Friday, 14 March 2014

चंदेरी दुनियेतील आवडत्या स्त्री भूमिका व नायिकांबद्दल

चंदेरी दुनियेतील काही व्यक्तिरेखा मनात अगदी घर करून बसतात.  त्या त्या व्यक्तिरेखेला त्या सिनेमाच्या कथानकाचा संदर्भ असतो पण आपल्या आयुष्याच्या कुठल्यातरी कंगोऱ्यास ती व्यक्तिरेखा किंवा तिची एखादी कृती स्पर्शून जाते. गेलेल्या घटनांची स्मृती चाळवते किंवा अगदी कसोटीच्या क्षणी हात ही देते -- बरेच पैलू आपण स्वतः किंवा माहितीतल्या कोणाची तरी आठवण करून देतात. एखादे चांगले पुस्तक, जीवश्च मित्र-मैत्रिणीला भेटल्यावर झालेला आनंद, मस्त शांत फिरून आल्यावर मिळणारा निवांतपणा आणि आवडलेली व्यक्तिरेखा -- जीवन सुकर, समृध्द करणाऱ्या साध्या गोष्टी. खूप वेळा संदर्भ, नाव लक्षात राहत नाही पण सिनेमातल्या एखाद्या प्रसंगाची छबी मनावर कोरलेली असते, शब्द आठवत नाहीत पण छोटीशी लकेर, कटाक्ष अशा छोट्या गोष्टी मध्येच आठवतात. आवडणारे सिनेमे खूप - सगळ्यांचीच यादी नाही करता येत पण स्मरणात राहिलेल्या काही व्यक्तिरेखा आणि अभिनयासाठी नायिकान्बद्दल थोडेसे. ही यादी परिपूर्ण नाही आणि यातल्या प्रत्येक भूमिकेबद्दल एक मोठा लेख होईल. पण सुरुवात करायला हवी कुठेतरी म्हणून आता संक्षिप्तात-- पुढे कदाचित वाढवेन. 

हुतुतू,  चीनी कम  आणि हेराफेरीतली तब्बू - तिन्ही वेगळ्या व्यक्तिरेखा. चीनी कम मध्ये आपल्या वयाहून दुप्पट असलेल्या अमिताभशी जुळवून घेताना, सब लडके मिले थे अब तक । असे म्हणत त्याच्या  विक्षिप्तपणाला हसून उत्तर देणारी, हट्टी बापाच्या धमकीला घुश्शात, ' तो कब जा रहे हो ' अशी विचारणारी पण नंतर त्याच्या काळजीने कळवळणारी, स्वतंत्र, मिश्किल आणि तेव्हडीच सह्रदय. जोहर सह्गलची आईची भूमिकाही अफलातून होती या सिनेमात 

रंग दे मधली वहिदापण छानच -- तिच्या जुन्या सिनेमातील भूमिका बघितल्या की तिच्याइतकी  इतकी graceful अजून कोणी नाही.  

 श्याम बेनेगलचा हरी भरी ग्रामीण मुस्लिम कुटुंब आणि मुख्यतः कुटुंब नियोजानासारख्या प्रश्नावर पण अतिशय वास्तवदर्शी असा सिनेमा  यात नंदिता दासची अल्लड छोट्या जावेची भूमिका, नवऱ्याने ऑपरेशन कारण आला म्हणून रुसून घर सोडून जाणारी आणि मध्येच थबकून परत येणारी हा प्रसंग गोडच. बांद्र्याच्या थिएटरात बघायला गेलो होतो तेव्हा सगळ्या बायकाच होत्या आत. 

ERIN brokovich मधली आणि Notting Hill  जुलिया roberts . Runaway Bride धमाल --
स्त्री 
हजारो ख्वाइशे ऐसी मधली चित्रांगदा, साठीच्या दशकातील विद्यार्थी आंदोलनाचा कॉलेजात असलेला प्रभाव, तिचं उच्चवर्गीय राहणीमान, आंदोलनातल्या मित्रावर जीव तोडून प्रेम, त्याच्यासाठी सुखाचा संसार सोडून त्याच्या कामात झोकून देणे आणि नंतर तो सोडून गेला तरी ते काम सुरु ठेवणे. अतिशय बोलका अभिनय आणि त्याचबरोबर राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ती म्हणून जाणाऱ्या अनेक आव्हानांना तोंड देत  तोंड देत   अल्लड मुलगी, असहाय्य प्रेमिका आणि एक प्रगल्भ स्त्री असा प्रवास तिने सुंदर दाखवला होता
  

समय मधली सुश्मिता सेन -- ही वाटली होती IB officer 

फिर भी दिल  हिंदुस्तानी मधली काहीही करून टॉपला राहणारी वार्ताहर  जुही आणि तीन दिवारे मधली जुही -दोन वेगळ्या व्यक्तिरेखा. तीन दिवारेमध्ये जेव्हा नवरयाला आता यापुढे असा अत्याचार करत राहिलास तर तू झोपलेला असताना जाळून टाकेन असं धमकावणारी आणि आपल्या बहिणीच्या खुनाचा अतिशय थंड डोक्याने तपास लावणारी पण त्याचबरोबर तुरुंगात घडणाऱ्या चांगल्या कामाला हातभार लावणारी. संवेदनशील पण करारी जुही आवडली होती.  

लज्जा मधली मनीषा आणि माधुरी दोघी - रस्त्याच्या कडेला लघवीला बसणारी, शीळ घालणारी आणि रंगमंचावर प्रियकराला जाब विचारणारी माधुरी अफलातूनच होती. देढ ईश्कीया बघायचाय अजून . खामोशीमधली मनीषा 

कहाणी, नोवन  किल्ड जेसिका, डर्टी पिक्चर, पा, ईश्कीया  मधली विद्या बालन. ईश्कीय मध्ये ती नसरुद्दिनला खड्सावते -- कौन हो तुम मेरे पती, यार … तो प्रसंग आणि अगदी थंड डोक्याने निर्णय घेणारी, दोघां मामू भातीज्यांच्या  प्रेमात आपल्याला हवे तेच  शोधणारी ।  

सुमित्रा भावेने चाकोरी म्हणून एक छोटी फिल्म केली होती -- त्यात काम केलेली मुलगी आणि व्यक्तिरेखा. नवऱ्याने टाकून दिलेली मुलगी, छोट्या भावाच्या मदतीने सायकल शिकते व गावात चाललेल्या कामात सहभागी होते. छोटीशी पण त्या मुलीची जिद्द दर्शवणारी आणि सायकल शिकणे ह्या छोट्या गोष्टीमुळे तिच्या आयुष्यात किती फरक आला- शेवटच्या प्रसंगात ती सायकल चालवताना सायकलीचे फिरणारे चाक आणि त्याचवेळेस तिच्या पायातले पडणारे पैंजण/ साखळी असा सुरेख शेवट अजून डोळ्यासमोर दिसतो. 

डोर मधली गुल पनाग, बंदी नवऱ्याच्या सुटकेसाठी शेकडो मैल दूर येउन ज्याच्या खुनाचा आरोप आहे त्याच्या विधवेस मदतीचे सांगाडे घालणारी, या दोघींची फुलणारी मैत्री आणि गुलचा  आयेशावरचा प्रभाव यामुळे घरात आणि गावात उठणाऱ्या तरंगांना दोघींनी दिलेला प्रतिसाद.  

फ़िजां मधली करिष्मा - तिचा हा एकच सिनेमा मी पाहिलाय -- दिसतेही छान आणि व्यक्तिरेखा ही मस्त. करीना असोका मध्ये मादक दिसते, जब वी ची  गीत ही छान.  

बेंड इट लाईक बेकहम मधल्या दोघी, कायरा नाईटली ने dangerous method मध्ये ही खूप छान काम केले आहे.  

गुजारीश आणि जोधा अकबर मधली ऐश्वर्या -इतका तरल प्रेमानुभव डोळ्यातून व्यक्त केला आहे. 

बर्फी मधली प्रियांका चोप्रा -- आणि Black मधली राणी मुखर्जी, सदमामधली श्रीदेवी --त्या भूमिकांचे सोने केले आहे 

The  Artist मध्ये Peppy Miller ची भूमिका करणारी Bejo - मूक अभिनयात अप्रतिम 

Matrix ची Trinity, Constant Gardner ची Tessa, Iron Lady मधली मेरिल स्ट्रीप 

चक दे मधली कोमल,  बंटी और बबली मधली राणी,   लज्जा मधली माधुरी --  बंडखोर आणि धमाल जगणाऱ्या या व्यक्तिरेखा फारच आवडतात. 

तलाश मध्ये मुलगा गमावलेली आणि नवऱ्याचे वागणे समजाऊन घेत नव्या अनुभवास सामोरी जाणारी राणी मुखर्जी 

धोबी घाटमध्ये उत्तर प्रदेशातून आलेल्या आणि मुंबईत एकट्या पडलेल्या मुलीच्या दृष्टीकोनातून मुंबई रंगवणारी यास्मीन - कीर्ती मल्होत्रा 


जाने तू न जाने ना - मधली रतना पाठक -- माझ्या खूप फेमिनीस्ट मैत्रिणींची आठवण करून देणारी -- काय जेवूयात मग scrambled egg on  toast -- सिंगल मदर घरातील ओळखीचा प्रसंग वाटला, वर वर hilarious वाटणाऱ्या अनेक प्रसंगातून आपल्या मुलाला वेगळे बनवण्याची-  स्वतःची तत्वे,  मुल्ये  आपल्या मुलास देण्याची तिची धडपड सुरेख होती. इम्रानने रंगवलेल्या त्या भूमिकेत हुशार आणि EQ ने काम करणारी अशा सिंगल मदरची मुले मला तरी आठवली होती.  

Thursday, 13 March 2014

पुन्हा मामू ........ ( भाग 2)

पुन्हा मामू ........ ( भाग 2)

