Wednesday, 17 May 2017

माझी टर्किश माय

माझी टर्किश माय
लंडनला पहिल्यांदा आले तेव्हा हातात नोकरीचे पञ आणि चार दिवस राहायची एका बेड आणि ब्रेकफास्टच्या ठिकाणी सोय एवढेच होते. ना कोणी ओळखीचे आणि जे कोणी ओळखीच्यांच्या ओळखीचे त्यांचीही फार काही मदत करायची तयारी नव्हती. त्यामुळे तिथे पोहोचल्यावर बघुयात असा विचार म्हणण्यापेक्षा दुसरा पर्यायच नव्हता . नावाला शासकीय नोकरी पण तोपर्यत सरकारी कर्मचारी या प्राण्याबद्दल भारतात जे काही माहित होते , ते काहीच या देशात लागू पडत नाही, हे कळू लागले होते. सुरुवातीचे काही दिवस, आठवडे इकडे तिकडे काढल्यावर एक आत्येभाऊ इथे असल्याचा शोध लागला. वीस वर्षे कोणाशीच संपर्क नसल्यामुळे नावापलीकडे त्याची फार काही माहिती नव्हती. पण आवडत्या मामाची लेक म्हणून तू अगदी अगत्याने घ्यायला आला. त्याची बायको कुठल्यातरी कंपनीतून सहा महिन्याच्या प्रकल्पावर आली होती आणि तो तिच्याबरोबर लंडन फिरायला. बस्तान टेकायला जागा मिळाली. दोघांनी मिळून लंडनच्या पूर्व भागात एक फ्लॅट सहा महिन्यासाठी भाडयाने घेतला. त्या सहा महिन्यात शेअर मध्ये राहणे हा प्रकार बराच माहित झाला होता. तो जायच्या आधीच दुसऱ्या रूमची व्यवस्था झाली आणि मग काही महिने वेगवेगळ्या ठिकाणी रूम मिळेल तसं राहत गेले. यात एक गोष्ट लक्षात आली होती, ती म्हणजे आपल्या एकटीच्या पगारात फ्लॅट घेऊन राहणे परवडणार नाही आणि कामाच्या निमित्ताने बऱ्याच शाळा बघून झाल्या होत्या. कामाचे स्वरूपचं असे की जिथे जाल तिथे समस्याग्रस्त मुलं आणि कुटुंबच आधी बघायला मिळतात. अतिशय आलिशान , निदान भारताच्या तुलनेत आणि अद्ययावत सर्व सोयी आणि शैक्षणिक सुविधा असलेल्या शाळा जरी खूपच भारावून टाकणाऱ्या असल्या तरी कामाच्या निमित्ताने या शाळेत असलेले ड्रगस , गँग्स आणि अगदी १३-१४ वर्षाच्या प्रेग्नन्ट मुली हा मला धक्काच होता. शिक्षण मोफत असले तरी सकाळी आणि संध्याकाळी मला मनूसाठी काहीतरी सोय करावी लागणार होती आणि अशा चाईल्ड मायंडर चे दर माझ्या आवाक्याबाहेरचे होते. इथे येण्यासाठी- विजा तिकिटासाठी आलेला खर्चही कर्ज घेऊन केलेला होता , त्यामुळे त्याच्या पूर्तीसाठी काही बचत करणे जरुरीचे होतेच. मनूला तेव्हा होस्टेलला ठेवायचा निर्णय याच परिस्थितीत घ्यावा लागला आणि पुढचे सात आठ महिने मी शेअर रूम्समध्ये राहिले . बहुतेक सगळे शेअर करणारे विद्यार्थी किंवा भारतातून आय टी प्रोजेक्टवर येणारी मुले , ज्यांनी कधी घरची काडी पण इकडून तिकडे केली नसेल. साहजिकच स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब, आणि इथे तीन चार बेडरूमचे घर असले तरी एकच संडास, बाथरूम आणि तेही एकत्र . त्यामुळे दर दोन महिन्यांनी मी इस्टेट एजंटच्या ऑफिसच्या दारात. त्याला पैसे मिळत कमिशनचे पण त्यापलीकडेही बराच गप्पिष्ट होता तो त्यामुळेही वैतागून का होईना दुसरी रुम दाखवायला यायचा.
