Thursday 13 March 2014

पुन्हा मामू ........ ( भाग 2)

पुन्हा मामू ........ ( भाग 2)

काल दुपारी मामुंवरची पोस्ट पाठवली आणि मुलांना घेऊन साउथबँकला कार्यक्रमाला गेले ...वेगवेगळ्या गोष्टी करत असतानाही मामू काही मनातून जाईनात ---मांचा सगळ्यात जवळचे भावंड आणि एरवी खंबीर असणारी मां जर कोणाकडून कधी काही अपेक्षा करेल तर ती मामुंकडूनच! आज दुपारी तर ठीक बोलली ती फोनवर ---पण आपल्याला त्रास होईल म्हणून ती बऱ्याच गोष्टी सांगत नाही. अगदी तीव्रतेने जावेसे वाटले --फार नाही तर आठ दिवस तरी ---तिला आणि मला बरे वाटेल थोडे .....मनुला ( माझ्या मुलीला ) विचारले राहशील का ग ताईबरोबर तर हो म्हणाली . तिकिटांचे दर बघून झाले आणि उद्या बॉसशी सुट्टीबद्दल बोलायचे ठरवून झोपी गेलो.
सकाळी कॉफी पिताना नेहमीप्रमाणे मेल चेक केली ---बऱ्याच प्रतिक्रिया आल्या होत्या. लोकांना पोस्ट आवडली होती --कोणी लिखाणाबद्दल टिप्पणी केली होती तर कोणी फलटणला पोहोचले होते. एक दोन शोकसंदेशही होते. मग नेहमीची धावपळ ;माहीला नर्सरीत सोडून ऑफिस गाठले. नेहमीप्रमाणे सोमवार. वीकएन्डला काय केले हे बोलता बोलता या आठवड्यात काय डेडलाईनस आहेत ते बघत होते. मनूचा फोन तीनवेळा वाजला --काहीतरी अर्जंट असणार. आज तिच्या सुट्टीचा शेवटचा दिवस त्यामुळे सगळे होमवर्क आजच आठवणार आणि मम्माला आणखीन चार फोन तर येणारच असा विचार करत फोन उचलला.' अरे मम्मा, ओ हमिदनाना मरे नही अभी तक!"
"व्हाट", इतक्या जोरात ओरडले की समोरच्या टेबलवरचा सहकारी, "आर यु ऑल राईट? " असे काळजीने म्हणाला .
" तैयबाखाला का मेसेज है --तू फोन कर उनको".
तिचा फोन ठेऊन तातडीने माझ्या बहिणीला तैयबाला फोन लावला. दुसऱ्या बाजूला तैयब आणि मां दोघी खदाखदा हसत होत्या. त्या नेहमीच अशा हसतात --काही बोलायच्या आत परत एक ठहाका. तैयब मला सांगते दुसऱ्या फोनवर मामू मांबरोबर बोलत आहेत. आणि मां त्यांना मी काय काय लिहिले ते सांगत आहे. तिने आज सकाळी माझी पोस्ट वाचली होती आणि मांच्या घरी जाऊन तिला दाखवली होती ---जे गेले ते मामू हे नव्हतेच. सारख्याच नावाचे दुसरे --ज्यांना आम्ही मामू म्हणायचो ते मामू गेले. आता नको त्यांचे नाव आणि वर्णन लिहायला ..उद्या परत काही फोन आला तर .......................
मां म्हणाली मामू म्हणतायत फोन कर त्यांना ! "हो मां, ऑफिसमध्ये आहे, नंतर करेन." त्यांच्या हसण्याच्या आवाजात फोन ठेवला खरे ..आणि आता परत मामू आठवायला लागले. पण गेले दोन दिवस सदगदित होऊन मामुंच्या माझ्या जीवनातील, बालपणातील योगदानाचे आकलन बिकलन करायचा माझा भाव कुठे लुप्त झाला कळाले नाही. खरे मामू दिसायला लागले नजरेसमोर आणि लहानपणच्या आणखी काही घटना ...पण पूर्णपणे दुसऱ्या रुपात समोर यायला लागल्या ...
