इजिप्त आणि मगरेब देश- सत्ता, अधिकार , नासर
राजकीय नेतृत्व - सत्ता, अधिकार
नासरच्या यशात आणि अपयशात त्याच्या नेतृत्वगुणाचा मोठा वाटा होता. नासरचा करिष्मा लोकांवर मोहिनी घालणारा होता आणि त्या करिष्म्याच्या जोरावरच त्याला प्रचंड लोकमत, पाठींबा आणि संसाधने मिळाली. अशा वलयांकित नेतृत्वास टक्कर देण्यास परंपरावादी नेतृत्व सौदीतून उभे राहिले. इस्लामिक जगतात अशी करिस्मा आणि परंपरेवर आधारित नेतृत्वेच पुढे येताना दिसतात. हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्याआधी राजकीय नेतृत्व कशासाठी आणि त्या अनुषंगाने राज्य करणे म्हणजे काय? राज्याची, शासनाची आणि राज्यकर्त्याची भूमिका नक्की काय हे पाहणे आवश्यक आहे. खरे तर हा प्रश्न व्यक्ती आणि समष्टी च्या संबंधांचे विवेचन सुरु झाले तेव्हापासूनचा. पाश्चात्य विचारसरणीत रुसो, हॉब्स, लोके यांनी मांडलेल्या विचारांच्या आधारे राज्याची संकल्पना व सध्याची प्रारूपे समजावून घेता येतील.
पाश्चिमात्य संस्कृतीच्या वैचारिक इतिहासात ॲरिस्टॉटल (इ. स.पू. ३८४–३२२) व प्लेटो (इ. स.पू. ४२८–सु.३४८) यांच्या काळापासून सामाजिक कराराची उत्पत्ती, स्वरुप आणि कार्य यांविषयीचे विश्लेषण आणि चर्चा सुरु होती. त्यांनी राज्यसंस्थेच्या उत्पत्तीचे मूळ मनुष्याच्या सहकारी भावनेत असल्याचे मत प्रतिपादन केले आहे. या कराराच्या संकल्पनेला अधिक सुसंगत आणि सुसूत्र स्वरुप सोळाव्या ते अठराव्या शतकांत टॉमस हॉब्ज, जॉन लॉक व झां झाक रुसो या विचारवंत तत्त्ववेत्त्यांनी दिले आणि आपल्या स्वतःच्या दृष्टीकोनातून या सिद्घांताचे परिशीलन करुन आपापले स्वतंत्र विवेचन मांडले. त्यामुळे या संकल्पनेला सैद्घांतिक व तात्त्विक बैठक प्राप्त झाली. या तत्त्ववेत्त्यांनी नागरी धुरीण समाजाला (लर्नेड सिव्हिल सोसायटी) मिळणाऱ्या सुविधा, फायदे आणि प्राथमिक नैसर्गिक अवस्थेत ( अ स्टेट ऑफ नेचर ) असलेल्या लोकांचे तोटे, अहितकारक गोष्टी यांची तुलना करुन राज्यसंस्था अस्तित्वात नसेल, तर काय घडते याचे आनुमानिक (हायपॉथेटिकल) चित्र संघटित राज्यसंस्थेचे मूल्य आणि उद्दिष्टे विशद करुन सिद्घ करण्याचा प्रयत्न केला आहे.
टॉमस हॉब्ज (१५८८–१६७९) याने रानटी दुःसह्य अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी मनुष्याने आपापसांत करार केला आणि त्यातून सार्वभौम सत्तेची उत्पत्ती झाली, असे सामाजिक कराराचे विवेचन लेव्हायथन या ग्रंथात केले आहे. हॉब्जच्या वेळी इंग्लंडमध्ये यादवी युद्घजन्य परिस्थिती होती. ती टाळण्यासाठी आणि सामाजिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी हा सामाजिक कराराचा विचार त्याने मांडला. त्याच्या विचाराचे मुख्य सूत्र सार्वभौम सत्तास्थान असावे आणि समाजाने आज्ञापालन हे कर्तव्य मानावे, असे होते. त्याच्या मते अशी सार्वभौम सत्ता निरंकुश आणि अविभाज्य असते. अशा सार्वभौम सत्तेची इच्छा म्हणजेच देशाचा कायदा. त्याला कोणत्याही परिस्थितीत विरोध करणे अवैध होय. हॉब्जच्या या सामाजिक कराराविषयीच्या तत्त्वज्ञानाने इंग्लंडमधील राजेशाही सत्तेला भक्कम स्थान मिळवून दिले.