ईस्ट लंडन सारखी विविधता लंडनच्या इतर भागात नाही , सर्व पूर्वाश्रमीचे वासाहतिक देशातले नागरिक इथे आढळतील. माझ्या ऑफिसच्या भाषांतर विभागात एकूण ९६ भाषांमध्ये मदत करणारे लोक पटावर होते त्यावरून या विविधतेची कल्पना यावी . ईस्ट हॅम या प्रामुख्याने आशियायी समजल्या जाणाऱ्या उपनगराच्या या भागात काही रस्ते पाकिस्तानी, पंजाबी , काही गुजराती तर काही श्रीलंकन दुकानांनी व्यापले आहेत. हा इस्टेट एजंट श्रीलंकन होता आणि इतर भाऊबंदांप्रमाणे त्याच्याही ऑफिसात प्रभाकरन चा फोटो होता . कामाच्या ठिकाणी बांगलादेशी, काही पाकिस्तानी , मिरपुरी कश्मिरी या सगळ्यांना भारत व भारतीय कसे वाटतात याचे कुतूहल होतेच पण लंडन शहरात किती वेगवेगळ्या आधीच्या वसाहतीतुन आलेले लोक आपापली संस्कृती जपत, इथल्या मुख्य प्रवाहात सामील होत पण हातचे राखत जगत आहेत. हा सर्वच माझ्यासाठी विस्मयकारी अनुभव होता. त्यात कोणी गप्पा मारायला लागले की भीड वगैरेंशी माझा कधी संबंध नव्हता त्यामुळे हा एजंट आणि मी घरं कमी आणि पूर्व लंडनच्या सगळ्या वसाहती खूप बघायचो, घरं बघताना , इथली वेगळी दुकाने, हॉटेले आणि वेगवेगळ्या समाजाची प्रार्थनास्थळे, धार्मिक, राजकीय संस्थांची ऑफिसे असं त्यानं प्लॅन न केलेली सांस्कृतिक राजकीय ट्रिप या महिन्यांमध्ये केली होती . मग वेळेचं भान आलं की तो हमखास शिव्या द्यायचा , तू बोलायला लागलीस की सगळा वेळ जातो आणि काम काही होत नाही . लंडनमच्ये आम लंडनकर अगदी मोजकेच, विचारेल तेवढेच बोलणार. आपण बरे आपले काम बरे असा खास ब्रिटिश बाणा असलेल्या या अतिशय वेगवान शहरात गप्पा , मैत्री फार क्वचित , झालीच तर आपल्या विशिष्ट भाषिक, जातीय , धार्मिक , सामाजिक समुदायातच होते हे तोपर्यंत माहीत नव्हते पण फार कोणी मोकळेपणाने बोलत नाही , त्यामुळे इथल्या बोचऱ्या थंडीत एक अलिप्तता आणि एकटेपणा जाणवायला लागलाच होता . एका शनिवारी असाच या राजाचा फोन आला आणि त्याने एक घर बघायला बोलावले , तशी अर्ध्या तासात दोन बसेस बदलून मी त्याच्या हाफिसात पोहोचले. त्याचा अजून एक मित्र आणि त्याची फॅमिली समोर बसले होते . ओळख झाली आणि राजाने नवीन प्रस्ताव मांडला , यांना घर विकायचे आहे, तू घेऊन टाक, मी तुला प्रोसीजर सांगेन.
इथे येऊन वर्ष व्हायला आलं होतं . येताना सगळे जाऊयात, नवीन संसार सुरु करूयात या सगळ्या योजनेचे बारा वाजले होते . शाळा आणि खर्चाचा मेळ बसत नव्हता आणि इथल्या शाळेचे वातावरण बघून मनू खाजगी बोर्डिंग शाळेत गेली होती . तिची एका वर्षाची फी, तिचा आणि माझा यायचा जायचा खर्च हा कधीही कल्पना केली नव्हती इतका होता . नवरा चार महिने राहून, मला इथे करमत नाही म्हणून निघून गेला होता. त्याच्याबरोबर न जायच्या निर्णयाबरॊबरच आणखी एका मुलाला स्वतःच्या जबाबदारीवर या जगात आणायचा माझा निर्णय होता. या गोष्टी इतक्या जलद गतीने घडल्या होत्या की काही विचार करायला, उमजायला ही वेळ मिळाला नव्हता. तो प्रस्ताव ऐकून मला आधी राजा चेष्टा करतोय असेच वाटले. त्याने मात्र शांतपणे पेपर काढले , प्रोसीजर समजावली, तू जितकी घरं सहा महिन्यात बदलली आहेत, त्या गतीने तुझं कोणाशी पटेल असं वाटत