एका बापाची गोष्ट ..
आयुष्यात आतापर्यंत खूप आया मिळाल्यात , बहुतेक सगळ्या मैत्रिणींच्या आयांना आई म्हणून हाक मारणे खूप सहजपणाने आले , अर्थात बऱ्याच काकवा पण आहेत. पण मैत्री झाली की अगदी जवळचीच होते त्यामुळे ज्या ज्या घरात उठबस तिथे तिथे आई , मम्मी , माई अशी नाती देश प्रदेशात आहेत. बाबा म्हणून कोणाला हाक मारणे असे झाले नाही, कदाचित हे सगळे बाबा लोक थोडे अंतर ठेवून असतात आणि आया जेवढ्या आपुलकीने चौकशी , अगत्याने खाऊ पिऊ घालतात आणि मायेचे चार सल्ले ( नको असले ) तरी देतात , त्या मानाने बाबा लोक कोरडे आणि लांबचेच वाटलेत नेहमी , त्यामुळेही असेल. पण कधी कोणी बाबा नाही झाले. पण एक बाबा नाही बाप मात्र मिळालाच आणि असा तसा नाही अगदी बॉलीवूड बाप ! त्याचे खऱ्या आयुष्यातील नाव इथे लिहिणार नाहीये कारण कदाचित त्याच्या इभ्रतीत ते बसणार नाही आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे एका खूप गाजलेल्या इंग्रजी कादंबरीत , ज्यात मुंबई आणि अंडरवर्ल्ड चे जे वर्णन आहे , त्यातल्या एका प्रमुख पात्राचे नाव आणि या बापाचे नाव एकच आहे . या लेखासाठी मी त्याला माझा बॉलीवूड बाप aka बी असं संबोधणार आहे.
टाटा इन्स्टिट्यूट मधून शिक्षण झाल्यावर छोट्या संस्थातून काम करत , सगळ्या क्रांतिकारी विचारांना अर्धंमुर्धं मूर्त स्वरूप देत छोट्या ते मोठ्या एनजीओ मध्ये माझा चढतीचा प्रवास सुरु होता. वैयक्तिक आयुष्यात नैया बरीच डगमगत चालली असताना या कामाने बरंच सावरून घेतलं होतं . नवीन प्रकल्प , खूप फिरती , असंख्य ट्रेनिंग , नव्या संकल्पना आणि इन्स्टिटयूट ला असताना ज्यांच्या कामांनी भरून जायला व्हायचे त्या सगळ्यांशी प्रत्यक्ष भेट आणि काम करायची संधी , या सगळ्यात अगदी जोमाने काम करत होते, त्याच वेळी तेव्हाच माझा मित्र आणि नंतर ज्याच्याशी लग्न केले तो सामाजिक राजकीय कार्यकर्ता होता त्यामुळे ऑफिसची कामे सांभाळून त्याच्याबरोबर अनेक मीटिंग, बैठकी असं भारावून टाकणारं आयुष्य काही वर्षे चालले होते. यादरम्यान गोध्रा झालं आणि त्या पाठोपाठ गुजरात ! वर्षभर आधी झालेला कच्छचा भूकंप आणि त्यानंतर ज्या लगबगीने सगळ्या स्वयंसेवी संस्था भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी धावून गेल्या होत्या , रात्रंदिवस काम करत होत्या आणि ते सर्व पाहून एक प्रकल्प भेट संपवून दुसरीकडे तातडीने आम्ही धावत होतो , माणुसकी आणि परस्पर सहकार्यातून अशा आपादग्रस्त परिस्थितीत किती पटकन कामे उभी राहत होती याचं कौतुक करावं आणि त्याचबरोबर दहा नवीन प्रश्न समोर उभे असावेत , त्यांच्यावर तोडगा काढ्यासाठी तत्परतेने पुढचं प्लॅनिंग असं वर्षभर चाललं होतं . गुजरात दंगे झाले आणि समोर येणाऱ्या निसर्ग निर्मित नव्हे तर मानवनिर्मित जनसंहार असूनही स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर एक सन्नाटा होता . रोज येणाऱ्या बातम्या, दंग्यांचे काही पत्रकारांनी स्वतः जाऊन केलेले रिपोर्टींग आणि काही संस्था, संघटना ज्या नेटाने काम करत होत्या त्यांच्याकडून कळणारी माहिती विषन्न करणारी होती . एन जी ओ तल्या बड्या बड्या मानवधिकारावर बोलणाऱ्या आणि ज्यांना आम्ही गुरुस्थानी म्हणायचो अशा धेंडांचे पाय किती मातीचे आहेत , हे त्या वेळी खूप तीव्रतेने कळाले होते. 'शो मस्ट गो ऑन', हे म्हणायला खूप सोपे आहे पण ज्या तत्वांसाठी आपण या क्षेत्रात आलो , इतकी वर्षे एकत्र काम केले आणि एन जी ओत ली इतरांच्या मानाने पैसे घेऊन 'स्वयंसेवी सेवा' असं हेटाळणीयुक्त सतत ऐकून, कधी प्रतिवाद करत तर कधी दुर्लक्ष करत सातत्याने जे शिकलो ते प्रामाणिकपणे आणि प्रोफेशनली करत राहिले त्यावरचा विश्वास उडायला लागला होता. या सगळ्या घडामोडीत हर्ष मंद्र या IAS अधीकाऱ्याचा टाईम्स मध्ये लेख वाचला, तेव्हा हर्ष ऍक्शन एड चे कंट्री डायरेक्टर म्हणून काम करत होते त्यांच्या लेखात गुजरात राज्ययंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांची दंग्यांच्या आणि नंतर दंगे पीडितांच्या पुनर्वसनाबाबतची गळचेपी भूमिकेचा परामर्श घेतला होता. हे सगळं होत असताना वैयक्तिक कारणांमुळे मला मुंबईत