भारतीय खाणं सर्व करतात. शनिवारचा दिवस दोन ठिकाणी फोन करून बघितला , एक रेलोकेशन मुळे बंद तर इतर ठिकाणी रिजर्वेशन नाही , काही ठिकाणी पार्किंग नाही असं रडगाणं चाललं होतं . शेवटी काही इंडियन मिळालच नाही . त्याला जवळचे म्हणून मग थाई रेस्टोरंट मध्ये छान जेवण झाले. पेरू , स्पेन आणि बास्क कंट्रीच्या वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची जेवताना ओळख झाली , परत एकदा टकलू कहाणी रिपीट झाली. निरोप घेताना तुम्ही चांगले भारतीय आहात असे मजेने तो म्हणाला - काय सांगू बाबा आमच्या देशबांधवांच्या पापाचे परिमार्जन करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला , - योलांडा ने एक वेळ भारतीय जेवण खाल्ले तरी असते , तुझ्या मस्त टकल्यावर आमच्याकडे काही उपाय नाही बघ, त्या मुळेच आज इंडियन रेस्टोरंट मध्ये कुठेच जागा मिळाली नाही बघ , असं मनात म्हणत gave them a big hug .
पुढची भेट आता लीमा मध्ये ...

January, 29th, 2017

No comments:

Post a Comment

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...