Monday, 14 April 2014

काय घडतंय मुस्लिम जगात - भाग ४ इस्लामिक कायदा - काही विचार

इस्लामिक कायदा - काही विचार 

आधीच्या लेखात  आपण आधुनिकतेला   प्रतिसाद म्हणून येणारे चार दृष्टीकोन पाहिले. यातील सर्वच विचारांमध्ये इस्लामिक कायद्याचा संदर्भ आहे. इथे या विषयाची सांगोपांग माहिती देणे शक्य नाही आणि तेवढे माझे ज्ञान आणि आवकाही नाही. Roy Mottehedeh या इराणी लेखकाने लिहिलेले Mantle ऑफ Prophet हे पुस्तक इस्लामी कायद्याचे शिक्षण यावर चांगला प्रकाश टाकते. इराण येथे झालेली इस्लामिक क्रांती आणि त्यानंतर केले गेलेले इस्लामिक कायदे याचा अभ्यास करण्यासाठी हे खूप चांगले पुस्तक आहे. साधारणतः २० वर्षे निरंतर अभ्यास केल्यावर या कायद्यांबद्दल काही बोलता येईल असा यांचा आवाका आहे. इथे फक्त संविधानिक आणि सार्वजनिक कायद्याच्या ( public and  constitutional law ) दृष्टीकोनातून काही विचार मांडायचा प्रयत्न आहे. सर्वात प्रथम एक एकसंघ असा इस्लामिक कायदा आहे ही मान्यताच मुळी चुकीची आहे. शरियाबद्दल खूप ठिकाणी लिहिले बोलले जाते आणि त्यावरून हा एकसंघ कायदा असा प्रचलित गैरसमज दिसून येतो.  इस्लामच्या सुरुवातीच्या शतकांमध्ये सुन्नी मुस्लिमांमध्ये चार वेगवेगळ्या परंतु वैध अशा चार कायदेप्रणाली विकसित झाल्या. हनिफी,हनाबली, मलिकी आणि शाफी - कालांतराने या वेगवेगळ्या प्रांतात रुजल्या. याव्यतिरिक्त शिया मुस्लिमात दोन प्रमुख शाखा व अनेक उपशाखानुसार कायदेप्रणाली विकसित झाली. महत्वाची बाब म्हणजे मुस्लिमांमध्ये एक सोडून अनेक विचारप्रणाली समाज आणि राज्य नियमनासाठी प्रचलित आहेत व इस्लामिक कायद्यानुसार वैधही आहेत. 

दुसरा प्रचलित प्रवाद  म्हणजे इस्लामिक कायदा ही संकल्पनाच चुकीची आहे. हे मानणाऱ्या लोकांचे  असे म्हणणे आहे की इस्लामच्या सुरुवातीच्या काळात धार्मिक गुरु आणि त्यावेळचे शासक यांनी मिळून एक कायदेपद्धती विकसित केली. यामध्ये प्रत्येक कायदा हा इस्लामच्या नैतिक नियमानुसार बरोबर आहे का नाही असा निकष लावून संहिता रचली गेली. परंतु यात गोची अशी आहे की कुठल्याही इस्लामी कायद्याच्या पुस्तकात तुम्हाला वैयक्तिक आचरणाबद्दलचे नियम दिसतात. वैयक्तिक पातळीवरच्या या नियमांवर केवळ व्यक्तीचेच नियंत्रण असते. त्याचबरोबर या संहितेत समाजनियामनाचे ही नियम दिले आहेत ज्याचा संबंध आणि नियमन बाह्यव्याक्तिनी करणे अपेक्षित आहे. उदा यात उपास, प्रार्थना, तीर्थयात्रा अशा व्यक्तिगत संबाधित विवरण दिसेल त्याचबरोबर लग्नकरार, वारसाहक्क, संपत्तीचे वाटप अशा विषयांवरही नियम दिसतात. हा व्यक्ती आणि समाज अशा दोन्ही गोष्टीतले नियमन तसे पाहता वेगळ्या बाबी आहेत  परंतु त्या परस्परविसंगत नाहीत आणि म्हणून इस्लामिक कायदा अशी गोष्टच नाही हे  सुसंगत वाटत नाही.  

हा विचार मांडणारे आणखी एक युक्तिवाद असा करतात की कुठलाही कायदा हा कायदा म्हणून योग्य आहे हे सिध्द करण्यासाठी कायदेशीर कार्यप्रणालीच्या आताच्या तत्वांवर व निकषांवर अशा कायद्याची तपासणी करता आली पाहिजे. परंतु यात समस्या अशी आहे की  प्रचलित आधुनिक कायदा, कायदेपद्धती व यासंबधात असणारी नियमप्रणाली ही ख्रिश्चन धर्माच्या संदर्भात विकसित झाली आहे. आजही अनेक पूर्वाश्रमीच्या वासहतिक देशांमध्ये इंग्रज/ फ्रेंच  यांनीच लागू केलेले कायदेसंहिता वापरात आहेत - थोडाफार बदल झाला असेल परंतु ढाचा मात्र आधीचाच आहे. अंतर्गत कायद्याबरोबरच आंतरराष्ट्रीय कायद्याची सूत्रेही ख्रिश्चन धर्मप्रणालीतून आलेली आहेत. 


हा प्रतिवाद जसे इस्लामिक विचारवंत करतात तसेच उदारमतवादी व धर्मनिरपेक्ष विचारवंतही करतात. त्यामुळे इस्लामिक का ख्रिश्चन असा हा वाद न ठेवता  वेबर या समाजशास्त्रज्ञाने या विषयावर केलेले विवेचन पाहूयात. वेबर कायदेपद्धतीची त्यांच्या उत्पत्तीनुसार दोन भागात विभागणी करतो. प्रथम भाग हा मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, हिंदू असे धार्मिक कायदे ( वेबर Sacred Law  असे म्हणतो ). हे कायदे त्या त्या धर्माच्या धर्मसंस्थापकाना मिळालेल्या दैवी  दृष्टांतावर आधारित आहेत. या दृष्टांत आधारित कायद्याची अंमलबजावणी त्या त्या धर्मातील धर्मपंडितांमार्फत केली जाते. नवीन प्रश्न ज्यावर दृष्टांत स्पष्ट नसेल अशा ठिकाणी परंपरागतरित्या काय निवाडा केला गेला त्याचा आधार घेऊन निवाडे केले जातात. दुसऱ्या प्रकारची कायदेप्रणाली ही आधुनिक राष्ट्र राज्य संदर्भात प्रशासकीय आणि सामाजिक संदर्भ यावर आधारित आहे. ही प्रणाली जास्त विचार, तर्कधिष्ठित आणि वस्तुनिष्ठ आहे. या प्रणालीत काही प्रश्न निर्माण झाले तर त्यांच्यावर विचारविनिमय करता येतो, वादविवाद होऊ शकतो परंतु दैवीदृष्टान्तावर असा वाद शक्यच नाही, त्यामुळे त्यात बदल शक्य नाही. वेळोवेळी त्या त्या काळच्या धर्मपंडितानी कठीण परिस्थितीत धर्मधीष्ठीत कायद्यांचे वेगवेगळे अर्थ लावले आहेत. बऱ्याचदा हे अर्थ त्या त्या कालच्या शासकांच्या समर्थनातच लावलेले दिसतात. बऱ्याच सामाजिक आणि राजकीय बाबतीत धर्माधिष्ठित कायदे गतिहीन ( stagnant ) राहतात कारण त्यात कालानुरूप सुधारणा अवघड असते. धर्मातीत आधुनिक कायदेही बऱ्याचवेळेस कालबाह्य ठरतात, त्यांना बदलणे शासकीय आणि राजकीय कारणांमुळे अवघड वाटते - भारतीय संदर्भात यासंबधात बरीच उदाहरणे देता येतील. परंतु या कायद्यांबाबत अगदी काळ्या दघडावरची न बदलणारी रेघ किंवा विधीचे विधान असा काही समज नसतो. आधुनिक कायदा हा दैवी दृष्टांतापेक्षा अमूर्त  तत्व व शास्त्रीय सिद्धांतावर  आधारित असून त्यांची अंमलबजावणीही काही समान घटकांवर अवलंबून असते, सर्वाना सारखीच लागू पडते. उदाहरणार्थ जर खून केला तर त्याला सध्याच्या कायद्यानुसार एकच शिक्षा मग तो स्त्री असो, पुरुष असो किंवा कुठल्याही जाती धर्माचा असो. परंतु इंग्रजांनी नवीन कायदे लागू करण्याआधी एकाच गुन्ह्याला त्या त्या समाजाच्या धार्मिक नियमानुसार आणि त्या त्या धर्मात गुन्हेगार व्यक्तीचे काय स्थान आहे यावर शिक्षा ठरवली जात असे. व्यक्ती, समाजनियमनबरोबरच राज्यशकट चालवताना या धर्माधिष्ठित कायद्याचा आधार घेतला जात असे आणि हा कायदा व त्यावर आधारित पध्दतीही देवमान्य म्हणून त्यात बदलाची संभावना नाही.  उदा राजा हा देवाचा अंश किंवा खलिफ़त हीच राज्य चालवण्याची सुयोग्य पद्धती. परंतु कालौघात नवीन आव्हानांपुढे या पद्धती टिकल्या नाहीत आणि जगभर त्यांची जागा संविधानावर आधारित अशा राज्यपद्धतीनी घेतली आहे. 