जॉन लॉक (१६३२–१७०४) याने हॉब्जनंतर हा विचार अधिक व्यापक व शास्त्रशुद्घ पद्घतीने टू ट्रीटिझिस ऑफ गर्व्हन्मेन्ट या ग्रंथातील दुसऱ्या प्रबंधात मांडला. या गंथात तो म्हणतो की, ‘मानवाची पहिली अवस्था नैसर्गिक अवस्था (अ स्टेट ऑफ नेचर) होती. त्या अवस्थेत सर्व मनुष्ये स्वतंत्र होती आणि सर्वांचे हक्कही समान होते. प्रत्येक व्यक्तीस आपले व्यवहार मनसोक्त करण्याचे स्वातंत्र्य होते आणि त्याच्यावर हुकमत गाजविणारी कोणतीही श्रेष्ठ सत्ता नव्हती. त्यामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्याला मर्यादा होती, ती फक्त नैसर्गिक कायद्याची’. हॉब्ज नैसर्गिक कायदा व मानवी प्रज्ञा (रीझन) ही एकच आहेत,असे मानतो. हा कायदा म्हणजे आपण आपले व आपल्या बांधवांच्या जीविताचे रक्षण करावे आणि कोणीही इतरांचे स्वातंत्र्य आणि मत्ता हिरावून घेण्याचा प्रयत्न करु नये; परंतु या व्यवस्थेत एखाद्याने गैरवर्तन केल्यास त्याचा बंदोबस्त करणारी कोणी अधिकारी व्यक्ती ह्या व्यवस्थेत शक्य नव्हती. यातून मार्ग काढण्याकरिता माणसांनी आपले नैसर्गिक अवस्थेतील काही हक्क सोडण्याचे ठरविले आणि सर्वांनी मिळून एक सामाजिक करार करुन एक समष्टी निर्माण केली. या करारान्वये सर्व मनुष्यमात्रांची जीवने, स्वातंत्र्य आणि मत्ता यांचे रक्षण केले जावे, असे ठरले. मनुष्याची ही मूळ नैसर्गिक अव अवस्था आणि सामाजिक करार या दोन्ही गोष्टी इतिहासात घडल्याचे लॉक मानतो.
झां झाक रुसो (१७१२–७८) या फ्रेंच तत्त्वज्ञ-विचारवंताने सामाजिक कराराचा पुरस्कार सोशल कॉन्ट्रॅक्ट (१७६२) या पुस्तकात केला असून हॉब्ज आणि लॉक यांच्या सामाजिक कराराविषयीच्या, विशेषतः नैसर्गिक अवस्था आणि धुरीण समाज या संकल्पनांविषयी मतभिन्नता व्यक्त केली आहे. त्याच्या मते नैसर्गिक अवस्था ही प्रक्रिया शांततामय व ऐच्छिक आहे. त्याने लोकांच्या क्रांतीचे तत्त्वज्ञान प्रतिपादिले असून जुलमी शासनसंस्थेविरुद्घ क्रांती करण्याचा जनतेला संपूर्ण अधिकार आहे, हा विचार मांडला. तो फ्रेंच राज्यक्रांतीला प्रेरणादायी ठरला. राज्यसंस्था हा एक करार आहे, ही कल्पना त्याने मांडली. नैसर्गिक जीवन तो आदर्श मानतो. माणसे स्वाभाविक प्रवृत्तीनुसार जीवनावश्यक गोष्टी मिळवून एकमेकांना मदत करीत होती, तेव्हा कोणत्याही संस्थेची, संघटनेची, राज्यसंस्थेची, दंडशक्तीची आवश्यकता वाटत नव्हती; पण जेव्हा माणसामाणसांतील संबंध गुंतागुं तीचे झाले आणि त्याला संघर्षात्मक स्वरुप प्राप्त होऊ लागले, तेव्हा नव्या समाजाच्या स्थैर्यासाठी-समाजव्यवस्थेसाठी रुसोला राज्यसंस्था अपरिहार्य वाटली. मोठा समाज एकत्र नांदत असला की,सर्वांच्या हितासाठी सर्वांची मिळून एक, सर्वांना समान अशी सार्वत्रिक इच्छा निर्माण होते. तीच समान इच्छा वा ईहा होय. ती स्वतंत्र, सर्वांमध्ये सारखीच वसत असलेली पण अमूर्त अशी एक प्रेरणा असते. त्या इच्छेला प्रत्येक व्यक्ती समूहनियंत्रणासाठी सर्व प्रकारचे अधिकार आपण होऊन प्रदान करते आणि तीत त्या व्यक्तीचीही