ऑटोमन साम्राज्याचा थोडक्यात इतिहास
१२९९ मध्ये सेल्जूक टोळीतून फुटून एक टर्किश टोळी बाहेर पडली आणि इथपासून ऑटोमन साम्राज्याचा उदय झाला. अन्तोलीया या प्रांतातल्या पूर्वभागात वसलेल्या या टोळीचे कॉन्सटन्टीनोपाल (पूर्व रोम) येथून चालणाऱ्या त्या भागातल्या बायझानटाइन साम्राज्याशी खूपवेळा कलह आणि लढाया होत. १३०२ पासून सुरु झालेल्या या लढाया १४५३ पर्यंत अविरत चालू रहिल्या. १४५३ मध्ये बायझानटाइन साम्राज्याचा बिमोड करून या तुर्कांनी कॉन्सटन्टीनोपाल जिंकले व त्याचे इस्तंबूल असे नामकरण करून तेथे आपली राजधानी स्थापन केली. ओटोमान साम्राज्याचा विस्तार खालील नकाशात दाखवल्याप्रमाणे पूर्व, मध्य युरोप ते अगदी कला समुद्र आणि क्रीमिया पर्यंत होता. विएन्ना काबीज करण्याचा ओटोमान सुलतानाने १५२९ आणि १६८३ असा दोनदा प्रयत्न केला, परंतु ते सध्या झाले नाही. यानंतर ओटोमनांनी आपला मोर्चा पूर्वेकडे वळवला. सद्यकाळच्या इराण येथे तेव्हा असणारी सफाविद राजवट आणि नैऋत्येकडे असणारी अब्बसीद खलिफत यांच्याशी ओटोमनांचा संघर्ष होऊन १५१७ मध्ये अब्बसीद राजवटीचा पाडाव झाला. ओटोमान साम्राज्यात या विजयास फार महत्व आहे कारण प्रेषित मोहम्मदांनी घालून दिलेल्या राज्यव्यवस्थेतील खिलाफत ही संस्था १५१९ साली ओटोमान सुलतानाने आपल्याकडे घेतली. खिलाफतीचे काय झाले हे थोडे नंतर बघुयात. खालील नकाशात ऑटोमन साम्राज्याच्या विस्ताराच्या चढ उतारानुसार बदलणाऱ्या सीमा दाखवल्या आहेत.
चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी लहानवयात जानिसरी म्हणून प्रशिक्षित करण्यासाठी लहान मुलांना सुलतानाकडे आणले जाई. सुरुवातीच्या काळात या मुलांची खरेदीविक्री होत असे आणि बहुतेक मुले हे मुस्लिमेतर - ख्रिश्चन -समाजातील असत. नंतर जानिसारींचे राजकीय आणि लष्करी महत्व वाढल्यामुळे बरेचसे पालक त्यांना स्वखुशीने पाठवू लागले. या मुलांना मांलौस - सुलतानची मालमत्ता समजले जाई. यांची निवडप्रक्रिया फारच कठीण असे. निवडीनंतर त्यांना राजधानीत असणाऱ्या प्रशिक्षण केंद्रात भरती केले जात असे. इथे त्यांच्या खतना ( circumcision ) करून त्यांचे धर्मांतर करण्यात येई. कडक शिस्तीत त्यांना टर्किश भाषा, लष्करी आणि प्रशासकीय प्रशिक्षण दिले जाई. स्वतःच्या कुटुंब, समुदाय आणि संस्कृतीपासून पूर्णपणे तोडलेल्या या मुलांस त्यांची पलटण ( corps ) हीच ओळख, भावसंबंध आणि कुटुंब असे. या सैनिकांना लग्नसंबंध, कुटुंबनिर्मितीचे अधिकार नसत. हे विशेष दल सर्व सैनिकी कारवायात निपुण असे, कडक शिस्तीत वाढलेल्या या दलावर फक्त सुलतानाची मालकी आणि अंकुश असे. या पलटणींच्या बळावरच ओटोमान साम्राज्य विस्तारले, १२५८ साली झालेल्या मंगोल आक्रमणास थोपवून धरू शकले. परंतु कालान्तराने या पद्धतीत शिथिलता आली. जानिसारानी लग्न करायला, संसार थाटायला सुरुवात केली. आधीची कडक शिस्त जाउन सैन्यभरतीत भाऊबंदकी आली. या भाऊबंदकीमुळे सैन्याच्या कामात ढिलाई आली, संरक्षण सोडून हे निमसत्ताधारी फक्त महसूलवसुलीतच आपली मर्दुमकी दाखवू लागले . अठराव्या शतकापासून ते पहिल्या महायुद्धापर्यंत या भाऊबंदकीने ओटोमान साम्राज्य पोखरून काढले. महाकाय असे हे साम्राज्य दिसायला प्रचंड पण बाह्य आक्रमणापासून स्वतःला वाचवण्यात असमर्थ आणि त्याचबरोबर अंतर्गत पातळीवर स्थैर्य आणि नियंत्रण घालवलेले असे खोकले बनले. याचवेळी वाढणाऱ्या पाश्चिमात्य देशांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली. या सर्व ताकदीना त्यांच्या सीमांवर असलेल्या या साम्राज्याच्या विघटना पासून धोका होता कारण ओटोमान विघटन म्हणजे युरोपीय सत्तांचे विस्तारीकरणास वाव. परंतु यामुळे युरोपीय देशांमधली विस्ताराची स्पर्धा वाढून त्यापैकी सफल होणाऱ्यांचे सामर्थ्य वाढले असते, युरोपमधील सत्ताकारणाचे संतुलन बिघडले असते. या कारणामुळे खेकडेन्याय पद्धतीने कोणीही या खिळखिळीत साम्राज्याचा स्वतःच्या विस्तारासाठी फायदा करून घेतला नाही. उलट वेळोवेळी ओटोमान साम्राज्याने केलेल्या सारवासारवीच्या सुधार प्रक्रियेस त्यानी पाठींबा आणि सक्रिय सहाय्य केले.
एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच ओटोमान साम्राज्याचे तुकडे पडणे सुरु झाले. १८०४ ते १८५० पर्यंत सर्बियन क्रांती सुरु होती याचा परिणाम म्हणजे इतर बाल्किक प्रदेशातही अशांतता पसरली. राष्ट्रीयत्वाचे हे लोण पुढे अरब प्रदेशात पोहोचले. १८३० साली ग्रीस युरोपिअन सत्तांच्या पाठिंब्यामुळे स्वतंत्र झाला. १८३१ -३३ दरम्यान मुहम्मद अली या पूर्वाश्रमीच्या निष्ठावंत माल्मुक सैनिकाने इजिप्त येथे आपली सत्ता स्थापन करून ओटोमान साम्राज्यावरच हल्ला चढवला. सिरीयाचा बराचसा भाग त्याने यावेळी गिळन्कृत केला. हे उठाव आणि स्वाऱ्या १८४० मध्ये लंडन येथे झालेल्या परिषदेनंतर थंडावल्या. या परिषदेत ओटोमान साम्राज्याच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणार्थ युरोपीय सत्ता मदत करतील असे ठरले. युरोपियांच्या उपरतीचे कारण आधी म्हटल्याप्रमाणे एकमेकांवर कुरघोडी हाच होता. ओटोमान साम्राज्याच्या सीमा अबाधित राखण्यात त्यांचा स्वार्थ होता. या परिषदेमुळे सिरीयाचा काही भाग मुहम्मद अली परत करतो आणि इजिप्तचा तो पहिला राजा म्हणून राज्य सुरु करतो पण त्याचवेळी तो ओटोमान साम्राज्याच्या सार्वभौमित्वाशी एकनिष्ठताही मान्य करतो. यानंतर १८५४ -५६ साली झालेल्या क्रिमिअन युद्धात ओटोमान साम्राज्य ब्रिटन आणि फ्रान्सच्या बरोबर रशियाशी लढते. हे युध्द जरी ते जिंकले तरी ओटोमान साम्राज्याची अधोगती काही थांबत नाही. तुर्कस्तान मध्ये याचे तीव्र पडसाद उठतात आणि सुधाराची प्रक्रिया सुरु होते १८७७ -७८ सालपर्यंत चाललेल्या टर्किश -रशियन युद्धापर्यंत ही अधोगती चालूच राहते. त्याचवेळेस पूर्व प्रांतातले बल्गेरिया, रोमानिया आणि सर्बिया स्वतंत्र होतात तर त्यापाठोपाठ बोस्निया - हर्झगोवानिया ऑस्ट्रियाच्या अधिपत्याखाली येते. हे बाल्कन प्रदेश एकजूट करून १९१२- १३ साली ओटोमान साम्राज्यावर हल्ला चढवतात.
मुहम्मद अलीच्या नेतृत्वाखाली इजिप्त हे अधिक स्वायत्त बनत जाते आणि ओटोमान सुलतानाच्या सार्वभौमत्वाला फक्त नाममात्र मान्यता देते. त्याला लागून असलेला अल्जेरिया हा १८३० पासून फ्रान्सच्या संरक्षणात आलेला होत. थोड्याच कालावधीत मोरोक्को आणि ट्युनिशिया हे प्रदेशही फ्रान्सचे अधिपत्य मान्य करतात. अर्थातच बुडणाऱ्या या महासत्तेला टिकून राहण्यासाठी बदलत्या परिस्थितीचा विचार करावाच लागतो. जपानमध्ये १८५०-६८ असा सुधारणांचा काळ होता, १८५६ मध्ये क्रिमियन युद्धानंतर रशियातही ही प्रक्रिया सुरु होते. इजिप्तमध्ये मोहम्मद अलीने सत्ता स्थापना करतानाच लष्करी आणि प्रशासकीय सुधारणा सुरु केल्या होत्या. या रेट्यामध्ये ओटोमान सुलतानही लष्करी सुधार सुरु करतो. याकामी युरोपिअन प्रशिक्षणाची मदत घेतली जाते. लष्करी सुधारणान्बरोबरच मुलभूत सेवा सुविधा, पोस्ट, दळणवळण, लष्करी साहित्य बनवणारे कारखाने आदींची स्थापना होते. अर्थातच या सुधाराच्याप्रक्रीयेला फळे लागायला बराच वेळ लागला आणि ओटोमान साम्राज्याला तसा त्याचा फायदा झालाच नाही. परंतु पहिल्या महायुद्धांनंतर दोस्त राष्ट्रांचा पाडाव करून तुर्कस्तान स्वतन्त्र करण्यात तुर्की स्वातंत्र्यवीरांना या आधुनिक लष्कराचा फायदा नक्कीच झाला. पहिल्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी ओटोमान साम्राज्य जिंकून त्याचे आपसात विभाजन केले होते. १९१९ ते २३ दरम्यान टर्किश स्वातंत्र्ययुद्ध झाले आणि १९२३ मध्ये तुर्कस्तान हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला.
No comments:
Post a Comment