संविधानिक कायदा म्हणजे राज्याच्या वेगवगळ्या अंगांमध्ये असलेला परस्परसंबंध सांगणारा कायदा, प्रशासकीय, न्याय आणि वैधानिक अशी ही तीन अंगे. इंग्लंडात लिखित संविधान नसले तरी या वेगवेगळ्या यंत्रणातले संबंध स्पष्ट आहेत, त्यांच्यामागच्या भूमिका, कार्यपद्धती स्पष्ट आहे . इस्लामिक इतिहासात अब्बसीद काळात आणि नंतर ओट्टोमान साम्राज्यात अशी सुसंगत रज्यरचना करण्याचे प्रयत्न झाले, तन्झीमात-- यावर नंतरच्या लेखात लिहिणार आहे -  या सुधारणा काळातील हे प्रयत्न स्पृहणीय असले तरी ते सफल झाले नाहीत. वेबर म्हणतो त्याप्रमाणे धर्मावर आधारित अशा व्यवस्थांमध्ये वस्तुनिष्ठ चर्चा व बदल शक्य नसते. कदाचित हेच कारण असावे ज्यामुळे अजूनही धर्माधारित व्यवस्थांमध्ये कायदेशीर, राजकीय  आणि सामाजिक बदलाचे प्रयत्न फार क्षीण दिसतात. आतापर्यंत काही संकल्पना आणि काही घडामोडींचा विचार  या लेखमालेत विचार केला आहे. यानंतरच्या लेखांमध्ये विविध प्रदेशातील राजकीय घटना व त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी यावर लिहिणार आहे. हे  लिखाण वाचताना आधुनिकता, त्याला येणारे प्रतिसाद आणि इस्लामिक कायदा याचे संदर्भ येतील. हे संदर्भ स्पष्ट करताना या आधीच्या लिखाणाकडे वळावे लागेल म्हणून काही गोष्टींचा खोलात उहापोह केला आहे. यानंतर तुर्कस्तान आणि मध्य आशियातील देशांकडे वळूयात. 

Monday, 7 April 2014

काय घडतंय मुस्लिम जगात - भाग ३ आधुनिकता-प्रतिसाद, विकास आणि अरब राष्ट्रे

आधुनिकता- प्रतिसाद, विकास आणि अरब राष्ट्रे
इस्लामिक जगतातही आधुनिकतेच्या प्रारुपास नाकारून वैकल्पिक संरचनेची कल्पना आणि व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येतो. उदा. इराणच्या इस्लामिक राज्यक्रांतीनंतर लिहिलेल्या १९७९ च्या संविधानाची प्रस्तावनेत त्यानी आधुनिक अर्थशास्त्रात अभिप्रेत अशा जडवादी विचारसरणीस नाकारले आहे. " जडवादी विचारसरणीचे उद्देशच नफा आणि संपत्ती कमावणे हा आहे. या विचारसरणीत आर्थिक व्यवहार आणि सत्ता हीच समाजरचनेची अंतिम उद्दिष्टे आहेत. याचा परिणाम म्हणूनएक भ्रष्ट िध्वंसकारी प्रक्रिया मनुष्याच्या विकासात दिसून येतात. इस्लाममध्ये अर्थव्यवस्था हे फक्त एक माध्यम आहे- ज्याचा उपयोग मुक्तीच्या अंतिम ध्येयापर्यंत जाण्यापुरताच करणे अपेक्षित आहे …" हे उद्धृत करण्यामागचा उद्देश म्हणजे इराणने पर्यायी राजनीतीचा पुरस्कार केला आणि अशी राज्यव्यवस्था निर्माण केली . संविधान प्रस्तावना हे त्या त्या देशांच्या मुख्य धोरणामागची मुल्ये अधोरेखित करणारे महत्वाचे दस्तैवज आहे. इथे इराण स्पष्ट म्हणतो कि आम्हाला जगात चाललेल्या, अस्तित्वात असलेल्या अर्थव्यवस्थेशी घेणेदेणे नाहि. आम्ही नवीन अर्थ व्यवस्था निर्माण करु! अशी व्यवस्था ते निर्माण करू शकले का -या प्रश्नाचे उत्तर मात्र नकारार्थी आहे. फक्त वैकल्पिक अर्थव्यवस्थेपुरताच हा प्रश्न सीमित नाहि. आतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धात्मक पातळीवर सारेच मुस्लिम देश तोकडे पडतात मग ते लष्करी सामर्थ्य असो किंवा अंतर्गत विकासाच्या निकषांवर- साक्षरता,आरोग्य, राजकीय सहभाग इ. ( इराण आणि पाकिस्तानकडे असलेली अनुशस्त्रे ही लष्करी सामर्थ्याची प्रतीके जरूर आहेत परंतु गेल्या ५० वर्षात झालेली मुख्य युद्धे उदा १९६७ सालचे इस्रायेल विरुद्धच्या युद्धात मुस्लिम राष्ट्रांना सांघिक माघार घ्यवी लागली आणि या देशतील राजवटीवर त्याचा दूरगामी परिणाम झाला - हे मुद्दे आपण त्या त्या राष्ट्राचा/ भूभागाचा अभ्यास करताना जास्त सविस्तररित्या पाहणारच आहोत.