आता जर फलटणला गेले तर काय परत अंगठे धरून उभे करणार की काय अशी भीती वाटायला लागली. अशी काही भीतीदायक घटना नजरेसमोर आली की माझी मानसिक सुरक्षा व्यवस्था ( defence mechanism) लगेच कार्यरत होते. हो सांगेन आता मामुंना ---तुम्ही ज्या ज्या शिक्षा करता त्या सगळ्या बालहक्कांचे उल्लंघन करणाऱ्या आहेत.
दुसर्याच क्षणी जाणवले ---आपल्या तोंडातून आवाज निघतच नाहीये. मामू निक्षून सांगत आहेत . "गुडघे न वाकवता अंगठे धर".
अहो पण मामू तेव्हासारखी सडसडीत नाही राहिले --हे पण मनातच, पण ऐकू गेले की काय मामुंना !
" तरी नेहमी सांगतो भाकरी -भाजी खात जा भरपूर --नुसता भात गिळायला पाहिजे ---पोट नाही सुटणार तर काय !" आणि उद्या सकाळी पाच वाजता उठून कॅनलच्या रस्त्याने दोन राउंड काढायचे."
हे फर्मान आधीच्या सगळ्या सुट्ट्यात असायचे. एक तर कॅनलच्या रस्त्याला मोठी खडी टाकलेली --ती पायाला रुतायची. डोळ्यासमोर एकतर इतका काळोख ---झोप आल्यामुळे का उजाडले नसल्यामुळे हे अजूनही माहित नाही. त्यात मागे रहायची बिशाद नाही. पळता पळता नैसर्गिकरित्या स्पीड वाढायचे एकमेव कारण म्हणजे आपल्या मागे कुत्रे भुन्कल्याचा वाढता आवाज! त्यात मामुंची नेहमीची ठरलेली वाक्ये --असेच नाही पी टी उषा होता येत आणि असेच नाही सुवर्णपदक मिळत ! ( तेव्हा नुकतेच पदक मिळाल्यामुळे पी टी चा फारच उदो उदो होता !)
" हो पण ते सोन्याचे पदक पाहिजे कोणाला? दोन वर्षाआधी पडलेलेया त्या कानातल्या चांदीच्या रिन्गेबद्द्ल अजून आम्ही बोलणे खातोय! कोण सांभाळत बसेल ते सोन्याचे पदक? आणि केरळमध्ये काय अशा दगडी नसतात...दगडांचा देश हा महाराष्ट्रच आहे ". पण या सगळ्या ज्ञानाची देवाणघेवाण नंतर पाणी भरत असताना आम्हा मुलातच व्हायची .
कॅनलवर पाणी भरायला जाणे किंवा भांडी घासायला नेणे हे मात्र सगळ्यांना आवडायचे. आजकाल जसे कॉन्फेरेंस मध्ये चहा घेताना किंवा बाहेर लॉबीत गप्पा मारताना खरे नेट्वर्किंग होते तसे कॅनलवर जाण्याची संधी म्हणजे नेटवर्किंग्ची संधी असायची. इथे महत्वाच्या खबरी कळायच्या उदा. आज अब्बाजी ( गुड्डू, मुन्ना मामुना अब्बाजी म्हणतात ) हॉलीबॉल खेळायला जाणार किंवा अम्मी कोणाच्या तरी घरी कार्यक्रमाला जाणार. आमच्या बऱ्याचशा योजनांचा उगम हा कॅनलचा फाटा असायचा त्याचबरोबर आमच्या विश्वातील घडलेल्या घटनांचे उहापोह करण्याचे कॅनल हे एक सर्वसंमत ठिकाण होते. त्यावेळी शीतयुद्ध, सार्क चळवळ, फुटीरतावाद यावर सगळ्या बातम्या असायच्या. दूरदर्शनला आदल्या दिवशी जे ऐकले आणि त्यादिवशीच्या सकाळ किंवा पुढारीमध्ये जे वाचले त्या बातम्यांच्या धर्तीवर आमचे सगळे विश्लेषण चालायचे. मी आणि गुड्डू, तैयब आणि मुन्ना अशा दोन सुपरपावरस होत्या; अमिना हा नेहमीच फुटीरतावादी गट ( ती एकतर सगळ्यात लहान आणि मामू आणि मुमानी दोघांची लाडकी --त्यामुळे थोड्याशा धाकाने किंवा त्या दोघांपैकी कोणी प्रेमाने विचारले की लगेच सगळी सिक्रेट्स सांगून टाकायची )आणि ज्यांच्यामध्ये आमच्या योजनांमध्ये सामील व्हायची धमक नाही ते सगळे मात्र ---असहकार किंवा नॉनअलाय्न्मेंत वाले. आमच्या निम्म्या योजना कुठल्या डब्यात काय ठेवले आहे आणि ते कधी आणि कसे लंपास करायचे याबद्दलच असायच्या . घरी खाण्यापिण्याची ददात होती असे नाही --उलट मामा याबाबतीतही फारच हौशी --दर रविवारी पिशव्या भरभरून बाजार आणायचे. घरी वेगवेगळ्या डीश बनवणे ही त्यांची हॉबी होती आणि मुमानीने काही दुजाभाव केला नाही ----तरीही समोर वाढलेले, सगळ्यांसोबत खाल्लेले आणि गुपचूप कॅनल वर किंवा एकाने दारात पहारा देऊन दुसऱ्याने लंपास केलेल्या गोष्टींची मजा निराळीच होती.
