Sunday 6 April 2014

काय घडतंय मुस्लिम जगात? भाग २- मुस्लिम राजवटींचा संक्षिप्त इतिहास आणि आधुनिकता

नमनाला घडाभर तेल घालून झाले आहेच आता पुढील विषयाकडे वळूयात.
मुस्लिम राजवटींचा संक्षिप्त इतिहास
आजचे मुस्लिम बहुल प्रदेश समजून घ्यायचे असतील तर इस्लामच्या उदयपासूनचा इतिहास पहावा लागेल. प्रेषित मोहम्मदांनी मक्केहून मदिना येथे इसवी सन ६२२ मध्ये  स्थलांतर केले तेव्हापासून हा इतिहास सुरु होतो. यानंतरच्या दहा वर्षात, सन ६३२ पर्यंत, प्रेषितांच्या मृत्युपर्यंत इस्लामी राजवट संपूर्ण अरब आखतात पसरली होती. यानंतर आलेल्या चार खिलाफतीनच्या - खलीफ म्हणजे राज्य संस्थेचा प्रमुख - कालवधीत मुस्लिम राजवट त्याकाळच्या बायझानटाइन आणि सास्सानिड साम्राज्यावर बहुतांशी कब्जा करून उत्तर आफ्रिकेत पसरली होती. त्यानंतर आलेल्या उम्मयाद राजवतिचा विस्तार स्पेन- पोर्तुगाल समुद्रकिनार्यापासून आजच्या पाकिस्तान व भारताचा काही भागअपर्यन्त झाला होता. प्रेषितकाळापासून केवळ १३० वर्षांचा हा व्यापक विस्तार ही मुस्लिम साम्राज्याचा गौरव, संघटीत ताकद आणि मोठ्या प्रमाणावर लोक आणि सैन्य यांना सोबत घेऊन केलेला राज्यकारभार यासाठी ओळखला जातो. यानंतर सन ७५० मध्ये आलेली अब्बासिद खिलाफत हा मुस्लिम साम्राज्याचा सुवर्णकाळ समजला जातो. सन ७६२ मध्ये या साम्राज्याची राजधानी बगदाद येथे स्थलांतरित केली गेली. बगदाद हे लवकरच एक संपन्न आणि सुसंकृत शहर म्हणून प्रसिद्धीस आले. त्याकाळच्या ज्ञात जगातून अनेक विद्वान, व्यापारी, लेखक, कलाकार बगदादकडे आकर्षित झाले होते. साधारण ४००- ५०० वर्षाचा हा कालावधी हा वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाप, उत्कृष्ट शासन -प्रशासन आणि सर्वसमावेशक सहिष्णुता यासाठी ओळखला जातो.इस्लाम आणि मुस्लिम राजवटी सहिष्णू आहेत असे जेव्हा दाखले दिले जातात तेव्हा याच काळाचा निर्देश केला जातो. इस्लामिक संस्कृतीत खरोखर हा एक उन्नतीचा आणि प्रगतीचा कालखंड होता.