आधुनिकता आणि मुस्लिम प्रतिसाद
आधुनिकतेच्या आव्हानाला जो प्रतिसाद मुस्लिम देशांत मिळाला त्याचे ढोबळ चार भागात वर्गीकरण करता येइल. आधी चर्चा केल्याप्रमाणे अरब आणि मुस्लिम देशांना स्वताच्या दैदिप्यमान अशे भूतकाळाची प्रतिमा आणि सांप्रतकालची त्यांची वास्तविकता यांचा मेळ घालणे कठीण जाते. आधुनिकतेमुळे आरपार बदललेल्या नव्या वैश्विक समीकरणात त्यांच्या या स्वप्रतिमा आणि अस्मितेच्या कल्पनांमुळे स्वतःला समाधानकारकरीत्या बसवणे अवघड दिसते. हा प्रश्न जसा मुस्लिम आणि अरब राष्ट्रांचा आहे तसाच तो वसाहतवादाच्या कचाट्यात सापडलेल्या अनेक देशांचा आहे. हा वसाहतवाद जरी भौतीकरीत्या गेल्या ५० वर्षात संपुष्टात आला असला तरी या देशांवर, समाजमनावर त्याचे ओरखडे अजूनही आहेत. एके काळी साम्राज्य स्थापनाऱ्या या बलाढ्य शक्तींना पश्चिमेच्या छोटाशा राष्ट्रांनी नामोहरम करून आजही त्यांचे ऐतिहासिक आणि सांप्रतचे स्थान वैश्विक परीघावर अगदी नगन्य केले आहे. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेने जग झपाट्याने जवळ आले, उत्पादनाच्या आणि बाजाराच्या पद्धती बदलल्या आहेत. पूर्वी एका ठिकाणाहून दुसरीकडे एक बातमी पोहचायला महिने, कधी कधी वर्षे जात. आज जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात घडणारी घटना तुम्हाला आपल्या घरी किंवा जिथे कुठे असाल तिथे अगदी सविस्तर कळू शकते. ज्ञान, तन्त्रज्ञान आणि त्यावर आधारित वैश्विक क्रयव्यवस्थेने सर्व स्थानिक संदर्भ जणू नामशेष करून टाकले आहेत. ज्या देशांमध्ये औद्यागिक क्रांतीमुळे ही आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरु झाली त्या देशांमध्येही सामाजिक आणि राजकीय उलथापालथी मोठ्या प्रमाणावर झाल्या. औद्योगीकरणाच्या प्रक्रियेत वसाहतींचा वाटा हा फक्त कच्चा माल पुरवणाऱ्या आणि तयार मालाचा खप असणाऱ्या अर्धविकसित बाजारपेठा एवढाच होता. परंतु या प्रक्रियेत मालाचा क्रयविक्रय, त्यानुषंगाने निर्माण होणारे छोटे उद्योग, विस्तारणारे सेवा क्षेत्र, निर्माण होणारी संपत्ती, शहरीकरण आणि त्याच जोडीने येणारे बकालीकरण हा बदल अनेक समाजात अभूतपूर्व असा होता. मुख्य म्हणजे या बदलाच्या आणि घडामोडींच्या नाड्या परकियांच्या हाती होत्या. वसाहतवादाच्या या संदर्भात आधुनिकीकरणाची प्रक्रिया स्वकीयांना त्यांच्यावर लादलेली वाटणे साहजिक होते. या प्रक्रियेत आपण नगण्य आहोत, निष्प्रभ आहोत हे उमजल्यावर या समूहांना वाटणारी दुर्बलतेची, हताशपणाची भावना या कालखंडात या सर्व देशांमध्ये रुजली. भूतकाळाचे स्वप्नरंजन,आधीच्या व्यवस्थेचे गुणगान आणि आधुनिकतेच्या अनुषंगाने आलेल्या सर्व गोष्टींबाबत कमालीचा अस्वीकार या गोष्टी या सर्व समाजात दिसून येतात. प्रचलित साहित्य, कला यामध्ये गतकाळाचे अगदी रुमानी प्रतिबिंब दिसून येते - चिनुआ अचेबे या विख्यात नायजरियन लेखकाची Things Falling Apart, या कादंबरीत आफ्रिकन टोळीप्रमुखाची कथा सांगितली आहे. औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे आधीची शेतीपद्धती व त्यावर आधारित समाजाचा कसा ऱ्हास होतो याची ही कहाणी. इराणी साहित्यात जलाल -अल- अहमद, अरब लेखक सादेक हेदायात यांच्या लोकप्रिय लिखाणातूनही भूतकाळाचे असेच गौरवीकरण दिसून येते. हा भूतकाळ मात्र धर्म आणि धार्मिक सत्ता यांच्याशी अतूटपणे बांधला गेला आहे आणि त्यामुळे साहजिकच आधुनिकीकरणाला प्रत्युत्तर म्हणून भूतकाळ आणि अनुषंगाने तेव्हाची धार्मिक व्यवस्था हा पर्याय यातून समोर येताना दिसतो.
गतकाळातील संकल्पनावर आधारीत अशा समाजरचनेचे हे स्वप्न थोड्याफार फरकाने सर्व मुस्लिम जगतात आढळते. परंतु सद्यपरिस्थितिस सामोरे जाताना वेगवेगळ्या देशात वेगवेगळे मार्ग अवलंबलेले दिसतात. ढोबळमानाने याचे चार प्रकारात विभाजन करता येईल. हे विभाजन फक्त सैद्धांतिक पातळीवर आहे- प्रत्यक्षात एकाच देशातही वेगवेगळे मतप्रवाह आहेत आणि त्यांचा देशाच्या धोरणांवर कमीजास्त फरक पडत असतो आणि काही देशात तर आमुलाग्र बदल झालेले दिसतात.
यातील पहिला मार्ग आहे तो पूर्णपणे पाश्चिमात्य देशांच्या अनुकरणाचा. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १९व्या शतकात तुर्कस्तान, इराण, इजिप्त असे देश. पाश्चात्य देशांत प्रचलित अर्थ- राज्य आणि प्रशासन व्यवस्था या देशांतील तत्कालीन सत्ताधारी आणि अधिकारी वर्गाला जवळची वाटतात. उदा कैरो विद्यापीठाची स्थापना झाल्यावर इथे इस्लामिक धर्मशास्त्राऐवजी आधुनिक शास्त्रांचा अभ्यास सुरु होतो. ओटोमान साम्रज्याच्या लष्करी प्रशिक्षणात, संघटनात्मक बांधणी आणि संरचनेत जर्मनीचा मोठा सहभाग दिसून येतो. ओटोमान साम्राज्यात या अनुकरनास तन्झीमात- सुधाराची चळवळ असे नाव दिले आहे. या चळवळीच्या प्रमुखपदी सुरुवातीला तत्कालीन सुलतान होता परंतु लवकरच एका तरुण मिलिटरी अधिकाऱ्याने आपण आणखी गतीने हे बदल घडवून आणले पाहिजेत या उद्देशाने बदलाची सूत्रे हाती घेतली. हा तरुण, मुस्तफा केमाल पाशा पुढे अतातुर्क - तुर्कांचा पिता म्हणून ओळखला जाऊ लागला. केमाल पाशा आणि त्याच्या तरुणतुर्क सहकाऱ्यांनी तन्झीमातचा विचार सोडून फ्रान्सच्या धर्तीवर आधारित धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकाची घोषणा आणि स्थापना पहिल्या महायुद्धादरम्यान केली. तुर्कस्थानात गेल्या दहा वर्षात धर्माचे सामाजिक जीवनात स्थान या विषयावर चर्चा आणि बदल चालूच आहे. थोडे विस्ताराने हे आपण नंतर पाहणार आहोत. परंतु संपूर्ण अनुकरण यामार्गे आधुनिकतेचा अंगीकार हा पहिला दृष्टीकोन होय -यात धर्मनिरपेक्ष समाजरचना अंगभूत आहे.
आधुनिकतेच्या अंगीकारातला दुसरा दृष्टीकोन हा धार्मिक उदारमतवाद हा आहे. नवीन बदलांना आत्मसात करताना आधीच्या प्रथा, परंपरा आणि धर्म यांना बाजूला सारण्याची गरज नाही. धर्मपरंपरांमध्ये आवश्यक ते बदल आणून आधुनिकतेमुळे येणारी आव्हाने स्वीकारण्याचा हा गट पुरस्कार करतो. या गटाचे प्रतिनिधित्व मोरोक्को आणि ट्युनिशिया हे देश करताना दिसतात. या देशांतील परिस्थितीचा सविस्तर विचार आपण नंतर करुयात परंतु येथे हे विभिन्न दृष्टीकोन समजाऊन घेताना यांचा उल्लेख केला आहे. इस्लाम हा सर्वसमावेशी धर्म असून तो आधुनिकतेसही अंगिकारू शकतो, नवीन आव्हाने असली तरी मुख्यतः इस्लामिक कायद्यात विशद केलेल्या संकल्पनांची पुनर्मांडणी करून त्या आव्हानांवर मात करू शकतो अशी या दृष्टिकोनावर आधारित धारणा. मुस्लिमजगतात सर्वात प्रभावी असा हा मतप्रवाह. येणाऱ्या काळानुसार बदल आवश्यक आहेत आणि ते बदल इस्लामिक कायद्याचे विवेचन, स्पष्टीकरण देऊन कायद्याच्या आधारावर संमत होऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ट्युनिशिया, मोरोक्को ५७-५८ मध्ये कौटुंबिक कायद्यात केलेले बदल. मोरोक्कोत हेच बदल २००४ मध्ये पुन्हा करण्यात आले. कौटुंबिक कायदे असोत किंवा इतर क्षेत्रातील बदल असोत अनेक मुस्लिम विचारवंत इस्लामचे वेगळ्या अंगाने स्पष्टीकरण देऊन अनेक असे बदल सामावून घेतात. परंतु या दृष्टीकोनात इसलाम आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या सार्वजनिक कायद्यांचीच सर्वोच्चता मानली जाते.