नाही. चार महिन्यात छोट्या मुलासह शेअर मध्ये घर मिळणे फार अवघड होईल तुला, त्यामुळे थोडी गुंतवणूक करून तू तुझे घर घे आणि त्यात लॊजर ठेव, इतका खर्च येईल. आधीच्या सगळ्या घराच्या भाडेकरारासाठी राजाने माझे कामाचे आणि बँकेचे कागदपत्र पाहिले होते. त्यामुळे त्याला बँक, कर्ज या सगळ्या गोष्टी माहित होत्या. घर बघून तर येउयात म्हणून त्यांनी गाड्या काढल्या आणि या घराच्या प्रेमात पडले मी. मागे पुढे सुंदर गार्डन , आटोपशीर दोन खोल्या छोटं पण टुमदार घर. पण तिथे गेल्या गेल्या राजाच्या मित्राने शेजारणीशी ओळख करून दिली- या घराचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ही शेजारीन -- ही या मायबरोबरची पहिली ओळख . तिने सगळ्यांना आग्रह करून चहा आणून दिला. दहा मिनिटे तो घरमालक, त्याची बायको आणि मुलगी या शेजारणीच्या गळ्यात पडून निरोप घेत होते, सगळ्यांचे डोळे पाणावलेले आणि या साठीतल्या बाईने त्या सगळयांना अगदी घट्ट आलिंगन देऊन त्यांचे मुके घेतलेले . माझ्या डोक्यात पैशाची आकडेवारी, कागदपत्रे , इतर जबाबदाऱ्या करताना आणखी एक कर्ज असे विचार त्यामुळे फार त्यांच्याकडे बघायला किंवा त्यांच्याबद्दल विचार करायला मला फुरसत नव्हती .
सगळ्या गोष्टी जुळवून आणायला सहा महिने जाणार होते , त्यात एक छोटं ऍग्रीमेंट करून पुढच्या दोन महिन्यात माझ्या दोन बॅगा घेऊन एका शनिवारी मी या घरी राहायला आले. होती तेव्हडी सगळी पुंजी पणाला लावून आणि मित्र मैत्रिणीकडून कर्ज घेऊन डिपोजीट आणि इतर कायदेशीर गोष्टीची तरतूद तर झाली होती , पण या घरात काहीही घ्यायला मला निदान ४-६ महिने थांबावे लागणार होते. आधीच्या घरमालकाचा जुना सोफा , पडदे, एक टेबल आणि दोन खुर्च्या या गोष्टी तो टाकून देणार त्या मी ठेऊन घेतल्या होत्या त्यावर गुजारा असणार होता. टिस मधून निघाल्यावर पहिले घर केले तेव्हा एक सतरंजी , चार भांडी आणि एक बॅग भरून कपडे या मानाने ही फार वाईट परिस्थिती नव्हती. त्यात माझे स्वतःचे घर आणि घाणेरड्या लोकांबरोबर आता शेअर मध्ये राहावे लागणार नाही याचे समाधान जास्त होते.
पहिल्या दिवशी मस्त त्या सोफ्यावर ताणून दिली , दुसऱ्या दिवशी सकाळी कोणीतरी जोरात दार वाजवले म्हणून उठले तर शेजारच्या आंटी उभ्या होत्या . यू ऑल राईट , टी ? म्हणून मला घरात बोलावलं . त्या क्षणापासून आतापर्यंतच्या असंख्य भेटीत यू ऑल राईट ? थँक यू थँक यू , मम्मी डॅडी सलाम , चिल्ड्रेन फाईन ! एवढ्या चार वाक्यापलीकडे आमचे प्रत्यक्ष संभाषण कधीच गेले नाही . पण झेहराच्या माध्यमातून दोघीना एकमेकींच्या चार पिढ्यांची आणि आवडी निवडीची इत्यंभूत माहिती आहे . त्या दिवशी सकाळी खूप उकळलेला टर्किश चाय त्यांनी छोट्या कपात दिला , आणि समोर मोट्ठी किटली भरून आणखी घे म्हणत बरंच काही टेबलावर ठेवले. त्यांना बरंच काही बोलायचे होते पण इंग्रजी येत नव्हते , घरात दुसरे कोणी नव्हते, अंकल टर्कीला त्यांच्या ट्रीपवर . मग त्यांनी झेहराला फोन लावला . स्पीकर फोनवर तिने चार पाच प्रश्न त्यांच्या वतीने विचारले . नवरा कुठेय? सामान कधी येणारेय ? किती महिन्याची गरोदर आहेस? इंडियन आहेस का वगैरे . झेहरा म्हणाली मी