राहायची अजिबात इच्छा नव्हती. तेव्हा इंटरनेट चा प्रसार ही एव्हडा नव्हता, त्यामुळे इतर राज्यात प्रत्यक्ष जाऊन काम बघणे एवढाच मार्ग राहिला होता. भोपाळ आणि मध्य प्रदेशच का याचे मला नक्की कारण माहित नाही पण या सगळ्या घालमेलीत मी भोपाळला जाऊन पोहोचले खरी . तिथल्या अरेरा कॉलनी या उच्चभ्रू वस्तीत सगळ्या मोठया संस्थांची कार्यालये होती. टाईप केलेला बायो डाटा हातात घेऊन सगळ्या कार्यालयात जाऊन आले, काहींनी हातातले कागद ठेवून घेतले, मुंबईहून या छोट्या शहरात का काम शोधायला आली असे कुतूहलाने प्रश्न विचारले. चहापाणी दिले पण नोकरी काही मिळाली नाही. CRY मधली मोठ्या हुद्द्याची आणि पगाराची नोकरी सोडून तीन महिने झाले होते, हाती आलेल्या PF सोबत आधीची बचतही संपली होती. एका मैत्रिणीच्या छोट्या फ्लॅटमध्ये मनू आणि मी राहत होतो, मम्मा अशी घरी बसून आणि रोज कुठे नवीन ठिकाणी जात नाहीये हे बघून ती खुश होती. रोज नेट कॅफेत जाऊन ईमेल बघायला जायचे. अशात CARE US च्या मध्य प्रदेशाच्या ऑफिसचे ईमेल आले आणि दुसऱ्याच आठवड्यात छिंदवाडयाला त्यांच्या ऑफिसात मी काम सुरु केले. कामाच्या पहिलयच दिवशी ऍक्शन एडच्या ऑफिसातून इंटरव्हीव्यू चा कॉल होता. हातातले काम सोडून, भाड्याने बुक केलेला फ्लॅट रिकामा करून आणि साइन केलेले कॉन्ट्रॅक्ट फाडून मी CARE मधल्या बॉसच्या चेहऱ्यावरचे वैताग, नाराजी , राग काही कळायच्या आधी मी मनूला घेऊन भोपाळला ऍक्शन एडच्या ऑफिसात पोहोचले होते. भोपाळची दीड वर्षे यावर स्वतंत्रच लिहीन .
सगळं काही सुरळीत चालले तर कदाचित पृथवीचा तोल ढासळेल असं काही असावं, त्यामुळे काम , घर , मनू अगदी छान चालले असताना ज्याच्याबरोबर राहणं शक्य नाही अशा विचाराने मुंबई सोडली होती, तो एक्स नवरा सातत्याने येऊन पुन्हा संसार मांडूयात म्हणून मागे लागला होता, मनूला त्याचा खूप लळा होता आणि कुठेतरी कधीतरी सेटल हो, मुलीला कुटुंब मिळू दे हे सातत्याने ऐकून वैताग आला होता पण याचबरोबर मलाही नातं हवं होतं त्यामुळे हबीबगंज ते लोकमान्य टिळक टर्मिनसच्या वाऱ्या सातत्याने व्हायला लागल्या आणि परत मुंबईला यायचा निर्णय झाला. पुन्हा एकदा घर करा, नोकरी शोधा, शाळा बघा असं चक्र चालू. मुंबईच्या काही संस्थात इंटरव्हियू दिले, काही ठिकाणी ऑफर मिळाल्या पण इच्छा होत नव्हती पुन्हा त्या एनजीओच्या गदारोळात उतरायची . एक दिवस माझ्या एक्सच्या आणि त्या अनुषंगाने माझा असा मित्र झालेल्या हनीफभाईनचा फोन आला आणि त्यांना भेटायला गेले . त्यांचा प्रस्ताव होता मुंबईतल्या एका धनाढ्य मुस्लिम बिजनेस घराण्याचे खूप धर्मादायी प्रकल्प चालतात , त्यांच्या बरोबर काम करशील का ? मी त्यांच्याशी बोललोय आणि त्यांना तुला भेटायचे आहे. 'हनीफभाई आपको पता है मैं कितनी मुस्लिम हूं , कोई मुस्लिमसे मेरा जमनेवाला नही हैं ', असं म्हणून मी जाणार होते. त्यांनी अगदी शांतपणे म्हणाले , थोडं ऐकून घे, एकदा त्यांना भेटून घे आणि मग ठरव . नाही तरी इतक्या लोकांना भेटतेच आहेस ना . हनीफ भाई बद्दल मला खूप आदर तेव्हा ही होता आणि आता ही आहे . मुंबईच्या बहुतेक सगळ्या मुस्लिम संस्था आणि कार्यकर्ते यांच्याशी तोपर्यंत ओळख झाली होती. मला मुस्लिम मुलींच्या शिक्षणात रस होता , माझ्या एक्सची आणि माझी भेट आणि मैत्री त्याच संदर्भातून झाली होती. त्याच्याबरॊबर खूप लोकांना भेटले आणि त्यात हनीफभाई हा सगळ्यात जवळचा असा मित्र तेव्हाही आणि आताही आहे. हा माणूस पेशाने इंजिनीअर आणि US मध्ये चांगली नोकरी सोडून पुन्हा भारतात काहीतरी आपल्या समाजासाठी करायचे या विचाराने परत आलेला . आजही अंजुमन इस्लाम या अवाढव्य संस्थेच्या मोठ्या पदावर हा माणूस आहे पण सगळ्या मुलांशी यांचे स्नेहाचे संबंध आणि हजारो उपक्रम वेगवेगळ्या पातळीवर चालवत असतात. ' तुला इतकी वर्षे काहीतरी करायचंय समाजासाठी आणि तुझ्यासारख्या शिकलेल्या मुलींची या समाजाला पण खूप गरज आहे , एकदा भेटून घे' असं साकडं घातल्यावर मला काही नाही म्हणवले नाही आणि मी नरिमन पॉइंटला अतिशय प्रसिद्ध बिल्डिंगमध्ये टॉप फ्लोअरवर असलेल्या या धनाढ्य माणसाच्या ऑफिसमध्ये पोहोचले.