काल दुपारी मामुंवरची पोस्ट पाठवली आणि मुलांना घेऊन साउथबँकला कार्यक्रमाला गेले ...वेगवेगळ्या गोष्टी करत असतानाही मामू काही मनातून जाईनात ---मांचा सगळ्यात जवळचे भावंड आणि एरवी खंबीर असणारी मां जर कोणाकडून कधी काही अपेक्षा करेल तर ती मामुंकडूनच! आज दुपारी तर ठीक बोलली ती फोनवर ---पण आपल्याला त्रास होईल म्हणून ती बऱ्याच गोष्टी सांगत नाही. अगदी तीव्रतेने जावेसे वाटले --फार नाही तर आठ दिवस तरी ---तिला आणि मला बरे वाटेल थोडे .....मनुला ( माझ्या मुलीला ) विचारले राहशील का ग ताईबरोबर तर हो म्हणाली . तिकिटांचे दर बघून झाले आणि उद्या बॉसशी सुट्टीबद्दल बोलायचे ठरवून झोपी गेलो.
सकाळी कॉफी पिताना नेहमीप्रमाणे मेल चेक केली ---बऱ्याच प्रतिक्रिया आल्या होत्या. लोकांना पोस्ट आवडली होती --कोणी लिखाणाबद्दल टिप्पणी केली होती तर कोणी फलटणला पोहोचले होते. एक दोन शोकसंदेशही होते. मग नेहमीची धावपळ ;माहीला नर्सरीत सोडून ऑफिस गाठले. नेहमीप्रमाणे सोमवार. वीकएन्डला काय केले हे बोलता बोलता या आठवड्यात काय डेडलाईनस आहेत ते बघत होते. मनूचा फोन तीनवेळा वाजला --काहीतरी अर्जंट असणार. आज तिच्या सुट्टीचा शेवटचा दिवस त्यामुळे सगळे होमवर्क आजच आठवणार आणि मम्माला आणखीन चार फोन तर येणारच असा विचार करत फोन उचलला.' अरे मम्मा, ओ हमिदनाना मरे नही अभी तक!"
"व्हाट", इतक्या जोरात ओरडले की समोरच्या टेबलवरचा सहकारी, "आर यु ऑल राईट? " असे काळजीने म्हणाला .
" तैयबाखाला का मेसेज है --तू फोन कर उनको".
तिचा फोन ठेऊन तातडीने माझ्या बहिणीला तैयबाला फोन लावला. दुसऱ्या बाजूला तैयब आणि मां दोघी खदाखदा हसत होत्या. त्या नेहमीच अशा हसतात --काही बोलायच्या आत परत एक ठहाका. तैयब मला सांगते दुसऱ्या फोनवर मामू मांबरोबर बोलत आहेत. आणि मां त्यांना मी काय काय लिहिले ते सांगत आहे. तिने आज सकाळी माझी पोस्ट वाचली होती आणि मांच्या घरी जाऊन तिला दाखवली होती ---जे गेले ते मामू हे नव्हतेच. सारख्याच नावाचे दुसरे --ज्यांना आम्ही मामू म्हणायचो ते मामू गेले. आता नको त्यांचे नाव आणि वर्णन लिहायला ..उद्या परत काही फोन आला तर .......................
मां म्हणाली मामू म्हणतायत फोन कर त्यांना ! "हो मां, ऑफिसमध्ये आहे, नंतर करेन." त्यांच्या हसण्याच्या आवाजात फोन ठेवला खरे ..आणि आता परत मामू आठवायला लागले. पण गेले दोन दिवस सदगदित होऊन मामुंच्या माझ्या जीवनातील, बालपणातील योगदानाचे आकलन बिकलन करायचा माझा भाव कुठे लुप्त झाला कळाले नाही. खरे मामू दिसायला लागले नजरेसमोर आणि लहानपणच्या आणखी काही घटना ...पण पूर्णपणे दुसऱ्या रुपात समोर यायला लागल्या ...
आता जर फलटणला गेले तर काय परत अंगठे धरून उभे करणार की काय अशी भीती वाटायला लागली. अशी काही भीतीदायक घटना नजरेसमोर आली की माझी मानसिक सुरक्षा व्यवस्था ( defence mechanism) लगेच कार्यरत होते. हो सांगेन आता मामुंना ---तुम्ही ज्या ज्या शिक्षा करता त्या सगळ्या बालहक्कांचे उल्लंघन करणाऱ्या आहेत.
दुसर्याच क्षणी जाणवले ---आपल्या तोंडातून आवाज निघतच नाहीये. मामू निक्षून सांगत आहेत . "गुडघे न वाकवता अंगठे धर".
अहो पण मामू तेव्हासारखी सडसडीत नाही राहिले --हे पण मनातच, पण ऐकू गेले की काय मामुंना !
" तरी नेहमी सांगतो भाकरी -भाजी खात जा भरपूर --नुसता भात गिळायला पाहिजे ---पोट नाही सुटणार तर काय !" आणि उद्या सकाळी पाच वाजता उठून कॅनलच्या रस्त्याने दोन राउंड काढायचे."
हे फर्मान आधीच्या सगळ्या सुट्ट्यात असायचे. एक तर कॅनलच्या रस्त्याला मोठी खडी टाकलेली --ती पायाला रुतायची. डोळ्यासमोर एकतर इतका काळोख ---झोप आल्यामुळे का उजाडले नसल्यामुळे हे अजूनही माहित नाही. त्यात मागे रहायची बिशाद नाही. पळता पळता नैसर्गिकरित्या स्पीड वाढायचे एकमेव कारण म्हणजे आपल्या मागे कुत्रे भुन्कल्याचा वाढता आवाज! त्यात मामुंची नेहमीची ठरलेली वाक्ये --असेच नाही पी टी उषा होता येत आणि असेच नाही सुवर्णपदक मिळत ! ( तेव्हा नुकतेच पदक मिळाल्यामुळे पी टी चा फारच उदो उदो होता !)
" हो पण ते सोन्याचे पदक पाहिजे कोणाला? दोन वर्षाआधी पडलेलेया त्या कानातल्या चांदीच्या रिन्गेबद्द्ल अजून आम्ही बोलणे खातोय! कोण सांभाळत बसेल ते सोन्याचे पदक? आणि केरळमध्ये काय अशा दगडी नसतात...दगडांचा देश हा महाराष्ट्रच आहे ". पण या सगळ्या ज्ञानाची देवाणघेवाण नंतर पाणी भरत असताना आम्हा मुलातच व्हायची .
कॅनलवर पाणी भरायला जाणे किंवा भांडी घासायला नेणे हे मात्र सगळ्यांना आवडायचे. आजकाल जसे कॉन्फेरेंस मध्ये चहा घेताना किंवा बाहेर लॉबीत गप्पा मारताना खरे नेट्वर्किंग होते तसे कॅनलवर जाण्याची संधी म्हणजे नेटवर्किंग्ची संधी असायची. इथे महत्वाच्या खबरी कळायच्या उदा. आज अब्बाजी ( गुड्डू, मुन्ना मामुना अब्बाजी म्हणतात ) हॉलीबॉल खेळायला जाणार किंवा अम्मी कोणाच्या तरी घरी कार्यक्रमाला जाणार. आमच्या बऱ्याचशा योजनांचा उगम हा कॅनलचा फाटा असायचा त्याचबरोबर आमच्या विश्वातील घडलेल्या घटनांचे उहापोह करण्याचे कॅनल हे एक सर्वसंमत ठिकाण होते. त्यावेळी शीतयुद्ध, सार्क चळवळ, फुटीरतावाद यावर सगळ्या बातम्या असायच्या. दूरदर्शनला आदल्या दिवशी जे ऐकले आणि त्यादिवशीच्या सकाळ किंवा पुढारीमध्ये जे वाचले त्या बातम्यांच्या धर्तीवर आमचे सगळे विश्लेषण चालायचे. मी आणि गुड्डू, तैयब आणि मुन्ना अशा दोन सुपरपावरस होत्या; अमिना हा नेहमीच फुटीरतावादी गट ( ती एकतर सगळ्यात लहान आणि मामू आणि मुमानी दोघांची लाडकी --त्यामुळे थोड्याशा धाकाने किंवा त्या दोघांपैकी कोणी प्रेमाने विचारले की लगेच सगळी सिक्रेट्स सांगून टाकायची )आणि ज्यांच्यामध्ये आमच्या योजनांमध्ये सामील व्हायची धमक नाही ते सगळे मात्र ---असहकार किंवा नॉनअलाय्न्मेंत वाले. आमच्या निम्म्या योजना कुठल्या डब्यात काय ठेवले आहे आणि ते कधी आणि कसे लंपास करायचे याबद्दलच असायच्या . घरी खाण्यापिण्याची ददात होती असे नाही --उलट मामा याबाबतीतही फारच हौशी --दर रविवारी पिशव्या भरभरून बाजार आणायचे. घरी वेगवेगळ्या डीश बनवणे ही त्यांची हॉबी होती आणि मुमानीने काही दुजाभाव केला नाही ----तरीही समोर वाढलेले, सगळ्यांसोबत खाल्लेले आणि गुपचूप कॅनल वर किंवा एकाने दारात पहारा देऊन दुसऱ्याने लंपास केलेल्या गोष्टींची मजा निराळीच होती.
असेच एकदा दिवाळीत शनिवारी सकाळी मुमानींनी संध्याकाळी करंज्या करायच्या म्हणून खोबऱ्याचे सारण तयार करून फळीवर ठेवले होते. जेवण झाल्यावर त्या दुसऱ्या कोणाच्या घरी फराळाचे करू लागायला गेल्या. मामू थोडी झोप काढून हॉली बॉल खेळायला गेले. आम्ही घरी पाचजण होतो ---सगळ्यांच्या अगदी मिलिटरी थाटात आपापल्या जागा घेऊन कारवाया सुरु. सुरवातीला थोडी चव घ्यायची म्हणून दोन-तीन चमचे सारणाचा बकाणा भरला. परत चांगले लागले म्हणून आणखी थोडे, मग आणखी थोडे असे करत करत इकडे तिकडे बघत, एकाने पहारा देत, दुसरयाने स्टुलावर चढून बारीबरीने चमच्या चमच्याने चव घेणे चालू होते. तेवढ्यात मुमानी परत येताना दिसल्या. घाईघाईने स्टूल जागच्या जागी ठेऊन आम्ही सगळे पसार. मामुंचे खेळणे झाल्यावर चहा घेऊन संध्याकाळी सगळ्यांनी करंज्या करायच्या असा बेत होता. त्याप्रमाणे चहा झाला आणि मुमानिनी सारण ज्या पितळी घमेल्यात ठेवले होते ते खाली काढले ---त्यात नावाला तीन -चार करंज्यांचे सारण शिल्लक राहिले होते!
करंजी दुमडावी तसे मामुंनी आम्हा सगळ्यांना दुमडून अंगठे धरायला लावले. नेहमीप्रमाणे अमिना लहान म्हणून तिला सूट मिळाली आणि गुड्डू आधीच पसार झाला होता. सगळी कॉलनी शोधली तरी तो तीन तास काही सापडला नाही ---तोपर्यंत आमच्या हातापायांच्या अंगठ्यांची गाठ तशीच होती. वरून मामुंची काय काय करेन ---याची धमकीवजा वर्णने सुरु होती. जेवणाची वेळ झाली तरी गुड्डूचा पत्ता नाही म्हणल्यावर मुमानींचा धीर सुटायला लागला. त्यांचे हुंदकेवजा बोल ऐकून आणि लाल झालेले नाक बघून पलंगाखालून गुड्डूचा फिदीफिदी हसण्याचा आवाज आला. ज्वारीच्या पोत्याच्या मागून त्याला बाहेर काढून काही बोलण्याच्या आधीच मुमानींनी आता पोरांना काही बोललात तर ....असे काहीसे तुटक ऐकू आले. नंतर बराच वेळ कोणामुळे आम्ही जास्त बिघडलो हे विश्लेषण चालू होते....त्या संभाषणाची आठवण आली की आजकालच्या स्टार न्यूजच्या बातमीच्या ष्टाईलचा उगम कसा झाला असेल त्याची कल्पना येते!
पण त्यावेळी गुड्डू वाचला हे खरे आणि करंजीसारण योजनेचा तो मुख्य सूत्रधार असताना ही काहीही शिक्षा न होता तो सुटला ---हे आजवरचे सगळ्यात मोठे शल्य आहे आमचे!
यावेळी भेटले की सांगणार मामू आणि मुमाणींना ---की फक्त मुमानिना हुंदका आला म्हणून त्याला शिक्षा न होणे हा भेदभाव तर आहेच पण असे आमच्यासमोर खमंग सारण बनवून ठेऊन जाणे आणि नंतर आम्ही आमची "फडताळ लंपास" कुशलता बाजूला ठेऊन त्या सारणाचा फक्त लांबून वास घेऊ अशी अपेक्षा करणे --हे आमच्या मुलभूत मानवी हक्कांच्या विरोधात आहे.
गेली दहा वर्षे मानवी हक्क आणि बालहक्क यावर प्रत्यक्ष काम आणि यासंदर्भातले ट्रेनिंग आणि अभ्यास यामुळे कुठल्याही आर्गुमेंट ला मानवी हक्कांची पायमल्ली असा मस्त मुलामा देता येतो --हा अनुभवसिद्ध खात्रीचा फॉर्मुला वापरून मनातली अशी बरीचशी शल्य यावेळेला आले की बोलून टाकणार आहे.
असा विचार येताच मुमानी दिसल्याच समोर. काठवडित एका हाताने पीठ काढत दुसऱ्या हाताने तव्यावर भाकरी टाकताना. तापल्या तव्यावर भाकरी उलटताना थोडे पाण्याचे थेंब पडले की जो चर्रकन आवाज येतो --तसा मुमानींचा आवाज. गेली कित्येक वर्ष भाकरीचा तो आवाज, खमंग वास आला की मुमानींचा एकादा धारदार डायलॉग आठवणारच--एकाही डायलॉगला घाबरलो नाही ही गोष्ट वेगळी. पण त्याचे कारण मुमानी कधी त्यांच्या डायलॉगला उत्तर म्हणून काही बोलले तर आमच्य्बरोबर हसण्यात शामिल व्हायच्या --त्याचमुळे त्यांच्याबद्दल भीती तर नाहीच पण एक जिव्हाळा नक्कीच जाणवायचा.
म्हणले स्वतालाच --बाहेर कितीही ट्रेनिंग कर आजही तुला त्या नक्की म्हणणार ---काय चुरूचरू तोंड चाललंय ! कुठं शिकून आला एवढं!
या सगळ्या विचारात एक गोष्ट लक्षात आली की मामू गेले म्हणल्यावर मी अगदी सगळ्या उदात्त गोष्टी विचार केल्या, लिहिल्या आणि आज मात्र पुन्हा संधी मिळाली की सगळी शल्ये बाहेर काढून एकदा तरी त्यांना समक्ष ऐकवेनच असे ---मनातल्या मनात मांडे चालू आहेतच !
मग लोक कोणाकोणाला श्रद्धांजली अर्पित करताना काय काय आठवणी काढतात, कसं गेलेलं माणूस सर्वगुण संपन्न होते हे अह्मामिकेने सांगतात याची आठवण आली ---पण या गेलेल्यापैकी जर कोणी लगेचच परत आले तर ---दुसऱ्या दिवशी काय म्हणतील बरे हे लोक !
मी अजूनही काही मामुना फोन केलेला नाही आणि हा आठवडाभर तरी घरी कोणाला फोन करणार नाही ---मनुने अगदी योग्य भाषेत मला सांगितले ----"मम्मा क्या पोपट हुवा तेरा!" आणि हेच वाक्य मला पुढची कित्येक वर्षे वेगवेगळ्या स्वरूपात ऐकावे लागणार आहे ----"गन्ना खडा था" ही जशी सगळ्या खानदानभर पसरलेली आणि सतत बोलून अजरामर झालेली गोष्ट आहे ---तसेच ' मामू गेले' हे ही आतापर्यंत निम्म्या खानदानभर पसरलेले असणार ..
खंत एकच ---आता जाहीर केले म्हणल्यावर पुढच्या भारतभेटीत नक्की फलटणला जावे लागणार- तशी जाणारच होते पण इतक्या वर्षांची सगळी रहस्ये चव्हाट्यावर आणल्यावर आता जायचे म्हणजे ............