इच्छा समाविष्ट असते. थोडक्यात रुसोच्या मते प्रत्येक व्यक्ती स्वतःचे स्वतःलाच सर्वाधिकार सुपूर्द करीत असते. राज्यसंस्था ही त्या इच्छेने उभी केलेली यंत्रणा असून ती बदलणे, मोडणे इ. सर्व अधिकार त्या समान इच्छेला असल्याचे रुसो मानतो. यामुळे राजकीय विचारांच्या संदर्भात सामाजिक करार हा त्याचा सिद्घांत इंग्रजी विचारवंतांचा आर्थिक उदारमतवाद आणि फेंच तत्त्वज्ञ माँतेस्क्यू (१६८९–१७५५) याची प्रत्यक्षार्थवादी अभिवृत्ती या दोहोंच्या पलीकडे जातो.हॉब्जच्या मांडणीप्रमाणे राजसत्तेला अनियंत्रित अधिकार मिळत होते; तर लॉकच्या विचारप्रणालीत राज्यसत्तेवर काही अल्पस्वल्प बंधने येत होती; मात्र रुसोच्या सामाजिक करारात जनतेचे सार्वभौमत्व आणि समतेचा सिद्घांत ही दोन मूलगामी तत्त्वे असल्यामुळे सरंजामशाही संपुष्टात येऊन आधुनिक लोकशाहीची बीजे रोवली गेली. परिणामतः फ्रेंच राज्यक्रांतीनंतर प्रस्थापित राजेशाही/सत्तांना रुसोच्या सामाजिक कराराने धक्का दिला.
सार्वजनिक जीवनाचे नियमन कसे करावे, बाह्य आक्रमनांपासून आणि अंतर्गत कलहापासून एकमेकांचे रक्षण कसे करावे यावर या करारात बरेच विवेचन केले आहे. समुदायात राहणे ही मानवाची गरज आहे, त्याला स्थैर्य, संरक्षण आणि नियमांची गरज असते आणि हे स्थैर्य, सुरक्षा आणि नियमन पुरवणे हेच राज्यसंस्थेचे काम आहे. वेबरच्या व्याख्येप्रमाणे ज्यात मानवास आपले सार्वजनिक आणि राजकीय व्यतीत करता येईल व आपल्या क्षमतांचा विकास करता येईल अशी व्यवस्था निर्माण करणे हे राज्याचे कर्तव्य आहे. आणि अशा राज्यात लोकांनी नियमांचे पालन करत राहणे हे आवश्यक आहे अर्थातच राज्यसंस्थेच्या आज्नाचे पालन करणे हे राज्यसंस्था सुरळीत चालण्यासाठी आवश्यक अशी अट आहे. या नियमांविरुद्ध जाणाऱ्याविरुद्ध कारवाई करणेही आवश्यक राज्य चालवण्यासाठी आवश्यक आहे आणि यासाठी बळाचा वापर करावा लागला तरी तोही योग्य आहे . वेबर defines the state as that entity, "which successfully upholds the claim, to the monopoly of the legitimate use of physical force,in the enforcement of that order,". एकाच समुदायात अनेक गट असतात. त्यापैकी कोणाची शक्ती सर्वमान्य मानायची आणि कोणाचे नियम लागू करायाहे हा पुढचा प्रश्न आपसूकच येतो. येथे वेबर सत्ता आणि अधिकार यामध्ये फरक करतो. सत्ता म्हणजे बळाचा वापर करून दुसर्यांना आपल्या बरहुकूम वाग्वायास लावणे. राज्य करतानाची आवश्यक अशी परंतु पुरेशी नसलेली ही बाब. परंतु अधिकार म्हणजे राज्याने बनवलेल्या नियमांचे, व्यवस्थेचे पालन संमतीने करण्याची लोकांची इच्छा मुख्यतः राज्यास आपल्या बळाचा वापर न करताच अशी संम्मती मिळणे याला वेबर खरा अधिकार म्हणतो. वेबरच्या मते अधिकार हा तीन प्रकारचा असतो. वेबरचे अधिकाराच्या बाबतीतले वर्गीकरण हे तो अधिकार त्या त्या सत्तेस कशामुळे प्राप्त होतो यावर आधारलेले आहे. आपण अभ्यास करत असलेल्या प्रदेशातील राज्यसत्ता समजून घेण्यासाठी वेबरच्या या वर्गीकरणाचा उपयोग केला आहे.
