इजिप्त - ऐतिहासिक परिप्रेक्ष्य
गेले दोन वर्षे इजिप्त धुमसतोय. तहरीर चौक आणि तिथे २०१० मध्ये सुरु झालेल्या निदर्शनानी सगळ्या जगभरात खळबळ माजवली आणि हे लोन इतर अरब राष्ट्रातही पोहोचवले. इजिप्त हा अतिशय पुरातन देश. ख्रिस्तपूर्व काळात पर्शिअन साम्राज्याचा भाग असलेल्या देशात इसवी सणाच्या पहिल्या शतकातच ख्रिश्चन आले, वसले. सातव्या शतकात अरब मुस्लीमांनी आक्रमण करून इथे सत्ता स्थापन केली, तेव्हापासून मुस्लिम बहुल असलेल्या या देशात ख्रिश्चन समाज अल्पसंख्यांक म्हणून राहिला. पुढची सहा शतके इजिप्तमध्ये फातीमीद राजवंशाची राजवट होती. कैरो इथे या राजवंशाच्या खिलाफतीचे केंद्र होते. कोकेशिअन टोळ्यांमधून मामलुक म्हणून गुलाम सैनिकांची भरती त्याकाळी होत असे. १२५० साली मामलुकांनी सत्ता हस्तगत करून आपले राज्य वसवले . तेराव्या शतकात अतिशय संपन्न असा समुद्रमार्गे व्यापार मामलुकांनी विकसित केला. चौदाव्या शतकात प्लेग्मुळे इथली जवळपास ४०% टक्के जनता नष्ट झाली. खिळखिळया झालेल्या मामलुकांना १५१७ साली ऑटोमनांनी जिंकले आणि तेव्हापासून हा ऑटोमन साम्राज्याचा प्रांत म्हणून काही शतके राहिला. परंतु ऑटोमनांचा अधिकार हा अगदी किरकोळ राहिला. इजिप्तमध्ये नेहमीच स्थानिक अधिकाऱ्यांचे आणि नंतर शासनकर्त्यांचे राज्य राहिले. तसेही ऑटोमन सुलतानाची एव्हड्या मोठ्या भूभागात एकसंघी कारभार चालवण्याची मनशा नव्हतीच. सुलतानाचे अधिपत्य मानून त्यांना नियमित कर मिळाला कि स्थानिक शासकांवर इतर गोष्टी ऑटोमनांनी सोडून दिल्या होत्या. त्यामुळे इजिप्त १५१९ पासून ऑटोमन साम्राज्याचा भाग असला तरी दुसऱ्या महायुद्धापर्यंत स्वतंत्रच होता. मोहम्मद अली ने १८०८ पासून येथे सुधारणांची सुरुवात केली होती. अलीच्या राजवटीत शेती, शिक्षण, कायदा आणि अर्थव्यवस्थेत आमुलाग्र बदल केले. आधीची निर्वाह्शेती जाउन कापसाचे उत्पादन सुरु झाले. युरोपात कापसाची आयात करून आलेल्या संपन्नतेमुळे आणि महसूलवसुलीतील सुधारांमुळे इजिप्तमध्ये भक्कम शासनव्यवस्था निर्माण केली. विसाव्या शतकात इजिप्त अरब देशातील एक अग्रगण्य देश समजला जाऊ लागला. त्याचे एक कारण सुविकसित शासनव्यवस्था आणि त्या अनुषंगाने येणारी स्थिरता हे होते.
बाकी अरब देशांच्या तुलनेत इजिप्तचा भूभाग आणि लोकसंख्याही प्रचंड आहे. यामुळेही इजिप्त नेहमीच अरब लोकसंखेत आणि देशांमध्ये बलवान समजला जातो. स्थिर आणि विकसित शासनसंस्थेमुळे इजिप्तची प्रजा ही तशी सुसंघटीत, आधुनिक राज्याच्या संकल्पनेस मानणारी अशी आहे. गेल्या दोन्ही शतकात लोकसंख्येत दरवाढही प्रचंड झाली आहे आणि अर्थातच त्या अनुषंगाने अनेक नवीन प्रश्न समोर येत आहेत. वाढत्या लोकसंख्येला जास्तीच्या सेवा सुविधा पुरवणे त्याबरोबरच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, दरडोई उत्पन्आचे समान वाटप असे अनेक प्रश्न वाढत्या लोकसंख्येशी निगडीत आहेत. अर्थात हा प्रश्न फक्त इजिप्तचाच नाही तर अनेक अरब आणि विकसनशील देशांचाही आहेच. परंतु इजिप्तमधल्या सद्य घडामोडींच्या मागचे वाढती लोकसंख्या हे एक महत्वाचे कारणही आहे.