मामू .......भाग १

मामू .......दोन भागात लिहिले आहे आधी भाग १ वाचावा 


भाग १



परवा खूप वर्षांनी विठी दांडू खेळले -with some invention to the game.............
नारळ फोडायचा होता --बाहेर concrete वर नेहमी फोडते --कोण एवढ्या थंडीत बाहेर जाणार --म्हणून घरात हातोडा घेऊन मेपल वूड फ्लोरवर प्रयोग सुरु होते --काय टनाटन उडतं होता --ज्यांना विठीदांडू खेळायचा असतो पण विठी ढिम्म हलत नाही त्यांनी नारळ घेऊन प्रयोग करावा!
हे वाचल्यावर आशिषची प्रतिक्रिया -काय छान युक्ती सांगितलीस --पुढच्यावेळी नक्की खेळेन.! पण अशा युक्त्या वेळ निघून गेल्यावरच का सुचतात बरे? सगळे लहानपण --कच्चा लिंबू म्हणूनच गेले --नाही म्हणजे त्यात पण प्रोग्रेशन होते. म्हणजे आधी सगळेजन ओरडून सांगायचे की हा कच्चा लिंबू ---त्याचा अर्थ कळून प्रोटेस्ट करायला लागल्यावर मग डोक्यावर हात ठेऊन काहीतरी सिग्नलिंग असायचे ---पण त्यातही आपण कच्चा लिंबू ठरवले जातो हे समजायला असंख्य युगे लागली होती! विठीदाण्डूने सगळ्या स्मृती जाग्या केल्या.
लहानपण खंडाळा ( पारगाव ) आणि पाचगणीला गेले. विठी दांडू, गोट्या, गलोर, डब्बा ऐसपैस हे नेहमीचे खेळ. दर सुट्ट्यांना आम्ही मामुंकडे फलटणला जायचो. मामू फलटणला इरिगेशनमध्ये, त्यामुळे राहायला इरिगेशन कॉलनीमध्ये. जिथे राह्यलो तिथे आजूबाजूला उसाची शेते आणि कॅनल. त्यामुळे उसात लपाछपी आणि कॅनलला जाऊन मासे पकडणे हे सुट्टीतले नेहमीचे उद्योग. मामू म्हणजे अगदी जमदग्नी, घरी असले की सगळे चिडीचूप पण एकदा दहा वाजता सायकलवर बसून ऑफिसला गेले की --मामीचे कोण ऐकतो --पुढच्या दारापाशी कोणीतरी एकाने थांबायचे आणि मामांची सायकल वळल्याचा इशारा द्यायचा की बाकी सगळे मागच्या दाराने धूम. बिचारी मामी ओरडून थकायची--दाद द्यायला कोणी आसपास तर पाहिजे!
अशीच एक सकाळ --त्या दिवशी मामू सायकलवर बसून गेले आणि आम्ही सगळे उसाच्या शेतात. मोठ्ठे दोन उस तोडून मी गुड्डूला हाक मारली ---उस तोडून मग पुढे कॅनलला जाऊन पाण्यात खेळणे किंवा मामीची साडी लंपास करून मासे पकडणे हा नेहमीचा उद्योग! पण गुड्डू, मुन्ना कोणीच दिसेना. मी आपली मोठा पराक्रम केल्याच्या अविर्भावात --सगळ्यांना हाका मारत होते. उसाची पाने बाजूला करत बाहेर आले तर समोरच्या दारातून मामू आत येत होते. काहीतरी विसरले होते घरी ---त्यांची सायकल वळताना मुन्नाने बघितली होती आणि बाकी सगळ्यांना निरोप गेला होता. मामू सायकल उभी करेपर्यंत कोण पुस्तक घेऊन बसले होते तर कोणी मामीला लसून सोलून देत होते. मामुंची एन्ट्री पुढच्या दारातून आणि मी मागच्या----
मामुंचे आणि समोरच्या शेतामालकाचे पाणी सोडण्यावरून नेहमीच बिनसायचे--त्यामुळे त्या शेतात जायचे नाही असे फर्मान मामुंनी आधीच काढले होते. त्यात आज सकाळी कोण --काय काय कामे करणार, काय वाचन करणार हे सकाळच्या नाश्त्याच्यावेळी पुन्हा पाठ करून घेतले होते आणि फक्त अर्ध्या तासामध्ये उसाचे दांडके जसे काडकाड गुडघ्यावर मोडावे तसे --ते फर्मान मोडून - उसाच्या पानांनी चरा- चरा कापलेल्या हातात दोन उस घेऊन गड जिंकल्याच्या जोशात मी मागच्या दारात ..
अगदी खिंडीत गाठलेल्या मावळ्यासारखी मी एकदम भौचक्का---मामू काही बोलायच्या आधी माझी सफाई ----नही मामू वोह गन्ना वहापे खडा था! ( म्हणजे मी तोडला नव्हता--असे म्हणायचे होते)
कान धरून मामुनी मागच्या दारात नेले --आणि अंगुलीनिर्देश करून ---देख सारे गन्ने वहापे खडे है म्हणून दाखवले! त्या दिवशी काय काय शिक्षा झाली --तो भाग वेगळा पण गेली पंचवीस वर्षे --फलटणची आठवण म्हणजे गन्ना खडा था ---अशीच आहे
मामू तसे खूप हौशी ---भरपूर वाचायचे, दिवाळी सुट्टीत सगळे दीपावली अंक घरी असायचे, फटाके, रांगोळ्या, फराळआचे सगळे पदार्थ स्वतः मामीबरोबर बसून करायचे. घरी असले की सगळे शिस्तीत सगळी कामे वेळच्या वेळी करणार ---एकदा बाहेर पडले की बिचारी मामी ---ओरडायची खूप ---आवडता शब्द --उंडगी मेली ( आवडता म्हणण्यापेक्षा --तिला आम्ही दुसरा काही पर्याय ठेवला नव्हता). एकदा शनिवारी सकाळी ती भाकरी करत होती --शनिवार - मामुंचा हाफ डे म्हणून आम्हीही कुठे उंदगायला गेलो नव्हतो ---पण काहीतरी धुडगूस चालू होता. तिने वैतागून हातात लाटणे घेऊन आमच्या मागे धावली ---समोर चटई पडली होती त्यावरून पाय घसरून पडली. दोन महिने पाय प्लास्टर मध्ये होता. नंतर तिने कधीही आमच्या मागे धावायाचा किंवा आम्हाला सुधारायचा प्रयत्न केला नाही.
मामुंचा सगळ्यानी सगळे शिकले पाहिजे -- असा कटाक्ष ( सासुरवास ). सगळ्या गोष्टीत त्यांची शिकवणी ---म्हणजे हस्तक्षेप.. एकदा संध्याकाळी आम्ही सगळे बच्चेकंपनी दोरीवरच्या उड्या खेळत होतो! लाल -हिरवा -पिवळा ....लाल -हिरवा -पिवळा ; माझी मामेबहीण अमिना लहान होती --प्रत्येकवेळा लवकर आउट व्हायची . मामू नुकतेच ऑफिसमधून आले होते --मध्येच सूचना आणि लगोलग प्रात्यक्षिक दिले नाही तर मामू कसले? तैयबच्या हातात दोरीचे एक टोक , माझ्याकडे दुसरे --'बघा आता, म्हणा लाल- हिरवा- पिवळा --असे सांगून त्यांनी दोन उड्या मारल्या असतील ---तिसऱ्या उडीसरशी त्यांची लुंगी खाली---हसायची पण चोरी...... त्यानंतर जेव्हा जेव्हा दोरीवरच्या उड्या खेळलो तेव्हा लाल- हिरवा- पिवळा ---आणि लुंगी --असा तैयबचा आणि माझा नेहमीचा जोक. पण या घटनेतून कौटुंबिक जीवनातील एक महत्वाचा नियम शिकलो ---लहानांची फजिती झाली की सगळ्या खानदानला ती गोष्ट सांगितले जाते --गन्ना खडा था चे लेबल -- पण मोठ्यांच्या बाबतीत अशी सार्वजनिक फजिती झाली की त्याबद्दल जाहीरपणे बोलायचे नाही!
असे माझे मामू --आणि असे त्यांचे असंख्य किस्से ---बऱ्याच वेळा लिहायचा विचार केला --पण नेहमीप्रमाणे राहून गेला .. काल फोनवर मांचा एकदम कापरा आवाज --हमीद मामू गेले! त्यानंतरच्या सुन्न क्षणात आणि ओघळणाऱ्या अश्रुमधून पण असे काही आठवले की मध्येच हसू पण येत होते.
इथल्या बाल कल्याण विभागात काम करताना ज्या अगदी "कॉम्प्लेक्स" केसेस असतात त्यामध्ये दोन गोष्टी आता कायद्याने बंधनकारक ठरवल्या आहेत ---एक ' Family Group Conference" आणि दुसरे "Family Therapy" चा वापर. यामध्ये जवळच्या सगळ्या नातेवाईकांना बोलावून त्यात जे नातेवाईक त्या मुलांना वेळ देऊ शकतील, त्या मुलांच्या गरजा विशेषता भावनिक गरजा भागवू शकतील त्यांना त्या मुलांच्या संगोपनात कसे सामील करता येईल --यावर कोर्ट आम्हाला काम करायला सांगते. या प्रक्रियेमध्ये एका मुलामागे कमीत कमी ६-८ प्रोफेशनल्स ३ ते ९ महिनेपर्यंत काम करतात ---या कामावर नंतर रिसर्च करणारे लोक आणि वेळ काही गणलेला नाही !
या प्रत्येक केसवर काम करताना मला मामुंची आठवण येते --त्यांनी दिलेला वेळ, शिकवलेल्या गोष्टी, लादलेली शिस्त, केलेल्या शिक्षा, घरच्या सगळ्या कामात दामटून लावलेल्या पाळ्या, तालुक्याच्या ठिकाणी आलेली सर्कस किंवा इतर ठिकाणी नेलेल्या सहली ---या सगळ्या गोष्टी " केस प्लान" करताना आठवत असतात. त्याचबरोबर असे प्लान करून खरेच या मुलांना, त्या नातेवाईकांना कितपत आपण एकत्र आणू शकू याचीही गोळाबेरीज चाललेली असते ----आणि मग नेहमीची जाणीव ---आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडवून आणता येतात ...पण ज्या सहज घडतात त्यांची मजा काही औरच असते.........मामू तुमच्यामुळे आमच्या बालपणाला जे विविध रंग मिळाले त्यांना लाल --हिरव्या--पिवळ्या अशा कुठल्याही सूत्रात नाही बांधता येणार आणि ना तर कुठल्या थेरपीत मोलता येणार ...................
एकच खंत ---प्रत्येक वेळी अशी आठवण आली की नेहमी ---पुढच्यावेळी भारतात गेल्यावर दोन दिवस फलटणला जाऊन येईन ---आणि या सगळ्या गोष्टी तुमच्याशी होतील ----हा प्लानच राहिला .....