अधिकार व सत्ता
यातला पहिला प्रकार म्हणजे अधिकार हा वैधानिक व्यवस्थेचा भाग म्हणून आलेला, यात व्यक्तीपेक्षा त्या वैधनिक पदाला महत्व. सर्व नियम कानून आधीच सर्वसंमत असे आणि या नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम या सत्ताधारकाकडे असते. ठरवलेली कामे, ठरवलेले नियम आणि अपेक्षित असा लोकांचा संमती देणारा प्रतिसाद. लोक आणि शासक यातला एक प्रकारचा करार, शासकाकडून किमान गुणवत्ता आणि कौशल्याची अपेक्षा आणि लोकांकडून निर्विवाद नियम आणि अधिकार मान्य करण्याची अपेक्षा असा हा करार. शासकाच्या अधिकार आणि सत्तेला कायदेशीर ठरवणारा
दुसऱ्या प्रकारचा अधिकार हा पारंपारिक रित्या हस्तांतरित झालेला. आधीच्या समाजरचनेत निर्माण झालेली सत्ता स्थाने अबाधित ठेऊन त्यांना पवित्र मानून तीच पुढे चालू ठेवण्याची पद्धत इथे दिसते. परंपरागत हस्तांतरित झालेली सत्ता आणि अधिकार हा त्या समाजरचनेत नुसताच मान्य नसतो तर त्याला पवित्रता आणि अखंडतेचे वलय लोकांच्या मान्यतेतुन प्राप्त होत असते. गल्फ देशांमध्ये असलेल्या सध्याच्या समाजरचना किंवा परंपरागत चालू असणाऱ्या समुदायानातर्गत काही रिती रिवाज आणि ते पार पाडताना विशिष्ट व्यक्तींना मिळालेला अधिकार आणि सत्ता ही या प्रकारात मोडते. भारतात अजूनही धर्म व कर्मकांडाच्या बाबतीत ब्राह्मणांना एक विशिष्ट प्रकारची मान्यता जनमानसात दिसून येते किंवा धर्मेपीठांचे मुख्य महंत लोक विशिष्ट गटातूनच आलेले दिसतात, हे या पारंपारिक अधिकाराचे उदाहरण. हे अधिकार आणि सत्ता हे गुणवत्ता किना विशिष्ट कौशल्य यावर आधारित नसतात तर पूर्वापार असेच चालत आले म्हणून पुढेही असेच चालणार हा विचार यात मुख्य असतो.
तिसऱ्या प्रकारचा अधिकार म्हणजे वलयांकित, करिष्म्यावर आधारित मान्यता, सत्ता आणि अधिकार. काही व्यक्तींकडे विशिष्ट अशी सुपरह्युमन गुण असतात किंवा एखाद्या प्रसंगाटेल असामान्य अशा कृतीमुळे त्या व्यक्तीभोवती असे वलय निर्माण होते आणि तीच त्या व्यक्तीच्या अधिकाराची, सत्तेची ओळख बनते. बाळासाहेब ठाकरे हे अशा करिष्म्यावर आधारित सत्तेचे आणि अधिकाराचे उदाहरण. या व्यक्ती आपल्या प्रभावामुळे लोकांच्या मनावर प्रदीर्घ काळ राज्य करतात, त्यांच्या अनेक कृतींमध्ये अपयश आलेले असले तरी त्यांचा चाहता वर्ग हा त्यांना नेहमीच वंदनीय मानतो आणि असे नेते चमत्कार करून आपल्याला सद्य परिस्थितीतून तारून नेईल अशी या समर्थकांना खात्री असते. इजिप्तमध्ये नासरचे नेतृत्व आणि तुर्कीमध्ये मुस्तफा केमालला मिळालेल्या प्रचंड समर्थनामध्ये या करिष्म्यावर आधारित नेतृत्व प्रतिमेचा मोठा भाग होता. या नेतृत्व प्रकारात एक समान धागा दिसतो आणि तो म्हणजे असे नेते आपल्या वैयक्तिक प्रतिभेच्या जोरावर सत्ता हस्तगत करतात, अधिकाराची स्थापना करतात पण त्यांना तेव्हड्याच तोडीचा वारसदार मिळेल याची काही खात्री नसते किंबुहाना बरीच अशी साम्राज्ये त्या त्या नेत्यांबरोबर कोसळताना दिसतात.