तिसरा दृष्टीकोन हा परम्परावाद्यांचा, याचे उत्तम उदाहरण म्हणजे सौदी अरेबिया आणि इतर गल्फ देश. यांची मांडणी आणि दृष्टीकोन म्हणजे आम्हाला बदलाची काहीही गरज नाही. इस्लामिक शासन आणि इस्लामिक समाज हा आपल्या जागी फक्त योग्यच नव्हे तर इतर समाजांपेक्षा आणि विशेषतः पतित अशा पाश्चात्य देशांच्या तुलनेत उत्कृष्ट आहे. आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ हे नेहमी आधुनिक जीवनाच्या काही बाबींचा उल्लेख करत असतात उदा. घटस्फोटाचे वाढते प्रमाण, कौटुंबिक जीवनाचा ऱ्हास, वेश्याव्यवसाय ई. अन्य समाजांच्या तुलनेत मुस्लिम समाज किती स्थिर आणि सुयोग्य आहेत कारण त्यांची बांधणी इस्लामिक कायद्यावर आधारित आहे. असा कायदा जो सर्वसमावेशक आणि जीवनाच्या सर्व पैलूंना विधिवत नियंत्रित करणारा आहे. त्यामुळे परंपरागत किंवा आधुनिक आव्हान असो -आम्हाला बदलायची गरजच नाही. आधुनिकतेच्या प्रक्रियेत येणाऱ्या अनेक तन्त्रज्ञानावर आधारित अनेक बदल मात्र यांनी अंगिकारले आहेत. हे तन्त्रज्ञान चालवण्यासाठी लागणारी मानवी संसाधनेही हे समाज आयात करतात. पाश्चात्य देशातील बनणाऱ्या सर्व सुख सुविधांचा उपभोग या देशात सर्रास केला जातो परंतु तेथील समाजाचे नियमन मात्र ते पूर्णपणे या प्रक्रियांपासून अलिप्त राहून करतात.
चौथा आणि सर्वात महत्वाचा गट - महत्वाचा यासाठी के मुसलीम आणि इतर समाजात हा गट राजकीय मंचावर जास्त चर्चिलेला, लोकांच्या मनात, कल्पनेत आज मुस्लिम म्हणून जी साधारण कल्पना आहे तीत असणारा असा हा मुस्लिममुलतत्ववादी गट. या गटांतर्गतही खूप विभिन्नता आहे, खूप सक्रियता आहे. सैद्धांतिक दृष्ट्या आज हा गट सर्वात जास्त सक्रीय आणि प्रभावशाली आहे. या गटाने आधुनिकतेला एक आव्हान म्हणून स्वीकारले आहे. या आव्हानास प्रतिसाद देण्यात धर्मनिरपेक्षवादी गट आणि उदारमतवादी सुधाराकांचा गट अयशस्वी झाल्यामुळे इस्लामवर आधारित शासनप्रणाली आणण्याची हा गट आपली जबाबदारी मानतो. अशी शासनप्रणाली जी आधुनिक जगात पाश्चात्य जगताशी टक्कर घेऊ शकेल. यांच्यामते इस्लाम हा मूलतः भांडवलशाही किंवा समाजवाद या पाश्चात्य संकल्पनापेक्षा श्रेष्ठ आहे. हा गट अरब आणि मुस्लिम देश ज्यांनी पूर्णतः किंवा अंशत: पाश्चात्यांचे अनुकरण केले त्यांच्या असफलतेचा हवाला देत इस्लामच्या मुलतत्वांवर आधारित अशी प्रणाली विकसित करण्याचे ध्येय राखतो. प्रेषितांच्या वेळची आदर्श नैतिक व्यवस्था या गटास अभिप्रेत आहे आणि या व्यवस्थेचे हे पुरस्कर्ते हेच या व्यवस्थेस कार्यान्वित करणारे शास्तेही आहेत. अयातुल्ला खोमेनींच्या मते इस्लाम ही तिसरी आणि सर्वश्रेष्ठ समाजप्रणाली आहे. ही विचारसरणी सर्व मुस्लिम जगतात गेल्या ३०-४० वर्षात लोकप्रिय झाली आहे.
आधुनिकता, विकास आणि अरब राष्ट्रे
आधुनिकतेचे हे आव्हान वस्तुतः काही नवीन गोष्ट नाही. ही प्रक्रिया जवळपास दोनशे वर्षापासून चालू आहे. या प्रक्रियेत मुस्लिम राष्ट्रे मात्र आर्थिक, सामाजिक आणि लष्करी सामर्थ्यात तोकडी पडलेली दिसून येतात. परंतु हे आव्हान सध्याच्या अरब देशातील घडामोडी बघता आणखीनच बिकट झालेले दिसते. या घडामोडींबद्दल प्रसारमाध्यमातून बरीच माहिती पुढे आली आहे. परंतु या चर्चांमध्ये या राष्ट्रांच्या आर्थिक परिस्थितीचा आणि अर्थविषयक धोरणांचाही महत्वाचा भाग आहे आणि सद्य चर्चांमध्ये तो थोडा दुर्लक्षिलेला आहे म्हणून थोडा विस्ताराने हा उहापोह. अर्थात ज्या काही घडामोडी चालू आहेत त्यांचे असे एकांगी विश्लेषण शक्य नाही आणि त्यातील इतर आयामही महत्वाचे आहेत, परंतु अर्थविषयक विश्लेषनाचीही तितकीच गरज आहे.After the Spring हे या विषयावरचे अगदी नुकतेच प्रसिद्ध झालेले पुस्तक. मान्यवर अर्थशास्त्रज्ञानी अरब आणि मुस्लिम देशातील सद्य परिस्थितीचा अभ्यास करून काही लेख यात प्रसिद्ध केले आहेत- यातील बरेच आंतरजालावरहि उपलब्ध आहेत.काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी इथे आलेखांचा वापर केला आहे.
या पुस्तकात गेल्या काही दशकात ज्या देशांमध्ये आमुलाग्र बदल झाले अशा १०३ देशांचा अभ्यास मांडला आहे. यातील ५७ देशांच्या अर्थव्यवस्था वाढताना ( GDP परिमाण )दिसतात, तर ४६ देशांच्या अर्थव्यवस्था त्या तुलनेत कमी विकसित दिसतात. म्हणजेच टोकाच्या राजकीय घडामोडी झाल्या तरी त्यानंतर त्या देशांची घडी कशी बसवली गेली यावर त्या देशांचा नंतरचा विकास अवलंबून होता. यात काही महत्वाचे घटक सकारात्मक ठरतात उदा - शिक्षण, रोजगाराच्या संधी, उद्योगधंद्यांचा विस्तार, भ्रष्टाचारमुक्त सेवा क्षेत्र आणि स्त्रियांचा आर्थिक प्रक्रियेत सहभाग. राजकीय घडामोडीत जेव्हा जुनी व्यवस्था कोलमडून पडते, जुन्या उत्पादनव्यवस्था बंद पडून उत्पादन, नफा आणि उत्पन्न घटते आणि गरिबी वाढते तेव्हा आलेल्या नवीन राजकीय बदलांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो. अर्थव्यवस्थेची घडी बसवता न आल्यामुळे अधिक जास्त राजकीय आणि सामाजिक अंदाधुंदी निर्माण होते. इजिप्त आणि ट्युनिशिया येथे दोन वर्षापूर्वी सुरु झालेल्या आंदोलनातून सत्ताबदल होऊनही अजून स्थैर्य येत नाहीये याचे महत्वाचे कारण आर्थिक घडी बसण्यासाठी जे संस्थात्मक आणि प्रक्रियात्मक घटक आवश्यक असतात त्यांचा अभाव हे आहे.
