Wednesday, 17 May 2017

भारतीय परिप्रेक्ष्यात मुस्लिम प्रश्नांची मांडणी

भारतीय परिप्रेक्ष्यात मुस्लिम प्रश्नांची मांडणी - जी गेली ४-५ दशके पुरोगामी आणि प्रतिगामी दोन टोकाच्या भूमिकातुन मांडत आहेत आणि हा प्रश्न त्याच त्याच मुद्द्यांभोवती फिरत आहे - चार बायका, मुस्लिम पर्सनल कायदा / समान नागरी कायदा, अयोध्या विवाद आणि राष्ट्रवाद. सगळे ऐतिहासिक दाखले देऊन पुन्हा पुन्हा मुस्लिम कसे राष्ट्रवादी आहेत असं पुरोगामी सिद्ध करायचा आणि विरुद्ध बाजूने आणि आता तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमातून मुस्लिम कसे दहशतवादी आहेत याचे भक्कम पुरावे देऊन ही चर्चा चालूच चालूच आहे. भारतातला मुस्लिम समाज शिक्षण, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक सगळ्याच बाबतीत बहुतांशी या तळागाळात असलेला स्वतःला दलितांपेक्षा वरचढ समजणारा पण वस्तुतः सर्वच निकषात त्यांच्या बरोबरीने मागासलेला किंबुहना दबलेला आहे. संविधानाच्या स्वरूपात भारताने सहा दशके आधी जो दस्तऐवज स्वीकारला त्याची अंमलबजावणी पहिली तीन चार दशके संथ होती , नंतर ऐशीच्या दशकात झालेल्या राजकीय आणि सामाजिक चळवळींनी त्याला थोडी धार दिली , पण गेल्या दोन दशकात एकूणच प्रतिगामी शक्ती वाढत आहेत आणि त्या सर्वच समाजात आहेत. मुस्लिम समाज याला अपवाद नाही . फक्त हिंदू बहुजनांचा मूलतत्त्ववाद वाढला म्हणून मुस्लिम प्रतिक्रिया आली , ही खूप सरधोपट मांडणी काही विचारवंत करतात आणि त्यात काही अंशी सत्यता आहे. ज्या प्रकारे धार्मिक उन्माद, दंगे आणि राजकारणाचं व्यावसायिक गुन्हेगारीकरण गेल्या दोन दशकात झालं आहे , त्यात समूहाला चिकटून राहून त्यातून येणाऱ्या सुरक्षितता या अंगाने हा जमातवाद समजू शकतो. पण हा जमातवाद आणि मूलतत्त्ववाद हा एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळीकडेच वाढताना दिसतोय , याची कारणमीमांसा आणि भारतीय परिप्रेक्ष्यात यातून पुढच्या दिशा समजण्याची प्रक्रिया एकूणच थंड किंवा दिसत नाहींच्या बरोबर आहे. पाश्चिमात्य राष्ट्रे - अमेरिका युरोप सगळीकडेच मूलतत्त्ववाद वाढतोय आणि त्याचे एक कारण म्हणजे गेल्या शतकात सुरु झालेली आधुनिकीकरणाची प्रक्रिया . भारत ही याला अपवाद नाही.
