Monday 12 May 2014

काय घडतंय मुस्लिम जगात - भाग १६वा. इजिप्त आणि मगरेब देश- राजकीय नेतृत्व

इजिप्त आणि  मगरेब देश- राजकीय नेतृत्व 

नासर नंतरचा इजिप्त 

इजिप्त आणि त्याचवेळेस स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये आढळणारा आणखी एक समान धागा म्हणजे या सर्व देशांमध्ये हुकुमशाही राजवटी ज्या स्वतःला पाश्चात्य  देशांच्या आधुनिक चौकटीत बसवायचा प्रयत्न करत असताना त्यांना  इस्लामिक विचारांकडून व संघटनांकडून झालेला विरोध. शीत युद्धाच्या काळात दोन्ही महासत्ता त्यांच्या अंकित किंवा मित्र असलेल्या राष्ट्रांना स्थिर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. नव्याने स्वतंत्र झालेल्या देशातील हुकुमशाही राजवटी टिकवणे हा त्या जैसे थे परिस्थिती टिकवण्याचाच एक प्रयत्न. या महासत्ता आणि तिथल्या राजवटीना देशांतर्गत उभारलेल्या धर्मनिरपेक्ष आणि राजकीय दृष्ट्या पक्व अशा चळवळीनची जास्त भीती वाटत असे कारण या चळवळीत त्या त्या सत्तेस प्रश्न विचारायचे आणि प्रसंगी उलटावून लावण्याचे वैचारिक सामर्थ्य होते. या गटांना वाढू न देण्याचे व प्रसंगी दडपून टाकण्याचे धोरण या महासत्ता व त्यांच्या प्याद्यांचे होते मग ते डाव्या विचारसरणीचा सोविएत किंवा उजवा अमेरिका असो. याचाच परिणाम या देशांमध्ये राजकीय विचार, चळवळी, ज्या विचारांवर मतभेद आआहेत ते व्यक्त करण्यासाठी स्पेस या देशांत राज्यकर्त्यांनी बनू दिली नाही, वाढू दिली नाही. त्याचबरोबर या राज्यकर्त्यांची स्वतःची धोरणे राबवण्यासाठी आवश्यक असणारा संस्थात्मक ढाचाही त्यांनी निर्माण केला नाही. उदा  नासरने ज्या संयुक्त अरब आघाडीचा पुरस्कार केला, आतरराष्ट्रीय स्तरावर संघटनम्हणून या आघाडीस पुढे आणले त्याच आघाडीत एक सिरीया वगळता दुसरा देश सामील नव्हता. या आघाडीचा स्वतःचा संस्थात्मक ढाचा नव्हता, यात सामील होण्यासाठी काही नियम, पद्धती असा काहीच विचार किंवा आराखडा नव्हता. तीन वर्षात सिरीयाने जाहीर केले कि आम्ही आघाडी सोडत आहोत आणि ही आघाडी कोसळली. अशाच पद्धतीच्या युरोपिअन युनिअन निर्मितीच्या प्रक्रियेशी तुलना करता असे दिसते कि युनिअन हा ही सुरुवातीला एका विश्शिष्ट वर्गाचा प्रकल्प होता परंतु कालांतराने त्यावर चर्चा, नियम आणि संस्था विकसित करण्यात आल्या. युरोपिअन न्यायालय, पार्लमेंट, कमिशन अशा माध्यमातून या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणली गेली. परंतु अशा कुठल्याही प्रक्रिया स्वतंत्र अरब राष्ट्राच्या निर्मिती प्रक्रियेत होताना दिसत नाही आणि हाच संस्थात्मक, व्यवस्थात्मक संरचनेचा अभाव या हुकुमशाही देशांमध्ये दिसून येतो आणि जरी लोकशाही व्यवस्था असेल तरी राजकीय मतभेद व्यक्त करण्यसाठी ज्या अनेक लोकशाही संस्थांची निर्मिती आवश्यक असते त्यांच्या अभावी या लोकशाही व्यवस्था अपूर्णच दिसतात. अतिशय अपरिपक्व आणि  उथळ अशी राजकीय विचारसारणी आणि संस्कृती या देशांमध्ये दिसून येते. करिष्म्याच्या आधारावरच चाललेले राजकारण हे लोकशाहीस पूरक अशा संस्था व प्रक्रियांची निर्मितीस हानिकारक ठरते आणि एकदा का अशा व्यक्ती किंवा त्यांचे वलय संपले कि अनागोंदीची परिस्थिती निर्माण होताना दिसते. इजिप्तमध्ये नासरच्या अंतानंतर असेच झाले. परंतु त्याआधी सर्व प्रकारच्या राजकीय विरोधकांची गळचेपी झाली होतीच आणि जेव्हा वस्तुनिष्ठ, धर्मनिरपेक्ष राजकीय विचार आणि प्रक्रिया मारल्या जातात तेव्हा अशा देशांमध्ये सगळ्यात शेवटचे संघटन हे धार्मिक स्वरूपाचे संघटन असते. मशिदींमध्ये, धर्माच्या आधारावर उभे राहत असलेल्या या संघटनावर त्या कालच्या शास्त्यांचा प्रभाव आणि हस्तक्षेप खूपच कमी असतो. नासर जरी अतिलोकप्रिय असला तरी त्याला राजकीय विरोधक हे होतेच आणि नासरने त्यांना त्याच्या राजवटीत दाबून ठेवले होते. वर वर दिसणाऱ्या डाव्या, धर्मनिरपेक्ष राजवटीतला असंतोष हा मशिदीमध्ये एकत्रित होत होता. नासारच्या मृत्युनंतर हा असंतोष बाहेर पडलाच व नासरच्या जागी आलेल्या अन्वर सादातने या असंतोषास आपली राजवट स्थिरावण्यासाठी वापरले. 

