Thursday, 18 May 2017

द्वाड

द्वाड

लहानपणापासूनच सगळ्या द्वाड पोरींशी मैत्री जरा लवकर होते असा अनुभव आहे. माझ्या स्वभावाचे प्रतिबिंब म्हणा किंवा सम कार्यकारणभाव भाव म्हणा, थोड्याबहुत उचापती मंडळींशीच गाठ जमून आली आहे. शहाण्या , सभ्य मुली काही आपल्या वाटेल जात नसत आणि त्यांच्या घरची वाट काही मला माहीत नसे , त्यामुळे कळत नकळत आणि आपला सहभाग असो नसो द्वाड गोष्टींचे खापर घरात आणि बाहेर आमच्याच डोक्यावर फुटायचे. छोट्या गावात राहिल्याचा एक फायदा नक्की असतो , सगळे सगळ्यांना ओळखून, एकमेकांवर नजर ठेवून असतात. समाजधर्माच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट पण त्यामुळे आमच्यासारख्यांची गोची - बऱ्याचदा काही गोष्टी करायच्या आधीच सगळ्या गावाला आणि पर्यायाने घर खान्दानाला त्या गोष्टीची माहिती झालेली असायची. नुसती बोलणी का मार यावरून आपण काय केलंय किंवा करणार होतो त्याची तीव्रता समोरच्याच्या दृष्टीने काय आहे, ते कळून यायची.
मी अकरावीला असताना कयामत से कयामत पिक्चर आला, आणि तोपर्यंत कॉलेजात नुसत्या चिठ्या देणाऱ्या आणि फिश पॉन्डच्या कार्यक्रमात आपली 'मन कि बात' जाहीर रीत्या सांगणाऱ्या मुली चक्क पळून जायला लागल्या. हे लोन बरेच महिने चालले होते. प्रॉब्लेम असा होता की एरवी सोबत हिंडत फिरत असूनही त्यातल्या बऱ्याच जणींनी ताकास तूर लावून दिली नव्हती. बऱ्याच वेळेस पाचगणीच्या मागच्या बाजूचा घाट उतरून , पाचवड मार्गे या पोरी फरार होत आणि त्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या आया किंवा भाऊ दादालोग आमच्या घरात ठाण मांडून माझी उलटतपासणी सुरु करत तेव्हा मग मला सगळ्या गोष्टींचा उलगडा होत असे. आता आतंकवादी हल्ला झाल्यावर दुसऱ्याच दिवशी सगळे धागे दोरे, सूत्र , पुराव्यासकट एका दमात बाहेर पडतात, तसे काहीसे हे साक्षात्कार असत. खूप वर्षांनी अशाच एका पळून गेलेल्या जीवश्च कंठश्च मैत्रिणीशी आणि तिच्या पन्नाशीला आलेल्या अघळ पघळ सुटलेल्या नवऱ्याशी भेट झाली. तिला जेव्हा मी ती गेली त्या दिवशी तिची आई सगळे देव घेऊन आमच्या घरात येऊन रात्रभर त्या देवांना पाण्यात घालून आणि मला समोर बसवून , कुठे गेली माझी मुलगी सांग, असे विचारतानाचा सगळा सीन सांगत होते. मला कसं काही न सांगता तुम्ही गेलात अशी तक्रार केली तर तिचा प्रतिप्रश्न - पण तुला आधी सांगून काय प्लॅन फेल करायचा होता का ? हे ऐकून कितीही कंठाशी आलेली मैत्रीण असली तरी असल्या बाबतीत आपण विश्वासार्ह नव्हतो, हे मला पहिल्यांदा कळले .
