Friday, 18 April 2014

काय घडतंय मुस्लिम जगात - भाग ५ तुर्कस्तान - मध्य आशियायी देश . प्रास्ताविक


तुर्कस्तान - मध्य आशियायी देश . प्रास्ताविक 


अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात बलाढ्य मुस्लिम साम्राज्याला  वाढत्या युरोपिअन शक्तींकडून जबरदस्त  लष्करी आव्हान मिळाले. चार-पाचशे वर्षांपासून संथ आणि सुरक्षित अशा ओटोमान साम्राज्याला या परिस्थितीला तोंड देण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांनी या बदलाचा प्रतिकार करण्याऐवजी त्याबरोबर जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. आपल्या लष्कराची बांधणी त्यानी युरोपीय लष्कराच्या धर्तीवर सुरु केली. याकामी फ्रेंच व जर्मन सैन्याचे अनुकरण त्यानी केले, या सत्तांपासून त्यानी लष्करी सामग्री विकत घेणे सुरु केले. अर्थातच या कामी जास्त खर्च होऊ लाग्ल. हा खर्च भागवण्यासाठी जास्त महसूल गोळा करणे त्यांना आवश्यक होते. त्यामुळे प्रशासकीय आणि त्याबरोबरच अर्थव्यवस्थेत बदल अनिवार्य झाले. अधिक खर्च भागवण्यासाठी अधिक महसूल, अधिक महसुलासाठी  उत्पादकतेत वाढ आणि त्यासाठी अर्थव्यवस्थेचे पुनर्रचनाकरण असा हा बदल सुरु झाला. साहजिकच याचे जीवनाच्या इतर क्षेत्रात पडसाद उमटले. ओटोमान साम्राज्यात सुरु झालेल्या तन्झीमात या सुधार चळवळीची ही पार्श्वभूमी होती. परंतु ही सुधाराची चळवळ अनेक नवीन प्रश्नांची उकल जुन्या सामाजिक, विधी आणि राजकीय आराखड्यातच करत होती. परिणामी या सुधारणांचा वेग अतिशय धीमा होता.युरोपीय सत्तांवर त्याचे परावलंबन होते आणि नव्या पिढीला ही गती मान्य नव्हती. मुस्तफा केमाल या मिलिटरी अधिकारयाच्या नेतृत्वात नवीन राजकीय सुधार ओटोमान साम्राज्यातून विकसित अशा आजच्या तुर्कस्तानने केले. आधी उल्लेखलेल्या प्रमाणे पाश्चिमात्यांच्या लष्करी, राजकीय आणि आर्थिक अशा सर्वच बाबीत तुर्कस्तानने अनुकरणाची भूमिका घेतली. फ्रेंच राज्यघटनेवर आधारित अशा धर्मनिरपेक्ष आणि औद्योगिक राष्ट्राची निर्मिती हे या नवीन बदलांचे उद्दिष्ट होते. हा बदल अर्थातच सोपा नव्हता कारण आधीच्या ओटोमान साम्राज्यातील विविध व्यवस्था, संस्था आणि औद्योगीकरणाच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या आधुनिक युरोपमधील समाजरचना यात खूप तफावत होती. या कारणामुळेच तुर्कस्तानला सर्व बदल आत्मसात करायला एका शतकाचा काळ लागला. आणि या तफावतीमुळेच कदाचित अनुकरणाचा हा मार्ग इतर राष्ट्रांनी स्वीकारलेला दिसत नाही. तुर्कस्तान यात यशस्वी झाला याचे महत्वाचे कारण म्हणजे बदल आणणाऱ्या राज्यकर्त्यांकडे असणारी जुन्या  ओटोमान साम्राज्याची  प्रचंड लष्करी व प्रशासकीय ताकद,  त्यांना मिळालेले लष्करी विजय आणि त्यावर आधारित केमालला मिळालेला लोकप्रिय पाठींबा.  ओटोमान साम्राज्याचाच भाग असणारे आणि तुर्कस्तानशी भाषिक आणि वांशिक साम्य असणाऱ्या मध्य आशियायी देशांनीही १९९१ मध्ये रशियाच्या विघटनानंतर तुर्कस्तानच्या राज्यघटनेशी साधर्म्य असणाऱ्या  राज्यघटना स्वीकारल्या . यात या देशातील ऐतिहासिक घटक  आणि अर्थातच साम्यवादी सोवियत संघाच्या धोरणाचा प्रभाव दिसून येतो. ओटोमान साम्राज्य १५व्या शतकापासून जरी तुर्कस्तानमध्ये स्थिरावले तरी त्याचा उगम आणि प्रवास या मध्य आशियायी देशातून झाला होता. ऑटोमन  साम्राज्यातील लष्करी आणि प्रशासकीय सेवांमध्ये इथले लोक नेहमीच अग्रगण्य होते. पुढे सोविएत संघाच्या अधिपत्याखाली जरी हा भूभाग गेला तरी लोकांचे आपापसातील संबंध दृढ राहिले. १९१८ पासून पुढची ७० वर्षे हा भूभाग सोवियेत संघाच्या अधार्मिक आणि साम्यवादी व्यवस्थांमध्ये राहिला. सोवियेत संघाच्या आर्थिक रचनेत मध्य आशियायी देशांची मोठी भूमिका होती आणि त्यांना याएकसंघीकरणाचा फायदाही झाला. शतकानुशतके असलेली अस्थिरता जाउन अंतर्गत बाजारपेठा निर्माण झाल्या. सोविएत व्यवस्थांमध्ये लोकांच्या गरजा भागून आर्थिक व सामाजिक स्थैर्य आले. सोवियेत विघटनात बाल्टिक राष्ट्रांचा विद्रोह ही प्रमुख घटना होती. परंतु या मध्य आशियायी देशांमध्ये अजूनही सोविएत काल हा स्थैर्य आणि सुबत्तेचा काळ मानला जातो. विघटनानंतर आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या ही राष्ट्रे जरी स्वायत्त झाली होती तरी त्यांच्या क्षमता मात्र नगण्य होत्या. उदा उझबेकिस्तानच्या कापसाला सोविएतची आयती बाजारपेठ नव्हती. वर्षानुवर्षे एकाच पठडीचे उत्पादन, सेवा व्यवस्था असल्यामुळे  या राष्ट्रांची नव्या स्पर्धात्मक वातावरणात उभे राहण्याची ताकद नव्हती. साम्यवादी व्यवस्थेत  समाजाचे राजकीय शिक्षण आणि सहभाग हा साम्यवादाच्या बसलेल्या घडीत, वाट्याला आलेले शासनप्रणीत सह्रभागीकरन एवढेच होते. सोवियेत संघात सामील होण्यापूर्वीची या भागातील प्रगतीही निम्नच होती. सोविएत वसाहतवादाच्या कचाट्यात या भूभागात आमुलाग्र बदल झाले, व्यवस्था बदलल्या, समाज बदलला. परंतु हे सारे बदल व्यवस्थेने लादलेले बदल होते. स्वाभाविक विकासाच्या प्रक्रियेतून निर्माण झालेले नव्हते, सततच्या दिशादर्शनाची सवय असलेल्याया समाजापुढे स्वातंत्र्यामुळे अस्तित्व व अस्मिता या दोन्ही पातळ्यांवर एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती.  

