आधुनिक तुर्कस्तानची निर्मिती आणि मुस्तफा केमालचे नेतृत्व
ओटोमान साम्राज्य लयास जाउन आधुनिक तुर्कस्तानचा उदय आपण या सदरात पाहणार आहोत. मुस्तफा केमाल आणि आधुनिक तुर्कस्तान एकमेकांशी अगदी घट्ट जुळलेल्या आहेत. केमालची कारकीर्द आणि यश समजावून घेतांना विसाव्या शतकातील या कालच्या एका महत्वाच्या घटकाकडे पाहूयात. दक्षिण गोलार्धातील अनेक देश आणि त्यातील नेते यामध्येही असे अगदी हिरो असल्यासारखे त्या त्या नेत्यांचे स्थान आणि कार्य पाहिले जाते. या सर्व नेत्यांनी पाश्चिमात्य देशांकडून देशाला स्वातंत्र्य मिळवून देवून देशाचा विकास केला, नवी घडी बसवली आणि म्हणूनच तिथल्या जनमानसात त्यांची प्रतिमा ही अगदी अतुलनीय अशा नायकाच्या जागी आहे उदा. इजिप्तचे गमाल नासेर. क्युबाचे चे गवेरा आणि फिडेल केस्ट्रो, घानाचे क्वामे न्कुमा किंवा भारताचे नेहरू- गांधी. या सर्वांच्या भोवती एक प्रकारचे अदभूततेचे वलय त्यांच्या समर्थकांनी निर्माण केलेले दिसते. त्या त्या देशांच्या राष्ट्रीय अस्मिता या नेत्यांशी जोड्लेल्या दिसतात. या देशांचे इतिहासही या नायकांना केंद्रीभूत ठेऊन लिहिलेले आहेत. या नायकांकडे सुपरह्युमन गुण असून राष्ट्रबांधणीतील त्यांची भूमिकेबद्दल खूपशी मिथके पसरलेली किंवा त्यांच्या समर्थकांनी पसरवलेली दिसतात. या नेत्यांच्या भूमिका या बहुतांशी त्यांच्या देशांच्या नीती आणि कार्यक्रमात तंतोतंत प्रतिबिंबित झालेल्या दिसतात. अगदी हेच नायकपूजेचे ( Hero warship ) रसायन केमाल आणि तुर्कस्तानच्या निर्मितीत दिसते. केमालचा उदय हा ओटोमान साम्राज्यांने आपली लष्करी आणि प्रशासकीय वाढ व्हावी यादृष्टीने केलेल्या प्रयत्नाच्या कालावधीतील आहे.
लष्करी सुधारात ओटोमान साम्राज्याने सुरुवातीला फ्रांस आणि ब्रिटनचे सहाय्य घेतले. परंतु १९व्या शतकाच्या सुरुवातीपासून ओटोमान साम्राज्याने प्रशिया आणि जर्मनीकडून लष्करी प्रशिक्षण आणि सामुग्री घेणे सुरु केले. जर्मनी आणि ओटोमान साम्राज्याच्या ब्रिटन, फ्रांस किंवा रशिया प्रमाणे समान सीमा नव्हत्या. जर्मनीची ब्रिटन, फ्रांस व रशियाशी साम्राज्य विस्ताराबाबत चढाओढ होतीच. १८७०- ७१ साली जर्मन साम्राज्य विस्तारून युरोपमधील महासत्ता म्हणून पुढे येत होते. १८८२ पासून ओटोमान साम्राज्याच्या प्रशिक्षणाची पूर्ण जबाबदारी आणि लश्कराचे नेतृत्व जर्मन अधिकार्यांकडे होते. याच काळात आधी उल्लेखलेले इतर सुधार - दळणवळण, पोस्ट, तार वगैरे सुरु झाले होते. परंतु पहिल्या बाल्कन युद्धातील पराभवामुळे हे प्रयत्न आणखी सखोल करण्याची निकड ओटोमानांना भासली आणि १९१३ साली लिमन फोन स्यंडर्सं च्या नेतृत्वाखाली ओटोमान लष्करात आणिक कडक बदल सुरु करण्यात आले. पहिल्या महायुद्धास तोंड फुटण्याच्या अगदी काही महिन्यापूर्वी ओटोमान साम्राज्यास जास्तीत जास्त कुमक जर्मनांनी दिली आणि याचवेळी स्यंडर्संकडे सर्व लष्करी अधिकार एकवटले होते. पहिल्या महायुद्धात जर्मनीस एका बाजूला रशिया तर दुसऱ्या बाजूस फ्रांस व ब्रिटन अशा दोन बलाढ्य सेनाना तोंड द्यावे लागले. Flanders प्रांतात ब्रिटन आणि फ्रांसच्या पायदलाची जर्मन सैन्याने कोंडी केली आणि त्याचवेळेला बाल्टिक समुद्रातून येणारी रशियाची कुमक थांबवली. दोस्त सैन्याला आपली कुमक पाठवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधणे भाग होते. Dardanelles व the Bosphorus या भूमाध्यासमुद्रातून जाणाऱ्या सामुद्र्धुन्या, आंतराष्ट्रीय समुद्र व्यापारच्या दृष्टीनी महत्वाचे मार्ग ओतोमानांच्या कब्जात होते. खालील नकाशात दाखवलेले हे अतिशय चिंचोळे परंतु त्या परिस्थितीत अतिशय महत्वाचे, अशा या मार्गावर ताबा मिळवण्यासाठी दोस्त राष्ट्रांच्या सैन्यांनी गालीपोली या बंदरावर हल्ला चढवला.