मुंबईचे मनोरम आणि विहंगम दृश्य दुसऱ्या कुठल्याही ठिकाणाहून दिसणार नाही अशा कोनात बी ची केबिन होती. सफारी सूट घातलेला , तीन चतुर्थांश टक्कल पडलेला पन्नाशीतील माणूस समोर होता. तुझ्याबद्दल खूप ऐकलंय आणि खूप स्वप्नं आणि अपेक्षा आहेत असं हिंदीत म्हणल्यावर मला थोडं हसू आले आणि माझं ठरवून आलेलं पाहिलं वाक्य मी त्यांना सांगितले की मी मुळीच धार्मिक नाहीये . त्यावर त्यांचं उत्तर होतं की मी धार्मिक आहे आणि माझं धार्मिक कर्तव्य आहे की मी माझ्या समाजबांधवांसाठी नेक कामं करावीत म्हणून मी सगळा उपद्व्याप मांडला आहे, पण मला सगळं सांभाळता येत नाहीये आणि खूप वर्षांपासून मी हनीफला म्हणतोय की तू सांभाळ पण त्याचं म्हणणं आहे की माझ्यापेक्षा चांगलं ही पोरगी सांभाळेल. काय उपद्व्याप आहेत असं विचारायच्या आधीच त्यांनी मुंबईच्या सगळ्या उर्दू शाळांची नावे , पत्ते आणि तिथल्या समस्या सांगितल्या. थोड्या बहुत फरकाने एकच परिस्थिती , बहुतांशी मुली आणि अतिशय गरीब घरातले विद्यार्थी मुख्यतः उत्तर भारतीय बहुल अतिशय हलाखीचं जीवन जगणाऱ्या वसत्यातून येणारी मुले. मोडकळीला आलेल्या इमारती , सेंट्रल आणि मध्य मुंबई सोडली तर बहुधा सगळ्या इमारती अगदी कच्च्या जमिनीवर बांधलेल्या, पावसात खालची गटारे फुटून बऱ्याच वर्गात पाणी शिरायचे, मुलांकडे ना धड पुस्तके वह्या आणि बीएमसी ने दहा वर्षात रिक्त जागा न भरल्यामुळे बहुतेक ठिकाणी एखाद दोन शिक्षक जे कधी आले तर आले नाहीतर शिपायांच्या मग्रुरीवर झोडपली जाणारी मुले . हे सगळं विशद करताना हा माणूस सद्गदित झाला होताच आणि त्याच्या मुख्य व्यवसायात किंवा आयुष्यात ह्या गोष्टी कशा मांडल्या जातात याचं काहीच ज्ञान नसल्यामुळे इतर मुंबईकर ज्या गोष्टीचा आसरा घेतात तेच या शेटजीने केले होते . नकळत इतके सिनेमांचे डायलॉग हाणले होते की स्वतःला मला सांगावे लागले, फिदीफिदी हसू नकोस . ह्या माणसाची कळकळ खरी आहे आणि त्यावर तो जे काही करायचा प्रयत्न करतोय ते ऐकलंस तर पुढचं संभाषण होईल. या सगळ्या शाळांमध्ये त्यांनी वर्ग शिकवायला बीएमसी च्या संमतीने शिक्षक पुरवले होते. बृहनमुंबईभर पसरलेल्या जवळ जवळ साठच्या वर शाळांमध्ये २०० च्या आसपास शिक्षिका आणि त्यांना साहाय्यकारी स्टाफ असा मोठा आवाका या कामाचा होता. या कामाबरोबर त्यांचे गुजरात मध्ये काही शैक्षणिक प्रकल्प होते आणि SOS च्या धर्तीवर त्यांना एक बालग्राम उभे करायचे होते. हा माणूस फार शिकलेला नाही, आताची मालमत्ता सगळी स्वपर्जित आणि करोडोचा मलिक असला तरी कुठल्याही गोष्टीचा अहंकार नाही. ज्या आस्थेने त्यांच्या मोडक्या 'समाजशास्तरीय 'भाषेत ते मला सगळं सांगत होते त्यावरून त्यांची किती समज , कळकळ आणि किती गुंतवणूक आहे या विषयात ते जाणवत होते . सगळं सांगून झाल्यावर मला पहिला प्रश्न तू काय करशील ते सांग म्हणाले. माझ्याकडे साहजिकच उत्तर नव्हते , सगळ्या शाळांची लिस्ट घेतली, सोबत त्यांचा कॉर्डीनेटर माणूस घेतला आणि आठ दिवस मागून घेतले. प्रत्येक शाळेला भेट दिली, मुंबई बाहेरून जशी भासते तशी कातिलाना आतून नाहीये. मुंबईतल्या प्रत्येक भागात अनेक गावं , गावठाणे, वसत्या , संस्कृत्या लपल्या आहेत. भेंडी बाजार , कुर्ला , देवनार, अंधेरी , मालाड , मालवणी या भागातला मुस्लिम समाज ही आपापसात इतका वेगळा असेल हे मात्र माहीत नव्हते. प्रत्येक शाळेत जरा बिचकतच लोकांनी स्वागत केले , एक तर सगळ्या बुरखा हिजाब मधल्या मुली आणि शिक्षिका , ट्रस्टच्या शिक्षिकाही बुरखा नसला तरी चादर आणि हिजाब ओढकेच होत्या. त्यात ही बालकटी , हातात कडं घातलेली कधी साडी तर कधी ड्रेसमध्ये पण दुपट्टा पण सांभाळता न येणारी मुलगी ही कशाला आली आहे इथे , असाच भाव सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता आणि आली आहे तर जाईल परत , कोण एवढ्या अडनिड्या वस्तीतल्या शाळेत येणार आहे , त्यामुळे कधी कटती आहे अशी वाट बघतच माझे स्वागत झाले. आतापर्यंतच्या एनजीओचच्या प्रकल्पभेटीत तिथे असलेली माणसे आणि अशा सेवाभावी कामाच्या संदर्भात त्यांचे वागणे हे फार पटकन कळायला लागले होते - कोण कामसु आहे, कोण bully आहे, सगळ्यांना सोबत घेणारं कोण, आपण आणि आपले काम बरं असं म्हणणारं कोण , बेरकी आणि हरामी अशी माणसेही लगेच कळून यायची . project आणि फायनान्स म्यनेजमेंट कोळून पिल्यामुळे लोक बघता बघता प्रकल्पाचा जेवढा आवाका होता तेवढाच सावळा गोंधळ पण व्यवस्थापनाचा होता हे समजत होते . दोन लोक पूर्ण मुंबई सांभाळणार आणि त्यातलं कोणीच निम्म्या शाळांमध्ये गेले नव्हते. बऱ्याच शिक्षकांना ट्रस्ट काय , कुठून पगार , वह्या पुस्तके येतात याची कल्पना नव्हती. बीएमसी च्या शिक्षकांची मग्रुरी सगळीकडेच होती आणि ट्रस्टच्या शिक्षिका बऱ्याच ठिकाणी त्यांच्या अंकित असल्यासारख्या वागत होत्या. एक गोष्ट पहिल्या काही शाळांच्या भेटीत जाणवली होती ती म्हणजे या सगळ्या शिक्षिका या त्यांच्या घरातल्या पाहिलंय शिकलेल्या आणि कमावत्या मुली होत्या . अगदी हलाखीच्या परिस्थितीत वाढलेल्या आणि खूप हुशार असल्या तरी समाजसंमत पेशांमध्ये शिक्षिका हा पहिला पेशा म्हणून स्वीकारणाऱ्या, तरुण, कष्टाळू आणि त्या विपरीत वातावरणातही जीव तोडून शिकवणाऱ्या. त्यांच्याशी दोस्ती व्हायला काही मिनिटे पुरी होती आणि एक एक कथा दबकत बाहेर पडत होती. त्या आठ दिवसांत सगळ्यांबरोबर बोलायला वेळ मिळणे शक्यच नव्हते, पण प्रत्येक शाळेतून निघताना मी माझं मलाच सांगत होते कि परत नक्की येणार आहे.
आठ दिवसांनी बी च्या केबिनमध्ये गेले तेव्हा अर्थातच अपेक्षेने त्यांनी विचारलं , कसा अनुभव होता? माझ्या विश्लेषणानी त्यांचा चेहरा खुलायच्या ऐवजी मलूल होत गेला. इतका मोठा व्यापार सांभाळणारा हा माणूस एका शाळेतून दुसऱ्या शाळेत शिक्षिका मंजूर करत राहिला , पुस्तके , वह्या गणवेश वाटत राहिला पण या सगळ्याचा जमाखर्च यांना माहित नव्हता, मधली सांडासांड आणि या सगळ्यात निर्माण झालेले साटे लोटे यांच्या गावीही नव्हते. आईच्या नावाचा ट्रस्ट , इतकी गरज समाजात आहे आणि मी जे काही करतोय त्याची मला जाहिरात करायची नाही - हे व्यक्तिगत मूल्य म्हणून ठीक आहे पण सगळेच या भावनेने जुडलेले नव्हते . कुठल्या शाळेत कोण शिक्षिका जाणार , किती आणि काय शिकवणार , सुपरवायझर तिच्या नोकरीची शिफारस करण्यात काय घेणार अशी एक समांतर व्यवस्था होती इथे. जरी स्वतःच्या व्यक्तिगत पैशातून या सगळ्या गोष्टी करत असाल तरीही त्याचे काही नियम आहेत हे माहीत होते पण सरकारी कर्मचारी म्हणजे फक्त आणखी लाच घेणार मग कशाला हे सगळं नीट करा , असाही साधा विचार होता. खरे तर बीएमसी ने या संस्थांचे आभार मानायला होते की किती मोठा भार ते उचलत होते , पण प्रत्येक गोष्टीत त्यांना पैसे हवे होते याचा प्रत्यक्ष अनुभव लवकरच मला आला . बींनी एक केले हे ऐकल्यावर त्यांचा अतिशय अनुभवी पारसी फायनान्स म्यानेजर माझ्या मदतीला दिला आणि आम्ही दोघांनी एक सिस्टिम उभी केली.