अशा प्रकारे वेबरच्या वर्गीकरणानुसार तीन प्रकारचे अधिकार आणि सत्ता - तर्कसंगत कायद्यावर आधारित, पारंपारिक आणि वलयांकित. उत्तर आफ्रिकेतल्या देशांमध्ये स्वातंत्र्यानंतर पारंपारिक नेतृत्वाने आपला हक्क दाखवलाच. परंतु एक मोरोक्को सोडता इतर देशात - अल्जेरिया, लिबिया, ट्युनिशिया आणि इजिप्त मध्ये हे सर्व राजे रजवाडे हे आधीच्या वासाहतिक सत्ताधाऱ्यांना सामील त्यामुळे लोकांनी त्यांचे दावे आणि वसाहतवादी राष्ट्रांचे या कठपुतली राजवटीना प्राधान्य देणे तिथल्या जनतेने उधळून लावले. मोरोक्कोत मात्र राजेशाही रुजली होती आणि लोकप्रियही होती त्यामुळे लोकांनी ती सत्ता मान्य केली. इतर देशांत नवीन राज्यकर्ते आपला अधिकार आणि सत्ता दोन्ही प्रस्थापित करत असताना लोकांचा प्रतिसाद मात्र वेगळा होता आणि त्यानुसार सुरुवातीच्या काळात अधिकार प्रस्थापित करताना त्या त्या शासकांनी वेगळे मार्ग चोखाळले. स्वातंत्र्यानंतर इजिप्तमध्ये मोहम्मद अलीचा वारस फावूद याने सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला परंतु लोकांनी तो धुडकावून लावला. परकीयांना देशातून जनतेने हुसकावून लाव्वले होते आणि आता नवीन राष्ट्राच्या उभारणीत नविन व्यवस्था निर्माण करताना जुने पारंपारिक नेतृत्व कुचकामी दिसत होते, एक प्रकारची पोकळी अधिकार केंद्राच्या बाबतीत इजिप्तमध्ये जाणवत होती. नासरच्या करिष्म्याची मोहिनी लोकांवर होतीच आणि वैधानिक, कायदेशीर अशी व्यवस्था लागेपर्यन्तचा वेळ लोकांकडे आणि राष्ट्राकडे नव्हता. नासरचा राज्यकर्ता म्हणून उदय या करिष्म्याच्या बळावरच झाला आणि त्याने त्यानंतर केलेल्या अनेक भावनिक आवाहने आणि बेत याच्यावर तो टिकला. बराच काल अस्थैर्य सोसलेल्या जनमाणसास अशा पटकन स्थैर्य देणाऱ्या, घडी बसवणाऱ्या वक्तव्यांची नितांत गरज असते आणि त्याचबरोबर स्वताच्या दैदिप्यमान भविष्यकाळाचे स्वप्नही झालेल्या विध्वन्सास पुसण्यासाठी आवश्यक असते. १९४८ च्या इस्त्रायेल्च्या हल्ल्यानंन्तर इजिप्तला मानसिक दृष्ट्या अशा उभारी देणाऱ्या वक्त्यव्यांची गरज होती आणि नासरने ती भागवली हे त्याच्या चढत्या यशाचे गमक.