 अन्वर सादात 

अन्वर सादात हा नासरचा सहकारी. राजाविरुध्च्या बंडातील एक साथीदार पण नासारचा करिष्मा याच्याकडे नव्हता. नासरच्या  तुलनेत सादातकडे धडाडी, वक्तृत्व, लोकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य असे काहीच नव्हते परंतु तो एक विचारी शासक मात्र होता आणि नासरच्या कामात अभाव असलेली दूरदृष्टी आणि राजकीय डावपेच हे मात्र सादातच्या व्यक्तिमत्वात व नेतृत्वात होते. मुळात अन्वर सादातची निवड नासारच्या मृत्युनंतर आलेल्या प्रचंड पोकळी भरून काढण्यासाठी केलेली तात्कालिक तडजोड होती. नासारच्या तोडीचा, तेव्हडी उत्तुंग लोकप्रियता असलेला नेता इजिप्त मध्ये अर्थातच नव्हता. त्यातल्या त्यात सादातपासून कोणाला राजकीय धोका नव्हता. सादात सत्तेवर आला खरा पण आपली पकड बसवून अधिकार कसा स्थापन करायचा ही भ्रांत त्यालाही होती. त्याच्याकडे न तर करिष्मा, न कुठली परंपरागत ताकद आणि न ही  न्यायसंगत व्यवस्थेची घडी बसवण्यासाठी लागणारा वेळ आणि संसाधने !  मिळालेल्या सत्तेस आपण पात्र आहोत हे सिध्द करण्यासाठी काही तरी व्यावहारिक तोडगा काढणे सादातला आवश्यक होते. नासरच्या साहसी, जोखीम पत्करण्याच्या अगदी विरुध्द असा सादातचा  स्वभाव होता. त्य्यात त्याने दोन युद्धे ४८ आणि ६७ चे जवळून पाहिले होते, त्यात झालेली इजिप्तची नामुष्की आणि हानीचा देशाच्या विकासावर झालेला विपरीत परिणामही भोगला होता. विशेषतः १९६७ च्या युद्धात इजिप्तने सिनाई चा भूभाग हरला होता. सादातने युद्धात हरलेला भाग परत मिळवणे आणि सोवीयेतच्या छत्रछायेखालून निघून अमेरिकेच्या गटात जाण्यासाठी पावले उचलली. हे करताना अर्थातच त्याला नासरने बसवलेल्या वैचारिक आणि राजकीय समीकरणांना फाटा द्यावा लागणार होता. सादातने सोवियेतच्या मदतीने पुन्हा शस्त्रास्त्रे जमवून युद्धाची तयारी केली. १९६७ च्या युद्धाचा वचपा काढायचा असेल आणि जनमानसात इस्रायेल विरुद्धच्या युद्धात आलेल्या पराभवामुळे पसरलेल्या नैराश्यास दूर करायचे तर निदान इजिप्तचा गेलेला भूभाग परत मिळवणे भाग होते. युध्द जिंकणे हा सादातचा हेतू नव्हता. इजिप्तची लष्करी ताकद वाढवून इस्रायेल व त्याचा पाठीराखा अमेरिका यांना जरब बसावी आणि ६७ च्या युद्धात गेलेला भाग वाटाघाटीच्या माध्यमातून परत मिळावा हे सादातच्या १९७३ सालच्या युद्धाचे उद्दिष्ट होते आणि ते सफल झाले ही. इजिप्त एक समर्थ लष्करी सत्ता म्हणून यातून  आला. जरी सोविएतच्या सहाय्याने इजिप्तने हे रणशिंग फुंकले असले तरी सादातला अमेरिकेच्या कंपूत जायला या शक्तीप्रदर्शनाचा फायदा झाला. त्याचबरोबर क्यंप डेविड येथे इस्रायेल बरोबर वाटाघाटी  होऊन सिनाई भूभाग परत मिळवण्यात ही सादातला यश मिळाले. या वाटाघाटींचा परिणाम म्हणजे १९४८ पासून इस्रायेलच्या प्रश्नांवर सामाईक भूमिका घेणाऱ्या अरब लीगशी फारकत घेणे आणि त्याचबरोबर नासरने केलेला अरब जगताच्या नेतृत्वाच्या  दाव्यातून इजिप्तला मुक्त करणे होय. अरब लीग ने इजिप्त आणि सादातवर बहिष्कार टाकला कारण लीगच्या भूमिकेनुसार कुठलेही अरब राष्ट्र इस्रायेलशी स्वतंत्र वाटाघाटी करू शकत नव्हते. सादातनी त्या केल्या आणि त्याच्या या नव्या आंतरराष्ट्रीय भूमिकेचे, इस्रायलला मान्यता देवून युध्द सोडून वाटाघाटीमार्गे सीमेचा प्रश्न सोडवण्यासाठीचा प्रयत्न पाश्चात्य देशांत प्रशांसिला गेला. अमेरिकेच्या मध्यस्तीने झालेल्या १९७८ मधल्या केंप डेविड करारानुसार इजिप्तने इस्रायेलला राष्ट्र म्हणून मान्यता दिली, त्याच्याबरोबर राजनयिक संबंध स्थापण्याचे मान्य केले आणि त्याबदल्यात १९६७ च्या युद्धात गमावलेला भूभाग परत मिळवला. सादात आणि इस्रायेलच्या बेगीनला या बद्दल नोबेल पारितोषिक ही  मिळाले. 