१२५८ साली झालेल्या मंगोल आक्रमणात बगदादचा पाडाव होतो आणि अब्बासीद राजवट इजिप्त कैरो इथे स्थलांतरित होते. तिथे ही राजवट चालू राहते परंतु पूर्वीची शान, बान आता लयास गेलेली असते. त्यात भर म्हणून कोर्डोबा -आजच स्पेन इथे प्रतीखीलाफतीची स्थापना झालेली आहे. प्रचंड मुस्लिम राजवटीला गेलेला हा पहिला तडा. यानंतर अब्बसीद राजवटीचे विभाजन चालूच राह्ते. १५१७मध्ये ओटोमान सम्राट या खिलाफतीवर पूर्णपणे कब्जा करतो. १५१७ पासून १९२४ मध्ये अतातुर्क केमाल पाषाने खिलाफत बरखास्त करेपर्यंत हि खिलाफत अस्तित्वात होती. परंतु आधीच्या खिलाफती आणि ही खिलाफत यात एक मुलभूत फरक दिसून येतो. तत्वतः खलिफा हा राज्याचा आणि धर्मपीठाचा मुख्य असतो. नवीन कार्यप्रणालीत मात्र खलिफचे स्थान हे त्याच्या लष्करी सैनिकांवर अवलंबून असू लागले. ओटोमान साम्राज्यातील सैनिक हे मुख्यतः गुलाम म्हणून सैन्यात विकत घेतलले असत. खलिफा हा नावापुरता राज्यप्रमुख राहिला आणि खरी सत्ता मात्र या सैन्यातूनच आलेल्या सुलतानाच्या हातात गेलॆ. धर्मसत्ता आणि राजसत्ता याची फारकत इथूनच सुरुवात झाली. प्रेषिताचे उत्तराधिकारी म्हणून खलिफ आणि खिलाफतीकडे मुस्लिम नेहमीच निष्ठावान असत परंतु या खालीफाकडे वास्तविक सत्ता मात्र या कालावधीत फारच नगण्य होती. धर्म आणि राजसत्तेची फारकत याचे दूरगामी परिणाम यापुढच्या काळात मुस्लिम शासनव्यवस्था आणि कायदे यांच्यावर झालेले दिसतात. विसाव्या शतकाच्या शेवटपर्यंत इस्लामिक राज्यांमध्ये सैद्धांतिक पातळीवरचीएक मोठी उणीव म्हणजे या फारकतीच्या पुढे जाउन समग्र नागरी व्यवस्थेची घडी बसवणे होय. या राजवटीतील मुस्लिम समाजाचे नियमन हे पूर्णपणे धार्मिक नियमानुसार अपेक्षित आहे, परंतु धार्मिक व्यवस्थेचा प्रमुख आणि शासनव्यवस्थेचा प्रमुख यांच्या स्थानामध्ये आणि सत्तेमध्ये बराच फरक आहे, अधिकाराचे विभाजन आहे.याचा परिणाम म्हणून नागरिकांची शासनव्यवस्थेप्रती असलेली निष्ठा ही धर्मपीठअप्रती असलेल्या निष्ठेशी सुसंगत असेलच असे नाही. यातून निर्माण होणाऱ्या तिढ्या सोडवताना प्रेषिताच्या वेळचे दाखले दिले जातात. परंतु त्या काळी जरी हि व्यवस्था प्रेषिताच्या उपस्थितीत चालली असली तरी त्यानंतरच्या काळाच्या आव्हानासाठी पुरेशी पडताना दिसत नाही. आपण अभ्यासणाऱ्या बऱ्याच देशांमध्ये हा घटक दिसून येतो. गेल्या काही दशकात या प्रश्नाची उकल करून एक समग्र इस्लामिक राज्यप्रणाली पुढे येत आहे त्याचाही विचार लेखामध्ये पुढे करुयात.
बहुआयामी विभिन्नता आणि सामायिक घटक
या राजवटी झंझावाती वेगाने पसरल्या खरया पण त्याकाळी जे जे समुदाय या राजवटीनच्या अखत्यारीत आले त्या समुदायाच्या भाषा, संस्कृती आणि धर्म मात्र तेच रहिले. सुरुवातीच्या काळात या समुदायांना जबरदस्तीने मुस्लिम बनवण्यात जेत्या अरबांना फार रस नसल्याचे दिसून येते. स्थानिक प्रथा आणि परंपरा या काळात निर्धोकपणे चालू रहिल्य. आज या मुस्लिम प्रदेशात अनेकांगी विविधाता दिसून येते त्याचे सुरुवातीच्या काळातील अरबांचे अनुत्साही धोरण कारणीभूत आहे. यथावकाश जेत्या समुदायांचे धर्मांतर झाले तरी बऱ्याच स्थानिक परंपरा तशाच