सौदी अरेबिया, गल्फ देश-  संक्षिप्त इतिहास 
सौदी अरेबिया हा यातला सगळ्यात मोठा देश.  अब्दुल अझीझ बिन सौद ने इथल्या चार प्रमुख भागांना एकत्रित करून १९३२ मध्ये सध्याच्या राजेशाहीची सुरुवात केली. हे चार भाग म्हणजे हेजाझ, नजद, पूर्वेचा अल-हसा आणि दक्षिणेकडील असीर. अब्दुलअझीझ  ने १९०२ साली रियाध काबीज करून खरे तर राजेशाही ची स्थापना केली होती. हेजाझ च्या भागातील तुरळक शहरी भाग वगळला तर हा भटक्या टोळ्यांचा प्रदेश. सातव्या शतकात प्रेषिताच्या मृत्युनंतर त्याच्या अनुयायांनी अरेबियाच्या पुढे जाउन मुस्लिम साम्राज्य वसवले तेव्हापासून मक्का व मदिना या ठिकानांना राजकीय व धार्मिक महत्व प्राप्त झाले. त्याआधीही मक्का व काबा तसे पूजनीय होतेच -पण इथल्या स्थानिक लोकांसाठी. जसे जसे मुस्लिम साम्राज्य वाढले तसे अरेबिया मागे पडला आणि नव्या राज्यकर्त्यांनी दुसरीकडे आपल्या राजधान्या वसवल्या. वार्षिक हजयात्रे शिवाय या भागात तसे काहीच स्वारस्य उरले नाही. १० व्या शतकापासून अगदी विसाव्या शतकापर्यंत मक्केच्या शेरीफाकडे इथला स्थानिक कारभार आणि कैरो, इस्तंबूल किंवा बगदाद खिलाफातीशी त्याची निष्ठा अशी घडी ब्रिटीश येईपर्यंत कायम राहिली. सोळाव्या शतकात  पोर्तुगीजांच्या लाल समुद्रावरच्या आक्रमणाला शह देण्यासाठी ऑटोमन या भागात शिरकाव करून त्यांनी लाल समुद्र, पर्शियाचे आखात ( हेजाज, असीर आणि अल हसा ) हा भाग आपल्या अधिपत्याखाली घेतला. पुढची चार शतके गरजेनुसार ऑटोमन साम्राज्याच्या सत्ता आणि  सामर्त्यानुसार त्यांची  या भागावर पकड कमी जास्त होत राहिली.  साधारण १७४४ च्या सुमारास नजद भागातल्या सौद या घराण्याने इथे आपल्या सत्तेचा विस्तार करणे सुरु केले आणि त्याला मदत मिळाली ती अब्दुल अल वहाब या कर्मठ धर्मप्रचारकाची. सुन्नी हनाबली पंथाच्या अल वहाबने वहाबी विचारसरणीचा व या  पंथाचा जनक . सौद्ची राजेशाही आणि या विचारसरणीचा प्रसार प्रचार  अठराव्या शतकात अरेबिया पासून सुरु झाला . १७७४ साली रियाध येथे स्थापन झालेल्या या राजेशाहीने बघता बघता पूर्ण सौदी  अरेबियाचा आज दिसणारा भाग  काबीज केला. १८१८ साली ऑटोमन साम्राज्याने मुहम्मद अलीस  येथे पाठवून या वाढत्या साम्राज्याचा बीमोड केला. नजदच्या  भागात त्यानंतरच्या कालावधीत १८२४ साली पुन्हा या राजघराण्याने आपली छोटीशी राजेशाही स्थापन केली. यानंतर पुढचे दीड शतक अरेबियावरच्या सत्तेसाठी सौद व अल रशीद या दोन घराण्यांमध्ये अनेक संघर्ष होत राहिले. १८९१ मध्ये अल रशीद ने सौद ला पराभूत केले त्यानंतर सौद कुटुंबास शेजारच्या कुवेतमध्ये आसरा घ्यावा लागला. १९०२ साली इब्न सौद ने रियाध पुन्हा ताब्यात घेतले व सौद कुटुंब परत नजदला आले. याच दरम्यान वहाबी शिकवणीने प्रेरित फैसल अल दाविश ने इथल्या टोळ्यांची मिळून इखवान ही संघटना बांधली होती. या संघटनेच्या मदतीने सौद ने १९१३ साली हसा चा भाग काबीज केला. याच दरम्यान मक्केच्या शेरीफ हुसेन ने ब्रिटीशांच्या मदतीने ऑटोमन साम्राज्याविरुध्ह उठाव केला होता. हा उठाव असफल झाला पण पहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्यच