Thursday, 3 April 2014

उद्धरली कोटी कुळे.....

उद्धरली कोटी कुळे.....


तीन वर्षाआधी लिहिलेला हा लेख आज पुन्हा सापडला . इथे पोस्ट करते आहे 

नेहमीप्रमाणे आज सकाळी मेल बॉक्स उघडला. कोणाचे काय स्टेटस अपडेट्स बघत होते--महेश च्या नावाखाली मराठीत ---उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे!

हं, आज १४ एप्रिल, आंबेडकर जयंती!

आंबेडकर जयंती म्हणल्यावर वेगवेगळे चेहरे समोर आले ---त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांची आजच्या दिवासाबद्दलची प्रतिक्रिया आणि त्यामागची राजकीय भूमिका अगदी स्पष्ट करतात! भारतात खूप divisive politics आहे हे खरे असले तरी त्याचा एक फायदा नक्कीच आहे ...लोकांच्या भूमिका , त्यांची समाजातली सामाजिक आणि राजकीय जागा त्यांच्या या प्रतिक्रियातून अगदी ताबडतोब काही संशोधन न करता कळून येते!

माझी पहिली जयंतीची आठवण म्हणजे बाबा घरी वेगवेगळ्या मंडळांचे बॅनर्स बनवून द्यायचे. त्यांचे अक्षर फारच सुरेख त्यामुळे कुठलीही जयंती --जिला पाचगणीत मिरवणुका निघायच्या त्यांचे बॅनर्स रात्रभर बसून अगदी तन्मयतेने बाबांनी केलेले असायचे. त्याच्या जोडीला जयंती निमित्ताने शाळेत असणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेसाठी मां ने लिहिलेले भाषण पाठ करण्यात आम्ही मग्न असायचो. वक्तृत्व स्पर्धेच्या भाषणाचा प्रत्येकाचा मजकूर वेगळा असला तरी सुरुवात ,' माझे दोन शब्द शांत चित्ताने ( बऱ्याच वेळा चीत्तेने, चीत्याने ) आणि शेवट ,' अशा महापुरुषास माझे विनम्र अभिवादन ' असा असायचा!जयंतीच्या मागचे राजकारण अगदी शेजारी चालले असले तरी त्याची फार जाणीव तेव्हा नव्हती. एकतर राहायला आम्ही 'आंबेडकर कॉलनी' आणि नंतर सिद्धार्थ नगर ला. त्यामुळे नंतर कॉलेजला आल्यावर जे 'दलित राजकारण ' म्हणून अभ्यासले जायचे ते रोजच्या जगण्याचा भाग असल्यामुळे काही वेगळे जाणवले नव्हते. बाबा आणि मां तसे जुन्या पठडीतले शिक्षक. गावातील सगळ्या समाजातील लोक गरज पडेल तसे घरी यायचे. कोणाला कुठल्या कोर्ससाठी पाठवू, आजारपणात कुठल्या हॉस्पिटलात घेऊन जाऊ, अल्पबचत योजनेत पैसे टाकू का बँकेत ठेऊ अशा सगळ्या गोष्टींवर सल्ला घेण्याचे आमचे घर ,'One Stop Shop' होते. पंधरवड्यात एक -दोन वेळा तरी नवरा दारू पिऊन मारतो आहे म्हणून कोणीतरी दार ठोठवायचे किंवा आईचा पगार झाला नाही म्हणून कोणीतरी आमच्या घरी जेवायला असायचे. पाचगणीत सगळी घरे अगदी जातीच्या आधारावर वेगवेगळ्या विभागात असली तरी तेव्हा आम्हाला काही फरक पडला नव्हता. कदाचित पडत असेल तरी तो त्यावेळच्या दैनंदीन जगण्यात जाणवला नव्हता. पुण्यात शिकत असतांना या गोष्टी जाणवल्या तरी तेव्हा कोर्सवर आणि पुढे काय करायचे यावर जास्त लक्ष केंद्रित असल्यामुळे वाचनापलीकडे फार काही विचार केल्याचे आठवत नाही.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत आल्यावर मात्र या वेगवेगळ्या अस्मिता आणि अस्मितांचे राजकारण फार जवळून बघायला मिळाले आणि अनुभवायालाही! परंतु तेव्हाही आपली नक्की अस्मिता काय हा प्रश्न नेहमी जाणवायचा! तेव्हापासून आणि आता आता पर्यंत ही या प्रश्नाचे एक ठोस उत्तर माझ्याकडे नाही. पण वेगवेगळ्या गटांच्या झुंबडशाही अस्मितेत आपण बसत नाही हे प्रत्येक वेळी कुठल्यातरी गटाशी बांधिलकी बांधण्याच्या प्रयत्नातून झालेली जाणीव! तिथेही असलेल्या दलित गटाबद्दल नेहमीच्या संमिश्र प्रतिक्रिया होस्टेलच्या कुठल्या गटात तुम्ही बसला आहात यावर अवलंबून असायच्या. पण थोडे थोडे आंबेडकर कळायला लागले ते या गटातल्या काही जणांशी बोलल्यावर , थोडा वाद घातल्यावर! त्यात उमानाथनची सांगण्याची पद्धत मात्र फार वेगळी होती. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, शांतपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरे तो मोडक्या इंग्रजीत द्यायचा. त्याचा तो हसतमुख चेहरा आणि शांत आवाज यामुळे दलित प्रश्न आणि दक्षिणेकडचे राजकारण यामध्ये खूप इंटरेस्ट निर्माण झाला हे खरे.

