ऑटोमन व वासाहतिक काळातला अरब आणि सौदी इतिहास
आजची अरब राष्ट्रे समजायची असतील तर या आधीचा ऑटोमन व वसाहतवादाचा इथला इतिहास समजून घेतला पाहिजे. ऑटोमन साम्राज्यात हेजाझ चा मार्ग आणि मक्का आणि मादिनाचे संरक्षण या दोन गोष्टी सोडल्या तर या खंडहरात त्यांना मुळीच स्वारस्य नव्हते. पश्चिमेकडचे एडन आणि येमेन चा भाग आणि १९ व्या शतकात अल हझ्झा म्हणजे आजच्या कुवेतच्या दक्षिणेकडचा भाग असा ओतोमानांचा विस्तार होता. ब्रिटीशांनाही सामुद्रिक व्यापारासाठी इथल्या किनाऱ्यांवर आणि मुख्यतः पश्चिम किनाऱ्यावर मालकी हवी होती. आखातातल्या आतल्या टोळी समाजात या दोन्ही साम्राज्यांना काहीही रस नव्हता. एक तर दळणवळणाच्या सोयी अभावी हे भाग दुर्गम होते आणि तिथे वाळवंट आणि दारिद्र्य या शिवाय काहीही नव्हते. भटक्या आपापसात भांडणाऱ्या या टोळ्या शेजारच्या सध्याच्या इरक़ व सिरीया इथल्या भूभागावर अनेकदा आक्रमणे करत. हा भाग तुलनेने शेतीप्रधान व समृध्द. ओतोमानांच्या ताब्यात असलेल्या या भागावरील आक्रमणे रोखणे आणि मक्का व मदिनेला होणाऱ्या वार्षिक तीर्थयात्रेला येणाऱ्या यात्रेकरूंचे संरक्षण आणि तिथली कर आकारणी या दोन गोष्टीसाठी ऑटोमन साम्राज्याची इथे उपस्थिती. ऑटोमन खलिफा हा मुस्लिम धर्मियांचा प्रमुख आणि त्या नात्याने तीर्थयात्रा, तीर्थक्षेत्र आणि तीर्थयात्री यांच्या देखभालीची आणि संरक्षणाची जबाबदारी परंपरेने खलीफाची असे. अर्थातच इस्तंबूल मधून खलिफा किंवा त्याचे अधिकारी त्या काळात ही जबाबदारी प्रत्यक्ष निभवू शकत नव्हते त्यामुळे त्यांनी सीरियाच्या गव्हर्नरला ही करआकारणी, टोळधाडीपासून शेजारच्या प्रांतांचे संरक्षण व मक्का मादिनेचे संरक्षण अशी जबाबदारी दिलेली. ऑटोमन साम्राज्यात जरी आखातातला काही भाग आला तरी इतर ठिकाणी झालेले बदल, सामाजिक राजकीय अभिसरण यापासून अगदी विसाव्या शतकापर्यंत हा भाग अलिप्तच राहिला. ऑटोमन साम्राज्याची राज्य करण्याची पद्धतच तशी होतॆ. स्थानिक नेत्यांनी खालीफाचे आणि खिलाफतीचे अधिपत्य मान्य करायचे, आवश्यक तो कर गोळा करून द्यायचा आणि स्थानिक कारभार मात्र त्यांचाच चाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जर्मनांच्या मदतीने बांधलेल्या बगदाद बानमुळे ( Bahn - जर्मनमध्ये रेल्वे) पहिला मोठा बदल या भागात झाला.
तुर्कस्तानात इस्तंबूल पासून निघणारी ही रेल्वे लाईन बगदाद बसरा आणि दुसऱ्या बाजूला मादिन्यापर्यंत पोहचत होती. आतापर्यन्तची दुष्कर तीर्थयात्रा या रेल्वेमुळे अतिशय कमी वेळात व सुखपूर्वक होऊ लागली. ऑटोमन साम्राज्याचा विस्तार एडन आणि अल हज्जा ( दक्षिण कुवेत) पर्यंत वाढला. साहजिकच या रेल्वेमार्गाच्या देखभालीची जबाबदारी ऑटोमनांची झाली. याच वेळेस हा मकका येथील स्थानिक नेता व शेरीफ हुसेन आपले सामर्थ्य या भागात वाढवू इच्छित होता. मक्का व मदिना ( हेजाझ प्रांत ) येथे त्याला मान्यता होतीच आणि त्याने ऑटोमन खलीफाचे अधिपत्य मान्य केले होतेच. हुसेन फार महत्वकांक्षी होता. संपूर्ण अरब प्रांताचा राजा होण्याचे त्याचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण झाले नाही पण त्याच्या मुलांनी पुढच्या काळात काय काय केले ते नंतर येईलच. एडन बंदरात या काळापर्यंत ब्रिटीशांनी आपला जम बसवला होता. भारतीय उपखंडातून येणारी जहाजे पुढे सुवेझ कालव्यामधून ब्रिटीश बेटांकडे येत जात होती. आणि या सर्वांचे नियंत्रण एडन बंदरातून होत होते. इथला आपला जम बसावा म्हणून किनाऱ्यालगतच्या टोळी प्रमुखांबरोबर ब्रिटीशांची या किनाऱ्यावर हुकुमतीसाठी हातमिळवणी सुरु झाली होतीच. पहिल्या महायुद्धआधीचा हा कालखंड. ऑटोमन साम्राज्याविरुध्ह असलेला थोडा असंतोष, इथल्या महत्वाकांक्षी नेत्यांच्या लालसेला खतपाणी घालून आता ब्रिटिशानी वाढवायला सुरुवात केली. पीटर ओ'टूलचा लॉरेन्स ऑफ अरेबिया हा याच विद्रोहावर निघालेला लोकप्रिय सिनेमा. यात थोमस लॉरेन्स हा ब्रिटीश अधिकारी इथल्या स्थानिक अरबांना ऑटोमन साम्राज्याविरुद्धच्या उठावास मदत करतो. ब्रिटीश नजरेतूनच या सिनेमाची निर्मीती झालेली असली तरी त्या वेळची परिस्थिती बऱ्यापैकी या सिनेमात चित्रित केली आहे.