राहिल्या, किंबुहना त्यातल्या बऱ्याचशा अरब विजेत्यांनी जोपासल्या उदा. पर्शिअन आणि नंतर भारतात प्रचलित असलेली प्रशासनव्यवस्था थोड्या फार फरकाने त्यांनी चालू दिली. मुस्लिम साम्राज्य त्याकाळी कळसास पोहोचले याचे महत्वाचे कारणच या स्थानिक संस्कृतीं आणि जेत्यांच्या नव्या संकल्पनांचे सह्मीलन होय. ही राजवट इस्लामिक कायदे व त्यात अभिप्रेत असलेल्या राज्यप्रणालीनुसार चालवली असली तरी त्या त्या प्रदेशातली स्थानिक विविधता यात सामावून गेली होति. म्हणूनच आज जेव्हा आपण मुस्लिम समाज पाहतो तेव्हा अरबस्तानातील मुस्लिम,सोमालिया, अफगाणिस्तान, इराण, बोस्निया, चीन येथील समाज हे अनेक बाबतीत एकमेकांपेक्षा वेगळे असल्याचे दिसतात. या समाजातील भाषा, चालीरीती, नंतरच्या काळातील शासन-प्रशासन हे एकमेकांपासून खूप भिन्न आहे. हे समाज स्वततःला मुस्लिम म्हणतात, समजतात परंतु या भिन्नता अटीतटीने जोपस्तात. अरबी ही प्रेषिताची भाषा, कुराण या भाषेत लिहिलेले असल्यामुळे तिला मुस्लिम जगतात महत्वाचे स्थान आहे. मुस्लिम राजवटीत बऱ्याच भागात अरबी भाषा राज्यकारभारासाठी स्वीकारली गेली परंतु ती जन भाषा मात्र झालेली दिसून येत नाही. पर्शिअन किंवा ओटोमान साम्राज्यातली जुनी फर्माने पाहिली तर ती अरबी भाषेतील आहेत पण स्थानिक लिपीमध्ये लिहिलेली दिसतात. फरक फक्त सांस्कृतिक पातळीवरच नाही तर आर्थिक आणि राजकीयही आहे. कतार सारखा देश जेथे जगातील सर्वोच्च दरडोई उत्पन्न आहे हा देश मुस्लिम आहे आणि अफगाणिस्तान किंवा सोमालिया जिथे पराकोटीचे दारिद्र्य, दरडोई सर्वात कमी उत्पन्न आहे हे देशही मुस्लिम आहेत. मलेशिया आणि तुर्कस्तानसारखे सातत्याने प्रगती करणारे देश मुस्लिम आहेत तर इतर अनेक देशांची उत्पादकता स्थिरावलेली आहे. यात जेथे मुस्लिम सत्ता स्थिरावल्या अशा प्रशिया, तुर्कस्तान, इराण इत्यादी देशात स्थिर शासनव्यवस्थांची परंपरा दिसते तर सौदी अरेबिया, अफगाणिस्तान अशा देशांमध्ये तुलनेने अपरिपक्व अशा शासनप्रणाली दिसून येतात. यातील बहुतांशी देशांमध्ये एकाधिकारशाही - एका राजघराण्याची किंवा फौजी अधिकारयाची - असणारी आहेत. बहुतेक अरब देशांमध्ये तिथले शासक आणि प्रजा यांच्यामध्ये एक अलिखित करार दिसून येतो. शासन करणारी श्रीमंत घराणी तिथल्या लोकांच्या आर्थिक गरजा भागवतील आणि त्या बदल्यात त्यांना आरामात राज्य करता येइल. या आर्थिक कराराबरोबरच इथल्या समाजाने एकप्रकारचा सामाजिक आणि मानसिक करार केलेला दिसून येतो आणि तो म्हणजे बाहेरच्या जगात त्या काही घडामोडी होतील त्यापासून त्यांचे संरक्षण. दशकानु दशके काहीही बदल न होता इथली समाजव्यवस्था तशीच चालू आहे त्यामुळे इथली प्रजाही मानसिक दृष्ट्या परावलंबी झालेली दिस्ते. आधुनिकतेमुळे येणाऱ्या सर्व बदलांना आहे त्या प्रचलित पद्धतीमध्ये घोळू इच्छिते किंवा त्यांचे अस्तित्वच नाकारू पाह्ते. या मानसिकतेमुळेच इतकी दशके हासामाजिक करार आणि त्यावर आधारित राजेशाही इथे अबाधित रहिलि. परंतु नव्याने उदभवत असलेल्या अनेक प्रश्नांना सामावून घेण्यात हे शासक कमी पडताना दिसत आहेत आणि त्यामुळेच एक असंतोष या समाजामध्ये उमडून आला आहे.