नासरचे नेतृत्व
नासर, गद्दाफी, मुस्तफा केमाल या सगळयांच्यात विशिष्ट नेतृत्व गुण नक्कीच होते, संधीचा योग्य फायदा घेण्याचे कसब, अमोघ वक्तृत्व आणि लोकांना खिळवून ठेवणारे बेत या सगळ्याचा उपयोग त्यांनी आपली सत्ता व अधिकार स्थापन करण्यासाठी केला. लोकांमध्ये उज्वल भवितव्याची आस आणि ते भवितव्य फक्त या नेतृत्वाखालीच लोकांना मिळू शकते हा आभास त्यांनी निर्माण केला. पारंपारिक नेतृत्वाला शह देऊन लोकांचा अतुलनीय असा पाठींबा या राज्यकर्त्यांना मिळाला खरा पण त्याचबरोबर हा पाठींबा कायम टिकून राहिला पाहिजे ही निकडही त्यांना सतत जाणवत राहिली. त्या अनुषंगाने येणारी असुरक्षितता, विरोधकांबद्दल कमालीचा तिटकारा आणि त्यांचे दमन या गोष्टीही आल्याच. नासरनेही आपल्या कारकिर्दीत आपल्या धोरणांची चिकित्सा, पुनर्र्तपासनी कधी केली नाही आणि त्याच्यावर भावनिकदृष्ट्या लोकांचे असलेले परावलंबन ही वाढतच गेले. असा सर्वेसर्वा असणारा हा नेता उद्या यालाच काही झाले तर अशी भीती आणि असुरक्षितता लोकांच्या मनात अशा राजवटीत निर्माण झाली आणि खरी लोकशाही इथे रुजली नाही. जिथे जिथे असे करिष्म्यावर आधारित नेतृत्व उभे राहिले तिथे मानसिक परावलंबन आणि नेत्याचे सर्व प्रकारे समर्थन ही मानसिक प्रक्रिया दिसून येतेच पण आपल्या चुकांमधून शिकण्याची, चिकित्सा करून पुढे वाटचाल करण्याच्या संधीही हा समाज घेत नाही. प्रा. सादिक अल - आझम यांचे After the Defeat हे पुस्तक या मानसिकतेवर आणि राज्यकर्त्यांच्या फसव्या प्रतिमा प्रेमावर अगदी झणझणीत अंजन टाकते. या पुस्तकावर बऱ्याच देशांत बंदी आहे पण त्याची e -copy उपलब्ध आहे. प्रा सदिकना हे पुस्तक लिहिल्याबद्दल तुरुंगवास सहन करावा लागला आणि त्यांच्या बऱ्याच देशांतील संचारास बंदी घालण्यात आली यावरून या राज्यकर्त्यांची आपल्यावरच्या टीकेबाबत असहिष्णू वृत्ती आणखीनच दिसून येते.
नासरने १९५६ च्या विजयानंतर लोकांच्या अपेक्षा आणि विश्वास कायम ठेवण्यासाठी अनेक घोषणा आणि कार्यक्रम सुरु केले. १९५६ चा विजय हा लष्करी विजय नव्हता फक्त राजकीय विजय आणि तोही अमेरिकेच्या मदतीने मिळवलेला. पण नासरची आंतरराष्ट्रीय भूमिका मात्र गूटनिरपेक्ष ( non alignment) ची होती परंतु त्याचबरोबर सोवियेत रशिया कडून अमाप पैसा, साधनसामुग्री, प्रशिक्षित सल्लागार आणि शस्त्रास्त्रे ही त्यांनी मोठ्या प्रमाणावर घेतली. सोविएत संसाधनांच्या बळावर त्यांनी राष्ट्राच्या विकासाचे महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु केले आणि त्याचबरोबर दक्षिणेतल्या नवमुक्त देशांची तिसरी आघाडीचे नेतृत्व आपणच करत आहोत हेही तितकेच ठासून सांगितले. खरे तर या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी पण या शक्य झाल्या फक्त शीत युद्धाच्या संदर्भात. प्रचंड प्रमाणावर दोन महासत्ता या नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांत पैसा उधळत होत्या आणि त्य पैशाचे उत्तरदायित्व मात्र या राज्यकर्त्यांवर नव्हते. बऱ्याच महत्वकांक्षी प्रकल्पास बाहेरून आलेला पैसा कारणीभूत होता आणि अंतर्गत पातळीवर आणि बाह्य जगात नासरची प्रतिमा हा सर्व खेळखंडोबा चालू ठेवण्यात उपयोगी पडत होती.गटनिरपेक्ष चळवळीबरोबरच नासरने संयुक्त अरब आघाडीची स्थापना करून त्याचे नेतृत्वही आपल्याकडे घेतले होते. इजिप्त आणि नासर यांनी प्यान अरेबिस्म चा पाया घातला आणि सर्व अरब देशांच्या नेतृत्वावरही आपला हक्क सांगितला. परंतु हे खरे नेतृत्व न ठरता पोकळ वल्गना ठरल्या कारण हे हक्क जतवण्यामागे इजिप्तची खरी ताकद - राजकीय, लष्करी किंवा सांस्कृतिक अशी विकसित झाली नव्हती, त्यामुळे हे दावे दावेच राहिले, त्यांना प्रत्यक्ष स्वरूप आले नाही आणि परिणामी नासरच्या प्रतिमेबरोबरच या सर्व नेतृत्वाच्या कल्पनाचा ऱ्हास झाला. नासरच्या पलीकडे जावून इजिप्तमध्ये प्रशासन, आर्थिक विकास किंवा लष्कर कशाचीच घडी बसली नाही. सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण झाले, अस्वानही बांधले गेले परंतु देशात प्रशासकीय सुधारणा न झाल्यामुळे या विकासाची फळे लोकांपर्यंत पोहोचली नाहीत आणि सोविएतची मदत संपल्यावर स्व बळावर पुढे फारशी काही कामेही झाली नाहीत.
