Thursday 13 March 2014

लंडनमध्ये मराठी

लंडनमध्ये मराठी


लंडनमध्ये मराठी
लंडनमध्ये पहिल्याच महिन्यात निरीक्षणात आलेल्या काही गोष्टी -- त्यापैकी एक म्हणजे इथे इतर भाषिकांचे जसे समूह दिसून येतात तसा मराठी माणूस काही एकत्र दिसत नाही. इथल्या प्रमुख भारतीय भागांमध्ये वेम्बली गुजराथ्यांचे, साऊथहाल पंजाब्यांचे आणि इस्टहॅम प्रामुख्याने तमिळ लोकांचे अशी वर्गवारी स्पष्ट दिसून येते. आणि अर्थातच याचे प्रतिबिंब इथल्या संस्कृतीत दिसते - इथली उपहारगृहे, इथे सार्वजनिकरित्या साजरे होणारे उत्सव, कपड्यांची व इतर वस्तूंची दुकाने, मंदिरे इत्यादी. साहजिकच जितके पंजाबी, गुजराती, तमिळ इथे ऐकायला मिळते त्या तुलनेत मराठी अगदी क्वचित कानावर पडते. मी ज्या स्थानीय प्रशासनसंस्थेत काम करते त्या भागात एकूण ९४ भाषीय लोक राहतात आणि त्याचा अर्थ त्यापैकी कोणालाही इंग्रजी येत नसेल तर त्यांच्याबरोबर काम करताना आम्हाला भाषांतरकारांना बोलवावे लागते. इथे शासकीय प्रचारपत्रांमध्येही इतर भाषांचा समावेश असतो. उदा. इथल्या सरकारी इस्पितळात इथे पंजाबी, गुजराती असल्यामुळे त्यांची पत्रके त्या भाषांमध्ये छापलेली असतात. किंवा जो पत्रव्यवहार केला जातो तो जर इंग्रजी समजेत नसेल तर त्या त्या भाषेत भाषांतरित करण्यासाठी टेलिफोनवर भाषांतरकार उपलब्ध असतात. या ९४ भाषांमध्ये बऱ्याच युरोपिअन, आफ्रिकन आणि आशियायी भाषा आहेत पण मराठी नाही. अर्थात याचा अर्थ मराठी लोक जिथे जातात तिथे इतर भाषा अवगत करून त्यांचे गाडे चालते असा होतो किंवा इंग्रजी येत नसले तरी हिंदीत काम चल जाता है!
मराठी मातृभाषा असली तरी घरी आणि कामाच्या ठिकाणी हिंदी, इंग्रजीची सवय असल्यामुळे मराठी इथे काही मी मिस करत होते अशातला भाग नाही. पण एके दिवशी घरी परतताना रेल्वे स्थानकाच्या बाहेरील बस स्टोपवर कोणीतरी मराठी बोलताना ऐकले. थोडे मागे वळून बघितले आणि तशीच पुढे गेले. पण पावले थबकली आणि कान टवकारले गेले --कारण ती मुले नुसतीच मराठी नाही तर अस्सल कोल्हापुरी मराठी बोलत होती. मग मला काही राहवले गेले नाही. परत वळून मागे गेले आणि विचारले -सातारा, सांगली का कोल्हापूर? मग कोण कुठले याच्यावर बोलणे झाले आणि त्यांनी मला विचारले -' गाववाले चला आमच्याबरोबर जेवायला '.
' नको' नको ' पुन्हा केव्हातरी असे म्हणून मी सटकणार होते -तर त्यांचाआग्रह चालू होता. शेवटी म्हणूनच गेले --हे काय कोल्हापूर, सातारा आहे का इथे पौंडात खर्च होतो --आणि तुम्हे सगळे इथे नवीन आणि त्यात विद्यार्थी! 'काय फरक पडत नाही ' चल आमच्याबरोबर.'
ठीक आहे बाबा, ( नाहीतरी घरी जाऊन परत खिचडीच खावी लागणार ) म्हणून जायचेठरवले. कुठे जाऊयात?
इथे थोडे पुढे गेले की चांगली जेवणाची जागा आहे असे म्हणून आम्ही बसमध्ये बसलो. बऱ्याच गप्पा झाल्या. मग उतरून थोडे पुढे चालत गेलो आणि हा सगळा घोळका एका गुरुद्वारयाच्या समोर उभा. मला काहीच संदर्भ लागेना. नंतर त्यांनी स्पष्ट केले -संध्याकाळचे जेवण ते इथे लंगर मध्ये येऊन खातात. मिश्कील हसत त्यातला एक जण म्हणाला --म्हणून तर अगदी बेधडक म्हणालो -चला जेवायला!
