'जाने क्या ढुंढता है मेरा दिल , तुझको क्या चाहिये जिंदगी'?
'मी कोण' हा तसा फारच क्लिष्ट प्रश्न आणि ज्या कोणाला तो पडतो त्याचे आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांचे अगदी जीना हराम करून टाकतो . मला असं मधनं मधनं फेफरं आल्यासारखा हा प्रश्न भंडावत असतो. मग सगळ्या जवळच्या लोकांना , ' मी काय करतेय आयुष्यात , काय अर्थ आहे का याला ? ', असे प्रश्न ऐकावे लागतात . बिचारे माझे आप्त स्वकीय त्यांनी शांत ऐकून घेतले तरी प्रॉब्लेम आणि मला खोलात जाऊन समजावून सांगायचा प्रयत्न केला तरी प्रॉब्लेम. त्यांच्या खांद्यावरचा हा वेताळ उतरतच नाही . या सगळ्या लोकांची सहनशक्ती मात्र अचाट आहे . प्रत्येक वेळी न रागावता , वैतागता रितू आणि अजित अगदी ऐकून घेऊन पुन्हा गाडे जिथे आहे तिथे आणून पोहचवतात . अजितला काही असले प्रश्न पडायचा संभवच नाहीये, कॉम्प्युटरच्या जन्मापासून त्याचा आणि कॉम्पचा जनम जनम का रिश्ता है . दिल चाहता है मधला --- बस मैं जन्मा ही हूं इसलिये हे अगदी गुडघ्यावर बसून आमिर खान म्हणतो ते त्याला अजितकडे बघूनच सुचलंय,अशी माझी ठाम खात्री आहे . पण तो पर्फेक्शनिस्ट खान काय त्याचं क्रेडिट अजितला देणार नाहीये . त्यामुळे अजित मी काय करू , कंटाळा आलाय असं काही म्हणलं] की तो कॉम्पुटर शी निगडित १७६० शक्यता सांगू लागतो . एरवी दोन वाक्य सलग बोलायला याला इतके कष्ट पडतात पण कम्पुटरशी संबंधित काहीही असलं की याच्या चेहऱ्यावरचे तेज अवर्णनीय असते, ते बघून मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाहीच , पण जाऊदे याला याची मंजिल मिळालीय, हा आपल्याला काय समजून घेणार असं म्हणून मी माझ्या हक्काच्या दुसऱ्या श्रोत्याला फोन लावते , रितू .
ज्या टोनमध्ये तिचं नाव घेते तत्क्षणीच कळतं तिला की आता ही तिचा यक्षप्रश्न विचारणार. रितू कडे उत्तरे भारी असतात , सगळ्या उत्तरांना एक प्रकारची celestial remedy असते . ती मात्र बर्रोब्बर सगळे आध्यात्मिक , तात्विक , बोलीवूडीक छक्के पंजे वापरून ती मला भौतिक पातळीवर आणून आपटते , पोरांची शिक्षणे आणि आपलं आर्थिक स्वावलंबन यापलीकडे काही दिसूच देत नाही.'जीवनात ही घडी अशीच राहू दे,,' या पंक्तीची पुरेपुर पाईक, खंदी समर्थक आहे ती. या प्रयत्नांत ओशो, टॅरोट कार्ड्स , कुंडली , झेन असले सगळे प्रकार तिच्या उत्तराच्या दावणीला बांधलेले असतात . नाहीतर मग ती काहीतरी अचाट , भन्नाट कल्पना आणि प्लॅन्स मांडते - मी जाम , चटण्या करायला घेतल्यात , काही लोकांना फ्री सॅम्पल दिली आता आपण त्याचे मार्केटिंग करू , नाहीतर आपण काहीतरी रेस्टॉरंट उघडू , मी स्कार्फ बनवते तू UK मध्ये मार्केट बघ , मी तिकडे येते मग आपण टॅरोट रिडींग प्रोफेशनल पद्धतीने करू . तिच्या योजना बरोबर लागू पडतात आणि दुसऱ्या दिवशी मी नव्या जोमाने पुन्हा नोकरीवर जाते . असं चक्र वर्षानुवर्षे चालू आहे आणि तरी मला पडायचा प्रश्न पडतो तो पडतोच . ऑफिसमध्ये कामाच्या संदर्भात असं काही म्हणलं की किती reflective analysis करतेस म्हणून अजून डोक्यावर घेतात आणि माझी मॅनेजर तू मांडलेले मुद्दे फारच pertinent आहेत , एक पेपर लिहुयात को दोघी अस अजून एक गळयात धोंडा बांधायला निघते , त्यामुळे आजकाल ऑफिसमध्ये असले फार critical reflection करायचं निग्रहाने टाळते मी .
