गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना कोणीतरी खरडलेल्या इकडच्या वालच्या तिकडच्या वालवर कोपी पेस्ट केल्या. बरेच जण पावसाचा आनंद लुटायला लोणावळा , महाबळेश्वर किंवा आजूबाजूच्या डोंगरावर जायचे बेत करत आहेत.
पाऊस माझ्यासाठी फक्त महाबळेश्वर पाचगणीचाच , पण तो आजच्या टूरिस्टी नजरेतनं पाहिलेला नाही तर माझ्या लहानपणचा!
उन्हाळी सुट्ट्या संपताना जांभळं, आंबोळ्या , फणस , गोटी आंबे खाण्यात आम्ही मग्न असताना घराघरातल्या बाया नेचे आणि लाकडाचे भारे आणण्यात दिवसभर आजूबाजूच्या रानात असायच्या . सकाळी चार वाजता किर्र अंधारात नानी कास्टा घालून शेजारच्या बायांबरोबर जायची ती अकराच्या सुमारास डोक्यावर भारे घेऊन परतायची . मेच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या घरांना करकचून नेच्याच्या झड्या बांधल्या जायच्या, माळ्यावर बारकी- मोठी लाकडे तोडून रचली जायची आणि पुढच्या चार महिन्यासाठी महाबळेश्वर झड्यांच्या मागे दडून जायचे. पहिला पाऊस म्हणजे लाल मातीच्या रंगाने वाहणारे मोठमोठाले लोट, नेच्याचा भिजलेला कुंद वास, घरच्या पत्र्यांवर वाजणारा रप रप आवाज आणि शेगड्या चुलीच्या उबेत शेकणारी आबालवृद्ध मंडळी!
चार महिने शाळा बंद, पुण्या मुंबईचे कस्टमर आणि पर्यायाने धन्दापानी बंद, कोमटी, माळवदे , पुर्ण्याशेटची किराण्याची दुकाने फक्त चालू असायची. चार महिन्यासाठीचे बोंबील, सुकट भरलेली असल्यामुळे अगदी नाइलाज असेल तरच बाहेर पडायचे. बावडीवरून फक्त एक हंडा पिण्याच्या पाण्याचा घेऊन यायचा आणि बाकी सारी कामे पन्हाळीच्या पाण्याने व्हायची. दोन तीन दिवस सलग पाणी पडले की नंतरचे पाणी अगदी स्फटिकासारखे शुभ्र, पण बर्फासारखे थंड असायचे. मुन्सिपाल्टीच्या गटारातून कमरेइतके पाणी वाहत असले तरी खालचा मातीचा कण न कण दिसायचा. धुके इतके गर्द कि दोन हातावरचा माणूस दिसणेही अवघड, त्यात झड्या लावल्यामुळे घरात अगदीच अंधारून आलेले, पडवीतल्या चुलीसामोरचा उजेड आणि उब या दोन गोष्टीन्भोवती सगळा परिवार गुंफलेला असायचा . बिनाका गीत माला , रंगलेल्या गप्पा आणि गाणी , नाव, गावाच्या ,भेन्ड्यात मस्त संध्याकाळ जायची. एकाच गोष्टी साठी बाहेर जाण्याची सक्ती असायची आणि कसरत हि ..टिनपाट घेऊन- इरलं , गोणपाट आणि कधीतरी कोणा मोठ्या माणसाची छत्री मिळाली तर ती घेऊन खड्ड्यावर जावून दोन नंबर करणे. कितीही सावरून बसले तर हमखास भिजायचो. घरी नानी ओरडेल म्हणून झाल्या झाल्या पळत सुटलो तर बोळात शेवाळ साचून झालेल्या निसरड्या जागी पाय घसरून आपटी खाल्ल्यावर दुखणारे बुड , थंडी मुळे भरलेले कापरे यात कोणी काय ओरडले , काही फरक पडायचा नाही. बर्फाळलेल्या पाण्यात कपडे धुणे मग चुलीवर बांधलेल्या उतवावर आठ दिवस सुकवणे यासारखी शिक्षा बिचाऱ्या छोट्या मुमानीला दुसरी नसेल.