इजिप्त जरी सातव्या शतकापासून मुस्लिमबहुल देश असला तरी तिथे धार्मिक अल्पसंख्यांक विशेषतः ज्यू आणि ख्रिश्चन नेहमीच स्थायिक होते. एकोणिसाव्या शतकापासून युरोपशी वाढलेल्या व्यावसायिक संबंधांमध्ये या अन्य धर्मीय समाजांची महत्वाची भूमिका होती. मुस्लिम आणि ऑटोमन साम्राज्यात अल्प्संख्यान्काना संरक्षण जरी असले तरी त्यांना धीम्मीचा दर्जा होता, अनेक बाबतीत समान दर्जा नव्हताच. परंतु १९व्या शतकात सुरु झालेल्या सुधारणांमुळे अनेक नवीन संधी या समाजास उपलब्ध झाल्या आणि त्याचा फायदा घेऊन शिक्षण, व्यापार उदीम, मिडिया आणि प्रशासकीय सेवांमध्ये अल्पसंख्यांक समाजाच्या लोकांनी बरीच प्रगती केली. एकोणीस आणि विसाव्या शतकात युरोपीय देश आणि कंपन्यांबरोबरच्या अनेक व्यवहारात या नवीन वर्गाने मध्यस्ती तर केलीच पण त्याचबरोबर आपल्या वाढलेल्या आर्थिक पतीवर त्यानी समाज आणि राजकारणात ही बरीच मुसंडी मारली. बाराव्या शतकापासून इजिप्तमध्ये आलेल्या गुलामसैनिकांनी आपले संसार थाटले होते. तुर्की, कक्यशिअन आणि कोकेशिअन अशा मध्य आशियातून स्थलांतरित झालेल्या या टोळ्यांचे लष्करी कौशल्य उत्कृष्ट दर्जाचे होतेच आणि त्यात त्यांना ऑटोमन साम्राज्यात मानाचा दर्जाही होता. त्यामुळे लष्करी वर्गाचे अधिपत्य सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात होतेच. एकोणिसाव्या शतकापर्यंत आंतरजातीय/ धर्मीय विवाह सर्रास होत त्यामुळे या लष्करी आणि व्यावसायिक उच्च वर्गाची मक्तेदारी ही तशी परंपरागत गोष्ट इथे आहे. मोहम्मद अलीच्या कारकिर्दीत इजिप्तच्या बहुतांशी उत्पादक जमिनीचा तोच मालक होता ! अलीचे वंशज या उच्च वर्गावर त्यांची सत्ता टिकवण्यासाठी अवलंबून होते. मोहम्मद अलीकडे जमिनीच्याबरोबरच कापसाचे उत्पादन, आयातीतून येणारी आवक, त्यावर उभ्या उद्योग्धन्द्यांची अशी सर्वच उत्पादनसाधने आणि उत्पादन यावर मक्तेदारी होती. अली आणि त्याच्या निकटवर्तीयानी मुळच्या कोरडवाहू जमिनीचा जास्तीत जास्त सिंचनाच्या सुविधा वाढवून कायापालट केला. इजिप्तची बहुतांशी लोकसंख्या ही नाईल नदीच्या काठावर वसलेली, बाकी जवळजवळ ६०% प्रदेश हा वाळवंटी आणि ओसाड, त्यामुळे सिंचन आणि शेतितल्या सुधारणा छोट्या आणि एकवटलेल्या जमिनीत करणे सोपे होते. एकोणिसाव्या शतकात एकूण अरब उत्पन्नाच्या २०% उत्पन्नाचा वाटा हा इजिप्त म्हणजेच पर्यायाने मोहम्मद अलीच्या कुटुंबाचा होता. करआकारणी आणि वसुलीही सुलभ होती आणि या एकत्रित उत्पन्नाचा विनियोग करने एका व्यक्तीच्या हाती असल्यामुळे सोपेही होते, कोणाची