लंडन आणि बॉलीवूड

लंडन आणि बॉलीवूड

माझा लंडनमध्ये अगदी पहिलाच आठवडा! वसंत ऋतू इथे एक एप्रिलला सुरु होतो. पण अजूनही काळवंडलेले आकाश आणि बोचरी थंडी यामुळे लंडन काही फार आकर्षक वाटत नव्हते. लंडनला येण्याआधी जी उत्सुकता आणि उत्साह होता तो फार काही जाणवत नव्हता. सहा वर्षाच्या मनुला सोडून आले होते. शिवाय माझी जिथे रहायची व्यवस्था होती ते बेड अँड ब्रेकफास्ट ठिकाण फारच अनाकर्षक होते -- त्यामुळे कदाचित घरची आठवण फार येत होती -- सलग चौथ्या दिवशी थंड सँडविच खावे लागल्यामुळेही त्या दिवशी संध्याकाळी फारच मलूल वाटत होते. बँक स्टेशनात जाऊन ग्रीनिचची ट्रेन घेऊन परत चालले होते. लंडनच्या अंडरग्राउंड ट्यूबवर जाण्याचाही तसा पहिलाच अनुभव. खोलवर जमिनीत असणाऱ्या फलाटावर उभे राहून बोळकांड्यातून येणारी लांबलचक ट्रेन बघत होते -- ती ट्रेन वेगाने कर्कश आवाज करत निघून गेली आणि समोरच्या भिंतीवर चक्क शाहरुख आणि प्रीती झिंटा दिसले. दोघांचीही मी मुळीच फॅन नाही आणि शाहरुखचा सिनेमा म्हणजे शिक्षा असे माझे मत -- पण तरीही त्या पोस्टर कडे बघून मला फार बरे वाटले होते... त्या नवीन शहरात अगदी कोणी सोबत आहे असे वाटून दिलासावजा आनंद झाला होता.
हिंदी सिनेमा इथे फार पॉप्युलर आहे ते ऐकले होते -- पण ते फार फार तर इथल्या पंजाबी किंवा गुजराती समाजात असतील अशी धारणा होती -- ( Thanks to करण जोहर and his NRI based movies). पण इथली बॉलीवूडची खरी क्रेझ अजून मला कळायची होती!ट्रेनिंग संपून मी कामाला सुरुवात केली त्यादिवशी ऑफिस टीम बरोबर ओळखीचा कार्यक्रम -- मध्यमवयीन गोरी ब्रिटीश डोना, आमची admin officer म्हणे
"I know you are from Bollywood city. I have been waiting for you. My daughter is a big fan of Bollywood movies and we would like to know the meaning of all the songs on which she loves to dance."
एक -दोन क्षण मला काही संदर्भ लागला नाही. नशीब तेवढ्यात मॅनेजरने दुसऱ्या कोणाशी ओळख करून दिली. लेकीन ये बॉलीवूड ऐसा पीछा छोड्नेवाला नही था! दोनच दिवसांनी सकाळी मी माझे टेबल लावत होते तर एक उंच, काळा, डोक्यावरचे निम्मे केस गेलेले आणि सोनेरी कडांचा चष्मा लावलेला तिशीतला माणूस समोर उभा.
"मी दहीर, याच टीम मध्ये आहे. तुझे स्वागत ...
"माझ्या लहानपणी खूप हिंदी सिनेमा पाहिले, मिथुन माझा आवडता हिरो. त्याची फायटिंग खूप आवडते अजून मला. तो जोश हॉलिवुडऍक्शन मूवीमध्ये नाही वाटत... "
आता मात्र माझे उसने हसू जाऊन डोळे विस्फारायला लागले होते. नंतर कळले की त्याला आणि त्याच्या पिढीतल्या कोणाही सोमालीया, युगांडा, केनियातल्या इस्ट आफ्रिकन लोकांना हिंदी कळत नाही, पण त्यांच्या लहानपणी तिथे आपल्यासारखे तंबू लावून हिंदी सिनेमा पाहिले जायचे. अर्थात ही इष्टोरी मला खूप नंतर दुसऱ्या सोमाली सहकारी मोहम्मदकडून कळली. हा थोडा आधीच्या पिढीतला. याला शम्मी कपूर आणि देव आनंद च्या सगळ्या गाण्यांच्या ट्यून आणि पहिल्या ओळीतले तुटक शब्द येतात. काम करता करता अजूनही मधेच साक्षात्कार झाल्यासारखा तो येतो आणि 'hey what after दिल्ल देके देखो' असं काहीतरी विचारतो! किंवा बिझी ड्यूटी डेस्कवर असताना मध्येच अगदी ठेका धरून 'ऐ गुलबदन' ची चाल किती छानआहे ना असे विचारतो. कपाळाला हात!
आता सवय झाली आहे म्हणून एक तर संदर्भ माहित आहे आणि त्याला काय म्हणायचे हे कळते तरी. त्याला नेमके ते गाणे शोधूनयूट्यूबची लिंक पाठवणे हा नेहमीचा होमवर्क झाला आहे! पण तरीही 'गुलबदन' ची पुढची ओळ, संदर्भासहित स्पष्टीकरण द्यायचे असेल तर मी त्याला ऍडव्हान्स क्लासला, म्हणजे दुसऱ्या टीम मध्ये काम करणाऱ्या हिंदीभाषिक वृन्दाकडे पाठवते!गेल्या पाच वर्षात आमच्या क्लासमध्ये मिथुन पासून अमिताभ, शाहरुख, शिल्पा आणि गेल्यावर्षी " जय हो " असे असंख्य लेसन्स आले. दुसऱ्या देशामध्ये असताना आपण आपल्या देशाचे जाणता -अजाणता प्रतिनिधित्व करत असतो,, पण कधी बॉलीवूडचे स्पेशलिस्ट रिप्रेझेंटेशन प्रोफेशनल लाईफमध्ये करू असा विचारही नव्हता केला.
लेकीन यह पिक्चर यही खतम नही होती है! ऑफिसमध्ये ही चर्चा अनौपचारिकपणे करता तरी येते. पण ज्या लोकांबरोबर मी काम करते, त्यांच्या घरी केस असेसमेंटसाठी गेलेले असताना, बऱ्याच बांगलादेशी कुटुंबात अगदी 'बकरा ' सापडल्यासारखे हिंदी सिनेमाच्या डायलोगांच्या धर्तीवर हिंदीत संभाषणाचा अट्टाहास होतो, तेव्हा मात्र "हिंदी सिनेमे कसे घातक असतात आणि ते ताबडतोब बंद केले पाहिजेत आणि विशेषता सगळ्या खान कंपनीमुळे सांस्कृतिक ऱ्हास होतो आहे" अशी ओरड करणारा ग्रुप मला जॉईन करावासा वाटतो!
एकतर सोशल सर्विसवाले आले की इथे लोकांची धाबी दणाणलेली असतात. बंगाली कुटुंब असले की त्यांना मला बघून थोडे हायसे वाटते. 'तुमी बांगाली?' असे दारातच विचारतात. ( त्यांची सीलेटी बंगाली आणि मराठीत खूप साम्य आहे ). नाही. इंडिअन? इंडिअन? असे करून आपल्या संस्कृतीत किती साधर्म्य आहे असा पाढा सुरु होतो. विशेषता जेव्हा आई -वडील मुलांना शारीरिक शिक्षा करतात किंवा नवरा बायको मध्ये विसंवाद असतो तेव्हा टिपिकल आर्ग्युमेंट अशी की आम्ही सुसंस्कृत आहोत. इथल्या स्वैर गोऱ्या किंवा रानटी काळ्यांसारखे नाही! (domestic violence and physical chastisement both are thoroughly investigated if there are children at home). हो बाबानो -- मुलांना आणि बायकोला घरी बडवण्यात आपली महान संस्कृती खरच एक आहे. यात तिळमात्रही शंका नाही. पण त्यांची केस जरा समजून घ्यावी ( म्हणजे ढील द्यावी ) म्हणून जेव्हा ते स्टार प्लसच्या सिरिअल्सचा वास्ता देतात तेव्हा मात्र खरच एकता कपूरला उलटं टांगल्याशिवाय पर्याय नाही हे मनोमन पटते!
violence and crime वरून मला नेहमी डेरिल आठवतो. आम्ही केस तपास कामात इथल्या स्पेशालीस्ट पोलीस टीम बरोबर बऱ्याच वेळा जातो. डेरिल हा सगळ्यांचा आवडता पोलीस ऑफिसर --कामात निपुण पण वर्दीचा बडेजाव नाही. उंच, धिप्पाड आणि हसतमुख. अगदी सिरिअस केस असेल आणि इक्विपमेंट लागणार असतील तरच ऑफिसची गाडी वापरणार. एरवी सायकल, पायी किंवा पब्लिक ट्रान्स्पोर्ट. अशाच एका व्हिजिटवरून परतताना गप्पा चालू होत्या. मी त्याला म्हणले,
"तुला भारताबद्दल बरेच माहित आहे."
"काय करणार ... माझी बायको पंजाबी आहे आणि मी बऱ्याचवेळा भारतात गेलो आहे ... "
मग काय मुंबई, ताजमहाल, इंडिअन करी ... असे विषय निघता निघता हिंदी सिनेमा आलाच! डेरिल अगदी लाल होऊन हसत सांगत होता.
"पहिली भारतभेट ... रीनाच्या घरी जेऊन सगळे बसले होते, तिला जुने सिनेमा आवडतात म्हणून मदर इंडिया पाहत होतो. मला सिनेमापण कळत नव्हता आणि सगळे एवढे का रडतात -- सिनेमातले आणि घरातले -- तेही कळत नव्हते. नुकतेच ट्रेनिंग संपल्यामुळे त्या बाईने ती बंदूक नीट धरली आहे का, तिला पेलवेल का असा विचार करत, अग्ग बाई एवढी ओरडू नकोस; फोकस जाईल. असे ओरडून सांगावेसे वाटत होते. पण तिथे बसलेल्या कोणालाच माझ्या डोक्यातल्या या कश्मकशबद्दल सांगता येत नव्हते! आज वीस वर्षांनी मला तिची भाषा कळते, सिनेमेही कळतात. पण लोक, सिनेमातले आणि (आता) माझ्या घरातले का असेडायलॉग मारून, ओब्सेसिवली का रडतात -- ते अजूनही उमगत नाही!"
डेरिल, अरे तो मॅजीक फोर्म्युला तुला कळला तर नोकरी सोडून तू नक्की हिंदी सिनेमात काम करशील ( नाही तरी Tom Alter चा ब्रिटीश अधिकारी बघून आम्ही थकलो आहोत.
सिनेमाची तिकिटे परवडत नाहीत म्हणून इथेही पायरेटेड सीडींचा व्यवसाय मोठा आहे. कुठल्याही आशियाई विभागात गेलात तर पाच पौंडला पाच सीडी मिळतात. मी इथे आल्यावर नोकरी करत पुढे पीएचडी करायचीच या विचाराने पैसे साठवून आधी लॅपटॉप घेतला . पण त्याचा उपयोग मात्र नवीन-जुने, राहून गेलेले सिनेमा पाहण्यातच केला हे सांगणे नलगे! नवीन शहरात, नवीन लोकांमध्ये जाणवणारा एकाकीपणा या सिनेमांनी खूप अंशी दूर केला आणि अगदी डिप्रेस्सिंग थंडीत एका आपलेपणाची मानसिक ऊबही दिली! अशी भावना असणारी मी एकटी नाही. अजूनही इथल्या ex-pat किंवा इतर देशातल्या मित्र मैत्रिणीशी ( thanks to facebook ) गप्पा होतात तेव्हा हा हिंदी सिनेमाशी असणारा bonding factor खूप जाणवतो. सिनेमाचे Review बघायला आता टाईम्स लागत नाही.. facebook च्या updates ने सर्व पैलूंची समीक्षा कळतेच. आणि जोडीला महिन्यातून एकदा लंच टाईम मध्ये आमच्या इंडिअन ग्रुप मध्ये बसले की सैफ चे नवे प्रकरण, फराह खान ला तिळ्यानंतर येणारे प्रोब्लेम्स, शाहरुख आणि करण जोहरचा चा सिनेमा विक्ण्यासाठीचा नवीन स्टंट, जोधा अकबरचा इंडिअन ज्वेलरी बाजारावरचा परिणाम अशा सगळ्या जिव्हाळ्याच्या बातम्या कळतात. आणि फराह खानला किती डिंक लाडू लागतील रिकव्हर व्हायला, यावर एकमत होताना दिसत नाही. अशावेळी परत आपल्या टेबलवर जाण्यात मला शहाणपणा वाटतो!
बॉलीवूड चा हा प्रभाव इथल्या स्थायी झालेल्या ( फक्त भारतीय नाही ) तर आशियायी समाजावर ठळकपणे जाणवतो. कुठल्याही आशियायी भागात ओळीने Indian वेअर च्या दुकानात सगळे जरीकाम केलेले भरजरी कपडे दिसतात--आणि ही दुकाने इथे वाढतच आहेत. साधे सुती कपडे वापरण्यावर आणि त्यातल्या त्यात भारी म्हणजे Fab India ची साडी किंवा कुर्ता असे मानणारी मी फारच misfit आहे असे वाटते. एकदा एका ट्रेनिंग मध्ये रिसोर्स पर्सन म्हणून आलेल्या गिल शी चांगली गट्टी जमली. तिला नंतर घरी बोलवताना पत्ता सांगितला.
"अरे तू इल्फर्डला राहते, मला तिथे नवीन एक दुकान सुरु झाले आहे, तिथे यायचे होते." म्हणाली.
आता तोपर्यंत गिल मैत्रीण या कॅटेगरीत आलेली; म्हणून फटकन बोलून गेले,
"इई! कोण ते कपडे घालत असेल! कळत नाही मला?"
गिल ने मला दिलेला लूक म्हणजे मैत्रीच्या शिखरावरून केलेला कडेलोट असा होता!!!
असाच एक शनिवार- सगळी कामे आटोपून काहीतरी छान बघावे असा विचार करून इस्ट हम मधल्या एका व्हिडियोच्या दुकानात गेले . सरकार नुकताच रिलीज झाला होता.
कौंटरवरच्या पंजाब्याने हसून विचारले, "कुठला सिनेमा बघायचा आहे?"
मी त्याला विचारले, "सरकार आहे का? "
"फोटो प्रिंट आहे, चालेल का?"
"नको."
"... "
"अच्छा वो आपके पास 'समय' का सीडी मिलेगा?" मी.
तो म्हणे, "मैने तो सुना नही."
"अरे वो, उसमे सुश्मिता सेन पोलीस अफसर है."
"नही वो नही है."
"अच्छा वोह 'कंपनी' का दुसरा पार्ट रिलीज हुआ है, वोह है क्या ?"
मुंबईत राहिल्यामुळे आणि माझी एक मैत्रीण criminology शिकवत असल्यामुळे gangwar आणि underworld हे तसे इंटरेस्टचे विषय. त्यामुळे तो नाही म्हणाल्यावर चेहऱ्यावरची नाराजीची प्रतिक्रिया काही लपली नाही. तो उत्साहाने मला त्याच्याकडच्या नवीन सीडी दाखवू लागला. मी त्याला वैतागून म्हणाले, "मला शाहरुख आणि सलमान नको आहे!"
उसके चेहरेका हाल बयान नही कर सकते! मी परत जायला निघणार तेवढ्यात त्याने विचारले, "आप पोलीस हो या फिर underworld से जुडे हो?"
"आपको क्या लगता है?"
"... नही चेहरेसे तो शरीफ लगते हो!"
"... ठीक है अगलेबार एक हाथ मी सिगरेट और दुसरे मी बोतल ले आवूंगी. आप 'Don' का म्युझिक चालू रखना!"
दोघेही छान हसलो. तेव्हपासून या हरीभाईने जो सीडी मांगा - वोह लाकर दिया !
काही महिन्यानंतरचा असाच एक शनिवार. आपण आयुष्यात काही करत नाही आहोत म्हणून नेहमीप्रमाणे स्वतावर वैतागले होते! खूप दिवसापासून अरोरा नावाच्या एका मित्राच्या मित्राचे इमेल्स येत होते. लंडनमधल्या भारतीय प्रोफेशनल्सचा एक ग्रुप आहे --त्याची सभासद व्हावे म्हणून आमंत्रण होते. आज जायचे ठरवले. तिथे जाऊन अर्धा तास झाला तरी अरोरा महाशय सोडले तर कोणी यायचे चिन्ह दिसेना. आम्ही लेस्टर स्क्वेअरच्या जवळ असल्यामुळे सिनेमाला जायचे ठरवले आणि अरोरांनी मला इंडिअन प्रोफेशनल नाही पण सिनेवर्ल्ड पासची ओळख करून दिली. फक्त ११ पौंड मध्ये महिनाभर हवे तेवढे सिनेमा बघा!
घरी आल्यावर माझ्या housemate ( घरमित्र म्हणूयात ) अन्वरने विचारले.
"मग काय आयुष्याची दिशा सापडली का नाही?"
त्याला मी सिनेवर्ल्डच्या त्या कार्डाबद्दल सांगितले! नंतरचे सगळे शनिवार आम्ही इमाने इतबारे इल्फर्डच्या सिनेवर्ल्डमध्ये असायचो!
अन्वर त्रिचीचा. पण दोन वर्षे दिल्लीला राहिल्यामुळे हिंदी बऱ्यापैकी बोलायचा ! पण स्त्रीलिंग - पुल्लिंगाचा सतत घोळ. त्यामुळे चतुर रामलिंगमच्या आधीपासून ( श्लोक वगळता ) भाषेचे सगळे जोक्स त्याच्यावर करून झालेले! आला त्याच आठवड्यात मी कोणाशीतरी फोन वर बोलताना 'अरे वैसा मत करना! वाट लगेगी' असे म्हणलेले ऐकले आणि अगदी विस्मयचकित होऊन तुला'मुन्नाभाई भाषा' येते? असे विचारायला आला. तेव्हापासून आमची सिनेमदोस्ती सुरु!
सिनेमाला जायच्याआधी तो वॉर्निंग द्यायचा. 'जोरात हसू नकोस. तू फार जोरात हसतेस.' पण सिनेमा चालू असताना दोन मिनिटांनी त्याला तोच जोक समजाऊन सांगितला की याचा आवाज सगळ्या थिएटरमध्ये ऐकू यायचा. कारण तोपर्यंत बाकीचे पब्लिक शांत होऊन पुढचा भाग बघत असायचे !
हिंदी सिनेमाचे त्याचे ज्ञान तर फारच अगाध. माधुरी दिक्षित कोण ते माहित नाही. बऱ्याचवेळा अमक्या हिरोचा तमका सिनेमा असा विषय चालू असायचा आणि नंतर कळायचे अरे हा तर तिसऱ्याच कोणाबद्दल बोलतो आहे. आता 'धमाल' सिनेमामधले शाब्दिक जोक समजावणे सोपे आहे पण 'ओम शांती ओम' बघायला गेलेलो असताना राजेश खन्ना ष्टाईल हा प्रकार कसा समजाऊन सांगायचा? किंवा 'मनोज कुमार च्या त्या एंट्रीवर का लोक हसले... हे ज्याला मनोजकुमार कोण हेच माहित नाही त्याला कसे सांगणार. पण असा प्रयत्न सोडला तर तो अन्वर कसला. घरी आल्यावर त्याने स्टोरी लाईन पासून त्यातले सगळे कॅरेक्टर्स समजून घेतले आणि दुसऱ्या दिवशी परत तो सिनेमा बघून आला, एवढेच नाही तर एक महिन्यानंतर त्रीचीला गेलेला असताना त्याच्या बायकोला -- दोन वाक्ये हिंदी येत नाहीत ---घेऊन पुन्हा त्याच सिनेमाला गेला!
मनूही हा सिनेमा बघताना सोबत होती. दोन आठवड्यानंतर मी एका इंटरव्यूला निघाले होते. थोडी नर्वस होते --तिचा अगदीजेन्युइन प्रयत्न मला चीअर अप करायचा.
"अरे मम्मा, सच्चे दिल से मांगो तो 'कयामत' भी मिल जाती है!"
मी तोंड विस्फारून व्हॉऽट म्हणाले. मग लक्षात आले की तिला 'कायनात' म्हणायचे होते.
समजाऊन सांगायला लागले तर "whatever mamma" म्हणून गेली पण.
असे आणखी बरेच अनुभव ---हिंदी सिनेमा के साथ साथ वोह भी बढ रहे है ---पण पुन्हा कधी --पिक्चर अभी बाकी है दोस्तो ....