इतक्या टोकाची विभिन्नता असूनही या सर्व देशांबद्दल एकजिनसी अभ्यास कसा होऊ शकतो हा निर्विवादपणे मोठा प्रश्न आहे. परंतु या सगळ्या घटकांमध्ये या देशांच्या,मध्ये धर्म - इस्लामचा एक सामाईकधागा निश्चितच आहे. हे देश स्वतःला मुस्लिम राष्ट्रे म्हणवतात. विभिन्न परिस्थिती असली तरी यांचे सैद्धांतिक पातळीवर उद्दिष्टे एक आहेत. वेगळी राष्ट्रे असली तरी हे समाज स्वतःला एका राष्ट्रातीत अशा समुदायाचा भाग मानतात- वस्तुस्थिती यापेक्षा खूप वेगळी असली तरीही! समान धर्मश्रद्धा हा इतर राष्ट्राच्या तुलनेत या राष्ट्रासाठीचा एक सामायिक ओळखीचा प्रयत्न आहे.
आधीच्या परिच्छेदात वर्णिलेली विविधता आणि हा समान अस्मितेचा प्रयत्न हे दोन्हीही तितकेच शक्तिमान प्रवाह आहेत. या सर्व मुस्लिमबहुल प्रांतातली विविधता ही स्थानिक घटकांशी संबधित आहे तर हा समान अस्मितेचा मुद्दा या देशांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीत आहे. ६ व्या शतकापासून ते १६व्या शतकापर्यंत विस्तीर्ण भूभागावर पसरलेल्या प्रचंड साम्राज्याचा हे प्रांत/ देश भाग होते. गेल्या दोन शतकांमध्ये यातील बरेचसे देश हे युरोपिअन वसाहतवादाचे बळी ठरले, त्यांची अस्मिता, सार्वभौमत्व, सत्ता आणि ओळख दडपली गेलि. हा अर्वाचीन इतिहास या देशांसाठी , समाजासाठी फार क्लेशकारक आहे.भूतकाळातील दैदिप्यमान प्रतिमेशी त्यांची मानसिकता करकचून बांधली गेलेली आहे आणि सद्य परिस्थितीचा स्वीकार आणि त्यास सामोरे जाण्याचे मार्गही या प्रतिमेशी निगडीत आहेत. वसाहतवादाचा अनुभव हा आधीच्या आक्रमनांपेक्षा फारच वेगळा होता. आधुनिक तंत्र ज्ञानाच्या बळावर या देशांची विभागणी इंग्रज, फ्रेंच, डचानी आपसात करून घेतली. स्वताची जेते, करते ही प्रतिमा जावून आपण मंडलिक झालो हे शल्य या समाजास खुपत राहिलेच.वसाहतवादाचा अनुभव सर्वच देशांसाठी तसा दाहक आहे . जपानने या अनुभवास दिलेला प्रतिसाद मात्र मुस्लिम जगास नेहमीच मोहिनी घालत आला आहे. १८५३ पर्यंत जपानने आपल्या सर्व सीमा बंद करून अंतर्गत विकासाचे धोरराबवले होते. १८५३ मध्ये अमेरीकन नौदलाने जपानला एकतर आपल्या सीमा व्यापारासाठी खुल्या करा किंवा आक्रमण सहन करण्यासाठी सज्ज राहा असे आव्हान दिले. आपणास फार निवडीस वाव नाही हे लक्षात घेऊन जपानने अमेरिकीचीदंडेलशाही त्या घडीस मान्य केली. परंतु त्यानंतर जपानने अमेरिकन नौदलाचा, त्यांच्या सत्तासामार्थ्याचा सूक्ष्म अभ्यास केला. अमेरिकेसारखे सामर्थ्य मिळवण्यासाठी त्यांनी अमेरिकेने अवलंबलेल्या मार्गाचे अनुकरण केले आणि ते फक्त नौदल, सैन्य या बाबतीतच नव्हे तर कायदे, प्रशासन आणि अर्थव्यवस्था सर्व ठिकाणी पाश्चिमात्यांचे अनुकरण करून त्यांच्या तोडीस जागतिक स्थान मिलवले. दमास्कन मुस्लिम राष्ट्रांसाठी, जपान आपली संस्कृती जतन करूनही पाश्चात्यांची बरोबरी अगदी काही दशकात करु शकतो म्हणून आदर्शवत ठरला. १८५३ साली अमेरिकेपुढे नांगी टाकणारा जपान हा १८९४ मध्ये ब्रिटिशाबरोबर मिळून चीनवर आक्रमण करतो आणि पुढे स्वबळावर साम्राज्याचा विस्तार करून वसाहतवादी देशांच्या कंपूत सामील होतो. १९०४-०५ साली केलेल्या रशियन आक्रमणात रशियाला धूळ चारतो - या घटनांचा मुस्लिम शास्ते व विचारवंत यांच्यावर जबरदस्त परिणाम झाला. जपानचे आंतरराष्ट्रीय वर्चस्व आणि त्याचबरोबर अंतर्गत पातळीवर परंपरा व संस्कृतीचे संवर्धन हे या मुस्लिम राजवटींचा आदर्श ठरला.