खालील आलेखात वेगवेगळ्या भौगोलिक विभागानुसार देशातील अर्थव्यवस्थेत प्रतिव्यक्तिचे योगदान दाखवले आहे.
vlcsnap-2014-02-24-12h00m54s245.png
यातील सर्वात वर आशियायी वाघ = चीन, कोरिया, विएतनाम हे देश आहेत. या देशांमध्ये गेल्या वीस वर्षात प्रत्येक व्यक्तिच्या उत्पादकतेत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील योगदानात मोठा फरक पडला आहे. याचा परिणाम म्हणून त्यांचे वेतन, क्रयशक्ती आणि एकूणच उत्पन्न व जीवनशैली सुधारली आहे. या देशांच्या अर्थव्यवस्थाही प्रगती करत आहेत.
मध्ये निळ्या रंगाच्या रेषेने दर्शवलेले देश हे पूर्व युरोपीय आणि मध्य आशियायी देश आहेत आणि यांची प्रगतीही समाधानकारक आहे. पिवळ्या रेषेने दर्शवलेले देश हे प्रगत, ओउद्योगिक देश आहेत, यांचेही दरडोई व राष्ट्रीय उत्पन्न गेल्या २० वर्षात २०% नी वाढले आहे. आता खालच्या दोन लाल आणि हिरव्या रेषेकडे पाहूयात. लाल रेषा सब सहारन आफ्रिकी देश दाखवते आणि गेल्या १०-१५ वर्षात यांचेही राष्ट्रीय उत्पन्न वाढताना दिसत आहे. परंतु सर्वात कमी दरडोई उत्पादक्ता, दरडोई उत्पन्न व स्थिर राष्ट्रीय उत्पन्न अरब देशात दिसून येते. याचाच अर्थ जी संपत्ती, उत्पन्न या देशात निर्माण होते ते सर्वांपर्यंत पोहोचत नाही. आणि हे देश असे आहेत जिथे एक विशिष्ट जीवनशैली प्रचलित आहे, लोक शिक्षित आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या आणि देशाच्या उत्पन्नाबद्दल ठोस अपेक्षा आहेत.
हा दुसरा आलेख यातही अरब देशांच्या कमकुवत उत्पादकतेची प्रचीती येते. या आलेखात अरब देशांचा परस्परातला व्यापार आणि इतर देशांशी व्यापार दाखवला आहे. इतर देशांच्या तुलनेत हा व्यापार नगण्य आहे, याचाच अर्थ या देशांची देशांतर्गत उ त्पादकता कमी तर आहेच आणि हे देश दुसर्या देशात आयात- निर्यात करू शकतील असे याचे उत्पादन नाही. आर्थिकप्रगतीच्या दृष्टीने ही काही फार आशादायक गोष्ट नाह
vlcsnap-2014-02-24-16h35m16s140.png
पुढील आलेखात या देशांची लोकसंख्यावाढ दाखवली आहे. इथे युरोपिअन आणि औद्योगिक देशांची लोकसंख्या स्थिरावलेली दिसते - याचेही वेगळे परिणाम आहेत पण तो इथे चर्चेचा विषय नाही. या देशांच्या लोकसंख्यावाढीचा दर ०-१% च्या दरम्यान आहे. शेष जगाचा १-२% दरम्यान आहे तर अरब जगाचा ३% च्या वर आहे.
vlcsnap-2014-02-24-16h36m06s250_0.png
या लोकसंख्येत तरुणांचा भरणा खूप मोठा आहे. एकूण लोकसंखेच्या २/३ लोक तिशीच्या आतले आहेत. अरब देशांनी गेल्या तीस वर्षात शिक्षणक्षेत्रात मोठी गुंतवणूक केली. हा सगळा तरुण वर्ग शिक्षित आहे आणि त्याच्या नोकरीच्या, उत्पन्नाच्या अपेक्षा या प्राथमिक श्रमक्षेत्राच्या पलीकडच्या आहेत. वर्षानुवर्षे या देशांमध्ये शासकीय सेवाक्षेत्रापलीकडे तरुणांना रोजगाराच्या संधीच निर्माण केल्या नाहित. सेवाक्षेत्राची लोकांना सामावून घेण्याची क्षमता मर्यादित आहे. लोकांची रोजगार आणि उत्पन्नाबाबतीतल्या अपेक्षांची पुर्ती न होणे हे या असंतोषाच्या मागचे महत्वाचे कारण आहे. खालील आलेखात काही प्रमुख देशातील बेरोजगारीची आकडेवारी दिली आहे.
vlcsnap-2014-02-24-16h36m54s226.png
दरवर्षी श्रम बाजारात येणाऱ्या प्रशिक्षित लोकांच्या टक्केवारीत २ ते ५% च्या दरम्यान वाढते आहे. याचाच अर्थ २-५% नवीन लोक दरवर्षी नवीन रोजगारासाठी तयार असतात आणि एवढा रोजगार त्या त्या व्यवस्थेने पुरवावा अशी त्यांची अपेक्षा अस्ते. या आलेखातील गुलाबी रेषा श्रमिकांच्या संखेतील वाढ तर निळ्या रंगाची रेषा तरुण बेरोजगाराची संख्या दाखवते. उदा अल्जेरियात ४५%, बहरीन २०% इजिप्त ३०%, जॉर्डन ४०% - यावरून सध्याच्या आंदोलनातील तरुण पिढीच्या स्फोटक विद्रोहाची कल्पना येईल.
vlcsnap-2014-02-24-16h37m22s192.png
शिक्षित, रोजगार व जीवनशैली याबाबत ठोस अपेक्षा असणारी, संपत्ती स्थैर्य यांची अभिलाषा असणारी ही पिढी सर्वच पातळ्यांवर निराश दिसते आहे. नोकरी नाही म्हणून संसार सुरु करता येत नाही आणि ज्या व्यवस्थेत वाढली तिथे निषेध, बंड करण्याची परंपरा नाही, इथल्या शासनव्यवस्था त्यांच्याशी निष्ठावान असणाऱ्यांवर कृपा आणि विरोधकांचे दमन करणाऱ्या, यामुळे घुसमटलेला असंतोष हिंसकरित्या बाहेर पडत आहे. यावेळी लोक पुढे येउन काही करू इच्छित आहेत, करत आहेत, हिच अरब राष्ट्रांच्या संदर्भात विलक्षण अशी घटना आहे. ही क्रांती जिथे सुरु झाली इजिप्त आणि ट्युनिशिया येथे नेमके हेच घटक - लोकांच्या आर्थिक आणि सार्वजनिक सेवा - आरोग्य, दळणवळण, शाळा, निवारा - सरकार पुरे करण्यात कमी पडली. जोपर्यंत सरकार या गोष्टी पुरवत होते तोपर्यंत जनता त्यांच्या अधीन होती, शांत होती. नवीन वैश्विक वातवरणात या सरकारांना त्यांच्या अर्थव्यवस्था सावरता आल्या नाहीत आणि परिणामी त्यांचे जनतेबरोबर जे कंत्राटी स्वरूपाचे संबंध होते त्यांनाच हादरा बसला. आता नव्याने आलेल्या सरकारांनीही नवीन व्यवस्थाबांधणीत राजकीय, वैधानिक व्यवस्थेबरोबरच नव्या अर्थव्यवस्थेच्या या आव्हानांना तोंड दिले नाही तर ही नवीन सरकारेही अल्पमुदतीची ठरतील. इजिप्तमध्ये सत्ताबदल होऊन गेल्या वर्षात तीन सरकारे आली आहेत. लष्कराचा आणि मुलतत्ववादी गटांचा प्रभाव आणखीनच वाढला आहे. ज्या लोकशाही मार्गाने उठाव करणाऱ्या जनतेसमोर लष्कर किंवा मुलतत्ववाद्यांची हुकुमशाही असे पर्याय आज तरी दिसत आहेत. वाढणाऱ्या लोकसंखेच्या, तरुण बेरोजगारांच्या समस्या या निकटच्या काळात सोडवता आल्या नाहीत तर परिणामी आणखी गोंधळ, अस्थिरता आणि असुरक्षितताच या देशातून वाढताना दिसेल.