New Thought Philosophy त Law of Attraction नावाचं एक प्रकरण आहे आणि त्याचा मतितार्थ थोडा वेगळा असला तरी माझ्या बाबतीत गाव, राज्य, देश , परदेश जिथे जिथे गेले तिथे जास्त अशा द्वाड मुलींचीच मैत्री झाली . रंग , रूप, भाषा , धर्म आणि राष्ट्रीयता याच्या परे एकच लघुत्तम साधारण विभाजक या सगळ्या पोरींमध्ये आहे आणि तो म्हणजे कुठल्याही प्रकारच्या अधिकार (authority )पीठाबाबत अगदी बेदरकार बंडखोरी . ही या द्वाड पोरींत उपजतच असते का माहीत नाही पण अगदी पहिल्या भेटीपासून स्पष्टपणे कळून येते आणि पुढच्या मैत्रीचा अगदी पक्का धागा बनते ,हा आत्तापर्यंतचा अनुभव .
अनस्टेसीया इंटरव्हियूला आली त्या क्षणीच मला जाणवलं होतं , ही त्यातलीच एक . एक व्यक्ती म्हणून आवडणं आणि आपली सुपरवायझी असणं यात फार फरक असतो आणि त्यात जो बंडखोरपणा ती करेल तो आपल्या विरोधातच असेल हे माहीत असूनही तिला जॉब ऑफर करायचा मोह काही मला सुटला नाही. कारण या द्वाड पोरी जे काही करतात ते अगदी जीव ओतून करतात असाही आतापर्यंतचा अनुभव. त्यात जे कोणी ब्रिटिश सहकारी नसतात ते आपापल्या ethnic identities घेऊन जगतात कारण तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असतो. जसे इथे इंडियन्स फार कष्टाळू (हार्डवोर्किंग) समजले जातात आणि म्हणून सगळ्या नोकऱ्यांत त्यांना प्राधान्य मिळते. मुळात कितीही काम करवून घेतले तरी चू करत नाहीत हे शिस्तप्रिय गोऱ्या साहेबांना दोनशे वर्षांपासून माहीत आहे . तो कॉलोनील धागा अजूनही कुठेतरी दोन्हीकडच्या मानसात ( mindset ) मुरलेला आहे. तसे मेडिटेरियन लोक त्यांच्या स्पष्ट आणि बरेचसे animated रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत . अनस्टेसीया ग्रीकची , इथे पंधरा वर्षे राहून पण ब्रिटिश समाजसंमत बोलाचालीत अगदीच ढ . तिला आणि तिच्या कामाला सांभाळणे मला फार अवघड जात नाही कारण तिने 'अरे 'केले की 'कारे 'शब्दात मलाही तिला खडसावता येते आणि तिच्यात विचार करून भांडायची जितकी गुर्मि आहे तितकीच आपल्याला काही माहीत नसेल तर जाऊन दोन चार पुस्तके वाचून, नाहीतरी आजच मला अर्धा तास देऊन हा नवा कायदा मला शिकव असं स्वतः शिकायची , आपलं काम सुधारायची उर्मि पण आहे . त्यामुळे कामात आणि असंही तिचं आणि माझं जमलं नसतं तर नवलच होतं .