दुपारी येते, जेवण आमच्याकडेच कर. नाहीतरी माझ्याकडे सामान आणायला त्यादिवशी पैसे नव्हते आणि भांडी ही नव्हती . आंघोळ करून , थोडं आवरून दुपारी परत आंटींनी दार वाजवले. झेहरा आली होती आणि सोबत आदल्या रात्री केलेले सारमा आणि डोल्मा आणले होते . झेहराचे इंग्रजी ही असेतसेच होते. आंटी प्रश्नांचा भडीमार करत होत्या , ती निवडून एक एक प्रश्न विचारत होती , मग माझे उत्तर त्यांना समजावून सांगत होती . सगळी दुपार अशी खाण्या पिण्यात , मुख्यतः माझी चौकशी करण्यात गेली. दोघी माझ्या घरात आल्या आणि पुन्हा त्यांच्या घरात जाऊन चार भांडी , रग , एक दोन छोट्या बादल्या अशा काही बाही वस्तू घेऊन तुला लागतील म्हणून ठेवून गेल्या. त्या दिवशी संध्याकाळी खूप समाधानाने चार अश्रू ढाळले . या एवढ्या मोठ्या शहरात कोणीतरी आहे, सोबत आलेल्या भारतीय मैत्रिणी होत्या पण त्याही माझ्यासारख्या नवीन शहरात आपले बस्तान बसवण्याच्या आणि नोकरीत सामावून घेण्याच्या तिढ्यात अडकलेल्या. भारतातून येताना चौदा जण एकत्र आलेलो , प्रत्येकाची परिस्थिती आणि प्रायोरिटी वेगळी होती. फार मन मोकळे करून बोलता येईल अशी मैत्री झाली नव्हती आणि सांगता येईल अशी फार आशादायक परिस्थिती माझी नव्हतीच. एका पाठोपाठ एक सगळीच समीकरणे चुकत होती आणि पुढे काय कसे होईल याची काहीही कल्पना नव्हती . त्यात एक प्रेमळ शेजार मिळाला आणि त्यानंतर कधी या शहरात एकटेपणामुळे रडले असे झाले नाही .
हळूहळू बस्तान बसू लागले तसं आंटी आणि झहराबद्दल माहिती आणि आपुलकी वाढतच गेली . दोघी इतक्या सारख्या दिसतात आणि ती आंटींना माय मम असंच म्हणते, दर दोन तीन दिवसांनी त्यांच्या घरी येऊन कामात , स्वयंपाकात मदत करते त्यामुळे त्यांची ती लेकच आहे असा माझा समज . कधीतरी सहा महिन्याने कळलं की ती सून आहे आणि सतत भांडत राहणारा , ओरडणारा असगर त्यांचा मुलगा आहे . त्या दोघी जितक्या प्रेमळ, लाघवी तितकाच हा भांडखोर , सतत कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या गोष्टींवरून गोंधळ घालणारा . सुरुवातीला खूप उध्दट पणे बोलायचा, एक दिवस आंटींनी चांगलंच झापलं तेव्हापासून थोडा सौम्य झाला आणि नंतर एक दिवस घरच्या भांडणात त्याने झेहरावर हात उचलला तेव्हा मी पोलीस बोलावले तेव्हापासून फार दबून राहायला लागला. हळू हळू ताण निवळला आणि थोडं जास्त कळायला लागलं तेव्हा माहीत झाले की तो मेंटल हेल्थ पेशंट आहे , माझा सगळा रवैय्या बदलला त्यांच्याकडे बघायचा. त्यात झेहराच्या छोट्या मुलाला ब्रेन ट्युमर आहे हे ही दोघींकडून कळलं होतं. ती निम्मे दिवस त्याच्या बरोबर हॉस्पिटल मध्ये असायची. मोठी दोन मुले आहेत. त्यांची मुलगी आणि मनू एकाच वयाच्या त्यामुळे मनू सुट्टीला यायला लागली आणि फक्त संध्याकाळ आणि वीकेंडचं नातं अगदी फुल टाईम घरोब्यात बदललं. माझे सगळे डोहाळे या सासू सुनेनी न विचारता पुरवले होते. माहिला जन्मापासूनच हे आजोळ मिळालं होतं. तो माझाच लेक त्यामुळे जगात यायची घाईच होती त्याला , वेळेच्या दीड महिना आधीच आला. त्या रात्री एकटीच घरी होते , एक लॉजर आणि त्याची बायको नुकतेच राहायला आले होते आणि स्कॉटलंडच्या ट्रीपवर गेले