असेच एकदा दिवाळीत शनिवारी सकाळी मुमानींनी संध्याकाळी करंज्या करायच्या म्हणून खोबऱ्याचे सारण तयार करून फळीवर ठेवले होते. जेवण झाल्यावर त्या दुसऱ्या कोणाच्या घरी फराळाचे करू लागायला गेल्या. मामू थोडी झोप काढून हॉली बॉल खेळायला गेले. आम्ही घरी पाचजण होतो ---सगळ्यांच्या अगदी मिलिटरी थाटात आपापल्या जागा घेऊन कारवाया सुरु. सुरवातीला थोडी चव घ्यायची म्हणून दोन-तीन चमचे सारणाचा बकाणा भरला. परत चांगले लागले म्हणून आणखी थोडे, मग आणखी थोडे असे करत करत इकडे तिकडे बघत, एकाने पहारा देत, दुसरयाने स्टुलावर चढून बारीबरीने चमच्या चमच्याने चव घेणे चालू होते. तेवढ्यात मुमानी परत येताना दिसल्या. घाईघाईने स्टूल जागच्या जागी ठेऊन आम्ही सगळे पसार. मामुंचे खेळणे झाल्यावर चहा घेऊन संध्याकाळी सगळ्यांनी करंज्या करायच्या असा बेत होता. त्याप्रमाणे चहा झाला आणि मुमानिनी सारण ज्या पितळी घमेल्यात ठेवले होते ते खाली काढले ---त्यात नावाला तीन -चार करंज्यांचे सारण शिल्लक राहिले होते!
करंजी दुमडावी तसे मामुंनी आम्हा सगळ्यांना दुमडून अंगठे धरायला लावले. नेहमीप्रमाणे अमिना लहान म्हणून तिला सूट मिळाली आणि गुड्डू आधीच पसार झाला होता. सगळी कॉलनी शोधली तरी तो तीन तास काही सापडला नाही ---तोपर्यंत आमच्या हातापायांच्या अंगठ्यांची गाठ तशीच होती. वरून मामुंची काय काय करेन ---याची धमकीवजा वर्णने सुरु होती. जेवणाची वेळ झाली तरी गुड्डूचा पत्ता नाही म्हणल्यावर मुमानींचा धीर सुटायला लागला. त्यांचे हुंदकेवजा बोल ऐकून आणि लाल झालेले नाक बघून पलंगाखालून गुड्डूचा फिदीफिदी हसण्याचा आवाज आला. ज्वारीच्या पोत्याच्या मागून त्याला बाहेर काढून काही बोलण्याच्या आधीच मुमानींनी आता पोरांना काही बोललात तर ....असे काहीसे तुटक ऐकू आले. नंतर बराच वेळ कोणामुळे आम्ही जास्त बिघडलो हे विश्लेषण चालू होते....त्या संभाषणाची आठवण आली की आजकालच्या स्टार न्यूजच्या बातमीच्या ष्टाईलचा उगम कसा झाला असेल त्याची कल्पना येते!
पण त्यावेळी गुड्डू वाचला हे खरे आणि करंजीसारण योजनेचा तो मुख्य सूत्रधार असताना ही काहीही शिक्षा न होता तो सुटला ---हे आजवरचे सगळ्यात मोठे शल्य आहे आमचे!