सामाजिक आणि राजकीय शास्त्रात आधुनिकता ( modernity ) म्हणजे मध्ययुगीन कालखंडातून सरंजामी व्यवस्था नाकारून भांडवली, वस्तुनिष्ठ, धर्मनिरपेक्ष अशा राष्ट्र-राज्याची संकल्पना. बहुतांशी राष्ट्रे या आधुनिकतेच्या अनुभवास त्याबरोबर येणाऱ्या स्वातंत्र्य आणि समूहाच्या सीमा ओलांडून व्यापक जगाशी सामाजिक संबंध प्रस्थापित करण्याच्या आव्हानात तोकडी पडताना दिसतात. आधुनिकतेचा हा प्रवास तसा अवघडच आहे कारण या प्रक्रीयेमेध्ये बरीच उलथापालथ होते. उत्पादकतेची पारंपारिक साधने जाउन औद्योगिकरण, शास्त्र आणि तंत्रज्ञानावर आधारित नवीन शोध, प्रशासनात आमुलाग्र बदल आणि याअनुषगाणे जीवनाच्या इतर क्षेत्रात येणारे सांस्कृतिक बदल यामुळे सम्जाअत असणाऱ्या प्रस्थापित समज, रूढी, सत्ताकेंद्रे आणि यावर अंकुश ठेवणाऱ्या व्यक्ती या सर्वांतच उलथापालथ होते. अस्तित्वात असणारी घडी आणि त्याबरोबर येणारी सुरक्षितता यांनाच तडा जातो. साहजिकपणे या सर्व बदलांच्या केंद्रस्थानी असणाऱ्या राज्यशक्तीविरुद्ध असूया व असंतोष निर्माण होतो. परंतु आधुनिकतेमुळेच पूर्वीची संथ जीवनशैली बदलून गतिमान बदल दैनंदिन जीवनात होत असतो. प्रस्थापित घडी चिरडून नवोन्मेशि असा हा बदल लोकांना हवा असतो. आपल्याकडे रेल्वे आल्यानंतरचा बदल किंवा तीन दशकांपूर्वी ठाणे बेलापूर पट्ट्यात शहर वसवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ज्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी झाल्या त्यामध्ये हा आधुनिकतेचा प्रवास स्पष्ट दिसून येतो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हा बदल बहुतांशी राष्ट्रात आणि समाजात झालेला आणि लोकांना भावलेला दिसतो. भांडवलशाही ज्यावर आधारित आहे ते पैसा आणि नफा हे दोन घटक आधुनिकतेच्या मुळाशी अस्तात. या दोन घटकांना, जडवादी विचारसरणीला मात्र फार सहजरीत्या मान्य केले जाताना दिसत नाही, किंबुहना त्यांचा अस्वीकार व त्याविरुध्द संतापाची भावना या समाजांमध्ये दिसून येते.
अनेक आशियायी राष्ट्रात आधुनिकतेचा प्रवेश हा मुख्यतः वसाहतवादी राष्ट्रांच्या माध्यमातून झाला. हा बदल झपाट्याने आला असला तरी तिथल्या स्थानिक लोकांसाठी त्याचा स्विकार मानसिकदृष्ट्या बराच अवघड होता. या प्रक्रियेत अनेक नव्या संधी उपलब्ध होतात परंतु त्याची जबर किंमत हि स्थानिक जनतेस द्यावी लाग्ते. बाहेरून येणारे लोक नुसते वेगळे दिसत नाहीत तर त्यांचे आचारविचार ही वेगळे. या प्रक्रियेशी जे जुळवून घेऊ शकत नाहीत किंवा ज्यांना विविध कारणांमुळे यात स्थान नाही त्यांची मात्र गोची होते. भूतकाळातील आपल्या स्थानाबद्दल,राजकारण, अर्थकाराणा तल्या भूमिकांबद्दल कमालीचे ममत्व याच प्रकियेतुन निर्माण होते.प्रचलित व्यवस्थेत एक प्रकारची निश्चितता असते, समाजास संभाव्य घडामोडींबद्दल ठाम खात्री असते. परंतु आधुनिकतेच्या प्रक्रियेत मात्र अनेक अनिश्चित आणि असंभाव्य अशा क्रिया या संथ समाजात प्रवेश करतात. मानसिकदृष्ट्या समाजासाठी हे एक मोठे आव्हानच असते. जागतिकीकरणाची १९९१ साली सुरु झालेली प्रक्रिया , त्यातून पुढे आलेला नवश्रीमंत समाज आणि त्याच बरोबर भूतकाळाचे, संस्कृती आणि रुढीरिवाजांचे वाढते स्तोम हे या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला प्रतिसाद म्हणून निर्माण झालेली प्रक्रिया आहे.