मोठ्ठा प्रॉब्लेम तिचं ग्रुप मधल्या लोकांशी कसे पटणार हा होता कारण असले मुहफट लोक असले की काही जणांना त्यांनी काही नाही केले तरी insecure असुरक्षित वाटायला लागतं . आणि बाकीच्यांना असं काही वाटतंय किंवा वाटू शकतं याची हिला खबर ही नसते. ती टीम मध्ये आली आणि दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यातच लोकांनी तक्रारी सुरु केल्या - ती फार जोरात बोलते , माझ्या केसमधल्या चुका काढते , तू नसली की दादागिरी करते इ इ . लीडर शिप मध्ये असल्याचा एक सगळ्यात मोठा तोटा असतो , समोरचा कितीही वायफळ बडबड करत असेल तरी ऐकून घयावे लागते, सर्वांना समजून घेऊन , त्यांची समजूत काढत , एकत्र पुढे जावं लागतं. बऱ्याच वेळा बाकीच्या लोकांची समजूत काढणे सोपे असते कारण मुळातच त्यांच्या आर्ग्युमेण्ट मध्ये दम नसतो, त्यांना जे काही खुपत असते ती मुद्द्याची गोष्ट नसतेच तर अनेस्थेसिया च्या विरोधात काहीतरी सांगायचे असते . या बाईला मात्र सगळ्या गोष्टींचा शहानिशा केल्याशिवाय चैन पडत नाही आणि बऱ्याच वेळा तिच्या ज्या तात्विक भूमिका असतात त्या सोडून पुढेही जाता येत नाही . परिणामी ही आपले आणि माझे काम सातत्याने वाढवत असते . कारण बऱ्याचवेळा इतके तिला कळते तर तीच का नाही ही केस घेत पासून , सगळं काही ऐकल्यावर खरं तर त्या केस वर्कर पेक्षा हिनेच जास्त अभ्यास केलाय आणि त्यामुळे मीच तिला म्हणते , तूच घेतेस का ही केस .असे करत टीममधल्या सगळ्यात कठीण केसेस हिच्या पदरात पडल्यात. आता ती टीम मीटिंगमध्ये दुसऱ्या कोणाच्या केसवर बोलायला लागली की दोघीनांही केस ट्रान्स्फर या टप्प्यावर संभाषण यायला लागलं की गाडी कुठे जाणार हे कळतं आणि वेळीच रिव्हर्स गियर टाकून, ज्याचे काम त्याला सुपूर्त करतो.
सगळ्या गोष्टी परफेक्ट करायच्या तर आपलं जीवन पण कसं परफेक्ट असायला हवं आणि त्यासाठी ही बया भरपूर वाचते आणि कष्टही घेते . त्यामुळे ती विगन आहे , बऱ्याचशा योगा आणि इतर पर्यायी जीवनशैलीच्या कार्यक्रमांची भोक्ती आहे. तिची राजकीय मते ठाम आहेत . शहरापासून लांब अशा संरक्षित कंट्री पार्क मध्ये एकटीच तिच्या असंख्य प्राण्यांच्या सोबतीने राहते . खूप मित्रमैत्रिणी आहेत पण हिच्या तत्वात बसणारा बॉयफ्रेंड नाहीये . मुलांची खूप आवड आहे त्यामुळे अर्धा डझन मैत्रिणींच्या मुलांची ही गॉडमदर आहे . बरं हे सगळे तिच्या आवडीच्या आणि तिला पटलेल्या गोष्टी आपणही कराव्यात असा तिचा आग्रहही असतो . मग एक दिवस सकाळ सकाळ बाटलीभर हिरवा द्रव पदार्थ घेऊन येईल - एक तिला आणि एक मला . हे काय तर स्पिनॅच मिल्क . तू खूप दमलेली दिसतेस आजकाल, याने फायदा होईल .ही वीगन असल्यामुळे साधं दुध व्यर्ज, बदाम ,ओटस ,हेजलनट चं दूध. मग मला तिला सांगावे लागते अगं या कॉम्बिनेशन मध्ये पालक खात नाहीत . त्याला थोडं तरी उकडावं लागत आणि इतकं दूध पालक प्याले तर मला माझा डेस्क टॉयलेटच्या शेजारी घेऊन जावा लागेल. मग अर्धा तास तिला काय कशाशी खातात ते सांगन्यात जातो .