कोसळले व ब्रिटिशांनी इथे सत्ता स्थापन केली. या सर्व घडामोडीत मात्र सौद ने मुळीच भाग घेतला नाही. तो रशीद घराण्याबरोबर त्याच्या लढाया लढत राहिला १९२१ मध्ये पूर्ण नजद आणि नंतर १९२४ - २५ च्या दरम्यान हेजाज चा प्रांत त्याने  जिंकून प्रथम २१ साली नजद चा सुलतान, २६ साली हेजाजचा राजा आणि नंतर ३२ साली सौदी अरेबियाचा राजा म्हणून  सौदने स्वतास घोषित केले -- हा सौदी अरेबियाचा अगदी धावता इतिहास 
 आपली सत्ता स्थिर केल्यावर बाह्य आक्रमणापासून संरक्षणासाठी सौदीने ब्रिटिशांचे संरक्षित क्षेत्र म्हणून  आपला दर्जा मान्य केला व तसा करार ब्रिटिशाबरोबर केला.  या सर्व काळात या प्रदेशांतील आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. पूर्व किनाऱ्यावर  होणारी मोत्यासाठीची मासेमारी, व्यापारातून येणारा तुटपुंजा पैसा  आणि तीर्थयात्रेसाठी लावण्यात आलेला कर या दोन उत्पन्नाच्या साधनाशिवाय दुसरे काहीही निर्वाहाचे साधन १९३६ मध्ये तेल विहिरी सापडेपर्यंत  इथल्या लोकांकडे नव्हते. तेलाचा शोध लागल्यावर एक वेगळी अर्थव्यवस्था इथे उभी राहिली. पुढच्या लेखात या अर्थव्यवस्थेबाबत आणि त्याच्या इथल्या राजकारणाबाबत पाहणारच आहोत. तेलाचा शोध, तेलकंपन्यांचे इथे येणे आणि पुढचा राजकीय इतिहास यावर गिरीश कुबेरानी  दोन पुस्तके लिहिली आहेतच. तेलावर आधारित या अर्थव्यवस्थेत मोठमोठ्या तेल कंपन्या इथल्या जमिनीत तेल उत्खननाची व निर्मितीप्रक्रियेची परवानगी मिळावी म्हणून या राजवटीला प्रचंड पैसा देतात. खरेतर त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाचा अगदी नगण्य भाग या कंपन्या इथल्या राजेशाहीस देतात. परंतु इथली आधीची हलाखीची परिस्थिती पाहता हा पैसा इथल्या लोकांसाठी प्रचंड मोठा आणि तोही काहीही हातपाय न हलवता आलेला. तेलासाठी लागणारे तन्त्रज्ञान, उत्खनन व निर्मितीसाठी लागणारे भांडवल, व्यवस्थापन, निर्मित मालाची विक्री या कशातच इथल्या लोकांना श्रम नाहीत.  या येणाऱ्या पैशाचा विनियोग त्यांनी आपल्या राजेशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी केला. बाहेरच्या जगाशी या निमित्ताने या समाजाचा संबंध जरूर आला परंतु  बाहेर चाललेल्या कुठल्याच आर्थिक किंवा राजकीय प्रक्रियांमध्ये काही या देशांनी  प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही त्यामुळे सामाजिक दृष्ट्या परंपरागत व्यवस्था इथे चालू राहिल्या. आधुनिकीकरणाची प्रक्रिया व त्या अनुषंगाने होणारी घुसळण इथे घडतच नाही. मध्ययुगीन बेदुयीन टोळ्या ज्याप्रमाणे आपला जीवनक्रम जगात तसेच आजही इथले लोक आपले व्यवहार करतात फरक एवढाच कि आज आर्थिक सुबत्ता इथे आहे जी पूर्वी नव्हती. इतर राष्ट्रांबरोबर यांचे संबंध आहेत पण त्यांना मिळणाऱ्या  बलाढ्य राष्ट्रांच्या संरक्षणामुळे इतर राष्ट्रांशी  स्पर्धा टिकून राहण्यासाठी किंवा आपले स्थान उंचावण्यासाठी या राष्ट्रांना करावी लागत नाही. १९३६ पासून आजतागायत या देशांच्या अर्थव्यवस्थेचा व त्यावर आधारित राजकारणाचा एक आकृतिबंध (pattern ) बनलेला आहे. 