त्याच सुमारास जब्बार पटेलांचे दोन सिनेमा पाहिले, मुक्ता आणि आंबेडकर. दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि आज ज्यांना एक प्रेषितासमान लेखले जाते त्यांचे जीवन किती अवघड होते आणि पन्नास वर्षानंतर कितीही बदल झाले असले तरी ते ज्या मूल्यांसाठी झटले ती लढाई अजूनही किती अवघड आहे ते या दोन्ही सिनेमांमधून अचूक व्यक्त झाले आहे. आंबेडकर खरे मनाला भावले म्हणण्यापेक्षा रुतले ते या सिनेमाच्या माध्यमातून!नंतर कामानिमित्त मराठवाड्यातील दलित गटांबरोबर वेगवेगळ्या प्रश्नासंबधी काम करताना आंबेडकरांचा प्रभाव अगदी ठसठशीतपने जाणवला. परंतु दलित आणि दलित- इतर हे इतके टोकाचे dynamics जाणवले की प्रत्येकवेळी तुम्ही किती 'दलीत मित्र' आहात या निकषांमध्येच तुमच्या जाणीवा आणि काम गुरफटताना बघून गुदमरायला झाले होते. या गटांचे राजकारण हा एक चर्चेचा स्वतंत्र विषय आहे आणि त्यावर खूप अभ्यासकांनी लिहिलेले आहे. काही वर्षांनी मी मध्य प्रदेशात अक्शन एड च्या प्रकल्पामधून तिथल्या जातीवर आधारित सामाजिक प्रश्नावर काम करताना परत एकदा आंबेडकर भेटले. मराठवाडा आणि एकूणच महाराष्ट्रात जी चळवळ, एक राजकीय घडामोड जातीच्या प्रश्नावर आहे तशी देशाच्या या भागात नाही. पहिल्यांदा जेव्हा मंद्सोर जिल्ह्यातील जातीवर आधारीत वेश्याव्यवसाय या विषयावरचा प्रकल्प मला दिला गेला तेव्हा भोपाल ते मंद्सोर पूर्ण प्रवासात हा काय प्रकार असेल याचा विचार आणि सोबतच्या सहकार्यांबरोबर चर्चा चालली होती. मध्य प्रदेशात रतलाम, मंदसौर इथे बाछडा आणि मुरेना, धोलपुर (राजस्थान) आणि सागर इथे बेदिया या समाजात देवदासी प्रथेप्रमाणे मुली हा व्यवसाय करतात. अगदी ६-७ वयाच्या मुलीना इथे ट्रेन केले जाते. आधी फक्त गावातल्या जमीनदारांच्या सोयीसाठी निर्माण केली गेलेली ही प्रथा आज मुलींच्या traficking मध्ये एक पुरवठा केंद्र म्हणून प्रस्थापित झाली आहे. इथून मुली मुंबई आणि नंतर देशातल्या इतर मोठ्या शहरात आणि विदेशातही या व्यवसायासाठी पुरवल्या जातात. पहिल्यांदा जेव्हा तिथे बाछडा समाजाच्या लोकांबरोबर बोलायला बसलो तेव्हा हे आमच्या जातीचे भूषण आहे आणि ते चालवणे हेच या मुलींचे काम आहे हे ऐकून प्रश्नाची दाहकता समजायला लागली. त्याचबरोबर आठ -नऊ वर्षाच्या मुली जेव्हा ही जाती परंपरांची समाजसंमत जोखड वाहताना पाहिल्या तेव्हा 'गुलामी मानसिकता' हा आंबेडकरांचा शब्द किती समर्पक आहे, ते जाणवले.