आडकाठी नव्हती. अलीने सुधारणा जरूर केल्या पण त्याचा उद्देश त्याची राजवट बळकट करणे हाच होता. या काळात युरोपशी इजिप्तचे आर्थिक संबंध सुधारले, इजिप्त कच्च्या मालाचा पुरवठा करणारा आणि तयार माल विकत घेणारी बाजारपेठ ठरला. या देवाणघेवाणीत साहजिकच नव्या व्यवस्था आणि संस्था उभ्या राहणे आवश्यक ठरल्या. सुएझ कालवा कंपनी हा त्यावेळचा बलाढ्य गुंतवणुकीचे एक उदाहरण. फ्रेन्चानी या कालव्यातून आंतरराष्ट्रीय व्यापारास मिळणारी चालना लक्षात घेऊन हा महत्वकांक्षी प्रकल्प सुरु केला होता. या कंपनीच्या निमित्ताने झालेल्या संपर्क आणि व्यवहारातून इतर सामजिक आणि राजकीय देवाणघेवाणही सुरु झाली होती. १८५९ साली सुरु झालेल्या बांधकाम पुढची दहा वर्षे चालले. त्याकाळी $१०० दशलक्ष इतका खर्च आल. बांधकाम करून पहिली ९९ वर्षे कंपनी हा कालवा चालवेल आणि नंतर तो इजिप्त सरकारला देईल असा करार कंपनी आणि लीच वंशज आणि त्यावेळचा इजिप्तचा शासक सईद पाषा याबरोबर कंपनीने केला होता. ऑटोमन साम्राज्याच्या बाबतीत चर्चा करताना अशा बदलांचे - परकीय भांडवल, उद्योग, व्यक्ती यांचे चढत्या स्वरूपातील हस्तक्षेप - सामाजिक परिणाम आपण पहिले होते. इजिप्तमध्येही या सर्व गोष्टी घडून येताना दिसतात.
आर्थिक व्यवहारांबरोबरच त्या प्रक्रिएत निर्माण झालेले लवाद मिटवण्यासाठी नवीन न्यायालयांची गरज भासली कारण शरिया न्यायालयांच्या व्याप्तीत हे खटले बसत नव्हते. शरीयावर आधारित न्यायालये ही मुस्लिमेतर व्यक्तींसाठी सोयीची नव्हती कारण तिथले नियम हे मुस्लिमांच्या पक्षात असत. त्याचबरोबर इतर बाबींसाठीही नव्या कायदेपद्ध्तेची गरज निर्माण झाली होती. ऑटोमन सलतनतीच्या बरेच आधी इजिप्तने नवीन सुधारणा सुरु केल्या आणि त्यानुरूप फ्रेंच कायदेपद्धतीवर आधारीत नवीन व्यवस्था रुजवल्या होत्या. इजिप्तने फ्रेंच समान कायदा जसा होता तसा अरबी भाषेत लागू केला. हा कायदा राबवण्यासाठी आधीची मिश्र आणि शरीया न्यायालये मोडीत काढून पूर्णपणे नवी न्यायालये स्थापित केली. ऑटोमन साम्राज्यात हा प्रयोग फसला आणि त्यांनी तंझीमातचा प्रयोग करून मजल्ला विकसित केला. परंतु इजिप्तमध्ये हा प्रयोग यशस्वी ठरला आणि सर्वात पहिला न्यायालयीन संस्थात्मक ढाचा संपूर्ण देशभर उभारण्यात, रुजवण्यात त्यांना यश आले. संपूर्ण अरब जगात यशस्वी अशी ही पद्धती इजिप्तची त्याकाळची एक उपलब्धी समजली जाते. ओटोमान साम्राज्याशी फारकत घेऊन शासन आणि राज्यानिर्मितीच्या कामात याच संस्थात्मक जाळ्यांचा फार फायदा नंतर इजिप्तला होताना दिसतो.