आजही साऱ्या आशियायी देशात सामर्थ्य आणि परंपरा यांची सांगड घालण्याचा प्रयत्न दिस्तोच. अहमद शुगारि हा सौदी अरेबियातील एक धर्मोपदेशक २००९ साली रमझानच्या संदेशात जपानी लोकांचे दाखले देऊन हाच प्रश्न मुस्लिम जगताला विचारत आहे- ज्या प्रकारे जपानी लोकांनी आपली संस्कृती, धर्म, परंपरा राखून आज इतकी प्रगती केली आहे तर आपण (मुस्लिम) असे का करू शकत नाही? आणि हाच प्रश्न मलाही पडतो की या समाजात असे काही घटक आहेत का ज्यामुळे हे धर्म, परंपरा आणि आधुनिकतेची सांगड बसतच नाही!

पण आधुनिकता म्हणजे नक्की काय?
पण आधुनिकता म्हणजे नक्की काय? सामाजिक आणि राजकीय शास्त्रात आधुनिकता ( modernity ) म्हणजे मध्ययुगीन कालखंडातून सरंजामी व्यवस्था नाकारून भांडवली, वस्तुनिष्ठ, धर्मनिरपेक्ष अशा राष्ट्र-राज्याची संकल्पना. बहुतांशी अरब राष्ट्रे या आधुनिकतेच्या अनुभवास त्याबरोबर येणाऱ्या स्वातंत्र्य आणि समूहाच्या सीमा ओलांडून व्यापक जगाशी सामाजिक संबंध प्रस्थापित करण्याच्या आव्हानात तोकडी पडताना दिसतात. आधुनिकतेचा हा प्रवास तसा अवघडच आहे कारण या प्रक्रीयेमेध्ये बरीच उलथापालथ होते. उत्पादकतेची पारंपारिक साधने जाउन औद्योगिकरण, शास्त्र आणि तंत्रज्ञानावर आधारित नवीन शोध, प्रशासनात आमुलाग्र बदल आणि याअनुषगाणे जीवनाच्या इतर क्षेत्रात येणारे सांस्कृतिक बदल यामुळे सम्जाअत असणाऱ्या प्रस्थापित समज, रूढी, सत्ताकेंद्रे आणि यावर अंकुश ठेवणाऱ्या व्यक्ती या सर्वांतच उलथापालथ होते. अस्तित्वात असणारी घडी आणि त्याबरोबर येणारी सुरक्षितता यांनाच तडा जातो. साहजिकपणे या सर्व बदलांच्या केंद्रस्थानी असणाऱ्या राज्यशक्तीविरुद्ध असूया व असंतोष निर्माण होतो. परंतु आधुनिकतेमुळेच पूर्वीची संथ जीवनशैली बदलून गतिमान बदल दैनंदिन जीवनात होत असतो. प्रस्थापित घडी चिरडून नवोन्मेशि असा हा बदल लोकांना हवा असतो. आपल्याकडे रेल्वे आल्यानंतरचा बदल किंवा तीन दशकांपूर्वी ठाणे बेलापूर पट्ट्यात शहर वसवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ज्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी झाल्या त्यामध्ये हा आधिनिकतेचा प्रवास स्पष्ट दिसून येतो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हा बदल बहुतांशी राष्ट्रात आणि समाजात झालेला आणि लोकांना भावलेला दिसतो. भांडवलशाही ज्यावर आधारित आहे ते पैसा आणि नफा हे दोन घटक आधुनिकतेच्या मुलाशी अस्तात. या दोन घटकांना, जडवादी विचारसरणीला मात्र फार सहजरीत्या मान्य केले जाताना दिसत नाही, किंबुहना त्यांचा अस्वीकार व त्याविरुध्द संतापाची भावना या समाजांमध्ये दिसून येते. जर्मन तत्ववेत्ता गटेच्या फ्वाईस्ट मध्ये हा विरोधाभास स्पष्ट दिसून येतो. फ्वाइस्ट हे आधुनिकतेच्या प्रक्रियेचा भाग आहे परंतु त्याला