यावेळी भेटले की सांगणार मामू आणि मुमाणींना ---की फक्त मुमानिना हुंदका आला म्हणून त्याला शिक्षा न होणे हा भेदभाव तर आहेच पण असे आमच्यासमोर खमंग सारण बनवून ठेऊन जाणे आणि नंतर आम्ही आमची "फडताळ लंपास" कुशलता बाजूला ठेऊन त्या सारणाचा फक्त लांबून वास घेऊ अशी अपेक्षा करणे --हे आमच्या मुलभूत मानवी हक्कांच्या विरोधात आहे.
गेली दहा वर्षे मानवी हक्क आणि बालहक्क यावर प्रत्यक्ष काम आणि यासंदर्भातले ट्रेनिंग आणि अभ्यास यामुळे कुठल्याही आर्गुमेंट ला मानवी हक्कांची पायमल्ली असा मस्त मुलामा देता येतो --हा अनुभवसिद्ध खात्रीचा फॉर्मुला वापरून मनातली अशी बरीचशी शल्य यावेळेला आले की बोलून टाकणार आहे.
असा विचार येताच मुमानी दिसल्याच समोर. काठवडित एका हाताने पीठ काढत दुसऱ्या हाताने तव्यावर भाकरी टाकताना. तापल्या तव्यावर भाकरी उलटताना थोडे पाण्याचे थेंब पडले की जो चर्रकन आवाज येतो --तसा मुमानींचा आवाज. गेली कित्येक वर्ष भाकरीचा तो आवाज, खमंग वास आला की मुमानींचा एकादा धारदार डायलॉग आठवणारच--एकाही डायलॉगला घाबरलो नाही ही गोष्ट वेगळी. पण त्याचे कारण मुमानी कधी त्यांच्या डायलॉगला उत्तर म्हणून काही बोलले तर आमच्य्बरोबर हसण्यात शामिल व्हायच्या --त्याचमुळे त्यांच्याबद्दल भीती तर नाहीच पण एक जिव्हाळा नक्कीच जाणवायचा.
म्हणले स्वतालाच --बाहेर कितीही ट्रेनिंग कर आजही तुला त्या नक्की म्हणणार ---काय चुरूचरू तोंड चाललंय ! कुठं शिकून आला एवढं!
या सगळ्या विचारात एक गोष्ट लक्षात आली की मामू गेले म्हणल्यावर मी अगदी सगळ्या उदात्त गोष्टी विचार केल्या, लिहिल्या आणि आज मात्र पुन्हा संधी मिळाली की सगळी शल्ये बाहेर काढून एकदा तरी त्यांना समक्ष ऐकवेनच असे ---मनातल्या मनात मांडे चालू आहेतच !
मग लोक कोणाकोणाला श्रद्धांजली अर्पित करताना काय काय आठवणी काढतात, कसं गेलेलं माणूस सर्वगुण संपन्न होते हे अह्मामिकेने सांगतात याची आठवण आली ---पण या गेलेल्यापैकी जर कोणी लगेचच परत आले तर ---दुसऱ्या दिवशी काय म्हणतील बरे हे लोक !
मी अजूनही काही मामुना फोन केलेला नाही आणि हा आठवडाभर तरी घरी कोणाला फोन करणार नाही ---मनुने अगदी योग्य भाषेत मला सांगितले ----"मम्मा क्या पोपट हुवा तेरा!" आणि हेच वाक्य मला पुढची कित्येक वर्षे वेगवेगळ्या स्वरूपात ऐकावे लागणार आहे ----"गन्ना खडा था" ही जशी सगळ्या खानदानभर पसरलेली आणि सतत बोलून अजरामर झालेली गोष्ट आहे ---तसेच ' मामू गेले' हे ही आतापर्यंत निम्म्या खानदानभर पसरलेले असणार ..
खंत एकच ---आता जाहीर केले म्हणल्यावर पुढच्या भारतभेटीत नक्की फलटणला जावे लागणार- तशी जाणारच होते पण इतक्या वर्षांची सगळी रहस्ये चव्हाट्यावर आणल्यावर आता जायचे म्हणजे ............

No comments:

Post a Comment

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...