मुस्लिम ब्रदर हूड 

सादात जेव्हा सत्तेवर आला तेव्हा त्याला जाणवलेली गोष्ट म्हणजे त्याचे विरोधक हे नासरवादी डाव्या विचारसरणीचे लोक नसून मुस्लिम ब्रदरहूडच्या प्रभावात राजकीय दृष्ट्या संघटीत झालेले इस्लामिक, धार्मिक गट आहेत. या गटास त्याला दुर्लक्षता येत नव्हते आणि त्यांच्या विरोधात जाण्याइतकी त्याची ताकद नव्हती, त्यामुळे या गटास आणि संघटनेस त्याने चुचकारायला सुरुवात केली. त्यांच्या धोरणांना पाठींबा द्यायला, त्यांच्या भूमिका जाहीर रित्या स्वीकारायला त्याने सुरुवात केली. नासरच्या सेकुलर धोरणांविरुद्ध सदातचे वागणे  व भूमिका होत्या. त्याने सईद कुतब या ब्रदरहूडच्या नेत्याशी जवळीक साधली आणि त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या. यातली महत्वाची मागणी म्हणजे इजिप्तच्या घटनेचे दुसरे कलम बदलून शरीयावर आधारित कायद्यांचा स्वीकार. आधीच्या घटनेप्रमाणे शरीया हा इजिप्तच्या कायद्याचा एक स्त्रोत असे लिहिलेले होते आता ते खोडून शरीय हाच स्त्रोत असे केले गेले. इस्लामिक गटांची ही महत्वाची मागणी मान्य करून त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा सादातचा मानस होता. परराष्ट्रीय धोरणांबाबत घेतलेल्या भूमिकेतून झालेले देशांतर्गत नुकसान भरून काढण्याचा सादातचा हा डाव होता. असाच डाव नंतर पाकिस्तानच्या झिया उल हक ने खेळला. मुस्लिम ब्रदर हूड ही १९२८ साली इजिप्त मध्ये स्थापन झालेली संघटना. १९४८ मध्ये इजिप्तच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षांचा खून ब्रदरहूडशी संबंधित हसन नावाच्या विद्यार्थ्याने केला तेव्हापासून ब्रदर हूड वर इजिप्तमध्ये बंदी होती. ब्रदर हूड चा प्रमुख हसन बन्ना हा इस्मायीला या गावात शिक्षक होता. सुएझ कालव्याच्या मुख्यालय असलेले हे गाव, साहजिकच इथल्या समाजात बाहेरून आलेल्या ब्रिटीशांचा प्रभाव खूप होता. मागच्या लेखात आधुनिकतेचे प्रतिक असलेले असे वसाहतवादी प्रकल्प स्थानिक जनतेत कसे अंतर निर्माण करतात ते पाहिले. बन्नाने अशाच असंतुष्ट युवकांना एकत्रित करीन ब्रदर हूड ची स्थापना केली होती. १९४८ च्या इस्रायेल विरुद्धच्या लढ्यात या संघटनेचे कार्यकर्ते होतेच. परंतु यांचा पाषा आणि नंतर नासारच्या सेकुलर धोरणांना प्रचंड विरोध होता आणि नासर ने बर्याच प्रमुख कार्यकर्त्यांना अटकेत ठेवले होते. सादातने याच ब्रदरहुड्चे लांगुलचालन करायला सुरुवात केली आणि याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ब्रदर हूड चा लोकांमध्ये प्रभाव वाढला होताच आता त्यांना शासनात कायदेशीर स्थान मिळाले आता त्यांना लुटुपुटुच्या मार्गांनी समाधान नको होते तर त्यांना पूर्ण इस्लामिक अजेंडा राबवायचा होता. यातूनच देशात उग्र इस्लामिक वातावरण पसरायला सुरुवात झाली 
  
