Wednesday, 17 May 2017

झाडाझडती ..

झाडाझडती ...
चार दिवस लेक आली होती , कामातून सुट्टी काढून छोट्या भावाच्या हाफ टर्म सुट्टीचे निमित्त साधून. प्रत्येक वेळी आली की आजकाल हेल्थ विषयावर नवीन काहीतरी शिकायला मिळते . अमुक तेल कसं तब्बेतीला घातक , कुठल्या कंपनीच्या कारभारामुळे कुठे अनेक शेतकरी बुडाले , कुठल्या पदार्थात काय प्रिजर्वेटिव्ह असतात , त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, अमुक तब्बेतीला कसं घातक आणि तमुक खाल्ले की काय व्हिटॅमिन्स मिळतात असा एकतर्फी संवाद असतो. सलग चार वर्षे शाळेच्या डिबेटिंग क्लबची ही अध्यक्ष असल्यामुळे संवाद हा शब्द आमच्या शब्दकोशात नाही. प्रतिवाद, घणाघाती हल्ला आणि आपल्या वाक्चातुर्याने समोरच्याला नामोहरम करणे हे आतापर्यंत माझ्यावर झालेले प्रयोग असल्यामुळे शांत बसून ऐकले की विषय चटकन संपतो आणि उभयपक्षी कटुता राहत नाही हे अनेक अनुभवातून मिळालेले शहाणपण , त्यामुळे शांतपणे ऐकायचे , चार दिवस किचन हिच्या हाती सुपूर्द करायचे , ती सांगेल त्या मुव्हीज मस्त कोचावर बसून बघायच्या आणि तिच्या हातचे नवीन पदार्थ तिच्या तोंडून त्यांची नवलाई ऐकत खायचे हा आतापर्यंतचा ती आली की कार्यक्रम .
चार दिवसात हजारो गोष्टी करायच्या असतात अजून , नवीन टी कॅफे शोधून तिथे जाऊन चहा प्यायचा, इथे टी रूम्स हा मस्त अनुभव असतो त्यातही ब्रायटन सारख्या अगदी फंकी शहरात तर खूप सुंदर टी रूम्स आहेत . किटलीभर चहा आणि तिचं जे काही फॅड चालू असेल त्याप्रमाणे तिचा काहीतरी हर्बल टी घेत कधी पुस्तकांबद्दल , कधी लहानपणीच्या आठवणीबद्दल तर कधी शांतपणे ती तिच्या आणि मी माझ्या छोट्या लॅपटॉप किंवा फोनवर आपली कामं करत असतो. एक लांब फेरफटका आणि इथे आल्यापासून फार थंडी नसेल तर समुद्रावर जाऊन बसणं - these are some of our favorite things .
याशिवाय आणखी नेहमी होणारी गोष्ट म्हणजे झाडाझडती -- किचन मध्ये , माझ्या कपाटात , छोट्या कानातल्या , हातातल्या गोष्टी ठेवायच्या डब्ब्यांमध्ये आणि घरातल्या इतर ठिकाणीही . किचन मध्ये नेमकी ही आली की आऊट ऑफ डेट गोष्टी समोर येतात मग हे किती जुनं आहे , ते कसं वाईट आहे या सबबीखाली बऱ्याच गोष्टी कपाटातून कचऱ्यात जातात , तेच इतर ठिकाणच्या गोष्टींचे फक्त त्याला नाव मिळते डिक्लटर ! यात सोयीने यांच्या लहानपणच्या असंख्य गोष्टी मात्र येत नाहीत . किचन चे फार वाईट वाटत नाही कारण बहुतेक सगळ्या पडून राहणाऱ्या गोष्टी म्हणजे कोणीतरी दिलेला चांगला सॉस , पेस्ट अशा प्रकारातल्या असतात आणि त्या कोणीतरी जवळच्या व्यक्तीने दिल्यात त्यामुळेच घरी आलेल्या असतात . त्या सगळ्या जाऊन चार दिवसात हिचे जे काय फॅड असते त्याप्रमाणे नवीन ऑरगॅनिक गोष्टी घरी येतात , मस्त चार दिवस