खरं तर किती सोपा प्रश्न आणि उत्तरेही! भारतीय परिप्रेक्ष्यात तर जन्मायच्या आधीच तुमच्या कौटुंबिक , सामाजिक, आध्यात्मिक , राजकीय अशा सर्व प्रकारच्या ओळखी निश्चित झालेल्या असतात. व्यक्तिमत्व आणि प्रवृत्ती नुसार थोडा बहुत फरक करायचा प्रयत्न केला तरी या ओळखी घट्टपणे तुम्हाला चिकटलेल्याच असतात. समाजमानातली तुम्ही कोण ही प्रतिमा आपल्याला आपण कोण हे जाणवायच्या खूप आधी स्पष्ट असते आणि बऱ्याच अंशी ती आपली आपल्याशी असलेली ओळख अधोरेखित करत असते . बारावीपर्यंत पाचगणीत असताना ही ओळख फार सोपी होती. शाळेत असताना गुरुजी , बाईची मुलगी म्हणून त्याला एक वेगळं वलय, कदाचित माझ्याच मनात होते . हुशार , म्हणजे शाळेत नेहमी वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने थोडाबहुत मुलामा पण त्या वलयाला होता . त्यामुळे असेल कदाचित पण पाचगणीतल्या सगळ्या गल्ल्यागल्ल्यामध्ये विखुरलेल्या सगळ्या जातीधर्माच्या घरात स्वागत असायचे , कधी भेदभाव असा जाणवला नाही किंवा सगळ्या गल्ल्या आणि नगर कशी काही विशिष्ट जाती समूहाची आहेत हे कधी जाणवले नव्हते . कदाचित आज जाणवतो तितका जातीय विखार ऐशीच्या दशकात दैनंदिन जीवनात बोलला जात नसेल, हे ही एक कारण असावे आणि वय आणि अनुभवामुळे तेव्हा या सगळ्या गोष्टीची आज जितकी चिकित्सा होते, तितकी त्यावेळी होत नसावी .
बारावीनंतर पुण्यात आल्यावर मात्र आपण 'शबाना ' आहोत , हे खूप प्रकर्षाने जाणवले . तोपर्यंत धार्मिक ओळख म्हणजे घरी माँ जे नमाज कुराण शिकवायची आणि कधी कधी अप्पाजान च्या घरी इजतेमा साठी जायचो तेवढीच होती . रमजान मध्ये रोजे आणि दोन ईदी साठी महाबळेश्वरला नानी , दादीकडे जायचो . वर्षातून मिळणार नवीन ड्रेस याचवेळी मिळायचा आणि ईद्दीच्या पैशातून वर्षभर ज्या गोष्टी दुकानांत बघितलेल्या असत त्या खरेदी करायची चैन , यापलीकडे फार धर्म जाणवला नव्हता . मुंबईहून येणारी आमची मावसभावंडे मात्र इस्लाम , मुस्लिम या विषयावर phd केल्यासारखी आम्हाला शिकवण देत असायची . त्यांच्यामते आम्ही गावठी , मराठी बोलणारे , धड रीती भाती संस्कार नसणाऱ्या मुली होतो. मला आणि तैयबला त्यांच्या दोजख आणि जन्नत च्या वर्णनावरूनच त्यांच्याशी फार चर्चा किंवा वादविवाद करायची इच्छा नसायची . एक तर त्या जन्नतच्या वर्णनात आम्हाला आवडेल , पचेल असे काही नव्हते आणि दोजखची वर्णन इतके अचाट आणि परत त्यावर कुठला प्रश्न विचारायची बंदी , का तर म्हणे असले प्रश्न विचारले तर दोजखच्या आगीत सात वेळा जळालं - एक तर मेल्यावर तुम्हाला गाडणार, मग फरिश्ते तुमचा सवालजवाब करणार आणि तुम्ही असले प्रश्न विचारले म्हणून पापी ठरवणार आणि सात वेळा जाळणार - एकदा जाळल्यावर होणाऱ्या राखेला आणखी सहा वेळा जाळणार- काही संदर्भ लागायचा नाही . सातवीत सगळे कुराण झाले, नमाज , रोजे माँ च्या मार्गदर्शनाखाली सगळे केले पण खरा इस्लाम मात्र खूप वर्षांनी कारेन आर्मस्ट्राँग ची पुस्तके वाचून तेव्हा कळाला. तोपर्यंत पुलाखालून सगळंच गेलं होतं ऑरोबिंदो , विवेकानंद , योग, विपश्यना. या सगळ्यातून बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली खरी पण वैयक्तिक पातळीवर , व्यक्ती समष्टीची सांगड घालणं काही अंशी टाटा इन्स्टिटयुट मध्ये शिकवले पण तो शोध बऱ्याच अंशी अपूर्ण आहे आणि त्यातूनच सतत हा प्रश्न पुढे येत राहतो.