भारतीय विद्यार्थ्यांमध्ये इथे गुरुद्वारा किंवा काही ठराविक मंदिरांना- सोहो मधले हरेकृष्ण मंदिर -जास्त आवडते --भेट देण्याचे महत्वाचे कारण म्हणजे -लंगर- प्रसाद म्हणून छान जेवण मिळते.
लंडनमध्ये मराठी भाषा आणि मंडळी भेटली ती अशी! कुठेही, कधीही! आणि ज्या कोणाशी थोड्य ;नमस्कार चमत्कारापुढच्या गप्पा होतात ते पहिल्यांदा वडा-पाव ची आठवण काढून इथे कोणीतरी एक गाडा सुरु करणे कसे आवश्यक आहे हेसांगतात. गेल्या पाच वर्षात अजून काही कोणी त्या योजनेची अंमलबजावणी केली नाही. त्यातले "मराठीपण" वेगळे सांगायला नको.
एक दिवस ऑफिसची;एक मिटिंग संपवून बाहेर आले . माझ्या मागोमाग एक मुलगा लगबगीने आला --
"तू मुंबईची का पुण्याची गं?"
"तुला कसे कळाले --मी मुंबई/ पुणे का मराठी ते ?"
"त्याचे काय आहे , तू ज्या पद्धतीने प्रश्न विचारला तसे इथे कोणी बोलत नाही ."
"म्हणजे ?"
तेव्हा मानसिंगने बाकीचे विषय काढून वेळ मारून नेली खरी. पण नंतर खरे सांगितलेच --असले भोचक प्रश्न इथे कोणी विचारत नाही. मला काय विचारले होते ते ही आठवत नाही पण त्यानंतरच्या लंच टाईम मस्त मराठीत गप्पा झाल्या आणि त्या भोचक प्रश्नांचा महत्त्वाचा परिणाम म्हणजे मला पुढची तीन वर्षे एक चांगला मित्र मिळाला.
मानसिंग मंचरचा - लंडनमध्ये पीएचडी करत होता. त्यानंतरच्या शनिवारी घरीजेवायला आला आणि माझ्या इतर अमराठी घरमित्रांबरोबर त्याची समवयस्क असल्यामुळे चांगलीच गट्टी जमली. अगदी उत्साहात त्यांच्याशी गप्पा मारणार --पण मध्येच मराठीत --आपलं याला काय म्हणतात रे ? असे ५-६ वेळा तरी विचारणारच. गेल्या वेळच्या फ़िफ़ा फुटबॉल सामन्यांच्यावेळी घराला अगदी रण धुमाळीचे वातावरण आले होते. मला एक तर आपल्या खोलीत शांत बसून राहणे किंवा सगळ्यांसाठी जेवण बनवणे एवढे दोनच पर्याय शिल्लक ठेवले होते. मानसिंग जोशात आला की मला अगदी शिवाजीचे मावळे आठवायचे --अरे पळ, पळ पळ. अरे मार ना ... ये .. अरे ....आणि मध्ये बरेच काही! त्यात अखेरच्या सामन्याच्या वेळी अगदी कहरच --त्या झिदानला लाल कार्ड मिळाले आणि त्याबरोबर मानसिंगच्या सगळ्या शेलक्या मराठमोळ्या शिव्या ---इतक्या उत्स्फुर्तपणे, वेगाने आणि मनापासून बाहेर पडल्या ----लहानपणी सुभाषिते/ श्लोक पाठांतराच्या स्पर्धा असतात तशा याच्या गावात काही वेगळे पाठ करायची स्पर्धा होती की काय असा प्रश्न पडला. त्यानंतरची पूर्ण संध्याकाळ राहून राहून आणखी काही राहिलेल्या शेलक्या वचनांची उजळणी होत राहिली --हे सांगणे नको.