एक्शन एडचा दुसरा प्रकल्प होता तो डोक्यावर मैला घेऊन जाणाऱ्या जातीबरोबर ---तिथेही हे काम म्हणजे आमची परंपरागत 'जहागीर' आहे हे ठासून सांगणारे लोक पाहिले आणि परत हा शब्द आठवला. या दोन्ही जातींबरोबर काम करताना आम्ही 'शैक्षणिक केंद्रे' सुरु केली कारण या दोन्ही समाजातील मुलांना गावच्या शाळेत मज्जाव होता. त्यातही या परिस्थितीवर विचार करणारे, आपल्या आपल्या पद्धतीने काम करणारे युवक पुढे आले आणि ही 'जहागीर', हे 'भूषण' कसे लादले गेले आहे यावर आम्ही थोडे उघडपणे बोलू लागलो. एक प्रश्न नेहमी समोर असायचा या सगळ्या चर्चा ऑफिसच्या सहकार्यांबरोबर किंवा अशा प्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातील इतर संस्थाबरोबर करणे फार सोपे आहे. परंतु आज जर ती मैल्याची टोपली वाहून नाही नेली तर मला आणि दोन्ही मुलांना चौधरीच्या घरची शिळी भाकरी मिळणार नाही --हे सांगणारी लालीबाई मला नेहमी निरुत्तर करायची. परंतु इथेही उत्तर मिळाले ते भिंतीवरच्या मळक्या, धुरकटलेल्या आंबेडकरांच्या फोटोमधून. इथे खूप जणांना ते कोण, कुठले, त्यांचे काय योगदान काही माहित नाही . पण आपल्यातला एक माणूस खूप पुढे गेला आणि आपल्यासाठी खूप काही करून गेला हे नेहमी मिळणारे उत्तर. तोच धागा घेऊन-- पण काय ठेऊन गेला तुमच्यासाठी --यावर बोलता बोलता मला या कामातल्या दिशा दिसल्या. महाराष्ट्रात गावोगावी, झोपडपट्ट्यांमध्ये दलित वस्तीच्या पुढे--'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा ' ही पाटी सर्रास दिसते. तीच ओळ अशा एका बैठकीत म्हणली आणि आमचा पुढचा अक्शन प्लान मिळाला. या कामाबद्दल आणि त्यातल्या निष्पत्तीबद्दल वेगळे लिहिता येईल ....परंतु भुकेल्या पोटी सन्मानाचे जगणे जिण्यासाठीची जिद्द आणि ती लढाई विपरीत परिस्थितीत पुढे नेण्यासाठी लागणारी लगन आणि परिश्रम यासाठीचा प्रेरणास्त्रोत तो धुरकट काळ्या चश्म्यामागच्या आंबेडकरांचा फोटोच होता.

आज उत्तर भारतातील दलित राजकारण, दक्षिणेतील आरक्षण आणि ब्राम्हणविरोधी चळवळ यातून दलित आणि आंबेडकर याबद्दल एक निश्चित मत झाले आहे. बऱ्याचवेळा कुत्सितपने हा विषय छोट्या चर्चातून किंवा मोठ्या वाहिन्यांच्या बातमीजालात चर्चिला जातो. आज ही जयंतीच्या निमित्ताने हा लेखाजोखा होणारच ...


मला मात्र मंद्सोर, रतलाम,सागर मधील बाछडा समाजाच्या काही मुली हा व्यवसाय आम्ही करणार नाही म्हणून ठामपणे उभ्या राहनारया -- पण दुसर्या पर्यायाच्या अभावी जगण्याच्या भेदक लढाईत होरपळनार्या या 'दलीत की बेटी'ना साथ देणारे आंबेडकर आठवतात. इंदोरच्या किंवा गुजरात मधील मैला वाहून नेणाऱ्या कित्येक आई बापांच्या मुलांना --तुम्ही यातून नक्की बाहेर पडू शकता--ही जागीर नाही -गुलामी आहे' हे सांगणारे आंबेडकर दिसतात. आजही कुठलाही अभिनिवेश न बाळगता हसतमुखाने दलित मुलांसाठी होस्टेल चालवणारा, त्यानाही व्यक्तिमत्व विकासाच्या सर्व संधी मिळाव्यात म्हणून झटणार्या उमानाथनला प्रेरणा देणारे आंबेडकर आठवतात....

महेशचा तो स्टेटस ई मेल पाहता पाहता आंबेडकरांची ही विविध रूपे --दिसलेली -भावलेली- समजलेली -समोर येत होती. जयंती निमित्ताने होणारे वेगवेगळे कार्यक्रम आणि भाषणे मग संध्याकाळच्या बातम्यांमध्ये त्यांचे चित्रीकरण असे नेहमीचे या दिवसाचे वातावरण आठवले. या सगळ्या कोलाहलात एक वाक्य सारखे आठवत होते --शाळेतल्या असंख्य भाषणांमध्ये म्हणलेले आणि तेव्हा आणि नंतर असंख्य भाषणातून यांत्रिकपणे ऐकलेले ---'त्या महामानवास विनम्र अभिवादन'.

आज हजारो मैल दूर, त्या सगळ्या वातावरणापासून दूर, मला या उक्तीचा अर्थ जाणवतो आहे!


1 comment:

  1. शबाना.... लेख छान झालाय.
    धन्यवाद

    ReplyDelete

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...