पहिल्या महायुद्धात ऑटोमन साम्राज्याचा पाडाव झाला आणि विजेत्या राष्ट्रांत नवीन भूभागांची वाटणी सुरु झाली. पहिले महायुध्द संपायच्या आधीच इंग्लंड आणि फ्रांसने रशियाच्या मदतीने ऑटोमन साम्राज्याची विभागणी आपापसात केली होती. बोल्शविक सत्तेवर येउन १९१८ साली त्यांनी हा कट उघडकीस आणला तेव्हा ब्रिटन फ्रांसची नाचक्की झाली पण तो भाग अलहिदा. Sykes–Picot Agreement, किंवा Asia Minor Agreement या नावाने हा प्लान ओळखला जातो. यानुसार अरब प्रांत हा ब्रिटीश व फ्रेंचांच्या मध्ये व रशियाला लागून असलेला भाग रशियास असा विभागणीचा बेत होता आणि राहिलेला प्रदेश हा आंतरराष्ट्रीय प्रदेश म्हणून पुन्हा यांच्याच अख्त्यरॆत. खाली या विभाजनाचा नकाशा दिला आहे.
याप्रमाणे ब्रिटीश जॉर्डन नदीपासून जॉर्डन, दक्षिण इराक़ भूमध्य समुद्रालगताचा हैफा चा भाग जेणेकरून या समुद्र्मार्गावर त्यांचे आधिपत्य राहील. फ्रेन्चांकडे दक्षिण पूर्व तुर्कस्तान, उत्तर इराक़, सिरीया आणि लेबनॉनचा काही भाग तर रशियाकडे इस्तंबूल, तुर्कस्तानच्या दोन्ही सामुद्र्धुन्या आणि अर्मेनियाचा ऑटोमन साम्राज्यातला भाग अशी विभागणी होणार होती. शरीफ हुसेनला ही या बेतात सामील करून त्याला स्थानिक अधिकार हेजाज च्या प्रदेशाचे द्यायचे आणि या सर्व भागांच्या सीमा निश्चित करायच्या असा हा बेत होता. आणि इथेही अरबस्तानाच्या वाळवणटी भागात या कोणालाही स्वारस्य नव्हते. हा तेल मिळण्याआधीचा कालावधी. पहिल्या महायुद्धानंतर या बेतानुसार वाटणी झाली नाही तरी ब्रिटीशांनी इथल्या किनाऱ्यावर जम बसवताना इथे भारतासारखी वसाहत निर्माण केली नाही कारण त्यांचे हितसंबंध फक्त समुद्रमार्गे दळणवळण एव्हढेच राहिले. इथल्या स्थानिक नेत्यांना शेखांना त्यांनी स्थानिक कारभारात स्वयंपूर्णता राखू दिली आणि त्यांच्याबरोबर फक्त संरक्षित प्रदेश protectorate असे करार केले. सध्याचा या भागाचा नकाशा पाहिला तर
सौदी अरेबिया हा सगळ्यात मोठा देश पण इतर छोटे देश १९व्या शतकापासूनच अस्तित्वात आहेत. तेव्हाच्या शेखशाह्या ( sheikhdom) आणि आताचे हे स्वतंत्र देश. महायुद्धानंतरच्या mandate system चा भाग. या Mandate System ने त्यांना स्वतंत्र प्रदेश म्हणून मान्यता दिली . या system बद्दल आपण इराक़ सिरीया बद्दलच्या लेखात सविस्तर विचार करूयात. थोडक्यात नवा गडी पण पुराना राज्य चालू राहिले ऑटोमनांची जागा ब्रिटीशांनी घेतली. बाह्य आक्रमणापासून संरक्षण आणि त्याबदल्यात समुद्र किनाऱ्याचा वापर असा हा सौदा होता. अंतर्गत राज्य व समाजरचना टोळीप्रधानच राहिली. ओमान मध्ये ब्रिटीशांची उपस्थिती (पPresence ) मर्यादित होता पण इतर ठिकाणी त्यांनी या Protectorate व्यवस्थेला एक औपचारिक रूप दिले होते. त्यानुसार या प्रदेशांचे सर्व परदेशी व्यवहार ब्रिटीश पाहणार म्हणजेच त्यांचे अस्तित्व एका अर्थाने ब्रिटीशांच्या अंकीतच होते.
No comments:
Post a Comment