मध्ये काही कारणानिमित्त मला दोन आठवड्यासाठी घर बदलावे लागले. इस्ट हॅममध्ये एका शेअर्ड अकोमोडषन मध्ये राहत होते. आजूबाजूच्या रूममध्ये कोण राहते असे विचारले तर कळाले की बाकी सगळे तमिळ पण खालच्या खोलीत कोणीतरी मुंबईचे जोडपे आहे. त्या दिवशी खूप पाउस आणि थंडी होती त्यामुळे कुठे बाहेर जाता येत नव्हते. संध्याकाळी खालच्या रूमचा उघडण्याचा आवाज आला आणि कोंडवाड्यातून सुटल्यासारखी खाली पळाले. समोरच्या मुलीच्या गळ्यात उलटी वाटी असलेले मंगळसूत्र. अरे हे तर मराठी दिसतात म्हणून मराठीतच बोलले --तर ही अनिका अगदी गळ्यात पडली. किती छान वाटले कोणी मराठी बघून ... तिने लगेच छान चहा केला आणि पुढचे वर्षभर छान मसाला चहा मला मिळत राहिला.
अनिका नगरची --पेशाने वकील आणि आई -वडील वकील असल्यामुळे तशी खानदानीवकिली अंगात भिनलेली. सगळ्या गोष्टीत ठाम मते. त्यात शासकीय कारभार म्हणजे अनागोंदी आणि भ्रष्ट अशी काळ्या दगडावरची रेघ. कुठलेही बिल आले की त्याचा शहानिशा करून ते कसे चुकीचे आहे हे सगळे त्यासंदर्भातले कायदे /नियम तपासून सिद्ध करणार. पण प्रत्येक वेळी कुठल्याही कार्यालयात गेली की मला दोन फोन नक्कीच की तिथला कर्मचारी तिचे काही ऐकून घेत नाही --आता कोणाला भेटू? तिचा फोन न घ्यायची बिशाद नव्हती. चुकून वोयीसमेलवर गेला की --शामत आ जाती थी! एकदा मिटींगमध्ये असताना चारवेळा फोन वाजला ---बाहेर येऊन घेतला तर म्हणे :
'मी दुसऱ्याफोनवर आईशी बोलते आहे. ती विचारते आहे अनिलबद्दल , मलाम्हणायचे आहे की तो माझ्यासारखा extrovert नाही, पण तिला extrovert म्हणजे काय ते कळत नाहीये. मला मराठीत शब्द सांग ---एकतर महत्वाची मीटिंग सोडून आले होते --त्यात इतका गंभीर प्रश्न डोक्यात घुसायला आणि प्रोसेस व्हायला वेळ लागला. त्यात तिचे समन्स पाठ्वल्यासारखे विचारणे.--मला काही मराठीत शब्द सुचत नव्हता. extrovert ---काय बरे ----पटकन तोंडातून बाहेर पडले --"बाहेरख्याली'! आपण चुकीचा शब्द सांगितला हे कळायच्या आधी बरेच 'चुकीचे बरोबर' शब्द ऐकवले गेले होते.
काही दिवसांनी असाच आणखी तातडीचा फोन -शबाना मला गाय छाप तंबाखू कुठेमिळेल?" बाप रे ही काय आपल्याला समजते ? असा प्रश्न विचारणार होते पण तेवढ्यात सफाई --अगं बाबांना इथे येऊन दहा दिवस झाले. त्यांच्या पुढ्या परवा संपल्या, तेव्हापासून त्यांना 'काही होत नाहीये ' आणि खूप चीड चीड करत आहेत. आई आणि मी कंटाळलो आहोत आता. मी तिला आनंद पान वाल्याबद्दल सांगितले --माहित नाही कुठला छाप मिळाला पण त्या नंतरच्या शनिवारी ती काका काकुना घेऊन जेवायला आली होती तेव्हा काका व्यवस्थित जेवले खरे!
इथे आले तेव्हा बऱ्याच मित्रमैत्रिणीनी त्यांच्या ओळखीच्यांचे पत्ते दिले होते. असेच द्वारकानाथने मृदुलाबद्दल लिहिले होते. तेव्हा ती केम्ब्रिजला असायची. आता मराठीवर लिहित आहे म्हणून, पण तिला ती मराठी आहे म्हणून मी काही भेटायला गेले नव्हते- मराठीपेक्षा केम्ब्रिज जास्त खुणावत होते. पण त्या पहिल्या भेटीनंतर मात्र मराठीत बोलणे हा आम्हाला जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे हे नक्की. गेल्या ख्रिसमसला घरी आली होती तेव्हा माझी मराठी टाइप करण्याचे शिकवणी घेतली. आणि तेव्हापासून मला लिही लिही म्हणून ढकलण्याचे कामही ती मनापासून करते.