या नंतरच्या काळात सुएझ कालव्याच्या बांधकामासाठी आणि नंतर घेतलेल्या कर्जांपोटी इजिप्तचे शासक दिवाळखोर होतात आणि १८८० साली त्यांचे सुएझ कालव्यातील सारे शेअर ब्रिटिशांना विकतात. कंपनीबरोबरच फ्रेंच आणि ब्रिटीश आता देशाच्या कारभारवारही पूर्णपणे नियंत्रण आणतात. त्यांनी आकारलेल्या अवास्तव करांमुळे आणि त्यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे इजिप्त जनमानसात क्षोभ निर्माण होतो आणि इजिप्तच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्रामाची सुरुवात इथपासून होते. साधारण १८८०-८५ चा हा काळ. या काळात अनेक ठिकाणी राष्टीय लढे सुरु होताना दिसतात कारण राष्ट्रीयतेची संकल्पनाही इतर गोष्टींबरोबर याकाळात युरोपमधून प्रसारित झालेली दिसते. राष्ट्रीय आंदोलनात मुस्लिमांबरोबर, ख्रिश्चन आणि ज्यूही सामील होताना दिसतात. ओटोमान साम्राज्याशी फारकत घेताना मोठ्या मुस्लिम सल्तनतीतील एक प्रांताधिकारी वेगळा होऊन मुस्लिम व्यवस्था चालू ठेवतो असे त्याचे स्वरूप होते. त्या व्यवस्थेत मुस्लिमेतर समाजांना दुय्यम स्थान होते. परंतु नव्या राष्ट्रीय आंदोलनात हे सर्व समाज एकत्र येताना आणि इजिप्त राष्टासाठी लढताना दिसतात. राष्ट्रीय आंदोलनान्बरोबरच पँन अरेबियनवादही याच काळात विकसित होताना दिसतो. अरबी भाषा बोलणारे ते सर्व संघटीत झाले पाहिजेत, देश आणि राष्ट्राच्या सीमा या कृत्रिम आहेत आणि अरबी भाषा बोलणारया सर्व समुदायाचे राजकीय संघटन आवश्यक आहे या विचारावर आधारित ही चळवळ इजिप्तमध्ये फोफावली. नंतरच्या काळातही या अरबी भाषेच्या मुद्द्यवर इजिप्त राजकीय पुढाकार घेताना दिसतो. इजिप्तमध्ये विकसित मिडिया -संचारमाध्यमे या भाषेच्या प्रश्नी फार उपयोगी पडतात. इजिप्तमध्ये विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच सिनेमा, गायन आणि इतर प्रसारमाध्यमातून अरबी भाषेचा प्रसार आणि प्रचार पूर्ण अरबी जगतात झाला. या प्रचारामुळेही पँन अरेबिक चळवळीत इजिप्त आघाडीवर राहिले. उम्मे कल्थुम ही इजिप्तची गानकोकिळा, हिची तुलना आपल्या लताताई किंवा एल्विसच्या लोकप्रियतेबरोबर करता येईल. जनमानसात हिच्या गाण्यांची मोहिनी अजूनही कायम आहे. ओमर शरीफ हा असाच एक कसलेला नायक, अरेबिक आणि बाहेरच्या जगातही त्याच्या अभिनयासाठी ज्ञात. असे अनेक कलाकार आणि समृद्ध सिनेसृष्टी आणि विकसित प्रसारमाध्यमानी इजिप्त हेच अरबी भाषेचे माहेरघर अन्वयाने इजिप्त म्हणजेच अरब किंवा अरबपणाचे प्रतिक असा ठसा सर्व जगात त्या काळी उमटवला. अशाप्रकारे विकसित आणि प्रस्थापित शासनसंस्था, संपन्न अर्थव्यवस्था, भौगोलिक आणि लोकसंखेच्या निकषावर प्रचंड साधनस्त्रोत असणारे, ओटोमान सम्राटाचे सार्वभौमत्व असले तरी वास्तविकता स्वतंत्र आणि म्हणून अनेक सुधारणा यशस्वीपणे राबवून इजिप्त हे एकोणीस आणि विसाव्या शतकात एक बलाढ्य राष्ट्र, अरब जगताचे नेतृत्व आपल्याकडे खेचणारे सामर्थ्यवान शक्ती म्हणून उदयास आलेले आपण पाहतो.