Sunday, 6 April 2014

काय घडतंय मुस्लिम जगात? भाग २- मुस्लिम राजवटींचा संक्षिप्त इतिहास आणि आधुनिकता

नमनाला घडाभर तेल घालून झाले आहेच आता पुढील विषयाकडे वळूयात.
मुस्लिम राजवटींचा संक्षिप्त इतिहास
आजचे मुस्लिम बहुल प्रदेश समजून घ्यायचे असतील तर इस्लामच्या उदयपासूनचा इतिहास पहावा लागेल. प्रेषित मोहम्मदांनी मक्केहून मदिना येथे इसवी सन ६२२ मध्ये  स्थलांतर केले तेव्हापासून हा इतिहास सुरु होतो. यानंतरच्या दहा वर्षात, सन ६३२ पर्यंत, प्रेषितांच्या मृत्युपर्यंत इस्लामी राजवट संपूर्ण अरब आखतात पसरली होती. यानंतर आलेल्या चार खिलाफतीनच्या - खलीफ म्हणजे राज्य संस्थेचा प्रमुख - कालवधीत मुस्लिम राजवट त्याकाळच्या बायझानटाइन आणि सास्सानिड साम्राज्यावर बहुतांशी कब्जा करून उत्तर आफ्रिकेत पसरली होती. त्यानंतर आलेल्या उम्मयाद राजवतिचा विस्तार स्पेन- पोर्तुगाल समुद्रकिनार्यापासून आजच्या पाकिस्तान व भारताचा काही भागअपर्यन्त झाला होता. प्रेषितकाळापासून केवळ १३० वर्षांचा हा व्यापक विस्तार ही मुस्लिम साम्राज्याचा गौरव, संघटीत ताकद आणि मोठ्या प्रमाणावर लोक आणि सैन्य यांना सोबत घेऊन केलेला राज्यकारभार यासाठी ओळखला जातो. यानंतर सन ७५० मध्ये आलेली अब्बासिद खिलाफत हा मुस्लिम साम्राज्याचा सुवर्णकाळ समजला जातो. सन ७६२ मध्ये या साम्राज्याची राजधानी बगदाद येथे स्थलांतरित केली गेली. बगदाद हे लवकरच एक संपन्न आणि सुसंकृत शहर म्हणून प्रसिद्धीस आले. त्याकाळच्या ज्ञात जगातून अनेक विद्वान, व्यापारी, लेखक, कलाकार बगदादकडे आकर्षित झाले होते. साधारण ४००- ५०० वर्षाचा हा कालावधी हा वेगवेगळ्या संस्कृतींचा मिलाप, उत्कृष्ट शासन -प्रशासन आणि सर्वसमावेशक सहिष्णुता यासाठी ओळखला जातो.इस्लाम आणि मुस्लिम राजवटी सहिष्णू आहेत असे जेव्हा दाखले दिले जातात तेव्हा याच काळाचा निर्देश केला जातो. इस्लामिक संस्कृतीत खरोखर हा एक उन्नतीचा आणि प्रगतीचा कालखंड होता.
१२५८ साली झालेल्या मंगोल आक्रमणात बगदादचा पाडाव होतो आणि अब्बासीद राजवट इजिप्त कैरो इथे स्थलांतरित होते. तिथे ही राजवट चालू राहते परंतु पूर्वीची शान, बान आता लयास गेलेली असते. त्यात भर म्हणून कोर्डोबा -आजच स्पेन इथे प्रतीखीलाफतीची स्थापना झालेली आहे. प्रचंड मुस्लिम राजवटीला गेलेला हा पहिला तडा. यानंतर अब्बसीद राजवटीचे विभाजन चालूच राह्ते. १५१७मध्ये ओटोमान सम्राट या खिलाफतीवर पूर्णपणे कब्जा करतो. १५१७ पासून १९२४ मध्ये अतातुर्क केमाल पाषाने खिलाफत बरखास्त करेपर्यंत हि खिलाफत अस्तित्वात होती. परंतु आधीच्या खिलाफती आणि ही खिलाफत यात एक मुलभूत फरक दिसून येतो. तत्वतः खलिफा हा राज्याचा आणि धर्मपीठाचा मुख्य असतो. नवीन कार्यप्रणालीत मात्र खलिफचे स्थान हे त्याच्या लष्करी सैनिकांवर अवलंबून असू लागले. ओटोमान साम्राज्यातील सैनिक हे मुख्यतः गुलाम म्हणून सैन्यात विकत घेतलले असत. खलिफा हा नावापुरता राज्यप्रमुख राहिला आणि खरी सत्ता मात्र या सैन्यातूनच आलेल्या सुलतानाच्या हातात गेलॆ. धर्मसत्ता आणि राजसत्ता याची फारकत इथूनच सुरुवात झाली. प्रेषिताचे उत्तराधिकारी म्हणून खलिफ आणि खिलाफतीकडे मुस्लिम नेहमीच निष्ठावान असत परंतु या खालीफाकडे वास्तविक सत्ता मात्र या कालावधीत फारच नगण्य होती. धर्म आणि राजसत्तेची फारकत याचे दूरगामी परिणाम यापुढच्या काळात मुस्लिम शासनव्यवस्था आणि कायदे यांच्यावर झालेले दिसतात. विसाव्या शतकाच्या शेवटपर्यंत इस्लामिक राज्यांमध्ये सैद्धांतिक पातळीवरचीएक मोठी उणीव म्हणजे या फारकतीच्या पुढे जाउन समग्र नागरी व्यवस्थेची घडी बसवणे होय. या राजवटीतील मुस्लिम समाजाचे नियमन हे पूर्णपणे धार्मिक नियमानुसार अपेक्षित आहे, परंतु धार्मिक व्यवस्थेचा प्रमुख आणि शासनव्यवस्थेचा प्रमुख यांच्या स्थानामध्ये आणि सत्तेमध्ये बराच फरक आहे, अधिकाराचे विभाजन आहे.याचा परिणाम म्हणून नागरिकांची शासनव्यवस्थेप्रती असलेली निष्ठा ही धर्मपीठअप्रती असलेल्या निष्ठेशी सुसंगत असेलच असे नाही. यातून निर्माण होणाऱ्या तिढ्या सोडवताना प्रेषिताच्या वेळचे दाखले दिले जातात. परंतु त्या काळी जरी हि व्यवस्था प्रेषिताच्या उपस्थितीत चालली असली तरी त्यानंतरच्या काळाच्या आव्हानासाठी पुरेशी पडताना दिसत नाही. आपण अभ्यासणाऱ्या बऱ्याच देशांमध्ये हा घटक दिसून येतो. गेल्या काही दशकात या प्रश्नाची उकल करून एक समग्र इस्लामिक राज्यप्रणाली पुढे येत आहे त्याचाही विचार लेखामध्ये पुढे करुयात.