नासरने इस्रायेलला शह देण्यासाठी संयुक्त अरब आघाडीची स्थापना केली. १९४८ मध्ये इस्रायेल समोर झालेला अरब राष्ट्रांचा बीमोड ही सल होतीच आणि वसाहतवादी राष्ट्रांनी लादलेल्या सीमा ओलांडून एक अरब राष्ट्राची निर्मिती हे या अरब आघाडीचे स्वप्न होते. त्यानुसार इजिप्त आणि सिरीयाने मिळून आपले संयुक्त सरकारही बनवले होते. नासर १९५६ च्या विजयानंतर या मुद्द्यावर अधिक आक्रमक भूमिका घेताना दिसतो. संपूर्ण अरब जगताचे नेतृत्वावर दावा सांगताना इतर अरब नेते आणि मुख्यतः आखातातले पाश्चीमात्यांच्या आधारावर असणाऱ्या नेत्यांवर आक्रमक टीका नासर करतो. येमेनी यादवी युद्धात नासरची याबाबतीतली भूमिका अगदी स्पष्ट दिसून येते. नासर आणि इजिप्त या येमेंच्या अंतर्गत संघर्षात डाव्या विचारसरणीच्या प्रजासत्ताकवादी गटास फक्त तात्त्विक पाठिंबाच नाही तर आर्थिक आणि लष्करी सहाय्यही करतात. अर्थातच सोविएतची प्रचंड मदत नासरला यावेळी होतेच. येमेन असो की प्यालेस्तायीनचा प्रश्न सोवियेतच्या पाठीम्ब्याशिवाय इजिप्त ही कृती करू शकला नसता. ही सर्व फुकटात आलेली साधन सामुग्री होती, नासरच्या महत्वकान्क्षेला खतपाणी घालणारी पण त्याचबरोबर या सामुग्रीच्या देण्याच्या बदल्यात या देशांच्या स्वयंविकासाच्या प्रेरणा मारनारी अशी ही प्रक्रिया होती. इस्रायेलच्या तोडीची अद्ययावत सामग्री असतानाही संयुक्त आघाडी १९६७ चे युध्द हरली आणि नासरने सत्तेचा राजीनामा स्वतहून दिला. प्रा सादिक्ने याच युद्धानंतर या फुकटच्या सहयोगावर आधारित बेडकी महत्वकांक्षा कशा आत्मघातकी ठरत आहेत हे त्यांच्या पुस्तकात दाखवून दिले होते. परंतु नामुष्की पत्करून नासरने राजीनामा दिला असतानाही त्याला लोकांनी पुन्हा सत्तेवर बसवलेच. १९७० मध्ये त्याचे निधन झाले त्यामुळे ही दुसरी खेळी अत्यल्प काळाची राहिली. पण १९६७ साली या प्रसंगी नासरला परत आणताना लोकांनी केलेली निदर्शने नासरबद्दल असलेल्या निष्ठेचे जसे प्रतिक होते तसेच त्याच्या असामान्य शक्तीवर लोकांचे मानसिक अवलंबन झाल्याचेही द्योतक होते.