तसे पाहिले तर मित्रमैत्रिणींची वानवा कधीच नव्हती आणि अगदी गंभीर चर्चा किंवा आवारागर्दी या कशातच भाषेचा अडसर कधी आला नव्हता --पण तरी मराठी ऐकले की इथे का अगदी मागोवा घेऊन त्या व्यंक्तीशी आवर्जून बोलावेसे वाटते. हे मला माझ्या मुलीला कधी समजाऊन सांगता नाही आले. अजूनही ती सोबत असली आणि कोणी मराठी बोलताना ऐकले की ती नेहमीचे मिश्कील हसून सांगते --जा मम्मा, तेरे मराठी लोग, बात कर के आ !
पण प्रत्येकवेळी मराठी माणूस दिसला की असे उचकवायला मनू लागतेच असे नाही.उदा. गेल्या महिन्यात सकाळी ९ वाजताच्या अपॉइंटमेंट ठरलेल्या होत्या. त्यात उशीर झालेला आणि ट्रेनस्टेशनवर गर्दीत वाट काढताना समोर आरामात एक माणूस मराठीत फोनवर गप्पा झाडताना दिसला आणि तोही अगदी सांगली-कोल्हापूरच्या भाषेत. हा नक्कीच सांगली किंवा कोल्हापूर -अधेमध्ये नाहीच. पण नक्की कुठला हा गहन प्रश्न त्याला विचारून दोनचार आणखी गोष्टी केल्या नाहीत तर गाडी पुढे कशी जाणार? हा कुठल्या फलाटावर आणि कुठल्या गाडीत चढणार असा आडाखा बांधत होते तर तो नेमका मला ज्या गाडीने जायचे त्यातच चढला. आता याचा फोन झाला की बोलूयात आरामात --दोन स्टेशन आहेत मध्ये असा विचार करत मी त्याच्या मागोमाग. एक स्टेशन जवळ आले तरी त्याचे फोन संभाषण काही संपेना. मला आपले दडपण --हा इथे उतरला तर? मेंदूचा दुसरा भाग अगदी कोकलून सांगत होता --तुला काय घेणेदेणे तो माणूस कुठला आणि काय फरक पडणार आहे तो सांगली म्हणाला किंवा कोल्हापूर? आणि किती उशीर झाला आहे त्याचे काय --आजचे काम काही हलके करणार आहे का तो कुठलाही असला तरी ! तेवढ्यात गाडी वेस्टहॅम स्टेशनला थांबली आणि तो उतरला खाली. मेंदूच्या त्या भागाने सुस्कारा सोडला, गेला आता हा-- तर दुसऱ्या भागाने लगेचच ओरडून सांगितले --नाही नाही तो फक्त दुसऱ्या लोकांना उतरायला जागा करून देत आहे. तो बघ परत चढला आत. मग गेल्या आठवड्यातच एका ट्रेनिंग सेशन मध्ये 'stalking' या संकल्पनेवर झालेली चर्चा आठवली आणि मग तुझे आताचे वर्तन तसेच आहे असा इशारा मेंदूचा सजग भाग देत असल्याचे कळाले.
पण तरीही " अरे आता तरी फोन ठेव बाजूला, केवढ्या काकुळतीने मला तुला विचारायचे आहे ". असा विचार करून खिडकीच्या बाहेर बघायचा प्रयत्न करत होते, तेव्हड्यात झाला या बाबाचा फोन. फोन त्याच्या खिशात जायच्या आधी मी विचारले --सांगली का कोल्हापूर?
तो हसून म्हणाला, सांगली - तुम्ही? मग पुढे काही विचारायच्या आधीच तोंडातून निघाले--' कधीचा पाठलाग करते आहे मी'. तो अगदी अवाक!
पण तोपर्यंत सांगितलेले --इथे असे मराठी खूप कमी ऐकायला मिळते ना !'
" अवो नाहीऽऽ. इथे इल्फर्डला खूप पडल्येत मराठी" . आता तर अगदी कन्फर्म झाले याच्या दोन चार पिढ्या सांगलीत असणार अगदी हळद किंवा तंबाखूच्या ढीगासारखे मराठी पडलेले!
" आणि आता तर मित्रमंडळ झाले आहे, परवा कार्यक्रम आहे गुढीपाडव्याचा, ई-मेल द्या तुमचे मी पाठवतो आमंत्रण". ( नशीब टिपिकल सांगलीवाल्यान्सारखे हा म्हणाला नाही --अवो कशाला घाबरताय-- मी आणून देतो की एक ढीगभर. )
गुढीपाडव्याचा कार्यक्रम एका चर्चच्या हॉलमध्ये होता आणि खरेच ढीगाने मराठी दिसले मला तिथे! आणि वडा पावचा स्टॉलही!!
