Tuesday, 10 June 2014

काय घडतंय मुस्लिम जगात - भाग १७ वा.सौदी अरेबिया आणि इतर गल्फ राष्ट्रेसौदी अरेबिया आणि इतर गल्फ राष्ट्रे 

सौदी अरेबिया, एका बाजूने प्रचंड समृद्धी, विकास आणि अद्ययावत सोइ  सुविधांनी सज्ज अशी शहरे पण त्याचबरोबर परंपरागत अरब समाज असे परस्परविरोधी चित्र समोर येते. परिस्थिती आहेही तशीच - पाश्चात्य देशातील सुखवस्तूनची मोठी बाजारपेठ आणि त्याचबरोबर परंपरेने चालत आलेला प्रगैताहासिक चाली रीतींवर आधारित समाजसंघटन. अद्ययावत संसाधने आणि बक्कळ समृद्धी पण त्याचबरोबर सामाजिक बदलात अगदीच मागे असा नव्या जुन्याचा संगम असलेला हा प्रदेश. ओमान आणि येमेन हे तुलनेने कमी संपन्न  देश वगळता सर्वच देशांत हा विरोधाभास दिसून येतो. पाश्चात्य देशांतील उपभोग्य वस्तूंबरोबरच अद्ययावत शस्त्रास्त्रे, सर्व प्रकारचे विलास आणि ऐश आरामाची साधने, कार्यक्रम उदा फॉर्म्युला वन, उंटाच्या शर्यती, महागडे व्यापार प्रदर्शने इत्यादी इथे भरताना दिसतात. परंतु अंतर्गत समाजरचना आणि प्रथा, रिवाज हे अजूनही शेकडो वर्षे जुन्या अशा विचित्र द्वंद्वात हा समाज जगताना दिसतो. या विसंगत वागण्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे उत्तुंग इमारती आणि झगमगाटीत उभ्या असलेल्या शहरातील महिला मात्र बुरख्याच्या आत आणि त्यांना सर्वाजनिक जीवनाची सर्व दारे बंद! नोकरीधंद्यात नगण्य असे त्यांचे प्रमाण, एकटीने संचार स्वातंत्र्य नाही, ड्रायव्हिंगची, खेळात भाग घेण्याची परवानगी नाही, एकूणच स्वतंत्र असे अस्तित्व या महिलांना नाही. आधुनिक, पाश्चिमात्य देशांचे अनेक बाबतीत अनुकरण करणारे हे देश जुन्या टोळीच्या  समाज संरचनेस अगदी घट्ट धरून बसताना दिसतात. इथे धर्म आणि टोळींचा रिवाज असा फरक करण्याची गरज आहे. स्त्रियांचे एकूण समाजातील स्थान, त्यांनी कसे वागावे, राहावे याबाबतीतले नियम हे मुख्यतः अरबस्तानातल्या टोळी समाजाचे नियम परंतु ते धार्मिक नियम म्हणून इथून प्रसारित होताना दिसतात आणि इतर समाजावर लादलेले दिसतात. उदा मुस्लिम स्त्रिया वापरत असलेला  काळा बुरखा हा खरे तर इथल्या खालिजी  टोळीतील स्त्रियांचा परिवेश परंतु आज जगात - शिया धर्मीय सोडता हाच मुस्लिम स्त्रियांचा वेश आणि त्याला एक धार्मिक अधिष्ठान अशी गल्लत दिसते. महाराष्ट्रातील अगदी छोट्या खेड्यापाड्यात हे लोन पोहचलेले आहे. काही दशकांपूर्वी इथे आणि उत्तर भारताचा अपवाद सोडता  प्रचलित असलेली साडी आता कमी दिसू लागली आहे. हाच बदल पाकिस्तान, बांगलादेश या देशांमध्ये झालाच पण आज पाश्चिमात्य देशांमध्येही मुस्लिम स्त्रिया स्वतःची वेगळी अस्मिता दाखवण्यासाठी हा परिवेश अट्टाहासाने धारण करताना दिसतात.  त्यांच्या व्यक्ती व सांस्कृतिक स्वातंत्र्याचा भाग म्हणून आज इतरांनी त्याला स्वीकृती दिलेली दिसते आणि असेलही तो व्यक्तीस्वातंत्र्याचे प्रतिक - कोणी काय घालावे हा ज्याच्या त्याच्या आवडीचा आणि सोयीचा भाग - स्वातंत्र्यपूर्व काळात नववारी सोडून कुर्ता पायजमा घालता यावा यासाठी तेव्हा घराघरात वाद झालेच होते किंवा माझ्या पिढीला जीन्स घालता यावी म्हणून वाद झाले होते -- आजच्या तरुणांना यात वाद काय घालायचा इतपत जीन्स आता सर्वमान्य झालीच आहे. परंतु जेव्हा एखादी गोष्ट धर्माचा भाग म्हणून स्वीकारली जाते आणि लाद्लीही जाते तेव्हा ती नक्कीच आक्षेपार्ह असणारी गोष्ट. मुद्दा हा कि धर्म आणि संस्कृती आणि मुस्लिमांच्या संदर्भात  इस्लाम आणि अरबांची टोळी संस्कृती यात फरक केला जात नाही, परिणामी जे या अरब देशांत घडते त्याला धार्मिक मान्यता म्हणून सर्व मुस्लिम जगात ते स्वीकारले  जाते. 