दरम्यानच्या काळात आपण मुस्लिम आहोत हे मात्र अनेक लोकांनी आणि घटनांनी बिंबवले , त्यांना चांगले किंवा वाईट असं दोन गटात विभागायची इच्छा नाही कारण ज्या दृष्टिकोनातून आपण एकमेकांना पाहत , स्वीकारत किंवा नाकारत असतो त्या एका विशिष्ट मनोवृत्तीतून घडत असतात आणि ती मनोवृत्ती बनण्यामागे फक्त त्या व्यक्तीलाच कारणीभूत ठरवता येत नाही . अर्थात हे मानवी पातळीवर माझे खूप सापेक्ष असे मत आहे . समाजघडणीच्या आणि राजकीय परिप्रेक्ष्यात या सापेक्ष विचाराला फार महत्व नाही किंवा यातून काही कोणाचे हृदयपरिवर्तन होऊन समाज बदलेल अशी भाबडी आशा हि मला नाही . उदा. बी ए ची तिन्ही वर्षे मला फर्गसन कॉलेजच्या मुलींच्या होस्टेलला प्रवेश मिळाला नाही आणि माझ्या डिपार्टमेंटच्या प्रमुख सतत तीन वर्षे हॉस्टेल प्रमुख असणाऱ्या त्या प्राध्यापकांशी भांडत राहिल्या की हीचा नंबर आलेला असतानाही तुम्ही इतर मुलींना का जागा देता ? तीन वर्ष हॉस्टेल मिळालं नाही , खूप वेगवेगळ्या ठिकाणी राहून मग तिसऱ्या वर्षी विद्यार्थी सहायक समितीची जागा मिळाली. मला या घटना नेहमीच त्या प्रसिद्ध प्राध्यापकांचा माझ्याबद्दलचा ग्रह म्हणून नाही तर खेर मॅडम माझ्यासाठी आणि एका तत्वासाठी ज्या पोट तिडकीने आणि सातत्याने भांडत राहिल्या त्यासाठी नेहमीच स्मरणात राहील. पुण्यात फक्त धर्मच नव्हे तर जात, भाषा आणि प्रांत या घटकांमुळे इतर विद्यार्थ्यांचे ही हाल होताना पाहिले की आपणच वंचित आहोत असा ढिंढोरा पिटण्यात मला फार स्वारस्यही नव्हते . एकदा victim mode मध्ये न जाता या घटनांकडे थोडं निरपेक्ष बघायला लागले की यातली माणसे मला फार वेगळी जाणवायला लागली . बऱ्याच वेळेस अरे तू शबाना असून मराठी छान बोलतेस असा पहिला प्रश्न आला की कळायला लागलं कीं त्या माणसाचा परिघ किती छोटा आहे. मग न आणि ण ; च आणि च अशा चुका काढायला लागले की मग सांगावं लागायचं की चादर हा शब्द किती वेगवेगळ्या प्रांतात आणि उच्चारात म्हणतात आणि तुम्हाला माहीत असलेली सोलापुरी चादर आणि एक चादर मैलिसी मधली चादर हा हा शब्द , उच्चार आणि विणकामाचा वेगळा प्रकार आहे. पुण्यातले बरेचसे अनुभव हे ९२-९३ च्या पार्श्वभूमीवर बरेच दाहक आहेत पण त्यातही बऱ्याच पुरोगामी मंडळीबरोबर असताना एकप्रकारचे patronizing feel हे कधी कधी फार किळसवाणं वाटायचं. या सर्व प्रवासात एक व्यक्ती म्हणून स्वीकारणारे बरेच मित्र मैत्रीनी मिळाल्या आणि त्यामुळेच हे दाहक अनुभव कधी विखारात किंवा द्वेषात मात्र बदलले नाहीत .