दुसऱ्या दिवशी मग आणखी नवा प्रयोग , परत काही सांगायचं तर हिचं खडसावण माझी बॉस आहेस, आई बनू नकोस . तिची आई माहित नाही मला , पण तिचे हे सगळे सत्याचे प्रयोग बघून आईची व्यथा नक्कीच कळते. परत ही आणखीन सांगणार कसे तिच्या घरात सगळे डॉक्टर आहेत आणि त्यांना आरोग्याबद्दल काहीच माहीत नाही. विविध हेल्थ प्रोडक्ट्स आणि डाएट्स यावर ती ऋतुजा दिवेकर जे पोटतिडकीने लिहीत असते ते हिला बघितले की कसे गरजेचे आहे हे मला गेल्या ८-१० महिन्यात खूप वेळा कळले आहे . बाहेर झीरोच्या खाली तापमान असले तरी dtox साठी दिवसभर काकडी आणि लिंबाचे पाणी पित राहणार . सर्दी झाली की कसले कसले हर्बल टी आजकाल टरमरिक टी ची लाट आहे. मंग बीन्स , आपले मूग ,कशी प्रोटीनयुक्त असते म्हणून ग्लूटन फ्री केकमध्ये घालणार , त्यात कुठेतरी इंडीयन घी वर आर्टीकल वाचलेले आठवून बटर ऐवजी मुक्तहस्ताने त्याचा वापर करणार. हे सगळे कमी म्हणून जो काही पदार्थ बनला तो डब्यातून बाहेर काढताना मोझेसच्या टेन कमांडमेंटस सारखे निरूपण ही करणार असं भन्नाट काहीतरी आख्खा वीकेंड खर्च करुन ती करत असते. यातून सुटका म्हणून मग आता तिने काही आणायच्या आत रात्री डबा करताना मीच जास्तीचा डबा घेऊन जाते तिच्यासाठी . एक तर तिचे भन्नाट प्रयोग त्यात सगळं महागडं ऑरगॅनिक घटकपदार्थ आणि एवढं मनापासून ती काहीतरी आणणार आणि मग मी तिला तिने जे वाचलं , ऐकलं आहे ते कसं चुकीचं आहे , ते सांगून तिचा भ्रमनिरास करणार त्यापेक्षा मीच तिच्यासाठी काही घेऊन जाणे परवडते. पण पर्यायी जीवनशैली आणि योगा या नावाने काय काय खपवतात याचे अगाध ज्ञान मला तिच्याकडून होत असते. बाहेर गुडूप अंधार आणि बर्फाळ हवेत संध्याकाळी ८. ३० ला काम आटोपून ती ज्या लगबगीने Sun Salutations अर्थात सूर्यनमस्कार घालायला निघत असते तेव्हा मला अगदी ओम अनस्टेशाय नमः म्हणून तिच्यासमोर लोटांगण घालावेसे वाटते .
हिच्या कामाचे जेव्हडे कौतुक होते तेवढ्याच बऱ्याच पालकांच्या तक्रारी ही येतात . अर्थात आमच्या कामात पालक तक्र्रार करतात म्हणजे तुम्ही तुमचे काम नीट करत असाल असा एक अलिखित नियम आहे . पण हिच्या बाबतीतल्या तक्रारी म्हणजे धम्माल असते . त्या सगळ्या तक्रारीना अधिकृत उत्तर द्यायची जबाबदारी माझी असते. बऱ्याच वेळा या तक्रारी ती लोकांना काय म्हणाली याबद्दल असतात. चिडली की सगळ्या ग्रीक भाषेतल्या म्हणी इंग्रजी भाषेत अनुवादित होऊन हिच्या संभाषणात येतात. एक तर शासकीय अधिकारी असल्यामुळे काय बोलावे, कसे बोलावे याचे नियम इथे फार कडक आहेत , त्यात सभ्य ब्रिटिश भाषेतील अगदी गुळमुळीत शब्दांनाही आम्हाला कायद्याच्या निकषावर तोलून मापून बोलावे लागते. कारण चुकीचं बोललं , नीट माहिती दिली नाही की अगणित चोकशा , दंड भरावा लागतो. असं असताना हिच्या ग्रीक भाषेत ही जे म्हणू इच्छिते त्याचे इंग्रजी भाषांतर आय विल किल यू असे होते पण त्याचा अर्थ मी तुला बघून घेईन याचयाशी जवळपास काहीतरी .. हे जेव्हा तक्रार निवारणासाठी आम्ही बसतो तेव्हा ती आरामात सांगते . इंग्रजीत म्हणा किंवा ग्रीक मध्ये म्हणा will kill you - समोरचयसाठी तेवढेच खतरनाक असते . पण एवढं होऊन पण लोकांना त्यांच्या केस वर तीच वर्कर म्हणून हवी असते . मग एक तिच्या वतीने , एक खात्याच्या वतीने माफीची दोन पत्रे जातात आणि गाडी परत रुळावर येते.