अनिश्चितता मग ती दैनदिन जीवनातील किंवा आध्यात्मिक पातळीवरची असो समाजमानसात त्याचे पडसाद तीव्र असतात, त्याविरुद्ध येणाऱ्या प्रतिक्रिया तीक्ष्ण असतात, हे सगळीकडे आढळणारे सत्य आहे. एरिक फ्रॉम आणि डुरखाइम यांच्या लेखनातून या संकल्पनांचा वेध घेतलेला आहे. फ्रॉम त्याच्या Fear ऑफ Freedom या पुस्तकात फ्रॉम म्हणतो कि स्वातंत्र्य एक प्रकारे नकारात्मक असते- जाचक परंपरा, रूढी, शासन यांना नाकारून त्यातून येणारे स्वातंत्र्य ! परंतु या स्वतंत्रतेबरोबरच एक प्रकारचा अभाव, रिक्तताहि येते. डुरखायीमने याचे वर्णन Anomie असे केले आहे. या अवस्थेत व्यक्ती व समूहाला मार्गदर्शन करणारे सर्व ढाचे कोसळलेले असतात, समाजमानस आणि समाजव्यवस्थापन यांना बांधणारी यंत्रणा कोसळलेली असते. भूतकाळातील निश्चितता जाउन एक प्रकारची संदिग्धता येते. फ्रोमच्या मते या स्थितीला जर बदलायचे असेल तर नकारात्मक स्वातंत्र्याऐवजी सकारात्मक स्वातंत्र्य आवश्यक आहे. सकारात्मक स्वातंत्र्यात व्यक्ती रचनात्मक कामात सहभागी होते, इतरांबरोबर अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करते. ही सकारात्मक स्वातंत्र्याची ओढ ज्या समाजात तीव्र बदल होतात तिथे अधिक जोमाने असते याचे कारण म्हणजे येणाऱ्या बदलांना स्वीकारत पण लवकरात लवकर आधीच्या निश्चिततेच्या स्थितीत जाण्याची एक निकड या समाजात असते. परंतु या निकडीपायीच हे समाज एकाधिकारशाहीस अंगिकारताना दिसतात. एकाधिकारशाही किंवा हुकुमशाहीत लोकांना काय विचार करावा, कसे वागावे याबद्दल ठोस मार्गदर्शन मिळते. जुन्या समाजव्यवस्थेत असणारी निश्चितता, अधिकारीव्यवस्था आणि जगण्यावाग्ण्याच्या निश्चित पद्धती हुकुमशाहीच्या माध्यमातून निर्माण होतानाचा एक आभास समाजास मिळतो. हा निश्चीततेचा आभास,सामाजिक आणि राजकीय पातळीवरची निष्क्रिय पण दृढ अशी प्रतिमा अशा हुकुमशाही राजवटी प्रस्थापित महत्वाचा घटक असतो. भारतात याच प्रक्रियेने गेल्या काही वर्षात जोर धरलेला दिसतोय. सर्व राजकीय आणि सामाजिक व्यवस्था आणि आतापर्यंतची संविधान आणि संसदीय कार्यप्रणाली वर आधारित सर्वच संस्था , व्यवस्था या प्रक्रियेत ध्वस्त करणे , हा या प्रक्रियेचा अविभाज्य भाग असणार आहे. अर्थातच हे काम इतक्या खुलेपणाने न करता त्याला समाजमान्यता मिळवत पुढे न्यावे लागणार आणि या कामात मुस्लिम प्रश्न हा कळीचा असणार आहेच .
भारतातील मुस्लिम प्रश्न हा आता यापुढे देश आणि राष्ट्राच्या सीमारेखेत ठेवून समजणार किंवा सुटणारा नाही. आपल्याकडे पुरोगामी सामाजिक चळवळीने स्वातंत्र्योत्तर काळात बराच मोठा पल्ला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गाठला आहे . आज पुरोगामी हा शब्द आणि ते विचार मांडणारे यांची सातत्याने खिल्ली उडवली जात आहे . बरंचसं मंथन, आत्मपरीक्षण , वैषम्य , विवंचना याच्या गर्तेत सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते अडकलेले दिसतात , बऱ्याचदा निराशेबरोबर पराभूत स्वर ही ऐकायला येतात , रोज घडणाऱ्या घटना आणि एकूणच जो कोलाहल समाज आणि माध्यमात चालू आहे, त्याची ही एक प्रतिक्रिया आहे , संवेदनशील मनाची , कृतीची आणि काही मूल्यांची ती अभिव्यक्ती जरूर आहे पण ती पूर्णपणे वास्तवातवादी नाहीये - सध्याच्या स्थितीच्या आकलनात . आतापर्यंतच्या कामाच्या मूल्यमापनात आणि भविष्यनिर्मितीच्या कामात थोडी तोकडी पडणारी ती प्रतिक्रिया आहे . खूप त्रुटी आणि विसंगती असल्या तरी आतापर्यन्त जो राजकीय आणि सामाजिक पल्ला आपण गाठलेला आहे त्यातूनच उद्याच्या जगाची निर्मिती नव्या तत्वांवर करण्याची शक्ती या विचारात आहे आणि हे केवळ भारतीय म्हणून स्वप्नरंजन नाही तर काही मूल्ये, तत्त्वप्रणाली यांच्या आधारावर बांधलेले ठोकताळे आहेत. स्वातंत्र्य संग्रामातून पुढे आलेल्या मूल्यांवर आधारित देश आणि समाजाची नवनिर्मितीची एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून बांधणी काही अर्थानी खूप सक्षम रित्या केली गेली आहे . भारताबरोबर जे देश वसाहतवादाच्या कचाट्यातून मुक्त झाले त्यांचा आणि आपला तुलनात्मक अभ्यास केला तर ही गोष्ट ठळक पणे दिसून येते. निरपेक्षरीत्या आढावा घेतला तर खूप त्रुटी , विसंगती आहेतच आपल्या प्रवासात . धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी अर्थ आणि राज्यव्यवस्था या दोन्ही उद्दिष्टांबाबत कमालीची अनास्था आणि विद्वेष निर्माण झालेला दिसून येतो, हे असं का झालं याची मीमांसा आवश्यक आहे.