सादातला सुरुवातीला जम बसवताना आणि त्याच्या पर राष्ट्रीय धोरण नीतीमुळे आलेले मळभ दूर करायला याची मदत झालीच पण ६७ चे युध्द आणि डेवीड करारानुसार इजिप्तची जमीन परत मिळाली.  सादातचा हा विजयोत्सव सुरु असतानाच त्याच्या इस्लाम्बोली नावाच्या अर्मितल्याच अधिकाऱ्याकडून  खून झाला. राष्ट्राच्या सीमा न मानणाऱ्या आणि संपूर्ण मुस्लिम जगाचे एकीकरण करण्याचे ध्येय ठेवणाऱ्या ब्रदर हूड ला सादातची पाश्चिमात्य देशांशी चाललेली हात मिळवणी आणि इस्रायेलशी समझौता या गोष्टी मान्य होणे शक्यच नव्हते.  इस्लाम्बोलीवर रीतसर खटला झाला व त्याला देहांताची शिक्षा मिळाली पण येणाऱ्या काळातल्या इस्लामिक चळवळीत तो हुतात्मा  म्हणून ओळखला जातो. इराणच्या इस्लामिक शासनाने त्याच्या नावाने पोस्टाचे तिकीट काढले, शहरातल्या मोठ्या रस्त्यास त्याचे नाव दिले, अल क़ैदच्या एका मोठ्या तुकडीचे नाव इस्लाम्बोली आहे. सादातच्या हत्येच्या कटात आयमान झवेरी या सध्याच्या अल कायदाच्या नेत्यास ही अटक झाली होती आणि त्या वेळेस जरी ब्रदर हूड ची मुळे सादातनंतर आलेल्या मुबारक सरकारने उखडायचा प्रयत्न केला तरी देशातील माहौल हा बदललेला होता. नासारच्या स्वप्नातील सेकुलर इजिप्त जोमाने कात टाकून इस्लामिक स्वरूप धारण करत होता. 