आधीची परंपरागत सुस्त अशी समाजरचना बांधून ठेवते आहे. एका प्रकारे फ्वाइस्ट हा तिसऱ्या अप्रगत जगातील त्या वेळच्या बुद्धिवादी व्यक्तीचे प्रतीकच आहे. अप्रगत जर्मनीने इंग्लंड आणि फ्रान्सचा आदर्श ठेऊन आपली प्रगती केली - फ्वाइस्टला या प्रगतीचे त्याबरोबर येणाऱ्या बदलांचे आश्चर्यमिश्रीत कौतुक आहे, त्याला आपल्या संसकृती आणि परंपरांचा अभिमान आहे , पण त्याचबरोबर स्वतःच्या मागासलेपणाची लाज वाटते. मुस्लिम जगतात आधिनिकतेचा प्रवेश हा मुख्यतः वसाहतवादी राष्ट्रांच्या माध्यमातून झाला. हा बाल झपाट्याने आला असला तरी तिथल्या स्थानिक लोकांसाठी त्याचा स्विकार मानसिकदृष्ट्या बराच अवघड होता. उदा. सुएझ कालवा बांधताना इजिप्तमध्ये आलेले भांडवल, तंत्रज्ञान, इमारती, प्रशासन हे तिथल्या स्थानिक जीवनशैलीपेक्षा फारच वेगळे होते. फ्रेंच जेव्हा ट्युनिशियामध्ये गेले तेव्हा तिथेही हीच प्रक्रिया दिसून आली. या प्रक्रियेत अनेक नव्या संधी उपलब्ध होतात परंतु त्याची जबर किंमत हि स्थानिक जनतेस द्यावी लाग्ते. बाहेरून येणारे लोक नुसते वेगळे दिसताच नाहीत तर त्यांचे आचारविचार ही वेगळे. या प्रक्रियेशी जे जुळवून घेऊ शकत नाहीत किंवा ज्यांना विविध कारणांमुळे यात स्थान नाही त्यांची मात्र गोची होते. भूतकाळातील आपल्या स्थानाबद्दल,राजकारण, अर्थकारानातल्या भूमिकांबद्दल कमालीचे ममत्व याच प्रकियेतुन निर्माण होते.प्रचलित व्यवस्थेत एक प्रकारची निश्चितता असते, समाजास संभाव्य घडामोडींबद्दल ठाम खात्री असते. परंतु आधुनिकतेची प्रक्रियेत मात्र अनेक अनिश्चित आणि असंभाव्य अशा क्रिया या संथ समाजात प्रवेश करतात. मानसिकदृष्ट्या समाजासाठी हे एक मोठे आव्हानच असते. Fyodor Dostoyevsky या रशियन लेखकाने लिहिलेल्या Brothers Karamazov.या कादंबरीत grand inquisitor म्हणून एक दृष्टांत आहे -समाजात अपधर्म अगदी विकोपाला गेलेला असतो तेव्हा ख्रिस्त पुन्हा परतून येतो, लोकांमध्ये मिसळतो, लोक पुन्हा त्याचा आदर करतात, श्रद्धा ठेवतात. तिथल्या चर्चला याची बातमी कळल्यावर चर्चचे अधिकारी येतात आणि ख्रिस्ताला अटका करून दुसऱ्या दिवशी सकाळी शिरच्छेद करायचा आदेश देतात. त्या रात्री तुरुंगाधिकारी येउन ख्रिस्ताला सांगतो की त्याला, न्यायालयाला आणि चर्चला हे माहित आहे कि तू खरा ख्रिस्त आहेस. तुला अटक काही अनवधानाने केलेली नाही. परंतु तुझ्या पुनरागमनाने चर्चचे उद्दिष्ट आणि भवितव्य धोक्यात आलेले आहे. येथे हा अधिकारी पुढे ख्रीस्तास म्हणतो -मनुजास शांती आणि स्वातंत्र्याची ओढ असते, मृत्यू आणि स्वातंत्र्य यात तो स्वातंत्र्याची निवड करेल. स्वातंत्र्य - बरोबर आणि वाईट जाणण्याचे स्वातंत्र्य, सद्सद्विवेक्बुद्धी नुसार जगण्याचे स्वातंत्र्य -- परंतु हेच स्वातंत्र्य मनुजास अपार दुखही देते.