मिरवतात मग नेहमीप्रमाणे शनिवार सकाळ होते आणि मोठ्या कढईत पोहे आणि सोबत आलं , वेलची घालून गुळाचा चहा उकळायला ठेवला की या सगळ्या फॅड गोष्टी हिरमुसल्या होऊन मागे जातात . सौ सोनार की वर हा माझा रामबाण उपाय आहे . मग पोहे कसे व्हाईट राईस चा प्रकार आहे वगैरे वगैरे फालतू चर्चा मागे पडून सगळे जण आपापल्या प्लेट्स घेऊन बसतातच सोबत. त्या दिवशी नेमकी ही येणार म्हणून लांबच्या इंडियन दुकानातुन आणलेली भेंडी , गवार नाहीतर मेथीला मस्त फोडणी दिली जाते आणि आणलेल्या शेवग्याच्या शेंगा तुरीच्या डाळीत आमसुलाच्या फोडणीत शिजवल्या की ग्लूटेनबाबा झकमारत बाजूला जातो आणि पोळी नाहीतर भाकरी तव्यावरून गायब व्हायला लागतात. घरात असलेल्या चटण्या , लोणची छोट्या छोट्या भरण्यात पॅक करण्यात उरलेला दिवस जातो .
बऱ्याच वेळा मी नसताना सगळे कपाट उकरून कपड्यांना ट्राय केलेले असते , दागिन्यांचा डबा काढून त्यातल्या गोष्टी घालून आरशात मिरवून झालेले असते किंवा चालू असते . तिला बघितले की मीही अजून अशीच मा नाहीतर तैयब किंवा रितूच्या कपाटात शिरून असले उपदव्याप करते त्याची आठवण येते. त्यातल्या काही गोष्टी नकळत पॅक होतातच आणि असे करत करत माही जास्त किर किर करायला लागला की कळते हिचे जाणे जवळ आले आहे. या दोघांच्या इतक्या गोष्टी या चार दिवसात ठरलेल्या असतात त्या होणे अर्थात शक्य नसते , जायच्या क्षणापर्यंत पुढच्या वेळेस काय करायचे , ती तिथून काय करू शकते , बहुतेक गोष्टी ज्या मम्मा नाही म्हणणार अशी खात्री असते त्या सगळ्या गोष्टी ती ऑनलाईन ऑर्डर करू शकते हे भाऊरायाला माहित आहे त्यामुळे आजकाल डायरेकट हट्ट तिच्याकडेच असतो , त्यात ही घासाघाशी चाललेली असते दोघांची, पण शेवटी शेंडेफळाच्या कलानेच गोष्टी होतात.
आता गेली थोड्या वेळापूर्वी , मस्त मिठी मारून. आजकाल रडत नाही जाताना ती किंवा आम्ही कोणीच . सवय झाली आहे आता ती नसण्याची आणि वर्षभर प्रचंड घालमेल सहन करून हे ही स्वीकारलंय की लेक मोठी झाली आहे आता अशीच येणार चार दिवसासाठी , बरसणार आणि थोडं विरसून निघून जाणार आपल्या विश्वात , तू नाही का गेलीस अशीच आणि अजूनही समजतं पण अक्ख्या इंडिया ट्रिप मध्ये अर्धा नाहीतर एक दिवसच असतेस पांचगणीच्या घरी -- तिथे पण असंच कुणी वाट बघत असतंय .
तुझीच लेक ती अशी मनस्वी , स्वच्छंदच जगणार, तू कितीही प्रेमाने तिच्यासाठी म्हणून उभं केलेलं घर तिला बांधून थोडीच ठेवणार.. जाताना घरच्या इतर गोष्टींबरोबर माझ्या विचार आणि भाव भावनांचीही अशी नकळत थोडी झाडाझडती होते --- शहाणपण (wisdom ) कदाचित असच या झाडाझडतीतूनच येत असावं प्रत्येक पिढीला ...

11th February, 2017

Show mor

No comments:

Post a Comment

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...