 या सर्वमान्यातेचे कारण म्हणजे इस्लामी जगतात सौदीस  अनन्यसाधारण  असे महत्व आहे -   भोगोलिक आणि आध्यात्मिक इस्लामच्या केंद्रस्थानी हा देश  आहे. इस्लामची पवित्र तीर्थक्षेत्रे मक्का आणि मदिना इथेच आहेत. इथूनच प्रेषिताने धर्मप्रसार सुरु केला होता. मुस्लिम धर्मीयांना पवित्र असलेला काबा सौदीमध्ये आहे. प्रेषिताने इथून धर्मप्रसार सुरु केला आणि त्याचबरोबर काब्याच्या २० मैल परिसरात रक्तपात आणि हिंसेला बंदी केली. त्याकाळी आपापसात झगडणाऱ्या टोळ्यांमध्ये एकी निर्माण व्हावी हाच प्रेषिताचा हेतू होता. प्रेषित कालपासूनच काबा मुस्लिमांचे तीर्थक्षेत्र असून दर वर्षी तिथे करोडोच्या संख्येने मुस्लिम जमतात. इस्लामच्या पाच मुलभूत कर्तव्यापैकी एक म्हणजे हाज - काब्याची तीर्थयात्रा. या करोडो लोकांच्या तीर्थयात्रेची सोय आणि काब्याची व्यवस्था या दोन्ही गोष्टींची जबाबदारी सौदीच्या शासकांकडेच आहे. सौदी राजाचा उल्लेख काब्याचा रक्षक, पालक असा केला जातो. मक्का आणि काब्यालाजाणारे मार्ग तीर्थ यात्रेकरूंसाठी सुरक्षित राखण्याची जबाबदारी त्या त्या प्रदेशातील राजवटींची होती आणि या मार्गावर मिळणारा महसूल ही बर्यापैकी मोठा होता. जे जे इथे घडते ते ते सर्व मुस्लिम जगतात आदरणीय आणि अनुकरणीय समजले जाते.  परंतु सौदी आणि इतर मुस्लिम जगतातल्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये कमालीचे अंतर आहे. सौदी आणि इतर गल्फ देश त्यांच्या स्त्रियांना पूर्णपणे बुरख्यात ठेवून, सार्वजनिक आणि आर्थिक जबाबदार्यांपासून दूर ठेऊ शकतात कारण त्यांना ते परवडणारे आहे. इतर ठिकाणी उदा अफगाणिस्तान जिथे तलिबाननी हेच निकष स्त्रियांच्या दिसण्यास त्यांच्या समाजात वावरास लावले आणि त्याचा अतिशय वाईट परिणाम स्त्रिया, मुले आणि एकूणच समाजावर झाला. अफगाणिस्तानवरच्या लेखात याचे सखोल विश्लेषण येईलच. देशाच्या अर्ध्या आर्थिक दृष्ट्या सक्षम अशा घटकास अशा प्रकारे घरी बसवून ठेवणे हे पाकिस्तान, बांगलादेश व आफ्रिकेतील गरीब देशांना मुळातच न परवडणारी गोष्ट. पण इस्लामच्या या आखाती देशातून आयात केलेल्या प्रतिमांमध्ये आपल्याला बसवण्याचा आटोकाट प्रयत्न हे समाज करताना दिसतात. हा प्रश्न मागासलेल्या  समाजानी केलेले अनुकरण एव्हडाच नसून  मलेशिया आणि पाश्चात्य देशातील अनेक सुशिक्षित आणि स्वतंत्र स्त्रिया ही, स्त्रियांच्या वेशभूषेचे आणि वागण्याचे हे अरबी रूप स्वीकारताना दिसतात. याचे कारण तेलाच्या पैशावर चालणारे इस्लामीकरणाचे प्रकल्प  आणि त्यावर सौदीची आणि पर्यायाने वहाबी पंथाची घट्ट पकड होय. 