दुसऱ्या  महायुद्धानानंतर सर्वच जगात वसाहतवादाविरुध्ह असंतोष वाढला त्यामुळे  त्याचेच दुसरे स्वरूप असलेला हा  संरक्षित क्षेत्राचा दर्जाही निकालात निघाला. ब्रिटन ने या सर्व देशांना स्वातंत्र्य दिले खरे पण यांच्यात आर्थिक वाटाघाटी होऊन दोन्ही राष्ट्रांना फायदेशीर असे करार त्यानी केले. १८९९ पासून संरक्षित असलेला कुवेत १९६१ साली स्वतंत्र झाला. १८२० पासून ब्रिटीश अधिपत्याखाली असणारा बहारीन १९७१ साली स्वतंत्र झाला. ओमान तसा संरक्षित प्रदेश नव्हता पण त्याच अर्थाच्या अनेक करारानुसार ब्रिटीश त्याच्याशी संबंध ठेऊन होते आणि ते आजतागायत तसेच आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने ब्रिटनच्या संरक्षणाच्या भूमिका स्वतःकडे घेतल्या आहेत. १८५३ पासून संयुक्त अरब अमिरातीने ब्रिटीश संरक्षित करार केला होता.  १९७१ मध्ये यु. ए. इ स्वतंत्र झाला. क़तार १९१६ पासून असाच ब्रिटीशांच्या अंकित होता तो १९७१ साली स्वतंत्र झाला. 
एकंदरीत ही सर्व राष्ट्रे गेल्या ४०-५० वर्षात स्वतन्त्र व स्वायत्त राष्ट्रे म्हणून आपला कारभार पाहू लागली आहेत. याआधी शेकडो वर्षे बिकट भौगोलिक परिस्थितीमुळे हे देश आणि समाज इतर समाजापासून तुटलेले होते. गेल्या दीड शतकात बाहेरच्या जगाशी संबध येउन आणि आर्थिक सुबत्ता येऊनही इथे आधुनिक शासनव्यवस्था उभ्या राहिल्या नाहीत. वर्षानुवर्षे चालत असलेल्या  टोळी समाजातल्या सत्ता आणि समाजव्यवस्थाच इथे अजून चालू राहिलेल्या दिसतात. त्यामुळे स्वातंत्र्य तर मिळाले, सत्ता मिळाली आणि आर्थिक सुबत्ता ही आहे पण स्वतःची अशी ओळख या राज्यकर्त्यांना नाही. आधीच्या लेखात चर्चा केल्याप्रमाणे सत्ता आहे पण  परंपरागत  अधिकार सोडला तर दुसरा काही बेस नाही , कुठल्याही आधुनिक शासन प्रशासन संस्था यांच्याकडे नाहीत अशी परिस्थिती या राजेशाहांची स्वातंत्र्योत्तर काळात होती. परंपरेवर आधारित स्वताची सत्ता टिकवायची असेल तर त्या परंपरा व त्यातील हितसंबंध जोपासणे या राज्यकर्त्यांना भाग आहे. सौदी अरेबिया हे त्या मानाने अगदीच नवीन राज्य आणि या राज्य निर्मितीच्या कामात वहाबी पंथाचा मोठा सहभाग त्यामुळे सौदी सत्तेचे अधिष्ठान वहाबी विचारसरणीवर आधारित इस्लामचे अनुकरण. कर्मठ, कट्टर, शुद्धीवादी  आणि xenophobic अशा इस्लामच्या एका विशिष्ट अनुवादावर आधरित धर्मसत्ता म्हणून सौदी आपली ओळख यानंतरच्या काळात प्रस्थापित करताना दिसतो. खरे तर हे कर्मठ धर्मावर आधारित असे रूप सौदीस संरक्षण देणाऱ्या ब्रिटन अमेरिकेच्या आधुनिक प्रतिमेपेक्षा खूपच विरोधाभासाचे वाटते. आणि हा विरोधाभास कमी करण्यासाठी एका बाजूला अद्ययावत तंत्रज्नानावर आधारित शहरे, सुविधा हे देश स्थापन करताना दिसतात पण त्याचबरोबर आपली धार्मिक सत्ता आणि तीच अस्मिता म्हणून मोठ मोठ्या मशिदी, इस्लामिक स्कॉलरशिप, धर्माचा प्रसार प्रचार यात ही राष्ट्रे आपली सर्व साधन सामुग्री पणाला लावताना दिसतात. 
No comments:
Post a Comment