होते. रात्री अचानक पोटात दुखायला लागलं आणि इंटरनेटवर आधी सगळे सिम्प्टम वाचलेले असल्यामुळे कळलं अँब्युलन्स बोलवायला पाहिजे. हॉस्पिटल मध्ये जाईपर्यंत water बॅग फुटली होती आणि NHS स्टाफ खूप आश्वासक असला तरी एकटीच रात्रभर वेगवेळ्या मशीनवर पडले होते. मैत्रिणीना कळलं आणि बघायला येऊन गेल्या. हॉस्पिटल मध्ये काही कोणाला राहता येत नाही. प्रचंड वेदना होत असताना आजूबाजूच्या विव्हळणाऱ्या आणि किंचाळणाऱ्या बायांच्यामध्ये मी आपली जमेल तेवढी शांत विपश्यना करत पडून राहिले. नशीबाने पहिली वेळ नव्हती आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी माहित होत्या पण तरीही नवजात बाळाला आंघोळ, दूध पाजणं , झोपवणं आणि नंतरची हॉस्पिटल डिस्चार्जची प्रोसिजर करून बाळाला घेऊन घरी आले तेव्हा अगदीच दमले होते. निसर्गाची किमया खरंच अगाध आहे इतक्या श्रांत अवस्थेतही आपल्या लेकरासाठी इतकं प्रेम आणि माया येते , सगळ्या वेदना बाजूला ठेऊन त्याला घेऊन घरी आले त्या आधीच माझ्यासाठी शोर्मा बनवून या सासू सुना दोघी त्याला दृष्ट लागू नये म्हणून घरात एक निळा डोळा ( टर्किश आय ) बांधून गेल्या होत्या. आपल्याकडे भाकर ओवाळून टाकतात तसं काहीसं आंटींनी पाणी घेऊन केलं आणि छोट्याला मांडीवर घेऊन बराच वेळ बसल्या. त्याच्या जन्मानंतर चोथ्या दिवशी शांतपणे झोप लागली. नंतरची पाच वर्षे माही चालायला लागल्यापासून कुठूनही बाहेरून आला की पळत जाऊन त्यांचे दार आधी वाजवायचा . आंटींकडून त्याचा ठरलेला खाऊ घेऊन , मस्तपैकी त्यांच्या मिठीत शिरून भरपूर मुक्यांची देवाणघेवाण करूनच घरात यायचा .
माझ्याकडे जे जे कोणी पाहुणे, नातेवाईक आले त्या सगळ्यांना आंटींच्या घरी अगदी अगत्याचे आमंत्रण असतेच असते आणि या अगत्याची सुरुवात त्यांच्या मिठी आणि मुक्यांनी होते. छोटे , मोठे सगळेच त्यांना मुलासारखे, अगदी अजितसारखा अंगाने उभा आणि आडवा गडी पण त्यांच्या मिठीत सहज सामावून जातो. त्यांच्याशी संवाद करताना कधी कोणाला भाषेचा अडसर आला नाही कारण सगळी माया आणि प्रेम त्या मिठीत असते. पाच वर्षे लंडनच्या त्या घरात राहिले आणि एकही संध्याकाळ अशी नाही की मागच्या दाराने आम्ही काही देवाण घेवाण केली नाही . कसलीही फोडणी घातली की आंटी त्यांच्या गार्डन मध्ये येऊन उभ्या राहणार . सगळ्या भाज्या , आमट्या , त्यांच्याकडून वेगवेगळया मुरवलेल्या भाज्या, ब्रेडचे वेगवेगळे प्रकार इकडून तिकडे गेल्याशिवाय आमची जेवणे झाली नाहीत . वीकेंडला झेहरा आली की मग एकमेकींना मंगळवारी काय दिले त्याचे नाव, काय घातले ते घटकपदार्थ , बुधवारचा पराठा छान होता पण कमी दिला होता असा अहवाल मिळायचा. त्यांच्या आणि आपल्या खाद्यपदार्थात बरंच साम्य आहे ते त्यातूनच कळले आणि ज्या ज्या गोष्टी आवडल्या त्या आवर्जून शनिवार रविवार वेळ काढून शिकले आणि त्यांनाही शिकवल्या. आपल्या पराठयांसारखे ग्योझेलमा , ब्योरेक , डोलमा , पनीर चे वेगवेगळे पदार्थ, लस्सी , आणि हे सगळे करून खाऊन झाले कि चाय असा आमचा बेत ठरलेला असायचा . उन्हाळ्यात तर बाहेर दोन झाडांना दोर बांधून त्यावर रग टाकून सगळी मुले खेळायची आणि आम्ही एक एक बार्बेक्यू लावत राहायचो .