ओटोमान साम्राज्याच्या सीमा आणि मध्य आशियायी देशांचे भौगोलिक स्थान दर्शवणारे नकाशे. 
Inline image 1



Inline image 2

नव्या वैश्विक रचनेत त्यांना स्वतःची ओळख बसवण्यात साहजिकच जुन्या धार्मिक आणि सांस्कृतिक बाधांवर आधारित जुने ओटोमान/ टर्किश संबंध आणि तिथल्या व्यवस्था जवळच्या वाटल्या. या राष्ट्रांनी जरी  मुस्लिम अस्मितेस अंगीकारलेले असले तरी सोविएत संघाच्या अखत्यारीत इथल्या सर्व समाजव्यवस्थांची पायाभरणी ही धर्मनिरपेक्ष तत्वांवर झाली आहे. हा  एक वेगळा घटक इथे लक्षात घ्यायला हवा. या राष्ट्रांनी स्वातंत्र्यानंतर अंगिकारलेल्या कायदे व राज्यशासनव्यवस्था व प्रशासकीय व्यवस्था या इथे प्रचलित साम्यवादी ढाच्यातूनच विकसित झाल्या आहेत. या राज्यांच्या राज्यघटनावर दृष्टिक्षेप टाकला असता काही टर्किश राज्यघटना आणि या देशांच्या राज्यघटना यात बरेच साम्य आढळून येते. उदाहरणादाखल या राष्ट्रांच्या राज्यघटनेतील प्रमुख  तरतुदी पुढे नमूद केल्या आहेत. हे विस्ताराने यासाठी दिले आहे कि इतर मुस्लिम राष्ट्रे आणि तुर्कस्तान आणि मध्य आशियायी देशांच्या धोरणात मुलभूत फरक आहे आणि तो त्यांच्या राज्यघटनातून प्रतीत होतो. 