सादातच्या मृत्यूमुळे इजिप्त समोर पुन्हा तोच नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिला आणि सादातच्या वेळेस जे घडले तेच याही वेळेस घडले. होस्नी मुबारक या सुमार कुवतीच्या तडजोड प्याद्यास पुढे करण्यात आले. होस्नी मुबाराराक्ने ही सादातचे धार्मिक गटांचे लांगुलचालन चालूच ठेवले. मुबारक हा लष्करी अधिकारी, निम्न कर्तुत्व आणि करिष्मा किंवा पारंपारिक अधिकार असे काहीच त्याच्या पोतडीत नव्हते. त्याला आपला पदसिद्ध अधिकार जतवण्यासाठी लोकप्रिय अशा ब्रदरहूड आणि तत्सम संस्थाशी हातमिळवणीची गरज होतीच. मुबराकचे शासन पहिल्यापासूनच कमजोर होते त्यामुळे त्याने त्याच्या विरुध्द बोलणाऱ्या राजकीय विरोधकांची दडपशाही केली, जिथे शक्य होते तिथे काही गटांना चुचकारले व आपल्या सोबत घेतले आणि आपली सत्ता स्थिर करण्यासाठी लष्कराची मदत घेतली. अनेक नवमुक्त विकसनशील देश आणि इस्लामिक देश यात हे साधर्म्य नेहमीच आढळते -- जिथे जिथे सामाजिक राजकीय संस्थाचा, व्याव्साथांचा अभाव असतो तिथल्या शासकांकडे एकमात्र संघटीत अशे शक्ती असते आणि ती असते लष्कराची. या लास्कारांच्या जोरावरच अशा अनेक राजवटी टिकून राहिलेल्या दिसतात आणि हे शासक हि प्रचंड खर्च करून लष्कर ही संस्था जोपासताना दिसतात. मुबारकच्या काळात लष्करावर प्रचंड गुंतवणूक केली गेली आणि यात अमेरिकेने सक्रिय भाग घेतला. इजिप्तचे आर्थिक आणि लष्करी धोरण हे अमेरिका धार्जिणे होते. लष्करास बाह्य आक्रमणापासून संरक्षण या मुलभूत कामाबरोबरच आर्थिक आणि सामाजिक प्रक्रियेत महत्वाचे स्थान मुबारकच्या काळात दिले गेले. उद्योग धंदे, शेती, दळणवळण सर्व क्षेत्रात लष्कराचीच मुजोरी होती. गेल्या ४०-५० वर्षात इजिप्त आणि तत्सम देशांनी पाश्चात्य राष्ट्रांपुढे आम्ही ( शासनकर्ते ) किती विपरीत परिस्थितीत आधुनिक, पाश्चात्य मुल्ये टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि देशातील मागास, धार्मिक गटांपासून आम्हाला कसा धोका आहे याचे रस भरीत चित्रण करून त्यांची सहानभूती आणि मदत मिळवली होती. लोकशाही, सेकुलारीस्म आणि आधुनिक जीवनपद्धती टिकवायची असेल तर आमच्या शासनास पर्याय नाही असे चित्रण करून त्या बदल्यात या राज्यकर्त्यांनी आपली हुकुमशाही