खरा प्रश्न पुढेच होता , आतापर्यंत अंदाधुंद चाललेल्या काही लोकांच्या कारभारावर या मुळे अंकुश आला आणि काही लोक खुश झाले तरी कानामागून आली आणि तिखट झाली आणि नुसतीच तिखट झाली नाही तर मोठ्या बॉसशी जिथे असेल तिथून सगळ्या गोष्टी सांगायला लागली म्हणल्यावर बऱ्याच लोकांशी नरीमन पॉईंटच्या ऑफिसात असलेले संबंध बिघडले. त्यात हे ऑफिस त्यांचं व्यासायिक ऑफिस, इथून सारा निर्यातीचा कारभार चालायचा. अनेक व्यापारी आणि कन्सलटंट तिथे सातत्याने असायचे , ट्रस्टचे काम भायखळ्याच्या त्यांच्या दुसऱ्या छोट्या इस्टेटीतून चालायचे. सकाळी ९-४ मी बाहेर असायचे पण साडेचारला बींच्या केबिनमध्ये बोलावून ते सगळं अहवाल मागवायला लागले. मध्येच सकाळी आठ वाजता स्वतः जाऊन कुठल्यातरी शाळेत मी सांगत असलेली गोष्ट खरी आहे का याची खातरजमा करायला लागले आणि कामचुकार लोकांना खडसावायला लागले तसा तसा माझ्याबद्दलचा रोष आणि असहकार तीव्र होत गेला . बाकी सगळ्या गोष्टी बरोबर असल्या तरी मी त्यांच्या 'इस्लामिक ' वागण्या बोलण्यात बसतच नव्हते त्यामुळे अर्थातच एका 'काफिर' मुलीला एव्हढा भाव का देताय अशी हाकाटी सुरु झाली. दोन तीन आठवडे अतिशय टेन्स गेले , मी बींना म्हणलं आता या तुमच्या सगळ्या परिभाषेत मी काही बसत नाही आणि इतकं सगळं डिस्टर्ब् होत असेल तर मी जायला तयार आहे . या सगळ्या असंतोषाची जी म्होरकी होती ती त्यांच्या मित्राची बायको, अनेक वर्षे त्यांचे चांगले संबंध होते आणि सुरुवातीपासून या सगळ्या कामात ती होती. माझ्यासमोर काही या कामाचा रोड मॅप नव्हता, स्टाफचा रोष, बी एमसी अधिकाऱ्यांची मुजोरी आणि सतत कोणाला ना कोणाला दुखावत या कामातून काय निघेल हे मला माहीत नव्हते , त्यामुळे वाईट वाटत असले आणि पटत नसले तरी माझी जायची मानसिक तयारी झालीच होती . दोनतीनदा असं बोलून झाल्यावर बीनी मला आणि त्यांच्या थोरल्या मुलाला बोलावले आणि समोर बसवून त्या बाईला फोन लावला . तुला शबानाचा इतका त्रास होतो तर थोडे दिवस ऑफिसमध्ये दुसरं येऊन काम कर, अली तुला सांगेल काय करायचे ते. अगदी अनपेक्षित पणे हा फोन करून बी मला म्हणाले आता सांग आणखीन काय करायचं? मला खरं तर वाईट वाटत होतं इतक्या निष्ठेने ती बाई त्यांच्या कामाशी पहिल्यापासून जोडलेली होती आणि एका फटक्यात यांनी हा निर्णय घेतला. वाईट मला वाटत होतं आणि भावूक होऊन बी समोर बसून म्हणत होते , तू कशीही असलीस तरी मुलगी आहेस माझी , मी तुला कसं जाऊ देऊ आणि गोष्टी इतक्या सुरळीत व्हायला लागल्या आहेत आणखी किती तरी प्रोजेक्ट मला सुरु करायचे आहेत इतके दिवस मनात फक्त कल्पना होत्या आता वाटते की आपण हे काम उभं करू शकतो. अली, त्यांचा मोठा मुलगा हसून म्हणाला की 'आजकाल रात्रीच्या जेवनाबरॊबर धंदा कमी आणि ट्रस्टच्या कामाची जास्त चर्चा होते आणि वरनं सगळ्यांना ऐकावे लागते की तू मुलगी असून इतक्या धडाडीने वागते आणि तुम्ही ?-- त्यामुळे का लोकांना इतकं थ्रेटनिंग वाटतं ते मी समजू शकतो '. त्या दिवसापासून बी मला बेटा म्हणून आणि त्यांची चारही मुलं मला बाजी म्हणून हाक मारायची .