शासक आणि शास्ते यांच्यात एक मानसिक सह्जीवित्व symbiosis घडताना इथे दिसते. इजिप्त नासर शिवाय देशाची कल्पना करू शकत नाही आणि लोकांचा हा पाठिंबाच नासारच्या महत्वाकांक्षेला घडवतो, नवोन्मेषी रूप देताना दिसतो. स्वतःबद्दल्च्या, देशाबद्दलच्या मोठ्या, महत्वाकांक्षी प्रतिमा न तर हे लोक विसरू शकत आणि अगदी दारुण पराभव झाला तरी या नेत्यांना आत्म्चीकीत्सा करावीशी नाही वाटत असा हा तिढा करिष्म्यावर आधारित नासरच्या नेतृत्वात दिसून येतो. अंतर्गत पातळीवर नासरला शेवटपर्यंत प्रचंड पाठींबा मिळाला परंतु संयुक्त अरण राष्ट्राच्या त्याच्या कल्पना व त्याचे स्वयंघोषित नेतृत्व मात्र बऱ्याच अरब राष्ट्रांना खुपत होते. साठच्या दशकात तेलाच्या पैशाने गबर होणाऱ्या सौदीने आता अरब राष्ट्रांचे नेतृत्व व इजिप्तचा नेतृत्वाचा दाव्यास आवाहन द्यायला सुरुवात केली. सौदीमध्ये मुस्लिम धर्माची दोन्ही महत्वाची पवित्रस्थळे आणि त्यांचे नियंत्रण सौदीच्या शेखाकडे. या घराण्यावर अब्दुल वहाब या कडव्या, विशुद्धवादी puritanical विचारसरणीचा प्रभाव. इजिप्तच्या वाढत्या डाव्या विचारसरणीस आणि हस्तक्षेपास शह देण्यासाठी वहाबी इस्लामची आयात सौदी आपला प्रभाव वाढवण्यासाठी याच वेळी करू लागला. सौदीकडे प्रचंड पैसा होता, अमेरिकेचे तेलाच्या निर्यातीमुळे संरक्षण होतेच आणि त्यातच इजिप्तला असणारे सोविएतचे पाठबळास प्रतुत्तर देण्यासाठी अमेरिका आणि मित्र राष्ट्रे सज्ज होतीच. सौदीने आपला प्रभाव वाढवण्यासाठी अरब आणि ,मुस्लिम जगतात धर्म आणि त्यावर आधारित संस्था यांना वाढावा देण्यास सुरुवात केली. अफगाणिस्तान, पाकिस्तान येथे बांधलेल्या भव्य मशिदी, मदरसे ही यासंदर्भातील काही उदाहरणे. सौदीचा उद्देश फक्त इमारती आणि संस्थाबांधणी एव्हडाच नव्हता तर वहाबी इस्लामचा प्रसार आणि त्यावर आधारित आपला अधिकार आणि सत्ता संपूर्ण मुस्लिम जगतावर स्थापन करणे हे त्यामागे अभिप्रेत होते. गेल्या अर्धशतकात इस्लामच्या या एका अतिशय संकुचित, सनातनी, xenophobic मतप्रवाहाने मुस्लिम जगताचा कब्जा तर घेतला आहेच पण त्याचबरोबर इस्लामची आणि मुस्लिमांची एक विशिष्ट असहिष्णू अशी प्रतिमाही निर्माण केली आहे. इस्लामचा प्रसार प्रचार हा प्रेषिताच्या कालापासून विविध मार्गे होतच राहिला आहे. जिथे जिथे हा धर्म गेला तिथे त्याचे अने अंगांनी स्थानिकीकरण झाले. मूळ श्रद्धा एकाच असली तरी कर्मकांडात फरक पडला परंतु इस्लामच्या आणि जगाच्या इतिहासात धर्माची एकेरी मांडणी आणि त्यावर आधारित समाजसंघटन इतक्या व्यापक पातळीवर पहिल्यांदा होताना दिसत आहे. सौदी अरेबिया वरच्या लेखांमध्ये याचा विस्तृत अभ्यास मांडला आहे पण महत्वाची गोष्ट या लेखाच्या संदर्भातली नासरच्या समग्र अरब देशाच्या नेतृत्वास आव्हान देताना सुरु झालेली ही प्रक्रिया पुढच्या दशकात इतके थैमान घालेल असे कदाचित साठीच्या दशकात खुद्द सौदिलाही कळले नसेल. उत्तर आफ्रिकेच्या संदर्भात आधुनिकता आणि इस्लामिकवाद या दोन्ही गोष्टीतला संघर्ष प्रबळ का आणि कसा होत गेला यावर थोडे विचार करूयात.