पहिल्या वर्षीच्या उन्हाळ्यात आणखी एक गोष्ट कळली होती ती म्हणजे मागच्या त्यांच्या गार्डनमधल्या चेरी , प्लम च्या झाडांचा बहर . उन्हाळ्याचे ते दोन महिने सकाळ संध्याकाळ चेरी , प्लम खाऊन इतकी सवय झाली आहे की गेल्या दहा वर्षात २/३ पौंड देऊन १०-१२ चेरी विकत घेणे हा जगातला सगळ्यात अक्षम्य गुन्हा आहे, असं माझं मत आहे. दरवर्षी न चुकता आम्ही अजूनही एक दिवस समरमधला रविवार काढून आंटीच्या घरी चेरी खायला जातोच. त्याचबरोबर कधी परातभर बटाटे , कांदे , वाटीभर स्ट्रॉबेरी मागच्या दारातून येत असायची. आंटी या सगळ्यासाठी मेहनत ही खूप घ्यायच्या पण ती सगळी मेहनत रात्री दोन वाजता सुरु व्हायची कारण त्यांना मायग्रेनचा त्रास होता त्यामुळे रात्री झोप यायची नाही . रात्री दोन अडीचला अगदी मागच्या पुढच्या गार्डनमध्ये दिवे लावून त्या झाडांना पाणी घाल , अळी काढ , मोठ्या फांद्या तोड अशी कामं करत राहायच्या. एरवी खुट्ट झालं की उठणारी मी या सगळ्या आवजात शांत झोपून जायची , भिंतीच्या पलीकडे आंटी असल्याचा मोठा दिलासा होता त्या घरात . सकाळ सकाळ ऑफिसला निघावे तर या शिडी लावून वरच्या खिडकीला रंग लाव , कौलं साफ कर असं काहीतरी करण्यात मग्न असायच्या . भरपूर काम आणि आहार त्यामुळे एकदम पैलवान असलेली ही बाई माही नर्सरीत निघाला म्हणून लगबगीनं शिडी उतरायला लागली की माझ्याच काळजात धस्स व्हायचं . परत वर हे काही सांगायची सोय नसायची कारण त्या स्पष्टीकरणात वेळ कोण घालवणार ? असे धस्स करणारे खूप प्रसंग आलेत त्या पाच वर्षात पण दोन अगदी स्मरणात राहिलेत .
रात्री तीन वाजता एकदा धाड धाड दार वाजवत आंटी आल्या आणि मला अगदी उठवून ,ओढत घरात घेऊन गेल्या . संपूर्ण घरात पाणी भरलं होतं . टॉर्च घेऊन त्यांचा वॉटर सप्लाय स्वीच शोधून काढायला अर्धा तास लागला मला . तो बंद केला , गुडघाभर पाण्यात दोघी बसून होतो , त्यांच्या मुलाला मी फोन करून सांगितले होते आणि तो अर्ध्या तासात येणार होतो. तो येईपर्यंत थांबणार होते, पाचच मिनिटे झाली आणि आंटी टी टी म्हणत किचनमध्ये गेल्या . गुडघाभर पाणी, सगळी वीज गेलेली त्यात त्या गॅस कुकर लावून चहा करणार होत्या , नक्की शॉर्ट सर्किट होऊन दोघी गेलो असतो . आंटींना समजावणार कोण आणि त्यांना बाहेर ओढणार तरी कसं ? माही उठेल, माझ्या घरी चहा करूयात हे कसतरी त्यांच्या डोक्यात घुसवलं आणि दोघी एकमेकींचा हात धरत त्या पाण्यातून बाहेर पडलो . दुसरा प्रसंग तीन चार वर्षानंतर अजित आलेला असताना आम्ही अगदी यावर्षी गार्डन करूयात म्हणून दोघेही दोन दिवस जमीन खणून , तण उपटून, छोट्या छोट्या वाफ्यात पेरण्या करत होतो . कौतुकाने आठ दहा प्रकारची फुलझाडे, भाज्यांचे बी आणले होते . आंटी प्रेमाने अगदी दोघांकडे बघत होत्या . मध्येच चहा आणून दिला मग गरम गरम चीज ब्रेड आणले मग काहीतरी सांगायला लागल्या. आमच्या दोघांना ही काहीच कळत नव्हते . दोघींच्या गार्डन मध्ये तारेचे कुंपण होते . या बाईने ढांग टाकून आली आणि माझ्या हातातले फावडे घेतले. खरा खरा माती ओढली आणि सगळं सपाट करून टाकलं . दोन दिवस आम्ही प्लॅन करून छोटे वाफे, फुलांचे ताटवे ,त्याला बॉर्डर असं जे काही आखून काम केले होते ते एका झटक्यात त्यांनी मिट्टी में मिला दिया . पुढचे सगळे आठवडे आम्ही मधूनच फुटणारे अंकुर बघून हे बघ हे लाल दिसतंय बीटरूट असेल, याचं पान पालकासारखा दिसतंय असा ओळ्खओळखीचा खेळ खेळत होतो.