वैयक्तिक आयुष्यात या धार्मिक ओळखीला मागे टाकून जरी बरेच निर्णय घेतले तरी त्या ओळखीने काही पिच्छा सोडला नाही. मनू , माझी लेक आता १९ वर्षाची झाली पण तिच्या तिकडच्या आजी आजोबांनी अजूनही तिला एकदाही बघितले नाही कारण तिची आई 'मुस्लिम' आहे. दोन्ही मुलांना कुठल्याही एका धर्मात वाढवायचे नाही असा फार आधीच माझा निर्णय होता. आई वडील आणि समाज मुलांना जन्मल्या जन्मल्या फक्त त्यांच्यापुरता एक ठप्पा लावतात एवढ्यापुरतेच हे संस्कार नसतात तर समाज , जग आणि नंतर आध्यात्मिक समज याचेही एक कुंपण आई बाप आपल्या मुलांना या धार्मिक संस्कारातून घालून देतात आणि हा खरे तर सगळ्यात मोठा child abuse आहे असे मला वाटते . मुलं सग्नान झालयावर त्यांनी त्यांना हवा तो धर्म निवडावा आई बापाने काही मूल्ये जरूर शिकवावीत . बऱ्याचदा ही मूल्ये धार्मिक संस्कारातून येतात हे मान्य पण बरेचदा त्याच्याभोवतीची कोंदने मुलांच्या निकोप वाढ़ीला घातकच असतात. आता हे तात्विक दृष्टीने म्हणणे ही एक गोष्ट आणि समाजात यानुसार जगणे ही दुसरी. त्यात येणारे इतके वेगवेगळे अनुभव आहेत की काहीवेळा हताश आणि बऱ्याचवेळा हसायला येते .
एक मुलगी आणि बाई म्हणून येणारे अनुभव कोणाही स्वतंत्र प्रग्नेंच्या बाईला येणारे असेच आहेत, लहानपणी मुलगी म्हणून असेच वागले पाहिजे अशा ज्या काही अपेक्षा होत्या त्या मी धुडकावून लावल्या होत्या आणि तेव्हा जो त्रास, मारहाण सहन केली त्या मानाने मग एकटी असताना जिथे नोकरीसाठी गेले तिथे राहण्याठी जागा ना मिळणे, लोकांच्या चित्र विचित्र चौकशा, त्या आडून त्रास आणि मानहानी असल्या प्रकारचे वैषम्य न वाटता एक प्रकारचे च्यालेंज वाटायला लागले होते . इतके विविध किस्से अनुभवायला मिळालेत की त्यावर एक पुस्तक निघेल पण इथेही कदाचित सामाजिक क्षेत्रात आणि त्यातही फन्डिंग एजन्सीत काम केल्यामुळे बरेचसे सामाजिक कार्यकर्ते मदतीला असायचे . अर्थात एनजीओ म्हणा किंवा सामाजिक चळवळी म्हणा यात असलेली एकमेकांबद्दलची असूया किंवा जात धर्मावरून लोकांना जोखण्याची प्रवृत्ती बघितली की कधी कधी पुण्यात आलेले दुस्वासाचे प्रत्यक्ष अनुभव जास्त सुकर वाटायचे
इंग्लडात आल्यापासून गोष्टी जरा सुकर झाल्यात कारण इथे धर्म किंवा बाई असणं असं पदोपदी आडवं येत नाही. वंश आणि ethnicity हे दोन मुद्दे नेहमीच वेगळे राहतील आणि त्या मानाने अजूनही इथे बऱ्यापैकी सहिष्णुता आहे . प्रत्येक इमिग्रंट समुदायाचे वेगळे प्रश्न आहेत आणि इथल्या समाजात सामिलीकरण आणि आपली संस्कृती किंवा वेगळी ओळख जपून ठेवणे , संवर्धन करणे अशा एका वेगळ्या तिड्यात सर्वच इमिग्रंट समुदाय दिसतात . सामिलीकरणाची