Sunday, 22 June 2014

नवीन 'बाप'

परंपरागत कुटुंबांचा ढाचा गेल्या दोन तीन दशकात बदललेला दिसून येतो. घटस्फोट, दुसरे लग्न, नवीन संसार आणि या संसारात वाढणारी, रमणारी मुले ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. 'सावत्र' आई ही चेटकीण किंवा अगदी दुर्गुणाची पुतळी नसते आणि आईच्या नवीन जोडीदाराला, 'काका' किंवा तत्सम उपाध्या न देता बाबा किंवा त्याच्या नावाने हाक मारणे आता रुजायला लागले आहे. समाजही अशा कुटुंबाकडे मोकळ्या नजरेने बघायला लागला आहे. खरे तर नवीन नाते किंवा कुटुंब हे सर्वांसाठी एकाच वेळा सुखकर अनुभव असतोच असे नाही. जुन्या तुटलेल्या नात्यांचे कडू अनुभव, मुलांच्या कस्टडी किंवा आठवड्याच्या भेटायच्या वेळा आणि इतर जबाबदाऱ्या यातून अनेक रूपाने आधीचे नाते नवीन कुटुंबात डोकावत असतेच. आपल्या साथीदाराला सांभाळून घेताना मुलांनाही त्या नात्यात सामावण्याची धडपड या नव्या कुटुंबात दिसते. नाती तुटण्याची अनेक कारणे असली तरी नव्या संबंधांकडे मात्र आता नवीन सुरुवात आणि ती जुन्या पेक्षा सरसच असणार अशा आशावादी दृष्टीकोनातून पाहिले जाते, तसे आवश्यकही आहे. पण खरे तर हे नवीन नाते अधिक क्लिष्ट, चढत्या रस्त्याचे आणि मानसिक दृष्ट्या कस लावणारे असते. कालांतराने थोडे स्थिरस्थावर झाले, अनेक स्वप्ने वास्तविकतेच्या पातळीवर स्वीकारली गेली तरी या नातेसंबधातील मुलांशी जूळणूक बरेच काळ चालणारी असते. खरे तर 'सामान्य' कुटुंबातही मुले जशी वाढत जातात तसे पालकही 'पालक' म्हणून वाढतच असतात. आणि जिथे असे जुळवून घेणे, एकत्र वाढणे होत नाही तिथे संघर्ष, कलह हे ही असतातच. परंतु दुसऱ्या लग्नातील नात्यांना मात्र 'वेगळेपणाचा', जैविक ( biological ) आई /बाप नसण्याचा एक वेगळा पैलू असतो, आणि तो कधी कधी फार धारदार पणे पुढे येतो किंवा आणला जातो.
बहुतांशी कुटुंबामध्ये मुले अजूनही आईच्या कस्टडीत दिली जातात. त्यामुळे नवीन संसारात बहुधा बाबा ही addition असते. एकूणच ज्या पद्धतीने संगोपन आपल्याकडे होते, पुरुषसत्ताक पद्धती असली तरी आईकडचा प्रभाव मुलांच्या संगोपनावर जास्त असतो. त्यात विभक्त कुटुंबात जेव्हाआई बाबा वेगळे होतात त्या प्रक्रियात मुले आईबरोबर त्या प्रक्रियेमध्ये ओढली जातात आणि बहुतांशी तिच्याकडेच राहतात. वडिलांना जरी न्यायालयांनी भेटण्याचे, मुलांच्या इतर जबाबदाऱ्यात समान हक्क दिले असले तरी, एकूणच विभक्त झाल्यावर आईचा, तिच्या कुटुंबाचा जास्त प्रभाव त्यांच्या वाढण्यावर असतो. बरेचसे बाबा त्यामुळे कितीही committed असले तरी त्यांच्या आपल्या मुलांवरच्या हक्कावर, प्रभावावर मर्यादा येतेच. याची दुसरी बाजू म्हणजे ज्या आया मुलांच्या कस्टडी घेतात त्यांच्यावर अधिक जबाबदारी येते आणि एक स्त्री म्हणून त्या सर्व संयोजनातून जाताना तिला इतर अनेक घटकांचा सामना करावा लागतो. या विषयावर बरेच लिहिले गेले आहे
नवीन संसारातही जर मुले असतील तर त्यांची त्यांच्या आईशी अशीच जवळीक आणि आईवर अधिक जबाबदारी असते, त्यात आपल्या नवीन जोडीदाराला सामावून घेणे, नवीन नात्याची घडी बसवताना, मुलांना दुर्लक्षित वाटणार नाही अशा विवंचनेत ती असते. बाबावर मात्र नवीन मुलांना आपलेसे करून, त्यांच्यावर आपल्या मुलासारखे प्रेम करणे, त्यांच्या जबाबदाऱ्या उचलणे आणि स्वतःचे पती, पालक म्हणून स्थान निर्माण करणे असे आव्हान असते. कसे जुळवून घेतात हे नवीन बाप या परिस्थितीशी? मुळात त्यांनी आईशी लग्न केले म्हणून मुलांचे बाप बनावे अशी अपेक्षा ठेवणे संयुक्तिक आहे का ? का या नविन नात्यांना आपण परंपरागत कुटुंबाच्या ढाच्यात बसवू इच्छितो? बऱ्याच ठिकाणी आई आणि तिचा पार्टनर/ नवरा हे एक स्वतन्त्र नाते म्हणून बघतात, परंतु एकाच छताखाली जर सर्व राहणार असतील तर त्यांच्यातील नाते संबंध कसे असावेत? पालक बनताना biological घटक किती महत्वपूर्ण ठरावेत अशा नात्यात- दुसऱ्याच्या आपले मुल म्हणून स्वीकारणे, वाढवणे हे खरेच शक्य आहे का ? आधीच्या संसारातील अवशेष या ना त्या निमित्ताने पुन्हा पुन्हा नवीन नात्यात डोकावत असताना एका नात्याचे replacement म्हणून नवीन नाते बघावे का दोन्ही गोष्टी आपापल्या ठिकाणी ठेवून आहे तसा त्याचा स्वीकार करावा? कालांतराने आधीच्या नात्यात सर्वच वाईट नव्हते आणि आपल्याही चुका स्वीकारण्यास जेव्हा आपण तयार असतो, तेव्हा मित्रत्वाच्या नात्याने जुन्या सह्चराचा स्वीकार का करू नये - असे अनेक प्रश्न पुढे येताना दिसतात.
 या विषयावर चर्चा व्हावी म्हणून हे लिखाण. माझा स्वतःचा संसार आणि मुले या अनुभवातून जात आहोत. कभी खुशी कभी गम असा प्रवास असला तरी तो फक्त त्यांचा biological बाप या प्रवासात नाही , म्हणून नाही. मुले वाढताना आणि वाढवताना येणारे विविध अनुभव आणि त्यावातिरिक्त आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांचा परिपाक हा प्रवास आहे. तुमचे अनुभव किंवा निरीक्षण काय आहे या बाबतीत, ऐकायला आवडेल.
मायबोलीवर संयुक्ता गटात लिहिलेले हे लिखाण. १० जून २०१४ ला प्रसिद्ध झाले होते व अनेकजणींनी यावर प्रतिसाद दिला होता. 

No comments:

Post a Comment