पहिला पाउस झाल्यावर नानी नेटाने रानात जाउन शेंडवळ आणि मुरड्याची भाजी घेऊन यायची. शेंडवळ दगडावर उगवणारी आणि मुरडा म्हणजे नेच्याचे कोवळे कोंब. त्या अगोदर उन्हाळ्यात चीचुर्ड्या चेचून त्याची भाजी , ही महा जहाल कडू असते . या तीन भाज्या सगळ्या पावसाळी आजाराची प्रतिबंधक औषधे होत.
माध्यमिक शाळा सुरु झाली तशी नानीच्या घरची सुट्टीची मौज संपली. पाचगणीत पावसात रस्तोरसती झरे फुटायचे. ते तुडवत जायची मजाच न्यारी. सगळ्या माळावर पांढरी गवतफुले उगवलेली , त्याच्या केलेल्या वेण्या, कोणीतरी घातलेला बकुळेचा गजरा यांनी वर्गातला मुलींकडचा भाग सुवासत असायचा . शाळेत गणपतीची आरास आणि प्रसाद यात सगळा ऑगस्ट मग्न असायचा आणि लगेचच सगळीकडे नवरात्रातले फेर धरून खेळणे व्हायचे . घरी बाबा संध्याकाळ झाली कि शेगडी पेटवायचे आणि एव्हाना दूरदर्शन आल्यामुळे जेवताना चित्त टी व्हीत लागलेले असायचे.
संजीवन मध्ये असताना डेस्कोलर ना दुपारी अडीच तास सुट्टी असायची , त्यात शाळेची इमारत बंद त्यामुळे मागच्या सगळ्या दऱ्या डोंगर , झरे पादाक्रांत करण्यात सगळ्यांचे रेनकोट पहिल्याच आठवड्यात बाद झालेले असायचे. पावसाच्या झडीत पूर्ण भिजून मग तसेच वर्गात बसण्यात फारच धाडसी वाटायचे.
तेव्हा पाचगणी महाबळेश्वरला कॉलेज नव्हते त्यामुळे सकाळच्या मश्वर पुणे गाडीने सगळे वाईच्या किसनवीरला. ज्यू. कोलेजची दोन वर्षे घाटातल्या पावसाळ्याची , एस टी च्या खिडक्यातून उडणार्या फवार्यांची. जूनच्या पहिल्या आठवड्यात अंकुरणारा , ओहोळणारा घाट जुलै ऑगस्ट मध्ये अनेक छोट्या मोठ्या धबधब्यांनी ओथम्बुन वाहता व्हायचा , झाडे ,दरडी कोसळणे नित्याचे असायचे. तोच घाट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये फुलून येणाऱ्या दिवाळीच्या सीजन चे स्वागत बहरलेल्या वृक्षराजीने करायचा . पाचगणी महाबळेश्वरची सगळी आर्थिक,सामाजिक व्यवस्था 'सीजन' या एका शब्दाभोवती गुंफलेली आहे. थंडी पडू लागली की नेपाळी स्वेटर वाल्यांची दुकाने अजूनच रंगीत दिसायची. झड्या निघून घरामध्ये सूर्यकिरणे पोहोचायची . डांबरी रस्त्यावर उन खायला आबाल्वृद्ध आवर्जून बाहेर यायचे . चार महिने आत राहून , शेकोटीच्या धुराने नखे आणि चेहरेही पिवळे पडलेले असायचे . मिट्ट काळोख्या संततधार रात्रीनंतर सकाळच्या कोवळ्या उन्हात जशी उल्हासाने पाखरे किलबीलतात तसे गल्ली, बोळ, सडका उन्हात गजबजून जायच्या. ईश्टापुरीच्या कावडी , घोड्यांची खोगीरे , नावांचे वल्हे असे सवंगडी ऊन खाणार्यांना सोबत करायचे. घोंगडी , वाकळा, घरांच्या पत्र्यावर सुकताना टाकलेले दिसलेकी पावसाळ्याची सांगता झाली असे समजायचे .