लंडन सोडून केन्टला राहायला निघालो आणि दोघीनाही गहिवरून येणं साहजिक होतं . आंटी जरी रोजच्या शेजारीं असल्या तरी झेहरा नुसती अनुवादक राहिली नव्हती , अगदी जिवाभावाची सख्खी मैत्रीण झाली आहे ती. आम्ही दोघीही ,'तशा ' नसलो तरी तिचा अगदी पक्का प्लॅन आहे माझ्यासोबत राहायचा, मध्येच माझ्या आयुष्यात आणि मग घरात अजित टपकला , हे सहन करते ना करते तेवढ्यात मी घर बदलून दूर जाणार म्हणून खूप नाराज होती. अजूनही मधूनच टोमणेवजा निरोप आला की कळते , हिला काहीतरी मनातले बोलायचे आहे. संध्याकाळी गाडीतून फोन लावून गप्पा होतात मग आणि फोन ठेवताना हमखास डोळे पाणावतात. कधीही लंडनला गेले की यांच्याकडे जाणे होतेच. मधल्या काळात आंटींची डोकेदुखी बळावलीय , झेहराची दोन थयरॉईड आणि पोटातल्या ट्युमरचे एक ऑपरेशन झालंय . सगळा राग , गोंधळ आवरत असगर दोघींची त्याच्या परीने काळजी घेतोय. अंकल अजूनही टर्कीच्या वाऱ्या करतात वर्षातून दोन वेळा आणि मध्येच या दोघीना आठवण आली की खूप झालं तुझं इंग्लंड फिरणं , ये परत इल्फर्डला असा निरोप असतो. आंटींनी माझ्या दोन्ही पोरांची लग्ने ठरवून ठेवली आहेत नात्यात आणि अंकल नेहमी तुझ्या मुलीचं शिक्षण झालं की तुझ्या भावकीला भेटायला येणार आहोत याची आठवण करून देतात. त्यांच्यासाठी एक भावकी शोधावी लागेल आता ...
यांचं गाव आहे तुर्कस्तानमध्ये आणि घरात त्या गावातल्या एका मुल्लाचे फोटो आहेत. माही लहान असताना मनू त्याला मुल्ला नासीरुद्दीनच्या गोष्टी वाचून दाखवत होती . ते पुस्तक बघून अंकलनी विचारले की हा कोण माणूस ? मुल्लाचे वर्णन ऐकून आणि फोटो बघून मग त्यांच्या घरातल्या या फोटोबद्दल माहिती मिळाली , आपला मुल्ला नसरुद्दीन म्हणजेच त्यांचा होजा नसरुद्दीन . होजा म्हणजे शहाणा (wise ) माणूस पण त्याला अगदी संतमहात्म्यासारखं मानलं जातं . आंटीच्या घरात सगळीकडे त्याचे फोटो आहेत , गाढवावरून बसलेले पण. आपल्याकडे त्याच्या नावावर काहीही खपवले आहे , ओशो ने तर इतके काही की माझी मनोमन इच्छा आहे की ओशो आणि मुल्ला एकदा प्रत्यक्ष भेटावेत आणि या खपवलेल्या कथांची शहानिशा व्हावी... एरवी सुन्नी मुसलमान त्यांच्या घरात कोणाचे फोटो लावत नाहीत , हा मुल्ला त्या कट्टरपणाला पुरून उरला आहे , निदान या घरात तरी. एकदा यांच्या गावी जायचा प्लॅन आहे आंटींबरोबर या होजाचे घर बघायला ..
परवा सकाळी इथले शेजारी येऊन दार वाजवून विनंती करून गेले की सकाळ सकाळ इंडियन जेवण बनवत जाऊ नका आम्हाला वासाने त्रास होतो , तेव्हा वाटलं खरंच जावं परत या सख्ख्या शेजारांच्याकडे ... लंडन जरा जास्त दूर गेलंय , वेळ काढून जाइन लवकरच , नाहीतर समर येईलच थोड्या दिवसात , मग चेरी डे असेलच . त्या दिवशी आंटी नेमका गोझेलमचा कार्यक्रम काढतील . लहानपणी पुराणपोळ्यांचा कार्यक्रम जसा दिवसभर चालायचा तसा हा कार्यक्रम असतो , ठेवणीतली गाणी म्हणत या दोघी सासू सुना सरसर गोझेलमा लाटत , भाजत जातात आणि लहान थोर शेजारी बसून गरम ग्योझेलमचा आस्वाद घेत असतात . मलाही दोन चार लाटावे लागणार आणि ते आंटींच्या स्टॅंडर्ड नुसार झाले की त्यांचा स्टॅंडर्ड डायलॉग - कशाला लग्नाची घाई केलीस , इतका छान ग्योझेलमा लाटता येतो तुला , माझ्या नात्यात मिळालंच असतं कोणी ना कोणी ..