धर्म आणि धार्मिकतेला नाकारून आधुनिकता आणण्याचा , धर्मनिरपेक्षता आणण्याची तर्कनिष्ठ थोडी कर्कश पद्धती इथल्या सामाजिक चळवळींनी घेतली आणि एक मोठा समाज दुरावला गेला . एकात्मता आणण्याआधी विविधता समजावून घ्यावी लागते , आपण एकात्मतेच्या नावाखाली विविधता मग ती धार्मिक असो की वैचारिक नाकारत राहिलो. धर्म कर्मकांड नको म्हणत असताना आपल्या चळवळी मात्र अतिशय कुंठित , बंदिस्त झाल्या आणि वैचारिक किंवा कृतीतील आदानप्रदान कठीणच नाही तर अधिक कर्मठ झाले. वादावादाच्या भिंती इतक्या मोठ्या झाल्या की संवादाचा गळा घोटत एकमेकांच्यावर तुटून पाडण्यात आणि आपली शुचिता पुढे करण्यात बरीच शक्ती वाया गेली आहे. यापासून धडा घेऊन नवीन सर्वसमावेशक चळवळीची बांधणी करायला हवी आहे , किंबुहना ती काळाची गरज आहे. भारतीय अध्यात्मिक मानसाला शतकांची चिकित्सा आणि बंडखोरीची परंपरा आहे. बौद्ध , शाक्त , भक्ती , सुफी अशा वेगवेगळ्या परंपरा इथे निर्माण झाल्या त्या प्रचलित समाज आणि धर्मव्यवस्थेला नाकारून, त्याच्या विरोधात बंड पुकारून . त्यांना कालपरत्वे धर्म आणि तत्कालीन राजवटींनी सामावून घेतले , प्रसंगी उखडूनही लावले . पूर्व आशियायी प्रांतात बौद्ध विचार आणि उपासनाप्रणालीचा प्रचार प्रसार या प्रक्रियेतूनच झाला. इस्लामचे भारतात आगमन, इथल्या राज्यकर्त्या समाजाशी झालेला संघर्ष, त्यातून झालेले विविध प्रकारचे समझोते , नंतर पसरलेली राजवट आणि अर्थ समाजकारणावर झालेला त्याचा परिणाम यावर बरंचसं लिहिलं गेलं आहे. तो बदल सहा आठ शतकांचा बहुपदरी, बहुआयामी असा आहे. त्यानंतर ब्रिटिश राजवट, त्यांची फोडा आणि झोडा नीती, सर्वच समाजातील लोकांनी त्याविरुद्ध वेगवेगळ्या नेतृत्वाखाली केलेला संघर्ष , फाळणीच्या रक्तमय आठवणी आणि त्यातून नवराष्ट्र निर्मितीची प्रक्रिया या सर्व गोष्टींवर वेगवेगळ्या अंगाने लिखाण झालेले आहे . गेल्या तीन दशकात जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत , तंत्रज्ञान आणि इतर देशांशी प्रवास, सहवास या गोष्टी झपाट्याने बदलल्या आहेत. भारतीय राजनीतीत, धोरणात आमूलाग्र बदल झालेला आहे परंतु मुस्लिम प्रश्नांची मांडणी पुरोगामी गटात अजूनही सत्तर - ऐशीच्या दशकातीलच राहिली आहे. या प्रश्नाचे आंतराराष्ट्रीय पैलू समजल्याशिवाय पुढची मांडणी आणि कृती अपुरी पडणार आहे.