And he describes the mission of the church in the following terms,and it's exactly this problem of freedom So it's: "Man prefers peace and even death,to freedom,to freedom of choice in the knowledge of good and evil.Nothing is more seductive for man than this.His freedom of conscience, but nothing is a greater cause of suffering."
अनिश्चितता मग ती दैनदिन जीवनातील किंवा आध्यात्मिक पातळीवरची असो समाजमानसात त्याचे पडसाद तीव्र असतात, त्याविरुद्ध येणाऱ्या प्रतिक्रिया तीक्ष्ण असतात, आणि हे फक्त मुस्लिम राष्ट्रेच नाही तर सगळीकडे आढळणारे सत्य आहे. एरिक फ्रॉम आणि डुरखाइम यांच्या लेखनातून या संकल्पनांचा वेध घेतलेला आहे. फ्रॉम त्याच्या Fear ऑफ Freedom या पुस्तकात फ्रॉम म्हणतो कि स्वातंत्र्य एक प्रकारे नकारात्मक असते- जाचक परंपरा, रूढी, शासन यांना नाकारून त्यातून येणारे स्वातंत्र्य ! परंतु या स्वतंत्रतेबरोबरच एक प्रकारचा अभाव, रिक्तताहि येते. डुरखायीमने याचे वर्णन Anomie असे केले आहे. या अवस्थेत व्यक्ती व समूहाला मार्गदर्शन करणारे सर्व ढाचे कोसळलेले असतात, समाजमानस आणि समाजव्यवस्थापन यांना बांधणारी यंत्रणा कोसळलेली असते. भूतकाळातील निश्चितता जाउन एक प्रकारची संदिग्धता येते. फ्रोमच्या मते या स्थितीला जर बदलायचे असेल तर नकारात्मक स्वातंत्र्याऐवजी सकारात्मक स्वातंत्र्य आवश्यक आहे. सकारात्मक स्वातंत्र्यात व्यक्ती रचनात्मक कामात सहभागी होते, इतरांबरोबर अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करते. ही सकारात्मक स्वातंत्र्याची ओढ ज्या समाजात तीव्र बदल होतात तिथे अधिक जोमाने असते याचे कारण म्हणजे येणाऱ्या बदलांना स्वीकारत पण लवकरात लवकर आधीच्या निश्चिततेच्या स्थितीत जाण्याची एक निकड या समाजात असते. परंतु या निकडीपायीच हे समाज एकाधिकारशाहीस अंगिकारताना दिसतात. एकाधिकारशाही किंवा हुकुमशाहीत लोकांना काय विचार करावा, कसे वागावे याबद्दल ठोस मार्गदर्शन मिळते. जुन्या समाजव्यवस्थेत असणारी निश्चितता, अधिकारीव्यवस्था आणि जगण्यावाग्ण्याच्या निश्चित पद्धती हुकुमशाहीच्या माध्यमातून निर्माण होतानाचा एक आभास समाजास मिळतो. हा निश्चीततेचा आभास,सामाजिक आणि राजकीय पातळीवरची निष्क्रिय पण दृढ अशी प्रतिमा अशा हुकुमशाही किंवा अरब देशात असणाऱ्या social contract पद्धती वर्षनुवर्षे चालू राहण्यामागचे महत्वाचे कारण आहे.