काय हवं आणखी काम करायला असा प्रश्न विचारताच मी बाईक हवी हे सांगितलं होतं . मुंबईत तासनतास टॅक्सी करून जाणं वेळखाऊ होतंच पण प्रचंड खर्चिक. बी नी त्यांच्या धाकट्या मुलाला सांगितले होते माझ्या बरोबर जाऊन गाडी घेऊन यायला. मी बाईक म्हणले तेव्हा दोघांना कल्पना नव्हती की मी मोटार बाईक मागते आहे , त्यांनी छोटी एक्टिवा बुक केली होती का तर दोघांच्या मते माझे पाय बाईकवर पुरणार नाहीत! शेवटपर्यंत त्यांनी अनेकदा सांगूनही हट्टाने बाईक दिली नाही . प्रत्येकवेळी त्यांच्या एका मित्राचा मुलगा कसा मोटारबाईक वरून पडला आणि गेला हे मला व्यथित होऊन सांगितले की शेवटी मी ती एक्टिवा घेतली आणि घरी पार्क केली , घरची पल्सर घेऊन सगळ्या शाळा हिंडायला लागले . यावरूनही खूप गदारोळ उठला होता पण तोपर्यंत या बापाला ही लेक किती हट्टी आहे याचे खूप अनुभव आले होते. याचदरम्यान बी एड कॉलेज, बालग्राम , शाळांना लागून व्यावसायिक केंद्रे सुरु करणे , अशी अनेक कामे मूर्तस्वरूप घेऊ लागली होती. या कुठल्याच कामात कोणाला लाच देणार नाही हा माझा आणखी हट्ट होता . त्यात अझीम प्रेमजी फौंडेशनशी बोलून त्यांचा संगणक कार्यक्रम या सगळ्या शाळातून राबवायचा असा पूर्ण प्लॅन झाला होता. आम्ही संगणक देणार आणि अझीम प्रेमजी फौंडेशनचे लोक येऊन त्यांनी तयार केलेला पूर्ण अभ्यासक्रम या शाळांमधून राबवणार असा हा कार्यक्रम होता. ट्रस्टचे काम फक्त शिक्षिका आणि शैक्षणिक साहित्य पुरवठा याच्या पलीकडे नेऊन व्यापक स्तरावर इतर प्रकल्पांशी जोडायचा हा प्रयत्न होता. बी एम सी च्या अधिकाऱ्यांची एकच मागणी होती यातले दोन्ही ट्रस्ट कोट्यवधी मालकांनी चालवले आहेत, तुमच्याकडे खूप पैसे आहे, फक्त आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांची एक सहल गोव्याला आयोजित करायला काही फार खर्च येत नाही . इतक्या बेशरमपणे हे अधिकारी हे सगळं मागत होते ते ऐकून मी आणि फौंडेशनचे अणीकर दोघंही मिटिंग सोडून निघून आलो होतो. प्रथमच्या फरिदा लांबे मॅडमनी पण हा मुददा लावून धरला होता. तोपर्यंत ट्रस्टच्या शिक्षकही बी एम सी च्या शिक्षकांच्या दादागिरीबद्दल बोलायला लागले होते, बऱ्याच वेळा समजावून, काही वेळा खडसावऊन स्थानिक पातळीवर आम्ही चांगले संबंध वाढवले तरी या अधिकाऱ्यांचं सहकार्य काही आम्हाला शेवटपर्यंत मिळाले नाही. सगळ्या शाळांमध्ये मात्र आमची घडी चांगली बसली होती आणि इतर वेगवेगळ्या विषयावर आम्ही ट्रेनिंग घ्यायला लागलो होतो, शिक्षणाचा दर्जा सुधारायला लागला होता आणि याची चर्चा बी त्यांच्या सामाजिक वर्तुळात ही करत असत. त्यांच्याकडे खूप लोक शिक्षण, हॉस्पिटल साठी मदत मागायला यायचे त्याचबरोबर बऱ्याचशा धार्मिक संस्था ही यायच्या. या सगळ्यांना ते सढळ हाताने मदत करायचे पण त्याचबरोबर त्यांच्या चाललेल्या कामाची चौकशी करायचे, कोणी रडगाणं गायला लागला की मुंबईच्या शाळांसारखं काम स्थानिक पातळीवर सुरु करा, सगळे यातिमखाने बंद करून बालग्रामसारखे प्रकल्प राबवा , तुम्हाला हवं असेल तर शबाना येईल तुम्हाला मार्गदर्शन करायला , हे ही परस्पर सांगायचे. काम करायला माझी ना नव्हती पण त्यांच्याकडे येणारे मुल्ला मौलवी माझ्याकडे बघत ही नसत. त्यांचं सगळं संभाषण खाली मान घालून असे, मी त्यांच्या मते अगदीच अन -इस्लामिक त्यात पर स्त्रीं , तिच्या चेहऱ्याकडे पण बघणे त्यांना हराम होते. असे लोक गेल्यावर बींना माझा नेहमीचा प्रश्न , जे लोक माझ्या नजरेला नजर देऊन बोलू इच्छित नाहीत , त्यांना का माझ्याबद्दल सांगता? बींच उत्तर - पण आता हा समाज आहे असाच आहे, यांच्याबरोबरच काम करायला पाहिजे , तुझ्यासारखे लोक कुठून आणायचे घाऊकमधून ते सांग , परचेस ऑर्डर काढतो ! बी स्वतः धार्मिक होते, कितीही कामात असले तरी त्यांची नमाजाची वेळ चुकली नाही. ऑफिसमध्ये स्टाफ साठी नमाजाची जागा होती. वेळ झाली की चारही मुलांना आणि सहकार्यांना बोलवायचे . मी ऑफिसात असले की मलाही न चुकता सांगायचे , तू पण नमाज पढत जा. या बाबतीत त्यांनी सक्ती केली नाही आणि खूप मोकळेपणाने मी का धार्मिक राहिले नाही हे ऐकून आणि समजून घेतले. त्याचवेळी हे ही सांगितले की माझी मुलगी म्हणून मी माझं कर्तव्य म्हणून तुला सांगणार, ऐकायचं का नाही हा तुझा निर्णय. एकूणच समाजाबद्दल , सामाजिक परिस्थितीबद्दल आणि या मुल्ला मौलवींबद्दल त्यांना राग नव्हता पण कणव होती. कुराण हे अरबी भाषेत लिहिलेले असल्यामुळे त्याचा अनुवाद हा मौलवींमार्फतच लोकांपर्यंत जातो त्यामुळे त्यांनी ज्या कोणाला कुराण समजून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी त्यांच्या भायखळ्याच्या जागेत अरेबिक भाषेचे वर्ग चालवले होते. एकदा भाषा समजली की अर्थ ज्याचा ते समजून घेतील असं त्यांचं म्हणणं होतं .