लंडनमध्ये मराठी

लंडनमध्ये मराठी


लंडनमध्ये मराठी
लंडनमध्ये पहिल्याच महिन्यात निरीक्षणात आलेल्या काही गोष्टी -- त्यापैकी एक म्हणजे इथे इतर भाषिकांचे जसे समूह दिसून येतात तसा मराठी माणूस काही एकत्र दिसत नाही. इथल्या प्रमुख भारतीय भागांमध्ये वेम्बली गुजराथ्यांचे, साऊथहाल पंजाब्यांचे आणि इस्टहॅम प्रामुख्याने तमिळ लोकांचे अशी वर्गवारी स्पष्ट दिसून येते. आणि अर्थातच याचे प्रतिबिंब इथल्या संस्कृतीत दिसते - इथली उपहारगृहे, इथे सार्वजनिकरित्या साजरे होणारे उत्सव, कपड्यांची व इतर वस्तूंची दुकाने, मंदिरे इत्यादी. साहजिकच जितके पंजाबी, गुजराती, तमिळ इथे ऐकायला मिळते त्या तुलनेत मराठी अगदी क्वचित कानावर पडते. मी ज्या स्थानीय प्रशासनसंस्थेत काम करते त्या भागात एकूण ९४ भाषीय लोक राहतात आणि त्याचा अर्थ त्यापैकी कोणालाही इंग्रजी येत नसेल तर त्यांच्याबरोबर काम करताना आम्हाला भाषांतरकारांना बोलवावे लागते. इथे शासकीय प्रचारपत्रांमध्येही इतर भाषांचा समावेश असतो. उदा. इथल्या सरकारी इस्पितळात इथे पंजाबी, गुजराती असल्यामुळे त्यांची पत्रके त्या भाषांमध्ये छापलेली असतात. किंवा जो पत्रव्यवहार केला जातो तो जर इंग्रजी समजेत नसेल तर त्या त्या भाषेत भाषांतरित करण्यासाठी टेलिफोनवर भाषांतरकार उपलब्ध असतात. या ९४ भाषांमध्ये बऱ्याच युरोपिअन, आफ्रिकन आणि आशियायी भाषा आहेत पण मराठी नाही. अर्थात याचा अर्थ मराठी लोक जिथे जातात तिथे इतर भाषा अवगत करून त्यांचे गाडे चालते असा होतो किंवा इंग्रजी येत नसले तरी हिंदीत काम चल जाता है!
मराठी मातृभाषा असली तरी घरी आणि कामाच्या ठिकाणी हिंदी, इंग्रजीची सवय असल्यामुळे मराठी इथे काही मी मिस करत होते अशातला भाग नाही. पण एके दिवशी घरी परतताना रेल्वे स्थानकाच्या बाहेरील बस स्टोपवर कोणीतरी मराठी बोलताना ऐकले. थोडे मागे वळून बघितले आणि तशीच पुढे गेले. पण पावले थबकली आणि कान टवकारले गेले --कारण ती मुले नुसतीच मराठी नाही तर अस्सल कोल्हापुरी मराठी बोलत होती. मग मला काही राहवले गेले नाही. परत वळून मागे गेले आणि विचारले -सातारा, सांगली का कोल्हापूर? मग कोण कुठले याच्यावर बोलणे झाले आणि त्यांनी मला विचारले -' गाववाले चला आमच्याबरोबर जेवायला '.
' नको' नको ' पुन्हा केव्हातरी असे म्हणून मी सटकणार होते -तर त्यांचाआग्रह चालू होता. शेवटी म्हणूनच गेले --हे काय कोल्हापूर, सातारा आहे का इथे पौंडात खर्च होतो --आणि तुम्हे सगळे इथे नवीन आणि त्यात विद्यार्थी! 'काय फरक पडत नाही ' चल आमच्याबरोबर.'
ठीक आहे बाबा, ( नाहीतरी घरी जाऊन परत खिचडीच खावी लागणार ) म्हणून जायचेठरवले. कुठे जाऊयात?
इथे थोडे पुढे गेले की चांगली जेवणाची जागा आहे असे म्हणून आम्ही बसमध्ये बसलो. बऱ्याच गप्पा झाल्या. मग उतरून थोडे पुढे चालत गेलो आणि हा सगळा घोळका एका गुरुद्वारयाच्या समोर उभा. मला काहीच संदर्भ लागेना. नंतर त्यांनी स्पष्ट केले -संध्याकाळचे जेवण ते इथे लंगर मध्ये येऊन खातात. मिश्कील हसत त्यातला एक जण म्हणाला --म्हणून तर अगदी बेधडक म्हणालो -चला जेवायला!
भारतीय विद्यार्थ्यांमध्ये इथे गुरुद्वारा किंवा काही ठराविक मंदिरांना- सोहो मधले हरेकृष्ण मंदिर -जास्त आवडते --भेट देण्याचे महत्वाचे कारण म्हणजे -लंगर- प्रसाद म्हणून छान जेवण मिळते.
लंडनमध्ये मराठी भाषा आणि मंडळी भेटली ती अशी! कुठेही, कधीही! आणि ज्या कोणाशी थोड्य ;नमस्कार चमत्कारापुढच्या गप्पा होतात ते पहिल्यांदा वडा-पाव ची आठवण काढून इथे कोणीतरी एक गाडा सुरु करणे कसे आवश्यक आहे हेसांगतात. गेल्या पाच वर्षात अजून काही कोणी त्या योजनेची अंमलबजावणी केली नाही. त्यातले "मराठीपण" वेगळे सांगायला नको.
एक दिवस ऑफिसची;एक मिटिंग संपवून बाहेर आले . माझ्या मागोमाग एक मुलगा लगबगीने आला --
"तू मुंबईची का पुण्याची गं?"
"तुला कसे कळाले --मी मुंबई/ पुणे का मराठी ते ?"
"त्याचे काय आहे , तू ज्या पद्धतीने प्रश्न विचारला तसे इथे कोणी बोलत नाही ."
"म्हणजे ?"
तेव्हा मानसिंगने बाकीचे विषय काढून वेळ मारून नेली खरी. पण नंतर खरे सांगितलेच --असले भोचक प्रश्न इथे कोणी विचारत नाही. मला काय विचारले होते ते ही आठवत नाही पण त्यानंतरच्या लंच टाईम मस्त मराठीत गप्पा झाल्या आणि त्या भोचक प्रश्नांचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे मला पुढची तीन वर्षे एक चांगला मित्र मिळाला.
मानसिंग मंचरचा - लंडनमध्ये पीएचडी करत होता. त्यानंतरच्या शनिवारी घरीजेवायला आला आणि माझ्या इतर अमराठी घरमित्रांबरोबर त्याची समवयस्क असल्यामुळे चांगलीच गट्टी जमली. अगदी उत्साहात त्यांच्याशी गप्पा मारणार --पण मध्येच मराठीत --आपलं याला काय म्हणतात रे ? असे ५-६ वेळा तरी विचारणारच. गेल्या वेळच्या फ़िफ़ा फुटबॉल सामन्यांच्यावेळी घराला अगदी रण धुमाळीचे वातावरण आले होते. मला एक तर आपल्या खोलीत शांत बसून राहणे किंवा सगळ्यांसाठी जेवण बनवणे एवढे दोनच पर्याय शिल्लक ठेवले होते. मानसिंग जोशात आला की मला अगदी शिवाजीचे मावळे आठवायचे --अरे पळ, पळ पळ. अरे मार ना ... ये .. अरे ....आणि मध्ये बरेच काही! त्यात अखेरच्या सामन्याच्या वेळी अगदी कहरच --त्या झिदानला लाल कार्ड मिळाले आणि त्याबरोबर मानसिंगच्या सगळ्या शेलक्या मराठमोळ्या शिव्या ---इतक्या उत्स्फुर्तपणे, वेगाने आणि मनापासून बाहेर पडल्या ----लहानपणी सुभाषिते/ श्लोक पाठांतराच्या स्पर्धा असतात तशा याच्या गावात काही वेगळे पाठ करायची स्पर्धा होती की काय असा प्रश्न पडला. त्यानंतरची पूर्ण संध्याकाळ राहून राहून आणखी काही राहिलेल्या शेलक्या वचनांची उजळणी होत राहिली --हे सांगणे नको.
मध्ये काही कारणानिमित्त मला दोन आठवड्यासाठी घर बदलावे लागले. इस्ट हॅममध्ये एका शेअर्ड अकोमोडषन मध्ये राहत होते. आजूबाजूच्या रूममध्ये कोण राहते असे विचारले तर कळाले की बाकी सगळे तमिळ पण खालच्या खोलीत कोणीतरी मुंबईचे जोडपे आहे. त्या दिवशी खूप पाउस आणि थंडी होती त्यामुळे कुठे बाहेर जाता येत नव्हते. संध्याकाळी खालच्या रूमचा उघडण्याचा आवाज आला आणि कोंडवाड्यातून सुटल्यासारखी खाली पळाले. समोरच्या मुलीच्या गळ्यात उलटी वाटी असलेले मंगळसूत्र. अरे हे तर मराठी दिसतात म्हणून मराठीतच बोलले --तर ही अनिका अगदी गळ्यात पडली. किती छान वाटले कोणी मराठी बघून ... तिने लगेच छान चहा केला आणि पुढचे वर्षभर छान मसाला चहा मला मिळत राहिला.
अनिका नगरची --पेशाने वकील आणि आई -वडील वकील असल्यामुळे तशी खानदानीवकिली अंगात भिनलेली. सगळ्या गोष्टीत ठाम मते. त्यात शासकीय कारभार म्हणजे अनागोंदी आणि भ्रष्ट अशी काळ्या दगडावरची रेघ. कुठलेही बिल आले की त्याचा शहानिशा करून ते कसे चुकीचे आहे हे सगळे त्यासंदर्भातले कायदे /नियम तपासून सिद्ध करणार. पण प्रत्येक वेळी कुठल्याही कार्यालयात गेली की मला दोन फोन नक्कीच की तिथला कर्मचारी तिचे काही ऐकून घेत नाही --आता कोणाला भेटू? तिचा फोन न घ्यायची बिशाद नव्हती. चुकून वोयीसमेलवर गेला की --शामत आ जाती थी! एकदा मिटींगमध्ये असताना चारवेळा फोन वाजला ---बाहेर येऊन घेतला तर म्हणे :
'मी दुसऱ्याफोनवर आईशी बोलते आहे. ती विचारते आहे अनिलबद्दल , मलाम्हणायचे आहे की तो माझ्यासारखा extrovert नाही, पण तिला extrovert म्हणजे काय ते कळत नाहीये. मला मराठीत शब्द सांग ---एकतर महत्वाची मीटिंग सोडून आले होते --त्यात इतका गंभीर प्रश्न डोक्यात घुसायला आणि प्रोसेस व्हायला वेळ लागला. त्यात तिचे समन्स पाठ्वल्यासारखे विचारणे.--मला काही मराठीत शब्द सुचत नव्हता. extrovert ---काय बरे ----पटकन तोंडातून बाहेर पडले --"बाहेरख्याली'! आपण चुकीचा शब्द सांगितला हे कळायच्या आधी बरेच 'चुकीचे बरोबर' शब्द ऐकवले गेले होते.
