Wednesday 17 May 2017

आजचा दिवस लेखनाचा

आजचा दिवस लेखनाचा. बाहेर डोरिस म्हातारीनं धुमाकूळ घातलाय रात्रभर, त्यामुळे काही कुठे जाता येणार नाही. आणि दोन आठवड्या पूर्वी दुर्लक्ष केलेली सर्दी ताप पुन्हा डोकं वर काढतोय त्यामुळे घरातली काही कामं करायची नाहीत अशी सक्त ताकीद आहे . अर्थात त्यात छुपा अजेंडा आहेच, मी कामं काढली की या दोघा पुरुषमंडळींना हलावेच लागते , त्यामुळे आता त्यांची चांदी, माझ्या न बरं वाटण्याच्या सबबी खाली ! कितीही बरं नसलं तरी बिछान्यात पडून राहणे काही होत नाही आणि टीव्ही , सिनेमा बघून बघून किती बघणार? बोलता येत नाही त्यामुळे फोनही नाही . सकाळ भर विचार करत होते , का लिहितो आपण? व्यक्त व्हावंसं वाटतं हे साधे उत्तर, पण एखादी गोष्ट डोक्यात पिंगा घालायला लागली की कितीही प्रयत्न केला तरी पुन्हा पुन्हा मन तिथेच येतं. बऱ्याच वेळा मग स्मार्ट फोन वर मराठी कीबोर्ड लावून दोन मिटींगच्या मध्ये एका बोटाने काही खरडते, दुसऱ्या मिटिंगमध्ये बसल्या बसल्या पुन्हा पुढचं सुचायला लागत, कधी कधी वाक्यच्या वाक्यं डोक्यात सलग येत राहतात , कधी नोट्स घेण्याच्या बहाण्याने तर कधी स्टाफचा अर्जंट मेसेज आहे म्हणून पुन्हा दोन मिनिटं बोलता बोलता फोन बाहेर येतो आणि ते वाक्य पूर्ण होतं. जोपर्यंत लिहून होत नाही तोपर्यंत अस्वस्थ वाटत राहतं , बऱ्याचदा जोडाक्षरं पटकन लिहिता येत नाहीत, शुद्धलेखनाच्या बऱ्याच चुका राहतात , वैताग वैताग होतो अशा वेळी .
बऱ्याचदा मनात विचार असतो, या सगळ्याला काही अर्थ आहे का ? आपल्या आयुष्यात घडलेल्या घटना, आलेल्या व्यक्ती , माझे सापेक्ष अनुभव, त्यातून झालेले ' दृष्टांत ' हे सगळं इतक व्यक्ती सापेक्ष आहे , त्याला वाचणाऱ्याच्या दृष्टीने काही मोल आहे का ? आपण आपल्या अनुभवांचे, भावनांचे प्रदर्शन करतोय का ? या सगळ्या प्रश्नांनाची उत्तरे नाहीत माझ्याकडे पण पहिला ब्लॉग लिहून झाला तेव्हापासून लिहिण्याची उर्मी वाढली आणि लिहून झाल्यावर एक नीरव शांतता जाणवते हे खरं . बरंचसं लिखाण माझ्या जवळच्या माणसांबद्दल आहे . खूप तीव्रतेने ज्या भावना मला वेळोवेळी या व्यक्तीबद्दल वाटतात त्या, बऱ्याचदा त्यांच्याकडे व्यक्त करता येत नाहीत , मलाही त्या लिहिताना स्पष्ट जाणवायला लागतात , ती व्यक्ती तिच्या वेगळ्या स्वरूपात पुढे यायला लागते, या अर्थाने लिहिण्यातून मी माझी मलाच आणि हे सगळे लोक मला जास्त कळायला लागतात . हल्ली ब्लॉग लिहिणं बंद केलंय आणि फेसबुक सोडून इतर ठिकाणी लिखाण प्रसिद्ध करत नाही. फेसबुकवर काही अपवाद सोडले तर ज्यांच्याशी माझा प्रत्यक्ष संवाद आहे तेच लोक आहेत आणि त्य्नाच्याशी पण लिखाण वाचनातून हा संवाद चालू असतो कारण प्रत्यक्ष भेटीगाठी आता विरळ झाल्या आहेत आणि प्रत्येकाचे जगण्याचे संदर्भ एवढे बदलले आहेत की जेव्हा भेटी होतात तेव्हा या सगळ्या संवादाचा संदर्भ लागेलच असं नाही . बऱ्याच गोष्टी दैनंदिन जीवनाच्या संदर्भातच कळतात आणि वेळ गेली की त्या अनुभवांची तीव्रता ही कमी होते , त्यामुळे फेसबुक पोस्टी या एखाद्या डायरी सारख्या झाल्यात माझ्यासाठी आणि कामानिमित्त आणि इंग्लंडात राहून इथल्या मित्र मैत्रीनी बरोबर कितीही इंग्रजीत बोललं तरी मराठीत बोलण्याची त्याला सय नाही , कारण भाषा ही नंतर येते, अनुभूती , तिचे जाणीव नेणिवेशी एक संधान झाल्यावर व्यक्त करण्यासाठी भाषा लागते , त्या आधीच्या अनुभूती, भाव भावना मला कळतात त्या ज्या भाषेत त्या पहिल्यांदा कळल्या, शब्दरूप झाल्या त्या माझ्या मातृभाषेत . त्यामुळेच आजही कितीही शब्दभांडार वाढले असले तरी इंग्रजीत विचार होतच नाही , मराठीत सर्व प्रकीर्या होऊन , इंग्रजीत त्याचे भाषांतर होऊनच पुढचं संभाषण कामाच्या आणि इतर ठिकाणी होते. आणि या फेसबुक माध्यमातून मला माझ्या मित्र मंडळी , मायदेश आणि मायबोलीशी जिवंत संपर्क ठेवता येतो , हे ही तितकेच खरे .

4th February, 2017

No comments:

Post a Comment

आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...