प्रक्रिया नाही म्हणलं तरी निदान पहिल्या पिढीला अवघड आहे , दुसऱ्या , तिसऱ्या पिढीत कधी कधी स्वतःची ओळख शोधण्याच्या प्रक्रियेत एक प्रकारचा नॉस्टॅल्जिया दिसून येतो त्यामुळे इथले शीख , मुस्लिम किंवा हिंदू बऱ्याच अंशी कट्टर होत असलेले दिसून येतात . अर्थात सगळयाच समाजात वेगवेगळे प्रवाह असतात आणि थोडे चिकित्सक , अलिप्त अशाही बऱ्याच लोकांशी इथे संपर्क येतो. पण एकूणच प्रोफेशनल जग सोडले तर इतर स्तरावर मैत्री किंवा काही एकत्र काम अशा संधी कमी आहेत. इथलं काम आणि जीवन बऱ्यापैकी आखीव रेखीव , जेव्हडं सांगितलं आणि जसं सांगितलं तेवढच आणि तसेच काम त्यामुळे आवडीच्या क्षेत्रात असूनही रटाळपणा कामात खूप असतो. इथे आल्यावर सुरुवातीची टूरिस्टी भूक बरीच भागली आहे त्यामुळे यू के म्हणा युरोप म्हणा त्यात काही नावीन्य राहिले नाही . आणि विरंगुळ्याचे आपले एक स्थान असते , पूर्ण वेळ विरंगुळा ही आपली आंतरिक भूक भागवू शकत नाही . आयुष्यात सगळ्या सुखसोयी , चांगली नोकरी , हुशार मुले , प्रेमळ कुटुंब आणि खूप जिवलग मित्रमैत्रिणी असं सगळं काही असून मला सतत असे प्रश्न पडायला लागले की मला नाही पण इतर लोकांना मात्र भांबावयाला होतं .ज्या काही सोप्या पारंपरिक श्रेणींमध्ये आयुष्याचा अर्थ लोक शोधतात, जगतात त्या माझ्या बाबतीत खूप आधी निसटून गेल्या आहेत - धर्म , समुदाय , कुटुंब , देश , प्रथा , परंपरा या सगळ्या गोष्टी काही जाणून सवरून काही नकळत मागे गेल्या आणि या सगळ्यांना पर्याय म्हणून नाही पण झालेल्या पोकळीत कधी कधी हरवायला होतं खरं . नकोसं असलं कितीही घुसमटायला झालं तरी समूहाचा भाग असण्यात एक प्रकारची बरेचदा फसवी अशी सुरक्षितता असते. एकला चालो रे आणि माझा मार्ग निराळा म्हणण्यातलं आणि जगण्यातलं थ्रिल कितीही रोमांचकारी असलं तरीही त्या बरोबरचं एकाकीपण स्वीकारताना बरीच घालमेल होत राहते आणि त्या एकाकीपणाला आणि त्यातल्या स्वतःच्या जगण्याला अर्थ द्यायच्या प्रक्रियेत पारंपरिक ढाचे कधीच कामी येत नाहीत . पुढे काय माहीत नाही, मागे जाण्यात अर्थ नाही असा टप्पा खूप वेळा आलाय आयुष्यात , कदाचित पुन्हा तोच अनुभव आज नव्याने जाणवतोय. या सगळ्यात राहूनही बऱ्याचदा वेगळी अलिप्तता जाणवायला लागली आहे. पुढे काय हा निर्बलतेतून किंवा हताशेतून आलेला प्रश्न नाही तर या पुढे रहाटगाडगं असंच चालत राहील कदाचित , या सगळ्याचे फलित काय असा माझा मात्र माझ्याशीच वाद संवाद, आज प्रकर्षाने पुन्हा जसा जाणवला तसा इथे टंकलाय ....
फार सुंदर लिहिता. आणि जे जीवन तुम्ही सजगतेने स्विकारलं अन पार पाडता आहात ते निश्चितच कौतुकास्पद आणि आदराचं आहे. जियो!
ReplyDelete