मी जिथे जिथे काम केले आहे तिथे तिथे थोड्या बहुत फरकाने अशा अनस्टेसीया भेटल्या आहेत . खूप जीव ओतून काम करणाऱ्या, खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणत कसलाही आडपडदा न ठेवता ऑफिस पॉलिटिक्स ची पर्वा न करता सडेतोड पणे काम करणाऱ्या आणि ऑफिस आणि प्रोफेशनल रिलेशन संपली तरी वैयक्तिक आयुष्यात अगदी जीवश्च कंठश्च झालेल्या. आधी खूप भारावून जायचे असं कोणी भेटलं की पण आता अनुभवातून आपल्याला लॉन्ग टर्म काही काम सातत्याने करायचे असेल तर अशा धडाडीच्या कार्यकर्त्यांबरोबर होयबा, नवशे, गवशे , थोडे कामचुकार आणि तक्रार करणारे असे सगळ्याच प्रकारचे लोक लागतात हे कळायला लागले आहे . त्याचबरोबर कितीही कोणी आवडले तरी सगळ्या टीम समोर एक ऑब्जेक्टिव्हिटी सांभाळावी लागतेच लागते. ऑफिसच्या बाहेर पर्सनल रिलेशन ठेवता येत नाहीत त्यामुळे एकूणच मैत्रीला मर्यादा येतात आमच्या. संध्याकाळी पाच नंतर बऱ्याच वेळा दोघी तिघी असतो ऑफिसात , तेव्हा पटापट रिपोर्ट्स संपवताना मग गप्पा रंगतात. काही कामाबद्दल , काही वैयक्तिक संदर्भातल्या , बऱ्याचशा इतर सहकार्यांबद्दल आणि इतर घडामोडींबद्दल . रोजच्या तशा नीरस आणि धकाधकीच्या जीवनात तगून राहायला जी चिकाटी लागते, रुटीन कामातही परिपूर्ण काम करण्यासाठीचा एक रेटा लागतो तो अशा सहकाऱ्यांकडूनच मिळत असतो. तिच्या इंटरव्ह्यू च्या वेळेस कुठेतरी हे अंधुक माहीत होते म्हणूनच तिची निवड केली होती मी . आता वर्षभराने ती निवड कितीही त्रासदायक असली तरी कशी योग्य होती याचा अनुभव घेत आहे . आज वर्ष झालं तिच्या आणि माझ्या अघोषित मैत्रीला, दोघी वाट बघतोय कधी एकदाचे ती किंवा मी हे ऑफिस सोडू म्हणजे मग खुल्लम खुल्ला दोस्ती का इजहार कर सके, पण त्याचबरोबर इतक्या वेगवेगळ्या केस वर आम्ही काम केलय आणि दोघी त्यातून इतकं शिकलोय की दोघींच्याही प्रोफेशनल प्रॅक्टिस साठी एकत्र जितकं काम करू तितके फायद्याचं आहे, अशी इकडं आड तिकडं विहीर अशी पण सुखद अडचण आहे समोर. आता द्वाड पोरी असल्या की अडचणीचं असणार ना , सगळं सुरळीत झालं तर उसमे कुछ मजा नै भाय !

February, 8th, 2017

No comments:

Post a Comment

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...