पँन अरेबिस्म आणि इजिप्तचे राष्ट्रीय आंदोलन यातला एक समान दुवा म्हणजे पाश्चिमात्य देशांच्या वसाहतवादाविरुध्हचा असंतोष . दोन महायुद्धांच्या काळात याला आणखीनच बढावा मिळाला. इजिप्त वाढत्या असंतोषाचे नेतृत्व करणारे अरब जगातील प्रमुख राष्ट्र म्हणून गणले जाऊ लागले. १९४८ नंतर पँलेसटाइन मध्ये ज्यू वस्त्या वाढू लागल्या तेव्हा तर या नेतृत्वाला अधिकच मान्यता मिळू लागली. निर्वासित पँलेस्टायीन लोकांच्या प्रश्नाला एकूणच अरब जगतात सहानुभूती आणि त्यांच्या हक्कांसाठी समर्थन दिले जात होते. पँलेस्टायीनचा प्रश्न, पाश्चात्य देशांची त्याबाबतची भूमिका, बृहत अरब प्रदेशांवर असलेला वसाहतवादी अंमल या सर्व घटकांमुळे पँन अरेबिक चळवळ फोफावली आणि तिचे नेतृत्व इजिप्तकडे गेले. परंतु अरब जगातूनच या नेतृत्वाला आव्हान मिळाले. सौदी अरेबियाला इजिप्तचे सांस्कृतिक आणि भाषिक वर्चस्व आणि त्याचबरोबर उभरते राजकीय नेतृत्व मान्य नव्हते. इजिप्तच्या नेतृत्वामागे असलेला डाव्या विचारसरणीकडे झुकणारा, धर्मनिरपेक्षता मानणारा क्रांतिकारी विचार हा सनातनी, धार्मिक आणि उजव्या विचारसरणीच्या सौदीला मान्य होणे शक्य नव्हते आणि इथूनच अरब देशांतल्या शीतयुद्धाची सुरुवात झाली. संपूर्ण अरब जग एका स्वतंत्र राजकीय छत्राखाली आणण्याचा इजिप्तचा मनसुबा होता. येमेन मध्ये झालेल्या ६२-७० या आठ वर्षाच्या यादवी युद्धात इजिप्त आणि सौदिमधील नेतृत्वासाठीची ही दुफळी स्पष्ट दिसून येते. दक्षिण आणि उत्तर येमेनमध्ये सुरु असलेल्या प्रजासत्ताक राष्ट्रीय गट आणि धार्मिक आणि वांशिक टोळ्यांचे पारंपारिक नेतृत्व यांच्यातील संघर्षात इजिप्तने प्रजासत्ताकवाद्यांना फक्त आर्थिक आणि संस्थात्माकच नाही तर लष्करी मदतही दिली. येमेन हे इजिप्तचे विएतनाम म्हणून या युद्धात ओळखले जाते. इजिप्तचे लष्करी आणि आर्थिक दृष्ट्या मोठे नुकसान या युद्धात झाले आणि अखेरीस वाटाघाटी होऊन येमेन एकत्र राहिला आणि इजिप्तच्या सैन्याने येमेन मधून माघार घेतली. सौदी आणि येमेनचा वर्षानुवर्षे चाललेला सीमेबाबतच्या चकमकी, ब्रिटनचा दक्षिण येमेनवर असलेले नियंत्रण, सोविएत आणि अमेरिका यातील शीत युध्द आणि येमेन मधील शिया सुन्नी हा संघर्ष हे ह्या युद्धास अधिक जटील करणारे घटक. महत्वाचा अधोरेखीत करायचा मुद्दा हा कि अरब देशांमध्ये निर्माण झालेल्या लोकतांत्रिक, वसाहतवादी देशांविरुद्ध चाललेला राष्ट्रीयतेचा लढा आणि सुधारणा याविरुध्द उजव्या, कट्टर धार्मिक विचारसरणी आणि त्याला वासाहतिक शक्तींनी घातलेले खतपाणी हा अरब राष्ट्रांच्या रंगमंचावर पुन्हा पुन्हा खेळला जाणारा राजकीय खेळ इथेही स्पष्ट दिसून येतो.