गालीपोलीचा स्थानिक सेनापती हा केमाल मुस्तफा होता, त्याने शर्थीने दोस्त राष्ट्रांचा मुकाबला केला. या द्वीपकल्पावर समुद्रमार्गे कब्जा मिळवणे दोस्त राष्ट्रांना शक्य झाले नाही. त्यांनी जमिनिमार्गे हल्ले चढवणे सुरु केले. ओटोमान साम्राज्याच्या सार्वभौमत्वासाठी हा लढा फार महत्वाचा होत.
स्यंडर्सच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या केमालने गालीपोली वाचवण्यासाठी दिलेल्या लढ्यात दोस्तराष्ट्रांच्या सैन्याने माघार घेतली. या लढ्यात लाखो धारातीर्थी पडले, २५०,००० च्या वर जखमी झाले, दोस्तांना याचा फटका बसलाच परंतु न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या सैनिकांसाठी आतापर्यन्तची ही सर्वात मोठी लढाई ठरली. आणि या घटकेपर्यंत एक स्थानिक पातळीवरचा सेनापती म्हणून माहित असलेल्या केमालला अधिक प्रशस्ती आणि प्रसिद्धीही प्राप्त झाली.
ओटोमान साम्राज्याचे विघटन
१९१२- १३ पासून सुरु झालेली साम्राज्याच्या विघटनाची प्रक्रिया पहिल्या महायुद्धात आणि त्यानंतरच्या वर्साय आणि सव्हायच्या तहांतर्गत पूर्णत्वास जाते. पहिल्या महायुद्धादरम्यान अरब प्रांतांमध्ये उठाव होतो. या विषयावर लौरेन्स ऑफ अरेबिया हा, थोडा ब्रिटीशांच्या दृष्टीकोनातून चितारलेला, पण त्याकाळची परिस्थिती दर्शवणारा चांगला चित्रपट आहे. महायुद्धात जर्मनी आणो ओटोमान साम्राज्याचा पराभव होतो. आधीपासूनच दबा धरून बसलेल्या सीमेवरच्या राष्ट्राना ओटोमान प्रांत गिळंकृत करण्याची संधीच या निमित्ताने मिळते. सव्हायच्या शांती तहात १९२० साली दोस्त राष्ट्र आणो ओटोमान सम्राटाचे प्रतिनिधी नव्या नकाशावर शिक्कमोर्तब करतात. खालील नकाशावरून १९१९ साली झालेल्या या विभागणीची आणि विघटीत प्रांतांची कल्पना येईल. तुर्कस्तानच्या सीमाही याच वेळी अधोरेखित झाल्या असल्या तरी १९२३ पर्यंत चाललेल्या राष्ट्रीय युद्धां मध्येच त्या निश्चित झाल्या.