वेळ मिळाला की या सगळ्या विषयांवरच्या गप्पा रंगत , त्यांचा मित्रपरिवार बराच मोठा होता आणि व्यापाराच्या निमित्ताने मध्यपूर्वेतल्या व्यापाऱ्यांशी आणि तिथे स्थायिक झालेल्या भारतीयांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तरुणपणात गावोगाव फिरून, विविध वस्तू विकत या कच्छी गुजरात्याने आपला जम बसवला होता , त्या दिवसांच्या आठवणी ते सतत त्यांच्या मुलांना सांगत . चार मुलगे, दोन पुतणे आणि सगळ्यांचा एकत्र परिवार यांचे ते प्रमुख होते. रोज दुपारी सगळे मिळून एकत्र जेवायचे. त्यांच्या कच्छ मधल्या घरी आणि तिथल्या गावच्या शाळांमध्ये त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने केलेले काम मी पाहून आले होते. गुजरातच्या दंग्यांमध्ये ही काही गावे तिथल्या शिक्षकांच्या आणि स्थानिकांच्या पुढाकाराने वाचली होती याचे त्यांना कौतुक होते. समाजातले अनेक प्रश्न बघून बी व्यथित झाले तरी त्यांना फार निराश मी कधीच पहिले नाही, त्यांच्याबरोबर काम करून, मला हा समाज खूप वेगळ्या अंगाने आणि त्याच्या विविध पैलूनुसार कळाला , लहानपणापासूनची अढी मनातून निघून गेली याचे श्रेय मी त्यांना निश्चित देते.
या सगळ्या दरम्यान काही महिन्याआधी एका नोकरीच्या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून पाठवलेल्या इ मेलचे उत्तर इनबॉक्स मध्ये आले. लंडनच्या एका शासकीय child protection विभागात पायलट प्रोजेक्त म्हणून भारतीय सोशल वर्कर्स हवे होते . त्यांनी माझा बायो डेटा सीलेक्ट् केला होता , दोन आठवड्यात इंटरव्ह्यू होते. सोबत त्यांनी यु के चा Children Act पाठवला होता. इंटरेस्टिंग वाटलं म्हणून वाचत गेले मग चार फेऱ्या झाल्या इंटरव्ह्यूच्या आणि एकूण ९३० अर्जदारातून आम्ही १४ जण निवड्ले गेलो. हे सगळं आधी कुतूहल म्हणून आणि मग आवडलं म्हणून करत गेले पण शेवटच्या मुलाखतीत त्यांनी निवड झाली आहे हे सांगितलं तेव्हा लक्षात आलं की आपण कधी पासपोर्टही काढला नाही . त्यात एक दिवस ताप आला आणि कामावर गेले नाही, मैत्रिणीच्या भावजयीचं हॉस्पिटल होतं. ताप आणि पोटातलं दुखायचं थांबेना म्हणून दाखवायला गेले आणि सरळ ऑपरेशन टेबल वरच घेतल तीने , अपेंडिक्स फुटलं होतं. सर्जरी झाली पण ताप काही उतरेना, आठ दिवस हॉस्पिटल मध्ये आहे म्हणून बी बघायला आले. इतकी आजारी आहेस माहीत नव्हतं आणि इथे या छोट्या हॉस्पिटलमध्ये काय होणार म्हणून बॉम्बे हॉस्पिटलच्या त्यांच्या मित्राला डीन ला फोन लावून माझ्यासाठी बेड बुक केलं . पुढचे दीड महिने इतकया टेस्ट, टेस्टमेन्ट करूनही ताप उतरत नाही म्हणून सगळे डॉक्टर हतबुद्ध झाले होते . बी रोज येऊन , विचारपूस करून जायचे . शेवटी तिथल्या मुख्य डॉक्टरनी मला सांगितले इतक्या तपासण्या केल्या पण काही कळत नाहीये, माझ्या मते टायफाईड आणि मलेरिया दोन्हीचा संसर्ग आहे. मी तुला दोन्हीची ट्रीटमेंट तुझी परवानगी असेल तर देतो, दोन दिवसात ही मात्रा लागू पडली आणि पुढच्या आठ दिवसात मी घरी आले. या दरम्यान घरी नवीन जॉब चे काँट्रॅकट , विजासाठी लागणारी कागदपत्रे येऊन पडली होती. परदेशी जायचं म्हणून नाही पण आतापर्यंत फक्त अभ्यासाच्या पुस्तकात वाचलेली या प्रगत देशातली advanced social policy फक्त अभ्यासायलाच नाही तर तिथे जाऊन प्रत्यक्ष अम्मलबजवानीच्या कामात सहभाग असणार त्याचबरोबर थोडी आर्थिक परिस्थिती सुधारायची हीच संधी होती. त्याचबरोबर थोडे पैसे साठवून phd पण LSE मध्ये करता येईल , असं वाटत होतं . पण त्याचवेळी उभं राहत असलेल काम सोडून २-३ वर्षासाठी जायचं अगदी जीवावर आलं होतं . वेळ ही कमी होता निर्णय घ्यायला आणि तयारी करायला , शेवटी या बापालाच विचारले काय करू - पैशाचा प्रश्न आहे तर किती लागतील सांग, तुझी सॅलरी वाढवू हा सरळ उपाय . फिरून यायचं आहे तर तेही आयोजित करता येईल पण बाकी तुझ्या ज्या योजना आहेत त्यावर तुलाच निर्णय घ्यावा लागेल . जिथं कुठं जाशील तिथं चांगलंच काम करशील आणि इथं जे काही सुरु केलंय ते या पध्दतीनं नाही, थोडं हळू थोडं ढिसाळ असं चालेल पण तुझा निर्णय तुलाच घयावा लागेल . दीड महीने हाॅस्पिटल मध्ये असताना मनूला भेटता आले नव्हते, सगळी जवळची पुंजी संपली होती आणि मला काय झाले तर या मुलीचं काय होणार हा इतर वेळी मनात येणारा प्रश्न खूप प्रकर्शाने या दरम्यान जाणवला होता...आणि मी घेतला निर्णय इकडे येण्याचा , माझ्या अनेक मित्र मैत्रिणींशी बोलून माझी रिप्लेसमेंट म्हणून दोघी गेल्या बीं कडे काम करायला पण बात कूछ जमी नही . सुरुवातीच्या काळात मुंबईला गेले की ऑफिसला जाऊन भेटून यायचे , झाले सहा महिने, ये आता परत असं ऐकून , परत मन द्विधा परिस्थतीत असायचं . त्यांच्या मुलांच्या इमेल्स यायच्या , ७/७ चे बॉम्बिंग झाले तेव्हा तातडीने फोन होता , ठीक आहेस का, तिकडंच काही खरं दिसत नाही , ये मायदेशी परत .