काही दिवसांनी असाच आणखी तातडीचा फोन -शबाना मला गाय छाप तंबाखू कुठेमिळेल?" बाप रे ही काय आपल्याला समजते ? असा प्रश्न विचारणार होते पण तेवढ्यात सफाई --अगं बाबांना इथे येऊन दहा दिवस झाले. त्यांच्या पुढ्या परवा संपल्या, तेव्हापासून त्यांना 'काही होत नाहीये ' आणि खूप चीड चीड करत आहेत. आई आणि मी कंटाळलो आहोत आता. मी तिला आनंद पान वाल्याबद्दल सांगितले --माहित नाही कुठला छाप मिळाला पण त्या नंतरच्या शनिवारी ती काका काकुना घेऊन जेवायला आली होती तेव्हा काका व्यवस्थित जेवले खरे!
इथे आले तेव्हा बऱ्याच मित्रमैत्रिणीनी त्यांच्या ओळखीच्यांचे पत्ते दिले होते. असेच द्वारकानाथने मृदुलाबद्दल लिहिले होते. तेव्हा ती केम्ब्रिजला असायची. आता मराठीवर लिहित आहे म्हणून, पण तिला ती मराठी आहे म्हणून मी काही भेटायला गेले नव्हते- मराठीपेक्षा केम्ब्रिज जास्त खुणावत होते. पण त्या पहिल्या भेटीनंतर मात्र मराठीत बोलणे हा आम्हाला जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे हे नक्की. गेल्या ख्रिसमसला घरी आली होती तेव्हा माझी मराठी टाइप करण्याचे शिकवणी घेतली. आणि तेव्हापासून मला लिही लिही म्हणून ढकलण्याचे कामही ती मनापासून करते.
तसे पाहिले तर मित्रमैत्रिणींची वानवा कधीच नव्हती आणि अगदी गंभीर चर्चा किंवा आवारागर्दी या कशातच भाषेचा अडसर कधी आला नव्हता --पण तरी मराठी ऐकले की इथे का अगदी मागोवा घेऊन त्या व्यंक्तीशी आवर्जून बोलावेसे वाटते. हे मला माझ्या मुलीला कधी समजाऊन सांगता नाही आले. अजूनही ती सोबत असली आणि कोणी मराठी बोलताना ऐकले की ती नेहमीचे मिश्कील हसून सांगते --जा मम्मा, तेरे मराठी लोग, बात कर के आ !
पण प्रत्येकवेळी मराठी माणूस दिसला की असे उचकवायला मनू लागतेच असे नाही.उदा. गेल्या महिन्यात सकाळी ९ वाजताच्या अपॉइंटमेंट ठरलेल्या होत्या. त्यात उशीर झालेला आणि ट्रेनस्टेशनवर गर्दीत वाट काढताना समोर आरामात एक माणूस मराठीत फोनवर गप्पा झाडताना दिसला आणि तोही अगदी सांगली-कोल्हापूरच्या भाषेत. हा नक्कीच सांगली किंवा कोल्हापूर -अधेमध्ये नाहीच. पण नक्की कुठला हा गहन प्रश्न त्याला विचारून दोनचार आणखी गोष्टी केल्या नाहीत तर गाडी पुढे कशी जाणार? हा कुठल्या फलाटावर आणि कुठल्या गाडीत चढणार असा आडाखा बांधत होते तर तो नेमका मला ज्या गाडीने जायचे त्यातच चढला. आता याचा फोन झाला की बोलूयात आरामात --दोन स्टेशन आहेत मध्ये असा विचार करत मी त्याच्या मागोमाग. एक स्टेशन जवळ आले तरी त्याचे फोन संभाषण काही संपेना. मला आपले दडपण --हा इथे उतरला तर? मेंदूचा दुसरा भाग अगदी कोकलून सांगत होता --तुला काय घेणेदेणे तो माणूस कुठला आणि काय फरक पडणार आहे तो सांगली म्हणाला किंवा कोल्हापूर? आणि किती उशीर झाला आहे त्याचे काय --आजचे काम काही हलके करणार आहे का तो कुठलाही असला तरी ! तेवढ्यात गाडी वेस्टहॅम स्टेशनला थांबली आणि तो उतरला खाली. मेंदूच्या त्या भागाने सुस्कारा सोडला, गेला आता हा-- तर दुसऱ्या भागाने लगेचच ओरडून सांगितले --नाही नाही तो फक्त दुसऱ्या लोकांना उतरायला जागा करून देत आहे. तो बघ परत चढला आत. मग गेल्या आठवड्यातच एका ट्रेनिंग सेशन मध्ये 'stalking' या संकल्पनेवर झालेली चर्चा आठवली आणि मग तुझे आताचे वर्तन तसेच आहे असा इशारा मेंदूचा सजग भाग देत असल्याचे कळाले.
पण तरीही " अरे आता तरी फोन ठेव बाजूला, केवढ्या काकुळतीने मला तुला विचारायचे आहे ". असा विचार करून खिडकीच्या बाहेर बघायचा प्रयत्न करत होते, तेव्हड्यात झाला या बाबाचा फोन. फोन त्याच्या खिशात जायच्या आधी मी विचारले --सांगली का कोल्हापूर?
तो हसून म्हणाला, सांगली - तुम्ही? मग पुढे काही विचारायच्या आधीच तोंडातून निघाले--' कधीचा पाठलाग करते आहे मी'. तो अगदी अवाक!
पण तोपर्यंत सांगितलेले --इथे असे मराठी खूप कमी ऐकायला मिळते ना !'
" अवो नाहीऽऽ. इथे इल्फर्डला खूप पडल्येत मराठी" . आता तर अगदी कन्फर्म झाले याच्या दोन चार पिढ्या सांगलीत असणार अगदी हळद किंवा तंबाखूच्या ढीगासारखे मराठी पडलेले!
" आणि आता तर मित्रमंडळ झाले आहे, परवा कार्यक्रम आहे गुढीपाडव्याचा, ई-मेल द्या तुमचे मी पाठवतो आमंत्रण". ( नशीब टिपिकल सांगलीवाल्यान्सारखे हा म्हणाला नाही --अवो कशाला घाबरताय-- मी आणून देतो की एक ढीगभर. )
गुढीपाडव्याचा कार्यक्रम एका चर्चच्या हॉलमध्ये होता आणि खरेच ढीगाने मराठी दिसले मला तिथे! आणि वडा पावचा स्टॉलही!!
मनू खूपच खुश --मराठीमुळे नाही खूप दिवसांनी वडा पाव खायला मिळाला म्हणून! मम्माच्या मराठीप्रेमाची महती तेव्हा तिला कळली असे वाटले खरे.
पण तिच्या प्रश्नाचे उत्तर उमजले असले तरी तिला समजून नाही सांगता येत. तिला इंग्रजीत अडलेले शब्द समजाऊन सांगते पण माझ्या आणि मांच्या एखाद्या शब्दावरून रंगलेल्या गप्पांचे स्वरूप काही त्याला नसते. तिच्या नवीन वाचलेल्या पुस्तकांवर संभाषण नेहमी होते पण त्यातला भाषेचा आनंद मला तिच्याबरोबर इतका शेअर नाही करता येत. खूप लाडात येऊन तिला गोंजारतानाकिंवा चिडले असले तर तिच्यावर खेकसताना नेहमी मराठीतले शेलके शब्द नकळत येतातच. गेल्या वीकेंडला रंगात येऊन 'Twilight' च्या सिरीजमधल्या नवीन रोमँटिक स्टोरीज सांगताना मला तिने विचारले --तुझे फेवरेट रोमँटिक नोवेल कुठले? आता सार्वजनिक वाचनालयात चोरून वाचलेल्या सुहास शिरवळकर किंवा बाबाकदमांच्या कादंबऱ्याची नावे सांगता येतील पण त्यांची स्टोरी लाईन कशी समजावून सांगायची? ( काय दुसरा पर्याय ही नसायचा. फास्टर फेणे, सोनेरी टोळी व तत्सम सगळे तिसरी चौथीतच अंगात अगदी जिरले होते त्यानंतर भा. रा. भागवतांची अमक्या किल्ल्याचे रहस्य वगैरे पहिल्या दोन पानातच कळायचे.डॅन ब्राऊनची पहिली कादंबरी संपवून दुसरी सुरु केली तेव्हा त्या रहस्यमय पुस्तकांची आठवण आली होती खरे. बिचारे बाबा आम्ही शामची आई किंवा दुसरी गांधी/विनोबांची पुस्तके वाचावीत यासाठी अगदी सदगदित होऊन त्यांच्याबद्दल सांगायचे. मला अजूनही प्रश्न आहे -त्यांच्या डोळ्यातील पाणीवजा भाव हा साने गुरुजींच्या बद्दलचा आदरभाव उन्मळून आल्यामुळे आहे का --ही कार्टी आपले काही ऐकणार नाहीत या ठाम हतबलतेमुळे आहे. पण यात त्या सानेगुरुजींचा काही दोष नसावा इतर बाबतीतही बाबा त्या 'निरूपा रोयला' मागे टाकतील असे डायलॉग मारतातच)
मराठी मातृभाषा असली तरी त्यातच शिक्षण, किंवा तीच भाषा गोड असा अट्टाहास बाळगणारी मी नाही --तरीही काही शब्द मला भाषांतरित करता येतात पण समजावता नाही येत. असेही असावे की जेव्हा आपण आपली प्राथमिक भाषा शिकतो तेव्हा शब्दांचे स्थान हे दुय्यम असते... आपला अनुभव हा प्राथमिक असतो आणि ते शब्द त्या अनुभवाला व्यक्त करण्याचे साधन असतात. त्यामुळे प्रत्येक शब्दाला अनुभूतीची आणि त्यासोबतच्या भावभावनांची जोड असते. एक व्यक्ती म्हणून जगताना, वाढताना ती भाषा तुमच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा अविभाज्य भाग असते ..म्हणूनच इथे मराठीवाचून काहीही अडत नसले तरी गर्दीतला एक चेहरा, काही ओळख नसताना फक्त आपली भाषा बोलतो म्हणून आपुलकीचा वाटतो.
असेच दोन वर्षाआधी कोणाचेतरी कोणीतरी -मराठीत बोलणारे लंडन भेटीवर आलेहोते. तेव्हापासून मराठीतील एक नवा अध्याय सुरु झाला आहे ---बऱ्याचशा प्रस्थापित आणि बऱ्याच लिहिता न येणाऱ्या म्हणींचा --पण त्यावर पुन्हा कधीतरी ..


माय मराठी ...