नकाशात दाखवल्याप्रमाणे ग्रीसने तुर्कस्तानच्या डावीकडचा भाग आपल्या सीमांना जोडून घेतला. पूर्वेकडे अर्मेनिया प्रजासत्ताक उदयास आले तर व्हान तळ्याकाठी व दक्षिणेला अन्तोलिआने मोठा भूभाग ताब्यात घेतला. त्याच्यापलीकडे कुर्डांच्या राज्यासाठीची जागा आरक्षित करण्यात आली. जोपर्यंत कुर्डीश राज्य स्थापन होत नाही तोपर्यंत तो भूभाग ब्रिटन आणि फ्रान्सच्या अधिपत्याखाली आला. त्याचप्रमाणे सिरीया आणि इराक हे हि ब्रिटन आणि फ्रान्सचे सुरक्षित शासनविभाग म्हणून निर्मित झाले. परंतु त्याचवेळी हे सुरक्षित प्रदेश आंतराष्ट्रीय प्रभावाखाली आणले गेले. त्यामुळे या प्रदेशांवर इटालीयान आणि फ्रेंच आंतरराष्ट्रीय शासनाचाही अधिकार आला. भूमध्य आणि काळ्या समुद्राला जोडणाऱ्या दोन्ही समुद्र्धुनीचेही आंतरराष्ट्रीयीकरण करण्यात आले. सव्हायच्या तहातील अटींबाबत लोकांमध्ये असंतोष होताच. त्यात १९१९ मध्ये ग्रीसने ओटोमान साम्राज्याच्या काही भागांवर आक्रमण केले, ग्रीसला ब्रिटन आणि फ्रांसने मदत केली. आणि इथूनच तुर्कांचा राष्ट्रीय स्वातंत्र्याचा लढा सुरु झाला तो १९२२ पर्यंत या सत्ताविरुद्ध विजय मिळेपर्यंत चालू राहिला. लष्करी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील या लढ्यात तुर्कस्तानने सव्हायच्या तहातील अटी झुगारून सीमेवरच्या रशिया, अर्मेनिया, फ्रांस आणि ब्रिटनशी सीमानिश्चीतीकारिता स्वतंत्र करार केले. लोसान येथील करारात सध्याच्या सीमा निश्चित झाल्या फक्त सामुद्र्धुनीवर ब्रिटनचा हक्क १९३६ पर्यंत चालू राहिला, नंतर तुर्कांनी तोही ताब्यात घेतला. तुर्की स्वातंत्र्याचा लढा हा तुर्की अस्मितेचा अविभाज्य भाग बनला कारण पहिल्या महायुद्धानंतर पराभवग्रस्त आणि पारतंत्र्यात गेलेल्या देशाला बलाढ्य शत्रूंच्या तावडीतून स्वतंत्र करून सार्वभौमत्व या लढ्याने दिले, आजच्या तुर्कस्तानची भौगोलिक आणि राजकीय ओळख जगाच्या नकाशावर करून दिली.
परंतु त्याचबरोबर या अस्मितेच्या राजकारणात ओटोमान साम्राज्यात एकत्र राहणाऱ्या विविध समुदायांमध्ये असलेला एकोपा व सहजीवन संपुष्टात आले. लोसानच्या तहानंतर फक्त तुर्की वांशिक आणि सांस्कृतिक वारसा सांगणारे लोक तुर्कस्तानात राहतील असे निश्चित करण्यात आले. दिढ लाखाच्यावर ग्रीक लोकांना तुर्की भागातून निष्कासित करण्यात आले तर ग्रीकमध्ये दोन हजार वर्षांपासून राहणाऱ्या लाख तुर्कांना सध्याच्या तुर्कस्तानात यावे लागले. फाळणीचा अनुभव घेतलेल्या कुठल्याही देशास या अनुभवातली दाहकता आणि या दरम्यान घडणाऱ्या आपदांची कल्पना येईल. अर्मेनिया येथून येणारे तुर्क आणि नवीन तुर्कस्तानातून जाणारे अर्मेनियन लोक यांच्या नरसंहारातूनच आजचा एकसंघ तुर्कस्तान निर्माण झाला. परंतु राष्ट्रीय लढा, असामान्य नेतृत्व आणि परिश्रमाने मिळालेले स्वातंत्र्य या समीकरणात तेव्हा इतर अर्मेनियन, ग्रीक, कुर्द या लोकांवरचे अत्याचार मात्र समाजमानसात सोयीने विसरले गेले. केमालच्या नेतृत्वाखाली नवीन तुर्कस्तानची निर्मिती करताना या स्वातंत्र्यलढ्याला केंद्रीभूत असणे हे साहजिक होते. परंतु त्याननंतर शासनव्यवस्थेमार्फत निर्मित आणि रचित अशा तुर्की एकसंघ समाजाचे एक मिथक निर्माण करण्यात आले आहे. नित्शे या तत्व्वेत्त्याने usable past ही संकल्पना मंडळी आहे. तुर्की अस्मिता निर्मितीत एकसंघ, एकजिनसी समाजाच्या कल्पनेत हजारो वर्षे एकत्र राहिलेल्या या सभ्यतांना जागा नाही. केमालच्या राष्ट्र्निर्मितीतला सर्वात कमजोर दुवा हा या पारंपारिक विविधतेचा नकार हाच आहे. परंतु त्याचबरोबर केमाल पाशाने अंगीकारलेली धोरणे आणि त्याचे लोकप्रिय नेतृत्व याच्या जोरावरच तुर्कस्तान एक प्रबळ राष्ट्र म्हणून पुढे आले आहे. कमालची धोरणे, तत्वे याबरोबरच केमालीझ्मच्या मर्यादा यावर पुढच्या लेखात चर्चा केली आहे.
No comments:
Post a Comment