इथल्या कामात , मनूच्या शिक्षणात आणि इतक्या वर्षांनी मिळालेल्या थोड्याशा निवांत अशा माझ्या space मध्ये मी थोडी विसावते त्यात एक्स नी परत भारतात जायचा निर्णय घेतला. त्याच्यासारख्या राजकीय कार्यकर्त्याला इथे असं without his identity and activism राहणं शक्य नव्हतं आणि इतकी वर्षे तळ्यात मळ्यात असलेल्या संसारात जाऊन त्याच्यसह पुन्हा सगळ्या आर्थिक जबाबदाऱ्या खांद्यावर घ्यायची माझ्यात ताकद राहिली नव्हती. पाच महिन्याची गरोदर असताना, तुला यायचं नसेल तर नको येउस, मुलाचा निर्णय काय घ्यायचा तो तू घे असं म्हणून तो निघून गेला होता. एकत्र असूनही इतकी वर्षे सिंगल पेरेंट म्हणून आणि असली धकाधकीची कामे सांभाळून एका मुलीला वाढवतानाच्या खस्ता मला माहीत होत्या. थोडं बस्तान बसू लागताना असंच आयुष्य परत विस्कटायचं नाही म्हणून अट्टाहासाने नाही गेले मी परत. बी च्या धार्मिक आणि पारंपरिक मनाला हे पटणं जरा अवघडच होतं. शेवटी पती परमेश्वर असतो , नमाजका पहिला सजदा अल्लाहला आणि दुसरा नवऱ्याला असतो हे परत परत ते मला सांगत राहिले .इतर वेळी आणि लंडनला यायच्या वेळीसुद्धा मी एकटी प्रवास करणार हे बींना कधीच पटले नव्हते. कोणी मेहरम व्यक्ती म्हणजे - बाप, मुलगा किंवा भाऊ नसेल तर इस्लाममध्ये महिलेस एकटीला प्रवास निषिद्ध आहे . आता तर प्रवास नाही तर एकटीच राहणार होते
आणि नंतर जेव्हा मी मुलांच्या कस्टडीसाठी कोर्टात गेले तेव्हा त्यांनी मला खडसावलेच , कितीही हट्टी असलीस तरी असं पाऊल उचलायला नको होतंस शेवटी बापच मुलांचा पालक असतो . त्यावेळी मुलांच्या कस्टडी आणि परत जाऊन नोकरी याच्यापलीकडे मला काही सुचणं शक्यच नव्हतं, त्यामुळे ते संभाषण अपूर्ण राहिले. निघताना मला ते म्हणाले तू थोडी कमी हट्टी हो , म्हणजे असले प्रश्न येणार नाहीत तुला, माझं त्यांना उत्तर होते हट्टी आहे म्हणूनच मी इथे आहे नाहीतरी पालापाचोळ्यासारखी गेले असते आतापर्यंत! कस्टडीचं प्रकरण डिवोर्समध्ये संपलं , त्याचं फार वैषम्य वाटलं नाही, औपचारिक गोष्ट होती ती पण त्या नात्याबरोबर हे नातंही मला दुरावलं ! कधी राग नाही आला पण त्यांचा किंवा त्यांच्या या भूमिकेचा , फक्त आता काय बोलावं असा प्रश्न पडतो त्यामुळे मी संपर्क नाही केला परत.
दहा वर्ष झाली आता परत भेट नाही झाली , कधी मधी त्यांच्या मुलांचे ईदला ईमेल येतात , जुनं त्यांच्या गृपमधली कोणी भेटलं तर सांगतात अजून माझं , बाईकचं , कामाचं कौतुक होतं आणि जे कोणी ट्र्स्ट च्या कामासाठी येतं त्यांना माझ्यासारखं काम करा असं एकदा तरी म्हणलं जातं . सगळे प्रकल्प चांगले चालू आहेत , बी एम सी चे लोक काही बदलले नाहीयेत. दीड वर्षात मी खूप काही शिकले त्यांच्याबरोबर आणि प्रत्यक्ष कामाची फलश्रुती फार मोठी नसली तरी जे काम त्यांना पुढे न्यायचं आहे त्यात अजूनही त्यांना , 'शबाना सारखीचा शोध आहे .' यातच सगळं आलं.