आणि भावबंद्कीच जोपासली होती. या राज्यकर्त्यांना होणारा अंतर्गत विरोध दडपला गेला होता आणि आधी म्हणल्याप्रमाणे फक्त धार्मिक संघटना एवढाच पर्याय जनतेसमोर होता. आज जो  असंतोष लोक व्यक्त करत आहेत आणि याच इजिप्तच्या तहरीर चौकातील लोन आज अनेक देशात पसरले आहे त्या सर्वांची मागणी इस्लामिक किंवा सेकुलर/ पाश्चात्य कि पौर्वात्य अशी नसून एक स्थिर, विकसनशील राजवट, किमान सोयी सुविधा -शिक्षण, आरोग्य, दळणवळण, रोजगार पुरवणारी शासनयंत्रणा असावी, भाऊबंदकी आणि लष्करी अधिकाऱ्यांना अतिप्रमाणात सत्ता आणि अधिकार न देता लोकांच्या राजकीय अधिकारांना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य हे लोक मागत आहेत. मुबारकला पदच्युत करणे हा प्रतीकात्मक निर्णय आहे. या सर्व देशात राज्य शास्त्राच्या भाषेत ज्याला Praetorian problem म्हणतात तो आ वासून उभा आहे - लष्कराचे काम आणि संघटन बाह्य शत्रूपासुन संरक्षण पण हेच लष्कर आपल्याच लोकांविरुध्ह उभे राहते तेव्हा त्याला रोखणे आणि त्याचे नियंत्रण योग्य प्रकारे करणे हे जमले नाही तर पाकिस्तानात जे झाले तेच इतर ठिकाणी होनार. इजिप्त आणि अरब स्प्रिंगमध्ये सामील असलेल्या अनेक देशातून आणखी एक महत्वाचा प्रश्न पुढे आला आहे. खरे तर या प्रशांची झलक विविध मार्गाने गेल्या दशकात पुढे आली आहेच - पाश्चात्य राष्ट्रांची, विशेषतः अमेरिका आणि मित्र राष्ट्रांची हे सारे प्रश्न समजून घेण्याची, त्यांना सोडवण्याच्या कामात काही योगदान करण्याची खरीच कुवत आहे का? सगळे प्रश्न हे दडपशाहीच्या मार्गाने सोद्वान्यातच हे देश पुढाकार घेणार आहेत का आणि असे जर असेल तर त्यांची जी कलंकित प्रतिमा या सर्व देशांच्या  मध्ये निर्माण झाली आहे त्यातून अधिक अधिक रक्तपात हेच होत राहील का? उत्तर आफ्रिकेत हा सगळा असणातोष धुमसतोय आणि त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सध्या तरी एका टोकाच्या भूमिकेशी येउन थांबले आहेत . हा लेख लिहिताना इजिप्तचे गेल्या दोन वर्षातले तिसरे सरकारहि कुचकामी ठरलेले दिसत आहे. अस्थिरतेतून अस्थिरतेकडे असाच हा प्रवास सध्या तरी दिसत आहे.  

No comments:

Post a Comment

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...