बहुआयामी विभिन्नता आणि सामायिक घटक
या राजवटी झंझावाती वेगाने पसरल्या खरया पण त्याकाळी जे जे समुदाय या राजवटीनच्या अखत्यारीत आले त्या समुदायाच्या भाषा, संस्कृती आणि धर्म मात्र तेच रहिले. सुरुवातीच्या काळात या समुदायांना जबरदस्तीने मुस्लिम बनवण्यात जेत्या अरबांना फार रस नसल्याचे दिसून येते. स्थानिक प्रथा आणि परंपरा या काळात निर्धोकपणे चालू रहिल्य. आज या मुस्लिम प्रदेशात अनेकांगी विविधाता दिसून येते त्याचे सुरुवातीच्या काळातील अरबांचे अनुत्साही धोरण कारणीभूत आहे. यथावकाश जेत्या समुदायांचे धर्मांतर झाले तरी बऱ्याच स्थानिक परंपरा तशाच राहिल्या, किंबुहना त्यातल्या बऱ्याचशा अरब विजेत्यांनी जोपासल्या उदा. पर्शिअन आणि नंतर भारतात प्रचलित असलेली प्रशासनव्यवस्था थोड्या फार फरकाने त्यांनी चालू दिली. मुस्लिम साम्राज्य त्याकाळी कळसास पोहोचले याचे महत्वाचे कारणच या स्थानिक संस्कृतीं आणि जेत्यांच्या नव्या संकल्पनांचे सह्मीलन होय. ही राजवट इस्लामिक कायदे व त्यात अभिप्रेत असलेल्या राज्यप्रणालीनुसार चालवली असली तरी त्या त्या प्रदेशातली स्थानिक विविधता यात सामावून गेली होति. म्हणूनच आज जेव्हा आपण मुस्लिम समाज पाहतो तेव्हा अरबस्तानातील मुस्लिम,सोमालिया, अफगाणिस्तान, इराण, बोस्निया, चीन येथील समाज हे अनेक बाबतीत एकमेकांपेक्षा वेगळे असल्याचे दिसतात. या समाजातील भाषा, चालीरीती, नंतरच्या काळातील शासन-प्रशासन हे एकमेकांपासून खूप भिन्न आहे. हे समाज स्वततःला मुस्लिम म्हणतात, समजतात परंतु या भिन्नता अटीतटीने जोपस्तात. अरबी ही प्रेषिताची भाषा, कुराण या भाषेत लिहिलेले असल्यामुळे तिला मुस्लिम जगतात महत्वाचे स्थान आहे. मुस्लिम राजवटीत बऱ्याच भागात अरबी भाषा राज्यकारभारासाठी स्वीकारली गेली परंतु ती जन भाषा मात्र झालेली दिसून येत नाही. पर्शिअन किंवा ओटोमान साम्राज्यातली जुनी फर्माने पाहिली तर ती अरबी भाषेतील आहेत पण स्थानिक लिपीमध्ये लिहिलेली दिसतात. फरक फक्त सांस्कृतिक पातळीवरच नाही तर आर्थिक आणि राजकीयही आहे. कतार सारखा देश जेथे जगातील सर्वोच्च दरडोई उत्पन्न आहे हा देश मुस्लिम आहे आणि अफगाणिस्तान किंवा सोमालिया जिथे पराकोटीचे दारिद्र्य, दरडोई सर्वात कमी उत्पन्न आहे हे देशही मुस्लिम आहेत. मलेशिया आणि तुर्कस्तानसारखे सातत्याने प्रगती करणारे देश मुस्लिम आहेत तर इतर अनेक देशांची उत्पादकता स्थिरावलेली आहे. यात जेथे मुस्लिम सत्ता स्थिरावल्या अशा प्रशिया, तुर्कस्तान, इराण इत्यादी देशात स्थिर शासनव्यवस्थांची परंपरा दिसते तर सौदी अरेबिया, अफगाणिस्तान अशा देशांमध्ये तुलनेने अपरिपक्व अशा शासनप्रणाली दिसून येतात. यातील बहुतांशी देशांमध्ये एकाधिकारशाही - एका राजघराण्याची किंवा फौजी अधिकारयाची - असणारी आहेत. बहुतेक अरब देशांमध्ये तिथले शासक आणि प्रजा यांच्यामध्ये एक अलिखित करार दिसून येतो. शासन करणारी श्रीमंत घराणी तिथल्या लोकांच्या आर्थिक गरजा भागवतील आणि त्या बदल्यात त्यांना आरामात राज्य करता येइल. या आर्थिक कराराबरोबरच इथल्या समाजाने एकप्रकारचा सामाजिक आणि मानसिक करार केलेला दिसून येतो आणि तो म्हणजे बाहेरच्या जगात त्या काही घडामोडी होतील त्यापासून त्यांचे संरक्षण. दशकानु दशके काहीही बदल न होता इथली समाजव्यवस्था तशीच चालू आहे त्यामुळे इथली प्रजाही मानसिक दृष्ट्या परावलंबी झालेली दिस्ते. आधुनिकतेमुळे येणाऱ्या सर्व बदलांना आहे त्या प्रचलित पद्धतीमध्ये घोळू इच्छिते किंवा त्यांचे अस्तित्वच नाकारू पाह्ते. या मानसिकतेमुळेच इतकी दशके हासामाजिक करार आणि त्यावर आधारित राजेशाही इथे अबाधित रहिलि. परंतु नव्याने उदभवत असलेल्या अनेक प्रश्नांना सामावून घेण्यात हे शासक कमी पडताना दिसत आहेत आणि त्यामुळेच एक असंतोष या समाजामध्ये उमडून आला आहे.
इतक्या टोकाची विभिन्नता असूनही या सर्व देशांबद्दल एकजिनसी अभ्यास कसा होऊ शकतो हा निर्विवादपणे मोठा प्रश्न आहे. परंतु या सगळ्या घटकांमध्ये या देशांच्या,मध्ये धर्म - इस्लामचा एक सामाईकधागा निश्चितच आहे. हे देश स्वतःला मुस्लिम राष्ट्रे म्हणवतात. विभिन्न परिस्थिती असली तरी यांचे सैद्धांतिक पातळीवर उद्दिष्टे एक आहेत. वेगळी राष्ट्रे असली तरी हे समाज स्वतःला एका राष्ट्रातीत अशा समुदायाचा भाग मानतात- वस्तुस्थिती यापेक्षा खूप वेगळी असली तरीही! समान धर्मश्रद्धा हा इतर राष्ट्राच्या तुलनेत या राष्ट्रासाठीचा एक सामायिक ओळखीचा प्रयत्न आहे.
आधीच्या परिच्छेदात वर्णिलेली विविधता आणि हा समान अस्मितेचा प्रयत्न हे दोन्हीही तितकेच शक्तिमान प्रवाह आहेत. या सर्व मुस्लिमबहुल प्रांतातली विविधता ही स्थानिक घटकांशी संबधित आहे तर हा समान अस्मितेचा मुद्दा या देशांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीत आहे. ६ व्या शतकापासून ते १६व्या शतकापर्यंत विस्तीर्ण भूभागावर पसरलेल्या प्रचंड साम्राज्याचा हे प्रांत/ देश भाग होते. गेल्या दोन शतकांमध्ये यातील बरेचसे देश हे युरोपिअन वसाहतवादाचे बळी ठरले, त्यांची अस्मिता, सार्वभौमत्व, सत्ता आणि ओळख दडपली गेलि. हा अर्वाचीन इतिहास या देशांसाठी , समाजासाठी फार क्लेशकारक आहे.भूतकाळातील दैदिप्यमान प्रतिमेशी त्यांची मानसिकता करकचून बांधली गेलेली आहे आणि सद्य परिस्थितीचा स्वीकार आणि त्यास सामोरे जाण्याचे मार्गही या प्रतिमेशी निगडीत आहेत. वसाहतवादाचा अनुभव हा आधीच्या आक्रमनांपेक्षा फारच वेगळा होता. आधुनिक तंत्र ज्ञानाच्या बळावर या देशांची विभागणी इंग्रज, फ्रेंच, डचानी आपसात करून घेतली. स्वताची जेते, करते ही प्रतिमा जावून आपण मंडलिक झालो हे शल्य या समाजास खुपत राहिलेच.वसाहतवादाचा अनुभव सर्वच देशांसाठी तसा दाहक आहे . जपानने या अनुभवास दिलेला प्रतिसाद मात्र मुस्लिम जगास नेहमीच मोहिनी घालत आला आहे. १८५३ पर्यंत जपानने आपल्या सर्व सीमा बंद करून अंतर्गत विकासाचे धोरराबवले होते. १८५३ मध्ये अमेरीकन नौदलाने जपानला एकतर आपल्या सीमा व्यापारासाठी खुल्या करा किंवा आक्रमण सहन करण्यासाठी सज्ज राहा असे आव्हान दिले. आपणास फार निवडीस वाव नाही हे लक्षात घेऊन जपानने अमेरिकीचीदंडेलशाही त्या घडीस मान्य केली. परंतु त्यानंतर जपानने अमेरिकन नौदलाचा, त्यांच्या सत्तासामार्थ्याचा सूक्ष्म अभ्यास केला. अमेरिकेसारखे सामर्थ्य मिळवण्यासाठी त्यांनी अमेरिकेने अवलंबलेल्या मार्गाचे अनुकरण केले आणि ते फक्त नौदल, सैन्य या बाबतीतच नव्हे तर कायदे, प्रशासन आणि अर्थव्यवस्था सर्व ठिकाणी पाश्चिमात्यांचे अनुकरण करून त्यांच्या तोडीस जागतिक स्थान मिलवले. दमास्कन मुस्लिम राष्ट्रांसाठी, जपान आपली संस्कृती जतन करूनही पाश्चात्यांची बरोबरी अगदी काही दशकात करु शकतो म्हणून आदर्शवत ठरला. १८५३ साली अमेरिकेपुढे नांगी टाकणारा जपान हा १८९४ मध्ये ब्रिटिशाबरोबर मिळून चीनवर आक्रमण करतो आणि पुढे स्वबळावर साम्राज्याचा विस्तार करून वसाहतवादी देशांच्या कंपूत सामील होतो. १९०४-०५ साली केलेल्या रशियन आक्रमणात रशियाला धूळ चारतो - या घटनांचा मुस्लिम शास्ते व विचारवंत यांच्यावर जबरदस्त परिणाम झाला. जपानचे आंतरराष्ट्रीय वर्चस्व आणि त्याचबरोबर अंतर्गत पातळीवर परंपरा व संस्कृतीचे संवर्धन हे या मुस्लिम राजवटींचा आदर्श ठरला.