माय मराठी ...
गणेश दिघेची आजची FB वरची पोस्ट वाचून बऱ्या च वेळा मनात आलेले हे विचार . या मराठी प्रेमिक मित्राने पातेले शब्दाचे समानार्थी शब्द बघता भगोने, भगुन या शब्दांची उत्पत्ती व वापर याबद्दल लिहिले होते
माझी इथली टर्किश शेजारीण- तिच्या नातवांशी बोलते तेव्हा कितीतरी 'मराठी' शब्द येतात - भगन हा त्यातलाच एक. चा म्हणजे चहा, बाबा म्हणजे बाबा! जेवायला गेलो कि भरीत हा त्यांचा आवडीचा पदार्थ. मोठी भाकरी करतात -मध्ये काही काही भरुन. दुसरी बांगलादेशी सिलेटी - पूर्व पाकिस्तानच्या प्रभावात आणि नंतर आता इस्लाम टीवी मुले खूप उर्दू शब्द आले त्यांच्याकडे पण कोणी आजारी पडले कि आधी 'औषध' शोधतात ! मला तर ते बोर्गी म्हणतात - कारण मराठ्यांच्या त्या प्रांतातल्या स्वाऱ्या आणि त्यांची किल्लेबांधनी -- आता Burg हा मुळात 'जर्मन - प्रशियन' भाषेतला त्यातून त्याचे बोर्ग झाले- शिवाजीचे तिकडचे नामकरण - बोर्गी !मी मराठ्यांच्या प्रांतातली म्हणून बोर्गि --- जर्मन आणि मराठीतले कित्येक शब्द एकसारखे . अरबी, पर्शिअन, पश्तू, अफगाणी, उर्दू, हिंदी, खडीबोली -- शब्द काय भाषाच संक्रमित झाल्या -- आज देश व राज्यांच्या सीमा बघतो आपण -- परंतु अगदी प्राचीन काळापासून लोकांचे, संस्कृतीचे एकप्रकारे मुक्त प्रवाह लोकांबरोबर इकडे तिकडे गेले - कोण कशावर मालकी दाखवणार ? जेत्यांची संस्कृती लादली जाते हे खरे पण त्यात त्या त्या कालच्या राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांचा जास्त भाग असतो. आपण मात्र इतिहासाच्या एका तुकड्याला धरून अस्मितेचे राजकारण करत असतो. माझ्या लहानपणी गावात जी भाषा शिकलो तीच आजही मला जवळची वाटते - पुण्यात आल्यावर अजूनही कोणी न आणि ण याच्या अगणित चुका काढल्या तरी ! त्यांची मला तेवढीच कीव येते जेवढी माझ्या लहानपणी भेटायला येणाऱ्या माझ्या भेंडीबाजारातल्या भावंडांची - त्यांना आम्ही मराठी बोलायचो म्हणून गावठी, मागासलेले, अधार्मिक वाटायचो! असो ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार, जगाच्या ञानअनुसार लोक भाषेची तुलना आणि उतरंड लावतात. भाषा एक माध्यम आहे - सवांद महत्वाचा! जिथे संवादच थांबतो --आणि शिव्या सुरु होतात -त्या मात्र सगळ्या भाषांमध्ये सारख्याच- सगळा आशय स्त्रियांना कमी लेखणारा !
आमच्याकडे तर सगळेजण वेगळी भाषा बोलतात. माझे आईबाबा दोघे महाबळेश्वरच्या धावडी घरात जन्मले वाढले. आईचे शिक्षण चौथीपर्यंत उर्दू शाळेत, पुढे मुलींसाठी शाळा नाही. तिचा एक मावसभाऊ मराठी शाळेत तिच्या पुढल्या इअयत्तेत - त्याच्याकडून मधल्या कुडाच्या भिंतीआडून ही मराठी शिकली. हट्टाने सातवीची परीक्षा दिली आणि मास्तरीन झाली. उर्दू आणि मराठी भाषा उत्तम येतात - तिच्यामुळेच मराठीची आवड आम्हा बहिणींमध्ये! गुरुजी -बाईंची मुले म्हणून शाळेत, गावात लहानपणी वेगळा भाव होता, आणि त्यांचे मार्गदर्शन, घरातील वातावरण म्हणून आम्ही आमच्या प्राथमिक मराठी शाळांमधून चमकलोही! पुण्यात पुढच्या शिक्षणासाठी आल्यावर तीच भाषा बऱ्याच लोकाना अशुद्ध वाटली -अजूनही च, न, ण असे शुद्धीकरणाचे प्रयत्न चालू असतात -- असो बापडे - माझीच लाल असं जेव्हा सिद्ध करायला कोणी जीव तोशीस लावून उठते तेव्हा -उनको उनके हाल पे छोडना -हाच उत्तम मार्ग असतो.
लहानपणापासून आम्ही सातत्याने ऐकलेला कौतुक आणि अविश्वासदर्शक वाक्प्रचार -तुम्ही मुस्लिम असून मराठी एवढं चांगलं बोलता ? त्यात आडनाव पण आमचं शेख किंवा खान नाही त्यामुळे काहीजण तर वडील नक्कीच मुस्लिम नसणार असे निष्कर्ष काढून मोकळे! त्यात इकडे येउन आता वारणेचे 'वॉर्न' झालो त्यामुळे नक्कीच कोणा गोऱ्याबरोबर संसार मांडला आहे असे सगळेच समजतात -- आता कुणाकुणाचे उच्चार आणि समज बदलत बसणार !
मनु माझी मुलगी मुंबईत जन्मली,आईच्या घरी पाचगणीला लहानपणी राहिली, नंतर आम्ही भोपाल, लंडन करत ती तळेगावला होस्टेलवर अनेक गुजराती मुलांबरोबर तीन वर्षे राहीली. तिच्या एका वाक्यात या सगळ्या ठिकाणाचे शब्द, हेल, वाक्प्रचार यांचे मिश्रण आहे. जिथे तिला हि भाषा कमी पडते तिथ तिला बॉलीवुड नेमका हात देते. गेल्यावर्षी - पंधरा वर्षाची असताना ती एकटी लंडन -दिल्ली- भोपाळ - मुंबई- पुणे- पांचगणी- सांगली अशी फिरून आली. मस्त लोक आणि भाषा यांच्या असंख्य आठवणी घेउन.
माहीचा जन्म इथलाच. मुलांना वयाच्या पाच वर्षापर्यंत भाषा आत्मसात करण्याची जास्त कुवत असते, त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास चांगला होतो हे माहित असून आणि मला स्वताला कुठलीही भावना व्यक्त करताना हमखास मराठी शब्द आधी तोंडात येतो असे असूनही त्याच्या वयाच्या पाच वर्षापर्यंत त्याला काही मराठी शिकवण्यात मी सफल झाले नाही. त्याचे इंग्रजीही आमच्यापेक्षा वेगळेच ऐकू येते आणि त्याच्यामतेतर आम्ही Indian इंग्लिश बोलतो. इथल्या शाळांमध्ये ्मुकबधीरसाठीची भाषा अगदी नर्सरीपासून शिकवतात. ( चिन्ह भाषा हा शब्द मला तितकासा पटत नाही ) ती घरात फक्त त्यालाच येते- मी खूप वेळा त्याच्याकडून शिकायचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारात त्यानेही माझ्यासारखा त्याला मराठी, हिंदी शिकवन्यातला निष्फळपणा तेवढ्याच उद्विगतेने अनुभवलेला आहे !
भारतभेटी आणि हिंदी सिनेमा यामुळे आता त्याला मराठी, हिंदी शिकायची इच्छा मात्र निर्माण झाली आहे आणि तो तसा प्रयत्न स्वताहून करायला लागला आहे. त्याच्या वयानुसार त्याला आता आपण इथल्या मुलांपेक्षा वेगळे आहोत, आपल्या घरचे वातावरण वेगळे आहे आणि भाषाही वेगळी आहे हे कळू लागल्यावर, त्याला हे समजून घेण्यात आणि शिकण्यात रस निर्माण झाला आहे. अगदी दोन - तीन वर्षाच्या मुलाला ज्याला आपली चड्डी सांभाळायचे ज्ञान नसते त्या मुलांना हीच आपली भाषा, संस्कृती आणि आपण असेच वागायला पाहिजे हे थोपवणे मला खरे अन्यायकारक वाटते. यात 'आपली' म्हणजे कोणाची भाषा, कोणाची संस्कृती हाही प्रश्न आहेच. आंतरजातीय, आंतरधर्मीय कुटुंबे आता सगळीकडेच दिसतात. अगदी परदेशी नाही गेलात तरी सातारा, सांगली, पुणे, विदर्भ, खानदेश इथली बोली वेगळी -- मग आईच्या घरी बोलतात ती मराठी का बाबाची पुण्याची अलंकारिक मराठी - का तिकडच्या आजीच्या घरची गुजराती - या सगळ्या वावटळीत मला मुलांवर असे जबरदस्तीचे संस्करण कधीच पटले नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या दोन्हीकडच्या संबंधावर, संवादावर काही फरक पडला आहे असेही वाटले नाही. आपल्या घरी, ज्या परिसरात आपण वाढतो त्याच्याशी आपली नाळ जुळणे, जिथे जिथे जातो तिथे आत्मविश्वासाने वागता येणे, चार माणसे जोडणे आणि कुठलाही गंड न बाळगता मानसिक दृष्ट्या सक्षम आणि संवेदनशील असणे याला माझ्यामते जास्त महत्व आहे
जन्म, विकास, मरण हा तर सृष्टीचा नियम आहे. त्याचबरोबर परस्परवलम्बी विकास हे उत्क्रांतीचे तत्व आहे - भाषा कशी याला अपवाद असणार? माझ्या आजोबाना मोडी येत असे, माझे बाबा बोरु वापरून खूप सुंदर लिहायचे, माझी आई गरज आणि शाळेची उपलब्धता म्हणून मराठी शिकली, शिक्षिका झाली, आमच्या वेळेनुसार आम्ही अगदी पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मराठीतच शिकलो, गरज म्हणून इंग्रजी आत्मसात केली, आमची मुले आज इथल्या वातावरणात नवीन भाषा, न वीन संस्कृती शिकत आहेत --काय चांगले आणि काय कमस्सल हे कसे ठरवणार? माझ्यासारख्या टायपिंग शिकून, कीबोर्ड संगणक शिकणाऱ्या पिढीला माझ्या मुलांची टच स्क्रीन वापरणारी पिढी मागास समजणार की हा तंत्रज्ञानाचा विकसित अविष्कार समजणार हे आपण काय दृष्टीकोन त्यांना देतो यावर अवलंबून आहे. बोरुच्या लिखाणातली सुंदरता आणि आजच्या टच स्क्रीनमधून रेखाटलेली, संपादित केलेली कलाकृती यांची तुलना होऊ शकत नाही पण आपापल्या परीने दोन्ही सुंदर आहेतच ना!


स्टार प्लसचे महाभारत आणि माउ उवाच !