मुस्लिम प्रश्नाचे पहिले आंतरराष्ट्रीय परिमाण म्हणजे इस्लाम, ख्रिस्ती आणि ज्यूडाइसम या तीन अब्राहमीक धर्मातला शतकांचा तिढा . इब्राहिम किंवा अब्राहमपासून सुरु होऊन प्रेषित मोहम्मदापर्यंत येऊन थांबलेल्या या तिन्ही धर्मांच्या तत्वप्रणालीत बरेच साम्य आहे, किंबुहना old टेस्टामेन्ट , न्यू टेस्टामेन्ट आणि कुराण यातील मूळ साचा एकच आहे. परंतु एका ठिकाणी उगम पावलेल्या आणि जगभर पसरलेल्या या धर्मप्रणालीतील संघर्ष हा त्यांच्या उगमापासून आहे तसा आहे . काळानुसार या धर्मयुद्धांचे स्वरूप बदलले आहे पण जागतिक पातळीवर जे राजकारण चालू आहे त्यात या तीन धर्मातील तिढा, एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याची शतकांची लालसा आणि जेरुसलेम या तिन्ही धर्मात महत्वाचे स्थान असलेले ठिकाणावर कब्जा करणे हा समान धागा आहे. दुसऱ्या महायुद्धात ज्यूंचे शिरकाण आणि इस्रायलची निर्मिती, त्यानंतर ज्यू आणि सेमिटीसम या विषयांवर पश्चिम युरोपची भूमिका बचावात्मक राहिली आहे. आज या राष्ट्रांत मुलतत्ववादी गट पुन्हा जोर धरू लागले आहेत आणि वेगळ्या पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर मोर्चे बांधणी सुरु आहे . मुस्लिम राष्ट्रे आणि समुदाय यांचे वैचारिक आणि इतर पातळीवर हनन ही याच कूटनीतीचा भाग आहे आणि या सर्व प्रक्रियेत भारताचे भौगोलिक आणि राजकीय स्थान आशियात फार महत्वाचे आहे. आंतराराष्ट्रीय मोर्चेबांधणीत आपण एक राष्ट्र म्हणून स्वतंत्र न राहता दाव्याला बांधले गेले आहोत आणि आंतरराष्ट्रीय घटना आणि राजनीती दोन्हीचे पडसाद इथे शतकानुशतके एकत्र राहिलेल्या दोन्ही समाजावर पडत आहेत, पडणार आहेत. येणाऱ्या काळात या आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्याला सोडून देश अंतर्गत घटनांचे विश्लेषण होऊच शकत नाही . मुंबई ताज हल्ला हा कसाब ला दिलेली बिर्याणी अशा क्षुल्लक गोष्टींभोवती गुंगवत ठेवण्याचे कसब आपल्या माध्यमांनी आणि राज्यकर्त्यांनी दाखवले आहेच आणि आपली राजकीय जागरूकताही यातून स्पष्ट झाली आहे.
दुसरा याचा पैलू म्हणजे मुस्लिम समाज हा तसा एकसंघ नाही. भारतात आणि जागतिक पातळीवर सुन्नी आणि शिया हा भेद आहेच. बहुदा शिया समाज हा कुठल्या ना कुठल्या धर्मगुरूंना मानतो, त्यामुळे तो खूप संघटित आहे . जागतिक आणि राष्ट्रीय दोन्ही ठिकाणी हा समाज संख्यात्मक दृष्ट्या छोटा आणि व्यावसायिक दृष्ट्या संघटित आहे. बोहरा, आगाखानी, इस्मायली ही काही उदाहरणे आणि जागतिक पातळीवर इराण. उरलेला सुन्नी समाज विखुरलेला आहेच पण यातही वेगवेगळे प्रवाह आहेत. आधुनिकतेच्या अंगिकारात या समाजाचे आणि जिथे तो बहुसंख्य आहे त्या देशांचे ढोबळ मानाने बघता चार प्रकारात विभाजन करता येईल. हे विभाजन फक्त सैद्धांतिक पातळीवर आहे- प्रत्यक्षात एकाच देशातही वेगवेगळे मतप्रवाह आहेत आणि त्यांचा देशाच्या धोरणांवर कमीजास्त फरक पडत असतो .