सौदी आणि एकूणच आखातातला हा समाज हा टोळीप्रधान तर आहेच पण त्याचबरोबर पितृसत्ताक आणि पिढ्या न पिढ्या चालत आलेल्या कुळ आणि वंशावर आधारित समाजरचनेचा पुरस्कर्ता ही आहे. 
या समाज रचनेत टोळीप्रमुख आणि इतर यांच्यात एक प्रकारचे संरक्षक/ पालक - संरक्षित अशा श्रेणी आहेत. सर्व सत्ता एका किंवा टोळीमधल्या मुख्य पुरुषांच्या हाती असते. संरक्षणाच्या बदल्यात यांनी स्थापन केलेले रितीरिवाज सगळ्यांनी पाळावेत अशी ही व्यवस्था. हीच व्यवस्था शासनपातळीवरही दिसून येते. तेल विकून आलेल्या पैशावर वेगळ्या प्रकारचे कल्याणकारी राज्य इथे उभे आहे. यात जोपर्यंत तुम्ही शासकांच्या अंकित राहून त्यांच्या नियम रिवाजानुसार राहता तोपर्यंत तुम्हाला संरक्षण, या व्यवस्थेबद्दल बोलायचाही अधिकार या नागरिकांना नाही. समाजशास्त्रात यालाच अरब सामाजिक करार ( Arab Social Contract ) असे नाव आहे. या शासनव्यवस्थेत राजाला सर्व अधिकार - संपत्ती जमा  करण्याचे आणि उपभोगण्याचे ही. त्याबदल्यात लोकांच्या आर्थिक गरजा त्यांनी भाग्वाव्यात, लोकांनी या शासकाच्या नियमांचे पालन करावे, प्रश्न विचारू नयेत किंवा कुठल्याही प्रकारच्या राजकीय प्रक्रियेत सामील होऊ नये. पिढ्या नु पिढ्या चाललेल्या या उतरंडीच्या रचनेत सगळ्यांच्या जागा आणि भूमिका अगदी ठरलेल्या! अर्थातच ही व्यवस्था फक्त अरब राष्ट्रातच नाही तर मध्य युगीन युरोप आणि सद्य कालीन अनेक आफ्रिकन देशात दिसून येते. जिथे जिथे अशा सरंजामी व्यवस्थेचा आर्थिक पाया डळमळू लागतो तिथे तिथे या रचनांना आव्हाने मिळताना दिसतात. अरब राष्ट्रांत मात्र  हे होताना दिसत नाही . परंपरेने चालत आलेली घडी आता तेल  आणि ग्यासवर आधारित नव्या अर्थव्यवस्थेत  आणखीनच पुष्ट होताना दिसते. या सर्व देशांच्या अर्थव्यवस्था या भाडेतत्वावर चालणार्या आहेत. मोठमोठ्या विदेशी कंपन्या या तेल आणि ग्यास  काढण्याचे, विकण्याचे काम करून प्रचंड नफा कमावतात. त्या नफ्यातला नगण्य भाग या देशात्तेल शासकांना दिला जातो. या देशातील जवळजवळ ४०% च्या वर उत्पन्न हे या भाड्याच्या मार्गाने मिळते आणि यात इथल्या जनतेला काहीही शर्म करावे लागत नाहीत. एका अर्थाने घरी बसून त्यांना हे आयते उत्पन्न मिळते आणि याच उत्पन्नाच्या जोरावर त्यांच्या परंपरागत समाजव्यवस्था चालू आहेत. या समाज व्यवस्थेचे आणि धर्माचे तसे काही देणे घेणे नाही. या सर्व देशांच्या आर्थिक बाबी या खरे तर त्यांच्या धर्मातील तरतुदींपेक्षा जास्त प्रमाणात समाजाचे विशिष्ट संघटन करताना दिसतात. या देशांतील लोक ज्या पद्धतीने राहतात, व्यवहार करतात आणि ते तसे करू शकतात कारण त्यांना मिळणारा हा पैसा, न की त्यांचा धर्म. पण याच सामाज्व्याव्स्थेस इतर मुस्लिम समाज मात्र धार्मिक अधिष्ठान देऊन प्रमाण मानतो, असे हे विचित्र त्रांगडे होऊन बसले आहे. 