जर आधुनिकतेमुळे इतके प्रश्न निर्माण होणार असतील तर मग ही आधुनिकता हवीच कशाला ?
आधुनिकतेच्या प्रक्रियेआधी अस्तित्वात असणारी स्थायी स्वरूपाची संरचना जशी होती तशीच का जोपासू नये? बाहेरच्या जगातील घडामोडींपासून सुरक्षित अशी घडी समूहाला किंवा राष्ट्राला लावणे अशक्य आहे का? काही शतकांपूर्वी जपानने हाच विचार करून आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या व अतर्गत विकासावर, संस्कृती जोपासन्यावर भर दिला कारण तिथल्या सत्ताधार्यांना माहित होते हि एकदा परकीयांबरोबर उठबस सुरु झाली कि त्यांच्याबरोबर जपान्यांनाही बदलावे लागेल. वेगवेगळ्या समूहांबरोबर येणाऱ्या संबधात हा स्पर्धात्मक घटक आढळतोच. केनिथ वाल्ट्झ यांनी त्यांच्या Theory ऑफ International Politics या पुस्तकामध्ये आंतराष्ट्रीय व्यवस्थेमुळे होणारे सामाजीकरण यावर सखोल विश्लेषण केले आहे. वाल्ट्झ यांच्या मते कुठलाही घटक मग तो राज्य,आर्थिक कंपनी, विद्यापीठातले विद्यार्थी असोत स्पर्धात्मक वातावरणाचा या सर्वांवर परिणाम होतोच. त्यांची इच्छा नसली तरीही नवीन रचनेत त्यांना सक्रिय सहभागी व्हावेच लागते. अन्यथा या प्रक्रियेत असणार्या इतर घटक नवीन रचनेतील बदल आपल्याला अनुकूल असे वळवून घेतात आणि जे या प्रक्रियेत उदासीन राहतात त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. या स्पर्धात्मक वातावरणाचा परिणाम म्हणजे कालांतराने या नवरचना वेगवेगळ्या समाजात सारख्याच रुजताना दिस्तात. या नवरचना अर्थ- उत्पादन व्यवस्था राज्य-प्रशासनव्यवस्था, लष्कर अशा सर्वव्यापी असतात. उदा. राजेशाही व्यवस्था, सरंजामशाही किंवा सध्या अस्तित्वात असलेली वेस्ट मिनिस्टर प्रारुपातली लोकशाही या रचना जगभरच्या ज्ञात जगात त्या त्या वेळी रुजल्या- थोडेबहुत स्थानीय विभिन्नता असेल परंतु संरचना म्हणून एखादी संकल्पना सगळीकडे रुजू होत असताना स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहणे आणि पुढे जाणे या दोन प्रखर उर्मी त्यात आढाळतात. अर्थातच अशा एकजिनसी संरचनेला विसाव्या शतकात तात्त्विक आणि इतर पातळीवर खूप विरोध झाला आहे. जगभरात अनेक चळवळी पुढे आल्या आहेत. विकल्पात्मक राजनीती, कलाकृती इत्यादीतून या स्पर्धात्मक सरनचनेवर टीका व पर्यायाने आधुनिकतेचा नकार होताना दिसतो. हा खरेतर फार खोलात जाण्याचा, वेगवेगळे मतप्रवाह असलेला विषय मी अगदी थोडक्यात फक्त प्रक्रिया समजून घेण्यापुरताच इथे मांडला आहे, हे वाचकांनी लक्षात घ्यावे.

1 comment:

  1. व्वा व्वा...शबानाजी, काय सुंदर विश्लेषण केले एक जटील विषयाचे.
    माझ्यानी राहावत नाहीये... आता पुढचे भाग लवकर टाका... मला ही संपुर्ण लेखमालिका एका दमात वाचून काढायची आहे.

    तुमचा ड्राफ्ट तयार असल्यास मला मेल कराल का?
    इतका सुंदर विषय मी टप्प्या टप्यानी नाही वाचू शकत.

    ReplyDelete

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...