यातील पहिला मार्ग आहे तो पूर्णपणे पाश्चिमात्य देशांच्या अनुकरणाचा. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १९व्या शतकात तुर्कस्तान, इराण, इजिप्त असे देश. पाश्चात्य देशांत प्रचलित अर्थ- राज्य आणि प्रशासन व्यवस्था या देशांतील तत्कालीन सत्ताधारी आणि अधिकारी वर्गाला जवळची वाटतात. उदा कैरो विद्यापीठाची स्थापना झाल्यावर इथे इस्लामिक धर्मशास्त्राऐवजी आधुनिक शास्त्रांचा अभ्यास सुरु केला गेला . ओटोमान साम्रज्याच्या लष्करी प्रशिक्षणात, संघटनात्मक बांधणी आणि संरचनेत जर्मनीचा मोठा सहभाग दिसून येतो. ओटोमान साम्राज्यात या अनुकरनास तन्झीमात- सुधाराची चळवळ असे नाव दिले आहे. या चळवळीच्या प्रमुखपदी सुरुवातीला तत्कालीन सुलतान होता परंतु लवकरच एका तरुण मिलिटरी अधिकाऱ्याने आपण आणखी गतीने हे बदल घडवून आणले पाहिजेत या उद्देशाने बदलाची सूत्रे हाती घेतली. हा तरुण, मुस्तफा केमाल पाशा पुढे अतातुर्क - तुर्कांचा पिता म्हणून ओळखला जाऊ लागला. केमाल पाशा आणि त्याच्या तरुणतुर्क सहकाऱ्यांनी तन्झीमातचा विचार सोडून फ्रान्सच्या धर्तीवर आधारित धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकाची घोषणा आणि स्थापना पहिल्या महायुद्धादरम्यान केली. तुर्कस्थानात गेल्या दहा वर्षात धर्माचे सामाजिक जीवनात स्थान या विषयावर चर्चा आणि बदल चालूच आहे. परंतु संपूर्ण अनुकरण यामार्गे आधुनिकतेचा अंगीकार हा पहिला दृष्टीकोन होय -यात धर्मनिरपेक्ष समाजरचना अंगभूत आहे.
आधुनिकतेच्या अंगीकारातला दुसरा दृष्टीकोन हा धार्मिक उदारमतवाद हा आहे. नवीन बदलांना आत्मसात करताना आधीच्या प्रथा, परंपरा आणि धर्म यांना बाजूला सारण्याची गरज नाही. धर्मपरंपरांमध्ये आवश्यक ते बदल आणून आधुनिकतेमुळे येणारी आव्हाने स्वीकारण्याचा हा गट पुरस्कार करतो. या गटाचे प्रतिनिधित्व मोरोक्को आणि ट्युनिशिया हे देश करताना दिसतात. इस्लाम हा सर्वसमावेशी धर्म असून तो आधुनिकतेसही अंगिकारू शकतो, नवीन आव्हाने असली तरी मुख्यतः इस्लामिक कायद्यात विशद केलेल्या संकल्पनांची पुनर्मांडणी करून त्या आव्हानांवर मात करू शकतो अशी या दृष्टिकोनावर आधारित धारणा. मुस्लिमजगतात सर्वात प्रभावी असा हा मतप्रवाह. येणाऱ्या काळानुसार बदल आवश्यक आहेत आणि ते बदल इस्लामिक कायद्याचे विवेचन, स्पष्टीकरण देऊन कायद्याच्या आधारावर संमत होऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ट्युनिशिया, मोरोक्को ५७-५८ मध्ये कौटुंबिक कायद्यात केलेले बदल. मोरोक्कोत हेच बदल २००४ मध्ये पुन्हा करण्यात आले. कौटुंबिक कायदे असोत किंवा इतर क्षेत्रातील बदल असोत अनेक मुस्लिम विचारवंत इस्लामचे वेगळ्या अंगाने स्पष्टीकरण देऊन अनेक असे बदल सामावून घेतात. परंतु या दृष्टीकोनात इसलाम आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सार्वजनिक कायद्यांचीच सर्वोच्चता मानली जाते.