·     टर्किश राज्यघटना - हे प्रजासत्ताक, लोकशाही, धर्मनिरपेक्ष, कायद्याने बंधित व शासित, सार्वजनिक शांतता, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक  न्याय, मानवी अधिकारांचा आदर आणि अतातुर्कने घालून दिलेल्या राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेस बांधील असे राज्य आहे.
·     किरगीझ राज्यघटना - किरगीझ हे सार्वभौम, लोकशाही, धर्मनिरपेक्ष, सामाजिक आणि संघटीत  , कायद्याने शासित असे राज्य 
·     कझाकिस्तान  राज्यघटना - लोकशाही, धर्मनिरपेक्ष, कायद्याने बंधित असे सामाजिक राज्य जिथे व्यक्ती, तिचे आयुष्य, अधिकार आणि स्वातंत्र्य हे सर्वोच्च आहे. 
·     तुर्कमेनिस्तान - लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि कायद्याचे राज्य 
·     ताजिकिस्तान - सार्वभौम, लोकशाही, धर्मनिरपेक्ष, संघटीत आणि  कायद्याचे राज्य 
·     उझबेकिस्तान -सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक जिथे शासन हे लोकांच्या इच्छा आकांक्षा चे प्रतिनिधित्व करेल आणि त्यांच्या हितांना कारक असे राज्य करेल. लोक हेच शासनाच्या सत्तेचा स्त्रोत आहेत. 
·     अझरबैजान - कायद्यावर आधारित, धर्मनिरपेक्ष राज्याची बांधणी हेच शासनाचे काम आहे. 


तुर्कस्तान आणि या देशांच्या राज्यघटनेत आणि कायदेसंहितांमध्ये कुठेही इस्लाम किंवा इस्लामिक कायद्यांचा उल्लेख नाही. राष्ट्रबांधणी आधुनिक कायद्याच्या, काळानुसार येणाऱ्या अर्थ व समाजरचनेच्या आधारवर इथे केली गेली आहे. मुस्तफा केमालने घालून दिलेली सुधाराची आणि देशप्रेमी राष्ट्रीयत्वाची अत्यंत मजबूत अशी घडीसही आज वैचारिक आव्हान दिले जात आहे आणि हे इथे असलेल्या, रुजलेल्या लोकशाही प्रक्रियेचे प्रतीकच आहे. एकूणच मुस्लिम जगतात आणि इतर प्रगत जगतात तुर्कस्तानचा त्याच्या आर्थिक प्रदार्शनच्या जोरावर बोलबाला आहे. खालील आलेख पहिला तर १९६६० ते ९० पर्यंत आर्थिक प्रगती स्थिरावलेली दिसते. परंतु १९९० नंतर दरडोई उत्पन्न तिप्पटीने  वाढलेले दिसते. 
 Inline image 3



याच काळात सध्या निवडून आलेल्या AKP पक्षाचा प्रभावही वाढलेला दिसतो. AKP हा धार्मिक पक्ष म्हणून ओळखण्यात येत असला तरी हा पक्ष स्वताला conservative म्हणवतो , इस्लामिक नाही .  १९९० पासून आर्थिक उदारीकरण, उद्योगधंद्याच्या वाढीवर भर आणि आधीच्या केमाली राष्ट्रीयीकरणाची आर्थिक धोरणे बदलून आयातीस प्रोत्साहन देणाऱ्या नव्या धोरणांचा पुरस्कार तुर्कस्तानने केलेल्या आर्थिक प्रगतीमागे दिसून येतो. या घडामोडीत सुरुवातीची समाजवादी अर्थरचना बदलून नव्याने येणाऱ्या सामाजिक बदलांमुळे पुन्हा पुरातनप्रेमी असा विचार वाढीस लागला आहे . एका बाजूला आर्थिक प्रगती तर सामाजिक, राजकीयदृष्ट्या प्रतिगामी अशा सामाजिक वातावरणाचे पडसाद गेल्या काही वर्षात तुर्कस्तान मध्ये वाढत आहेत. भारतात गेल्या वीस वर्षात  उदारीकरणानंतर झालेला भाजपचा प्रभावी विस्तार आणि इथल्या नवश्रीमंत आणि उच्चवर्गीय समाजामध्ये अशा पक्षांच्या रूढीवादी सामाजिक विचारसरणीस  मिळणारा प्रतिसाद याच्याशी तुर्कस्तानातील वातावरण मिळते जुळते आहे. आजचा तुर्कस्तान समजायचा असेल तर ऑटोमन साम्राज्याबद्दल जाणणे महत्वाचे आहे. पुढील लेखात याबद्दल माहिती दिली आहे. 



1 comment:

  1. Backgroundmule vachata yet nahii ahe. White karata yeil ka?

    ReplyDelete

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...