मनू खूपच खुश --मराठीमुळे नाही खूप दिवसांनी वडा पाव खायला मिळाला म्हणून! मम्माच्या मराठीप्रेमाची महती तेव्हा तिला कळली असे वाटले खरे.
पण तिच्या प्रश्नाचे उत्तर उमजले असले तरी तिला समजून नाही सांगता येत. तिला इंग्रजीत अडलेले शब्द समजाऊन सांगते पण माझ्या आणि मांच्या एखाद्या शब्दावरून रंगलेल्या गप्पांचे स्वरूप काही त्याला नसते. तिच्या नवीन वाचलेल्या पुस्तकांवर संभाषण नेहमी होते पण त्यातला भाषेचा आनंद मला तिच्याबरोबर इतका शेअर नाही करता येत. खूप लाडात येऊन तिला गोंजारतानाकिंवा चिडले असले तर तिच्यावर खेकसताना नेहमी मराठीतले शेलके शब्द नकळत येतातच. गेल्या वीकेंडला रंगात येऊन 'Twilight' च्या सिरीजमधल्या नवीन रोमँटिक स्टोरीज सांगताना मला तिने विचारले --तुझे फेवरेट रोमँटिक नोवेल कुठले? आता सार्वजनिक वाचनालयात चोरून वाचलेल्या सुहास शिरवळकर किंवा बाबाकदमांच्या कादंबऱ्याची नावे सांगता येतील पण त्यांची स्टोरी लाईन कशी समजावून सांगायची? ( काय दुसरा पर्याय ही नसायचा. फास्टर फेणे, सोनेरी टोळी व तत्सम सगळे तिसरी चौथीतच अंगात अगदी जिरले होते त्यानंतर भा. रा. भागवतांची अमक्या किल्ल्याचे रहस्य वगैरे पहिल्या दोन पानातच कळायचे.डॅन ब्राऊनची पहिली कादंबरी संपवून दुसरी सुरु केली तेव्हा त्या रहस्यमय पुस्तकांची आठवण आली होती खरे. बिचारे बाबा आम्ही शामची आई किंवा दुसरी गांधी/विनोबांची पुस्तके वाचावीत यासाठी अगदी सदगदित होऊन त्यांच्याबद्दल सांगायचे. मला अजूनही प्रश्न आहे -त्यांच्या डोळ्यातील पाणीवजा भाव हा साने गुरुजींच्या बद्दलचा आदरभाव उन्मळून आल्यामुळे आहे का --ही कार्टी आपले काही ऐकणार नाहीत या ठाम हतबलतेमुळे आहे. पण यात त्या सानेगुरुजींचा काही दोष नसावा इतर बाबतीतही बाबा त्या 'निरूपा रोयला' मागे टाकतील असे डायलॉग मारतातच)
मराठी मातृभाषा असली तरी त्यातच शिक्षण, किंवा तीच भाषा गोड असा अट्टाहास बाळगणारी मी नाही --तरीही काही शब्द मला भाषांतरित करता येतात पण समजावता नाही येत. असेही असावे की जेव्हा आपण आपली प्राथमिक भाषा शिकतो तेव्हा शब्दांचे स्थान हे दुय्यम असते... आपला अनुभव हा प्राथमिक असतो आणि ते शब्द त्या अनुभवाला व्यक्त करण्याचे साधन असतात. त्यामुळे प्रत्येक शब्दाला अनुभूतीची आणि त्यासोबतच्या भावभावनांची जोड असते. एक व्यक्ती म्हणून जगताना, वाढताना ती भाषा तुमच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा अविभाज्य भाग असते ..म्हणूनच इथे मराठीवाचून काहीही अडत नसले तरी गर्दीतला एक चेहरा, काही ओळख नसताना फक्त आपली भाषा बोलतो म्हणून आपुलकीचा वाटतो.
असेच दोन वर्षाआधी कोणाचेतरी कोणीतरी -मराठीत बोलणारे लंडन भेटीवर आलेहोते. तेव्हापासून मराठीतील एक नवा अध्याय सुरु झाला आहे ---बऱ्याचशा प्रस्थापित आणि बऱ्याच लिहिता न येणाऱ्या म्हणींचा --पण त्यावर पुन्हा कधीतरी ..


No comments:

Post a Comment

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...