तिसरा दृष्टीकोन हा परम्परावाद्यांचा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सौदी अरेबिया आणि इतर गल्फ देश. यांची मांडणी आणि दृष्टीकोन म्हणजे आम्हाला बदलाची काहीही गरज नाही. इस्लामिक शासन आणि इस्लामिक समाज हा आपल्या जागी फक्त योग्यच नव्हे तर इतर समाजांपेक्षा आणि विशेषतः पतित अशा पाश्चात्य देशांच्या तुलनेत उत्कृष्ट आहे. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ हे नेहमी आधुनिक जीवनाच्या काही बाबींचा उल्लेख करत असतात उदा. घटस्फोटाचे वाढते प्रमाण, कौटुंबिक जीवनाचा ऱ्हास, वेश्याव्यवसाय ई. अन्य समाजांच्या तुलनेत मुस्लिम समाज किती स्थिर आणि सुयोग्य आहेत कारण त्यांची बांधणी इस्लामिक कायद्यावर आधारित आहे. असा कायदा जो सर्वसमावेशक आणि जीवनाच्या सर्व पैलूंना विधिवत नियंत्रित करणारा आहे. त्यामुळे परंपरागत किंवा आधुनिक आव्हान असो -आम्हाला बदलायची गरजच नाही. आधुनिकतेच्या प्रक्रियेत येणाऱ्या अनेक तन्त्रज्ञानावर आधारित अनेक बदल मात्र यांनी अंगिकारले आहेत. हे तन्त्रज्ञान चालवण्यासाठी लागणारी मानवी संसाधनेही हे समाज आयात करतात. पाश्चात्य देशातील बनणाऱ्या सर्व सुख सुविधांचा उपभोग या देशात सर्रास केला जातो परंतु तेथील समाजाचे नियमन मात्र ते पूर्णपणे या प्रक्रियांपासून अलिप्त राहून करतात.
चौथा आणि सर्वात महत्वाचा गट - महत्वाचा यासाठी के मुसलीम आणि इतर समाजात हा गट राजकीय मंचावर जास्त चर्चिलेला, लोकांच्या मनात, कल्पनेत आज मुस्लिम म्हणून जी साधारण कल्पना आहे तीत असणारा असा हा मुस्लिम मुलतत्ववादी गट. या गटांतर्गतही खूप विभिन्नता आहे, खूप सक्रियता आहे. सैद्धांतिक दृष्ट्या आज हा गट सर्वात जास्त सक्रीय आणि प्रभावशाली आहे. या गटाने आधुनिकतेला एक आव्हान म्हणून स्वीकारले आहे. या आव्हानास प्रतिसाद देण्यात धर्मनिरपेक्षवादी गट आणि उदारमतवादी सुधाराकांचा गट अयशस्वी झाल्यामुळे इस्लामवर आधारित शासनप्रणाली आणण्याची हा गट आपली जबाबदारी मानतो. अशी शासनप्रणाली जी आधुनिक जगात पाश्चात्य जगताशी टक्कर घेऊ शकेल. यांच्यामते इस्लाम हा मूलतः भांडवलशाही किंवा समाजवाद या पाश्चात्य संकल्पनापेक्षा श्रेष्ठ आहे. हा गट अरब आणि मुस्लिम देश ज्यांनी पूर्णतः किंवा अंशत: पाश्चात्यांचे अनुकरण केले त्यांच्या असफलतेचा हवाला देत इस्लामच्या मुलतत्वांवर आधारित अशी प्रणाली विकसित करण्याचे ध्येय राखतो. प्रेषितांच्या वेळची आदर्श नैतिक व्यवस्था या गटास अभिप्रेत आहे आणि या व्यवस्थेचे हे पुरस्कर्ते हेच या व्यवस्थेस कार्यान्वित करणारे शास्तेही आहेत. ही विचारसरणी सर्व मुस्लिम जगतात गेल्या ३०-४० वर्षात लोकप्रिय झाली आहे.
भारतातील मुस्लिम समाजात हे चारही विचारप्रवाह दिसून येतात परंतु गेल्या दोन दशकात तिसऱ्या आणि चौथ्या विचारप्रणालीचा प्रसार जोमाने होत चालल्याचेही निरीक्षण आहे. अगदी स्थानिक पातळीवर भाषा, परिवेष आणि धार्मिक चालीरीतींचे कट्टर पालन यातून हा प्रवाह दिसून येतो. हिंदू मुलतत्ववादी राजनीतीपासून संविधानधिष्ठित विचार आणि संसदीय कार्यप्रणालीला जेवढा धोका आहे, तितकाच धोका या प्रवाहापासूनही आहे . या विचारप्रवाहाचे संघटित रूप काय असू शकेल आणि ते कसे व्यक्त होईल याचा अंदाज व्यापक पातळीवर अजून येत नाही कारण हिंदुत्ववादी राजकारण आणि त्याला प्रतिवाद यात सगळ्या पुरोगामी शक्ती केंद्रित झालेल्या दिसत आहेत आणि आताच्या घडीला मुस्लिम समाज हा receiving end ला आहे , त्याचे दमन आणि शोषण होत आहे, आणखी होईल पण त्याची प्रतिक्रियाही येईल आणि ती नक्कीच सकारात्मक नसेल कारण त्याला घडवणारा मुख्य प्रवाह हा चौथ्या गटातील असेल .