महाभारताशी पहिली ओळख केव्हा, कशी हे सांगणे अवघडच. लहानपणी ऐकलेल्या अनेक कथांतून, नंतर वाचलेल्या पुस्तकातून आणि नंतर चोप्रांच्या महाभारत मालिकेतून बराचसा कथाभाग समजलेला. सातवी आठवीत वाचलेल्या राधेय आणि मृत्युंजय मधल्या व्यक्तिरेखा अजूनही मनपटलावर कोरलेल्या. मग अनेक पुस्तकातून वेवेगळ्या अंगातून केलेले महाभारताचे, गीतेचे आणि कृष्णाबद्दलचे विवेचन- बरेचसे लक्षात राहिलेले पण विश्लेषण - विवेचन हे मुख्यतः भारतीय राजनीतीत घडणाऱ्या गेल्या शतकांच्या संदर्भातच.
गेल्या वर्षी मनु गीतेवर काहीतरी वाचत होती आणि अचानक तिचा काहीतरी प्रश्न आला म्हणून बोलताना ती म्हणाली -- मला माहित आहे महाभारत का घडले ते --त्या कृष्णाने कोणाचे तरी नाक कापले होते म्हणून ! थोडी बहुत गोष्टीत गल्लत ठीक आहे पण हे जरा जास्तच खटकणारे म्हणून आम्ही तिच्यासाठी महाभारतावर पुस्तके बघत होतो. १४ वर्षाच्या मुलीला कळेल आणि त्यातही अगदी गंभीर वाचणाऱ्या मनूला रुचेल असे पुस्तक काही सापडत नव्हते. अगदी अकराव्या वर्षी kightrunner, thousand splendid suns आणि नंतर शांताराम वाचणाऱ्या लेकीला बरीच पुस्तके आणून दिली -राधाकृष्णनचे Indian Philosophy आणि Discovery ऑफ इंडिया या दोन्ही पुस्तकांसमवेत. पण तरीही बर्याच गोष्टींचा घोळ डोक्यात चालूच आणि मला मिळणाऱ्या मर्यादित वेळेत त्याचे निराकरण शक्य नाही म्हणून थोडा लांबणीवर टाकलेला विषय…
मग एके दिवशी रीतुशी बोलताना तिने स्टार प्लस वरच्या या मालिकेबद्दल सांगितले. स्टारप्लस बघायचा म्हणजे जर जीव मुठीतच असे म्हणून आम्ही बघायला सुरुवात केली आणि आवडली ही मालिका. त्यात दाखवलेल्या बऱ्याच गोष्टी तर्क आणि माझे विवेचन सोडून बघायच्या असा निर्णय पहिले दोन तीन भाग बघतानाच घेतला होता. मुख्य उद्देश मुलांबरोबर कथाभाग समजावून घ्यायचा हाच होता. मनु नंतर डोके फाटेस्तोवर प्रश्न विचारत असतेच आणि तिच्याशी बरीच चर्चाही होते. पण माझ्या ७ वर्षाच्या लेकाला आतापर्यंत काही माहित नव्हते आणि हिंदीचा गंधही नाही. शाळेत Religious Education मध्ये यावर्षी Hinduism आहे त्यामुळे ten headed monster 'रवाना' , butter eater krishna मध्ये याला फार इंटरेस्ट ! गेल्यावर्षी भारतात गेलो तेव्हा छोटा भीम बघितला --तेव्हापासून सगळे छोट्या भीमचे टी शर्ट आणि मग कॉमिकस एवढाच पूर्वाभ्यास. आतापर्यंत धारावाहीकेत सांगितलेली कथा कळली आहे. काही गोष्टीत मार्मिक प्रतीक्रिया असतात. त्याला त्याच्या पद्धतीने समजून घेऊ देत म्हणून मीही आता भाष्य करायचे सोडले आहे पण तरीही --
उदा एकलव्याचा अंगठा घेतला तेव्हा मी हळहळलेच -- so unfair! असे निघालेच तोंडातून. माऊची प्रतिक्रिया : it is fair mamma- Ekalvya did not ask Drona's permission to copy him. You cant just do such things! किती copyright बद्दल सजगता !
हिडींबा आली तेव्हा याला वाटले कदाचित हीच छुटकी -- अजून छोट्या भीमाचे साथीदार दिसत नाहीयेत ना ।
द्रौपदीचे पाच नवर्यात विभाजन यात एवढा वाद घालायचे काय हे त्याला पटतच नव्हते --but she has accepted it and all of them are happy ( pandav and droupadi) मग एव्हडा रडून ओरडून गोंधळ काय घालताय? that is their choice, what is so unrighteous about it ? सगळे सबटायटल्स-- अधर्मचा unrighteousness! माझ्यातल्या मम्मात्वाला आत्तापासूनच ललकार आहे -- पुढे जाउन we are happy why interfere असा म्हणताना दिसतोच आहे हा !
भीष्म पितामह अगदी उद्विग्न होतात तेव्हातर माहीला अगदी राहवत नाही, मी इमेल टाकू का त्याला समजवायला ? आता भीष्माचा इमेल असेल तर शेअर करा. अर्थात अशा सत्कृत्यामागे माझीच प्रेरणा -- लंडनमध्ये लोक रस्त्यावर सिगरेट पीत असताना माहीला तो वास सहन होत नाही, मग काय करता येईल असे विचार करता मी त्याला सांगितले होते कि तू लंडनच्या मेयरला इमेल लिही. भीष्माच्या काळी इतका child freindly public policy नव्हती हे कसे समजवायचे? आणि त्यापुढेही त्याचे अर्घ्य गंगेच्या पाण्यात पडत नसते -- माहीचे अनुभवजन्य विश्लेषण --टेम्परेचर मायनस खाली असणार म्हणून पाणी गोठले आहे. मी अगदी वैतागून आता मग हा द्रौपदीच्या सुर्यानारायणास केलेल्या आवाहनावर काय टिपणी करतो म्हणून वाटच बघत होते . आता लिहायला छान वाटते पण बर्याच वेळेला या प्रश्नांत मला संवाद ऐकण्यावर, समजण्यावर पाणी फिरवावे लागते, खेकसून सांगावेसे वाटते -- है कथा संग्रामकी, आपल्यातच होईल, मुकाट्याने शांतपणे बघ. असा वैताग दिला कि खरेच भारतीय संस्कृतीच महान आहे हे पटते अगदी. मुलांनी एकदा सांगितले कि निमूट ऐकायला पाहिजेच. हा काय पाश्चात्य स्वैरपणा ---एका मागून एक प्रश्न ? पण काय करणार - जैसा देस वैसा --वागावेच लागते . बर्याच वेळेस मग त्याला झोपवून यु ट्युबवर परत तो भाग फास्ट फोरवर्ड करून बघायचा, याला पर्याय नसतो
पांडव हस्तिनापुर सोडून चालले आणि अर्जुन कुंतीच्या मांडीवर डोके ठेऊन रडू लागला --oh come on arjuna - you need to grow up, cant be with your mother all your life ! हस्तिनापुर आणि राज्यावरचा हक्क, कुंती सगळ्यांना सोडून जाताहेत म्हणून मी म्हणाले - बिचारे पांडव --why poor mamma they must seek new experience, it is good to learn new things
परशुरामास जेव्हा कर्ण त्याच्याशी खोटे बोलला हे कळते आणि पुनीत इस्सार त्याच्या घोगऱ्या आवाजात ओरडतो तेव्हाही माहिला कळत नाही की हा चिडला तर आहे पण मग हा कर्णाला Hey कर्ण अशी का हाक मारतो ? hey dude असे तर प्रेमाने मित्राला हाक मारायची पद्धत न !
कृष्णाने रुक्मिवर सुदर्शन चक्र सोडून फक्त अर्धे डोके भादरले तेव्हां तर असल्या मशीन मिळाल्या तर शाळेत कोणाकोणावर सोडता येईल अशी यादी आम्ही केली होती. विश्व के कल्याण कि योजना सोडून हा कृष्ण आता जॉन, मग बेन , मग जेम्स अशा मुलांची डोकी भादरत असतानाचे चित्र दिसत होते. पण भीतीपण वाटत होती तो सर्वज्ञानी कृष्ण असे आमचे बेत ऐकत असेल तर? अजून आमची डोकी शाबूत आहेत -- माफ केले असावे त्याने बहुदा कारण आम्ही त्याची आळवणीही तितकीच करतो न- पुढे येईल याबद्दल !
भिमासारखे पाय आपटणे-- नंतर दुखतात म्हणून गुपचूप शांत बसणे -- मान्य नाही करायचे. पाउस असला तरी छत्री बंद करून युधीष्टीरासारखा भाला बनवून फिरवणे. रागवायचे नाटक म्हणजे धृतराष्ट्रासारखे डोळे वर करणे. हातावर उपरण्यासारखा टॉवेल घेऊन घरभर भटकणे - महाभारत ड्रेस आहे हा! --हे दैनदिन जीवनात महाभारतासारख्या 'ग्रंथोमें महान' ग्रंथामुळे आलेले काही मुलभूत बदल .
दुर्योधनाच्या हत्तीवर उडी मारून मालिकेत प्रवेश केला तेव्हापासून बिचाऱ्या घरच्या सोफ्याने हजार शाप नक्कीच दिले असतील दुर्योधनाला आणि त्या स्टंट डायरेक्टरला।
शकुनिमुळे डोळा मारणे आम्ही मात्र बंदच केलंय, फार वाईट असं मत आहे डोळा मारला की, काहीतरी कपट असाच त्याचा अर्थ ! मला मात्र काळजी उद्या भारतात गेलो आणि याला तिथल्या कॉलेजात हा गेला तर एव्हडे बेसिक स्किल माहित नसले की याचा तिथे कसा निभाव लागणार ?
सकाळी शाळेला उशीर होत असताना toilet seat वर बसून जोरात अगदी गांडीवधारी अर्जुना आ}} आ}}} अशी तान हा जेव्हा छेडतो तेव्हा तू जे काय धरलयस ते सोड आणि तयार हो लवकर -- हे अर्थात माझ्या मनात! काय बोलतोय आणि काय करतोय याच्यात काही ताळ असेल का हे समजण्यासाठी तरी निदान आपल्या लेकरांना म्हराटी शिकवणे किती महत्वाचे ते अशा वेळेला कळतं -- शिकवायचंच अशी प्रतिज्ञा काही आपण करणार नाही -- महाभारतातल्या कोणाच्या प्रतिज्ञेमुळे काय काय घडलं याचा कार्यकारणभाव लावून आणि समजावून दमायला झाले आहे!
शीर्षक गीत तर फार आवडलंय आम्हाला -- धर्म, अधर्म, आदी, अनंत सगळीकडे गुणगुणत असतो आणि नको तिथे फेकत पण असतो -- मम्मा this is adharm ; झोप म्हणले कि, पुस्तक ठेव, चोकलेट नको आता-- अशा वेळी सगळाच धर्म अधर्माचा मामला !
मला गाण्यापेक्षा शब्द ( lyrics ) मध्ये जास्त रस त्यामुळे अर्थही मीच सांगितला सगळ्या शब्दांचा - संदर्भसहित स्पष्टीकरण देऊन. एकदा आज नको बघायला, उद्या बघुयात, एक दिवस नाही बघितले तर काही बिघडत नाही असे म्हणले तर मम्मा this is जीवन का संपूर्ण सार हैं, मग बघायलाच पाहिजे न हे हि ऐकवलेच !
कृष्णाच्या बासरीची मोहिनी बृहत विश्वावर - माही कसा अपवाद असणार ? रितू मावशीने बासरी पाठवली होतीच. सगळ्या घरात कृष्ण होऊन बासरी फुंकत आणि थुंकतही असतो. एका शनिवारी यू ट्युब वर enchanted flute of krishna असा विडीओ शोधून त्याची प्रक्टिस चालली होती आणि शेजारी मोठा टॉवेल घेऊन enchanted थुंकी साफ करणे चालले होते, तेव्हा हा साईड इफेक्ट कळाला. बरेच दिवस आमची बासरी शाळेच्या पँटच्या बेल्टला लटकून शाळेत ही गेली आहे. मोरपिसाची मागणी झाली आहे मावशीकडे -- कसा खोवणार त्याची उत्कंठता आहेच.
अर्जुन, कृष्ण तर हिरो आहेतच पण बकाबका खायचे तेव्हा आम्ही भीम पण होतो -- मग सगळेच demi -god आहेत, जे काही करतील ते चांगलेच, पणसोयीस्कर रित्या . पोहायला गेलो तेव्हा त्याला मी सांगितले बघ अर्जुन आवडतो ना तुला , त्याने किती प्रक्टिस केली धनुष्यबाण चालवण्याची मग तुही न थकता आज पाच फेऱ्या मारायच्या. डुबुक डुबुक करून महाशयांचे उत्तर --I can't change what I am mamma, can I? काय कपाळ उपदेश करणार आपण ? उलट त्या सौरभ जैनसारखे मधाळ हसून प्रत्येक वेळेस --think about it- ( स्वयं विचार किजिये) असे मलाच ऐकवतो !त्यातल्या त्यात हे बरे की पुरुषपात्रांचाच जास्त प्रभाव आहे, नाहीतर ती किंचाळणारी अंबा ( मला तर ती PMS मध्ये असतानाच तिच्या रोलचे शुटींग केले आहे असे वाटते ) , कल्याण हो, कल्याण हो असे म्हणत सतत अश्रू ढाळणारी कुंती( ही तरुणपणाची न सुटलेली निरूपा रॉय) , मेंगळटपणे फिरणाऱ्या अंबिका आणि अंबालिका, भयानक डोळ्यांची द्रौपदी यातले कशाचे अनुकरण केले असते, ते कळत नाही.
छोटेपणीच्या अर्जुनाने अभिनय छान रंगवला होता. त्या मुलाचा चेहराही अगदी निग्रही आणि बोलका. युधिष्ठिराचे काम करणारा मुलगा मात्र, 'पौगंडावस्थेतल्या मुलांच्या समस्या', अशा कार्यक्रमात दाखवणाऱ्या मुलांसारखाच अगदी शेळपट - मला तो शब्द ऐकूनच कसले कसले गंड आठवतात आणि काय त्या चर्चा, मस्त गळपटल्याल्या दगडू परब, त्याची मित्रकंपनी आणि पराजक्ता यांना बघून तरी आता अशा चर्चासत्रांना बंदी घालतील अशी आशा करूयात !
राम ला रामा, कृष्णला कृष्णा तसे रावण चा उच्चार त्याच्या शिक्षिका रवाना असा करतात. महिच्याच भाषेत इथले लोक महाभारतला, माहाभरटा म्हणतात - त्याच्या इथल्या उच्चारात . अरे ससां ग तुझ्या शिक्षिकांना असे त्याला सांगितले तर it is ok Mamma that's how British people speak, do they come to change your words -- असे म्हणून मोकळा झाला आहे तो. मी हे त्याच्या शिक्षिकेला पालकसभेत सांगितलं, तेव्हा दोघीही हसलो त्यावर. त्यानंतर मला एक तास त्यांच्या वर्गावर बोलायला बोलावलेही ! आता माही वर्गातला या विषयावरचा तज्ञ म्हणून सर्वमान्य झाला आहे. महाभारतावरची घरी असलेली कॉमिक्स घेऊन जातो तो व्याख्यान झोडायला ! आणि मध्येच येउन आता अमक्याची , तमक्याची मूर्ती दे दाखवायला असा हट्टही असतो. दिवाळीला लक्ष्मीची दिली, राम सीतेची दिली आम्हाला रक्षाबंधनला राखीचीपण हवी होती -- त्याला देवीच वाटली ! रितू म्हणून माझी मैत्रीण आहे तिने मुर्त्या, पुस्तके ईचा पुरवठा चालू ठेवला आहे.
पण कौतुक वाटते इथे ज्यापद्धतीने दुसरीच्या वर्गात नवीन धर्म आणि संस्कृतीबद्दल शिकवतात, माहिती देतात. त्याचा साईड इफेक्ट म्हणजे तो हे काही करतो, डब्यात घेऊन जातो -- ते सगळं हिंदू धर्माच्या कक्षेत येत असावे असे त्याच्या मित्रांना वाटते -- उदा 'अरे यार' असे घरी ऐकून तो बऱ्याचवेळा शाळेत बोलताना म्हणून जातो ---त्याच्या प्रिय दोस्ताला बेनला हे हि हिंदू धर्माचे लक्षण वाटते. मायबोलीवरचे धर्मप्रेमी याबाबतीत मला माफ करतील अशी आशा आहे! गेल्यावर्षी त्यांना ख्रिश्चन धर्माबद्दल शिकवले. त्यानुसार जीझस हा देवाचा पुत्र . यावर्षी जेव्हा हिंदू धर्मातील देवांबद्दल शिकवायला सुरुवात केली तेव्हा जीझस हा देवाचा पुत्र आणि हिदु धर्मात देव म्हणून जीझसही त्याच बापाचा मुलगा म्हणून तोही हिंदू असा नविन सिद्धांत मांडून तो मोकळा. पुढच्या वर्षी इस्लाम शिकताना हा कोणाची संगती- नाती गोती कोणाशी लावतो ते पाहूयात स्मित


आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...