पहिल्या लेखात आपण आधुनिकतेला प्रतिसाद देणारे चार नमुने पाहिले - अनुकरण, अंतर्गत सुधारणा, मुलतत्ववादी विचार आणि आधुनिकतेच्या तत्वांना नाकारून पारंपारिक व्यवस्थांचा पुरस्कार. सौदी आणि इतर आखातातले देश हे चौथ्या प्रकारात मोडतात. आम्हाला आमच्या समाज रचना, शासन व्यवस्था बदलायची मुळीच गरज नाही. ज्या व्यवस्था आहेत त्या अगदीच सुयोग्य आहेत असे यांचे म्हणणे. पण याच संदर्भात आपण केनिथ वाल्ट्झ यांच्या आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या  सिद्धांताची चर्चा केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर देश , समाज एकमेकांशी संबंध ठेवतात तेव्हा त्यांच्यात सामाजीकरणाची, अभिसरणाची आणि त्यातून बदलाची प्रक्रिया होतेच होते असे केनिथ वाल्ट्झ म्हणतात.  आजच्या स्पर्धात्मक वातावरणात कुठल्याही देशाला टिकायचे असेल तर त्याला इतर देशांमध्ये जे बदल घडत आहेत ते स्वीकारावेच लागणार अन्यथा अशी राष्ट्रे व समाज हा नामशेष होईल असे वाल्त्झ्चे म्हणणे आहे. अरेबियन देशांकडे बघता त्यांनी काही बाबतीत हे अनुकरणाचे, स्पर्धेत राहण्यासाठी आवश्यक असे बदल केलेले दिसून येतात उदा अद्ययावत शस्त्रास्त्रे, तन्त्रज्ञान, उद्योग आणि शहरीकरण. परंतु विरोधाभास हा कि सामाजिक मुल्ये आणि समाजरचना मात्र मध्य युगीन ठेवण्यात, त्या न बदलता चालू राहिल्या आहेत. हे असे का झाले याचा विचार करता पहिली गोष्ट लक्षात येते ती अशी कि एकोणीसाव्या शतकापर्यंत हे देश तसे एकाकी आणि अत्यंत दुर्गम होते. अतिशय मागास आणि दरिद्री असा हा प्रदेश, यात कोणालाच स्वारस्य नव्हते. त्यामुळे इथला समाज जगातील बाकी घडामोडींपासून अलिप्तच राहिला. तुर्कस्तान किंवा इजिप्तमध्ये जे विचार, घडामोडी झाल्या त्या इथे होऊ शकल्या नाहीत कारण इथल्या दुर्गम वाळवन्टात ओटोमान किंवा युरोपीय वासाहात्वाद्यान काहीच मिळणार नव्हते. ओतोमानांची नाममात्र सत्ता इथे होति. अंतर्गत सारे व्यवहार त्यांनी इथल्या स्थानिक टोळ्यांवर सोपवले होते. विसाव्या शतकात समुद्र मार्गावर अधिपत्य गाजवण्याहेतू इथल्या किनारपट्टीत ब्रिटीशांना रुची निर्माण झाली व त्यांनी त्या बदल्यात या भूभागाला संरक्षण दिले. तेलाच्या विहिरींचा शोध लागेपर्यंत इथल्या वाळवन्टाशी कोणाचे घेणेदेणे नव्हते. विसाव्या शतकात ही परिस्थिती बदलली आणि सर्वच महासत्तांना तेलासाठी इथे येण्याचे प्रलोभान मिळाले. या महासत्तांनी रेड लाईन आखून या भूभागाची आपपसात वाटणी केली आणि त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेतली. या देशांना उत्पन्न, संरक्षण , तंत्र्ज्नान आणि दळणवळणाची साधने अशी घर बसल्या विकसित झाली कारण तेलाच्या उत्खननासाठी आणि व्यापारासाठी उद्योजक आणि नोकरवर्गाची ती गरज होती. वाल्ट्झचा सिद्धांतानुसार छोटी राष्ट्रे आणि समाज या स्पर्धात्मक वातावरणात टिकणे अवघड असते.विशेषतः छोट्या परंतु नैसर्गिक साधन सामुग्रीने संपन्न अशा देशांना शेजारची मोठी राष्ट्रे गिळंकृत करण्यास टपलेली असतातच. कुवेतच्या बाबतीत हेच झाले. इराकने तेल विहिरींसाठी कुवेतवर हल्ला केला पण त्याच वेळेस अमेरिका कुवेतच्या सहाय्यास धावून आली. कुवेतला स्वतःचा बचाव करण्यासाठी आधुनिक सैन्याची गरज नव्हती. ऑपरेशन डेजर्त स्टोर्म मध्ये विदेशी देशांच्या सहाय्याने आणि त्यांच्याच साधनसामुग्रीने  कुवेतवरचा हा हल्ला परतवला होता. या लढाईत सौदीचा सहभाग नाममात्र होता. सौदी कडे अद्ययावत सामग्री असली तरी ती वापरण्याचे कौशल्य, प्रशिक्षण नव्हते व आजही नाही. या देशांची ही परावलंबी मानसिकता समजून घेण्यासाठी या भागाचा इतिहास समजावून घ्यावा लागेल.

No comments:

Post a Comment

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...