या सर्वातून पुढचा मार्ग काय हा खरा आताच प्रश्न आहे आणि एक सैद्धांतिक बैठक म्हणून काही विचार आणि ज्यांनी ते विचार मांडले त्या व्यक्ती मार्गदर्शक म्हणून आहेत . जगभरच्या वैकल्पिक समाजरचनेचे काम करणाऱ्या लोकांपुढे गांधीं आणि बुद्ध तत्ववेत्ता म्हणून आदर्श आहेत . भले त्यांच्या जन्म व कर्म भूमीत त्यांचे योगदान व्यापक प्रमाणावर हिनवले जात असले तरी त्या विचाराचे आकर्षण आणि त्यातून असंख्य छोटे मोठे प्रयोग वैयक्तिक आणि सांघिक स्तरावर चालू आहेत. त्यांच्या जोडीला नेहरूंची धोरणात्मक दूरदृष्टी जोडून नव्या परिप्रेक्ष्यात आधुनिकता आणि धर्मनिरपक्ष राष्ट्राची परिकल्पना मांडायला हवी आहे. पाश्चिमात्य देशांनी औद्योगिक आणि राजकीय क्रांतीच्या प्रक्रियेतून नवीन संसदीय कार्यप्रणाली दिली परंतु बऱ्याच अंशी आध्यात्मिक आणि सामाजिक पातळीवर आपल्याकडे जसे मंथन झाले आहे तसे या समाजात झालेले दिसत नाही . अजूनही सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर चर्च ही जीवनाच्या सर्व अंगांचे नियमन आणि नियंत्रण करणारी संस्था आहे आणि त्याचे पुनरुज्जीवन होत आहे. भौतिक पातळीवर खूप सुधारणा झाल्या असल्या तरी त्यातून निर्माण झालेल्या व्यक्तिवादाने एक प्रकारचे रितेपण या समाजात भरले गेले आहे आणि चर्च आणि धर्माधारित राजनीती ही त्या पोकळीला भरून काढण्याचा एक मार्ग होत चालली आहे. जागतिक पातळीवर पाश्चिमात्य राष्ट्रांची युती बघितली तर त्यातला धार्मिक समान धागा आणि त्यात गुंतलेले त्यांचे हितसंबंध स्पष्ट दिसून येतात. देशादेशातले संघर्ष हे इराक , लिबिया , येमेन असे न राहता इस्लाम / मुस्लिम विरुद्ध पाश्चिमात्य / ख्रिस्ती देश अशी सरळ विभागणी दिसून येत आहे. या सगळ्या वेडेपणाला वेसण घालण्याची वैचारिक दृष्टी ६० वर्षाआधी नेहरूंनी अलिप्ततावादी गट स्थापून केली होती, त्या विचारांची आणि त्यावर आधारित समाज आणि राजकारणाची सैद्धांतिक मांडणी करणे आणि त्यावर आधारित चळवळ उभारणे हे सगळ्या डोकं शाबूत असलेल्या माणसांपुढचे आव्हान आहे. अशा प्रकारची मांडणी आणि कृती हे आजच्या अधिक अधिक हिंसक बनत चाललेल्या, युद्धखोरीने ग्रासलेल्या जागतिक पटलावर एक विकल्प म्हणून पुढे येणे आणि त्या दृष्टीने स्थानिक पातळीवर काम उभे करणे ही काळाची नितान्त गरज आहे 

April, 11th, 2017

1 comment:

  1. very good information <a href="https://mahendrapatil1210.blogspot.comजमातवाद अर्थ व स्वरूप, उदयाची कारणे, कार्यपद्धतीआणि निवारणासाठीचे उपाय</a>

    ReplyDelete

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...