अशी ही नावाची शेजारींन , साता समुद्रापल्याड असलेलं माहेर मला हवं होतं तेव्हा ह्या मायच्या स्वरूपात , घरापासून दोन पावलावर मिळालं. तेव्हापासूनची मायेची बरसात अजून चालूच आहे. ना कधी भाषेचा अडसर ना संस्कृती , राष्ट्र याच्या सीमा. त्यांची बरसात अशी सगळ्यांवरच होत असते. माझी कॉलेजातली मैत्रीण , एका मोठ्या आंतरराष्ट्रीय संस्थेची डायरेक्टर पण वैयक्तिक आयुष्यात फारच त्रासलेली , तिच्या दोन छोटुकल्या आई बाबाची भांडणे सुरु झाली की घाबरून मावशीला फोन करायच्या. दोन तास गाडी चालवून त्या पोरीना घरी आणायचा नित्याचा कार्यक्रम होता. इथे बाकी सगळं झकपक असलं तरी कुणाच्या कुशीत जाऊन रडता येईल , शांतपणे झोपता येईल अशी नाती नसतात मुलांना. एकदा असंच रेस्क्यू मिशनवर असताना या सखीला पण गाडीत घातलं आणि घरी घेऊन येत होते. तिच्या फ्लॅटवर राहिली असती तर अँब्युलन्स बोलवून मलाच तिला हॉस्पटिल मध्ये पाठवावं लागलं असतं. प्रोफेशनल ड्युटी अशा वेळी आडवी येतेच आणि तिचा मेंटल ब्रेकडाऊन मला रिपोर्ट करावा लागला असता . खूप पटकन मेंटल हेल्थ वाले आले असते तरी मला क्लिनिकल सायकोलॉजि इथे NHS मध्ये ज्यापद्धतीने प्रॅक्टिस करतात त्याच्या इफेक्टिव्हनेसवर प्रश्न आहेतच. मनोमन इच्छा होती की ही तिथे पोहोचू नये . भेदरलेल्या तिच्या दोन मुली आणि अतिशय विध्वंसक अवस्थेत असलेली मैत्रीण मागच्या सीटवर आणि थोडी घाबरलेली पण शांत असलेली मनू पुढे असं गाडी चालवत घरी येत होते. काय करावं असा विचार करताना गाडी आपसूक आंटीच्या घराकडे वळली आणि दार वाजवताच आंटींनी हिला कुशीत घेतले . काही सांगायची , बोलायची गरज नव्हती, मैत्रीण आणि तिच्या दोन्ही मुली आंटींना बिलगून अर्धा तास होत्या, या आधी कधीच न भेटलेल्या आणि काय प्रॉब्लेम आहे याच्याबद्दल एकही प्रश्न न विचारता अर्ध्या तासात खूप काही थेरपि त्या कुशीत घडली होती. झेहरा आलीच अर्ध्या तासात, सगळ्यांसाठी जेवण बनवले, पोरींना घेऊन केक बेक केला आणि मध्यरात्री चार ही पोरी गाडीत शांत पणे झोपून आम्ही घरी पोहोचलो. त्या क्रायसिस पॉईंट ला मला आंटीच आठवल्या. माझी माय मावशी असलेल्या ह्या बाईने प्रेमाची पाखर अतिशय नवख्या , काहीही माहित नसलेल्या पण अतिशय गरज असलेल्या या मैत्रिणीवर घातली होती - या नात्याला काय म्हणावे मला माहित नाही, त्या मायेला कुठल्या थेरपीत बांधावे ते मला कळत नाही. अशी माय माझ्या आणि माझ्या आप्तांच्या आयुष्यात आहे याबद्दल अतीव कृतज्ञतेपलीकडे फार विचार करणे आणि समजणे सोडून दिले आहे आता ...
आंटी आणि झेहराबरोबरचे हे काही फोटू

25th February

No comments:

Post a Comment

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...