आजही साऱ्या आशियायी देशात सामर्थ्य आणि परंपरा यांची सांगड घालण्याचा प्रयत्न दिस्तोच. अहमद शुगारि हा सौदी अरेबियातील एक धर्मोपदेशक २००९ साली रमझानच्या संदेशात जपानी लोकांचे दाखले देऊन हाच प्रश्न मुस्लिम जगताला विचारत आहे- ज्या प्रकारे जपानी लोकांनी आपली संस्कृती, धर्म, परंपरा राखून आज इतकी प्रगती केली आहे तर आपण (मुस्लिम) असे का करू शकत नाही? आणि हाच प्रश्न मलाही पडतो की या समाजात असे काही घटक आहेत का ज्यामुळे हे धर्म, परंपरा आणि आधुनिकतेची सांगड बसतच नाही!

पण आधुनिकता म्हणजे नक्की काय?
पण आधुनिकता म्हणजे नक्की काय? सामाजिक आणि राजकीय शास्त्रात आधुनिकता ( modernity ) म्हणजे मध्ययुगीन कालखंडातून सरंजामी व्यवस्था नाकारून भांडवली, वस्तुनिष्ठ, धर्मनिरपेक्ष अशा राष्ट्र-राज्याची संकल्पना. बहुतांशी अरब राष्ट्रे या आधुनिकतेच्या अनुभवास त्याबरोबर येणाऱ्या स्वातंत्र्य आणि समूहाच्या सीमा ओलांडून व्यापक जगाशी सामाजिक संबंध प्रस्थापित करण्याच्या आव्हानात तोकडी पडताना दिसतात. आधुनिकतेचा हा प्रवास तसा अवघडच आहे कारण या प्रक्रीयेमेध्ये बरीच उलथापालथ होते. उत्पादकतेची पारंपारिक साधने जाउन औद्योगिकरण, शास्त्र आणि तंत्रज्ञानावर आधारित नवीन शोध, प्रशासनात आमुलाग्र बदल आणि याअनुषगाणे जीवनाच्या इतर क्षेत्रात येणारे सांस्कृतिक बदल यामुळे सम्जाअत असणाऱ्या प्रस्थापित समज, रूढी, सत्ताकेंद्रे आणि यावर अंकुश ठेवणाऱ्या व्यक्ती या सर्वांतच उलथापालथ होते. अस्तित्वात असणारी घडी आणि त्याबरोबर येणारी सुरक्षितता यांनाच तडा जातो. साहजिकपणे या सर्व बदलांच्या केंद्रस्थानी असणाऱ्या राज्यशक्तीविरुद्ध असूया व असंतोष निर्माण होतो. परंतु आधुनिकतेमुळेच पूर्वीची संथ जीवनशैली बदलून गतिमान बदल दैनंदिन जीवनात होत असतो. प्रस्थापित घडी चिरडून नवोन्मेशि असा हा बदल लोकांना हवा असतो. आपल्याकडे रेल्वे आल्यानंतरचा बदल किंवा तीन दशकांपूर्वी ठाणे बेलापूर पट्ट्यात शहर वसवण्याचा निर्णय घेतल्यानंतर ज्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी झाल्या त्यामध्ये हा आधिनिकतेचा प्रवास स्पष्ट दिसून येतो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हा बदल बहुतांशी राष्ट्रात आणि समाजात झालेला आणि लोकांना भावलेला दिसतो. भांडवलशाही ज्यावर आधारित आहे ते पैसा आणि नफा हे दोन घटक आधुनिकतेच्या मुलाशी अस्तात. या दोन घटकांना, जडवादी विचारसरणीला मात्र फार सहजरीत्या मान्य केले जाताना दिसत नाही, किंबुहना त्यांचा अस्वीकार व त्याविरुध्द संतापाची भावना या समाजांमध्ये दिसून येते. जर्मन तत्ववेत्ता गटेच्या फ्वाईस्ट मध्ये हा विरोधाभास स्पष्ट दिसून येतो. फ्वाइस्ट हे आधुनिकतेच्या प्रक्रियेचा भाग आहे परंतु त्याला आधीची परंपरागत सुस्त अशी समाजरचना बांधून ठेवते आहे. एका प्रकारे फ्वाइस्ट हा तिसऱ्या अप्रगत जगातील त्या वेळच्या बुद्धिवादी व्यक्तीचे प्रतीकच आहे. अप्रगत जर्मनीने इंग्लंड आणि फ्रान्सचा आदर्श ठेऊन आपली प्रगती केली - फ्वाइस्टला या प्रगतीचे त्याबरोबर येणाऱ्या बदलांचे आश्चर्यमिश्रीत कौतुक आहे, त्याला आपल्या संसकृती आणि परंपरांचा अभिमान आहे , पण त्याचबरोबर स्वतःच्या मागासलेपणाची लाज वाटते. मुस्लिम जगतात आधिनिकतेचा प्रवेश हा मुख्यतः वसाहतवादी राष्ट्रांच्या माध्यमातून झाला. हा बाल झपाट्याने आला असला तरी तिथल्या स्थानिक लोकांसाठी त्याचा स्विकार मानसिकदृष्ट्या बराच अवघड होता. उदा. सुएझ कालवा बांधताना इजिप्तमध्ये आलेले भांडवल, तंत्रज्ञान, इमारती, प्रशासन हे तिथल्या स्थानिक जीवनशैलीपेक्षा फारच वेगळे होते. फ्रेंच जेव्हा ट्युनिशियामध्ये गेले तेव्हा तिथेही हीच प्रक्रिया दिसून आली. या प्रक्रियेत अनेक नव्या संधी उपलब्ध होतात परंतु त्याची जबर किंमत हि स्थानिक जनतेस द्यावी लाग्ते. बाहेरून येणारे लोक नुसते वेगळे दिसताच नाहीत तर त्यांचे आचारविचार ही वेगळे. या प्रक्रियेशी जे जुळवून घेऊ शकत नाहीत किंवा ज्यांना विविध कारणांमुळे यात स्थान नाही त्यांची मात्र गोची होते. भूतकाळातील आपल्या स्थानाबद्दल,राजकारण, अर्थकारानातल्या भूमिकांबद्दल कमालीचे ममत्व याच प्रकियेतुन निर्माण होते.प्रचलित व्यवस्थेत एक प्रकारची निश्चितता असते, समाजास संभाव्य घडामोडींबद्दल ठाम खात्री असते. परंतु आधुनिकतेची प्रक्रियेत मात्र अनेक अनिश्चित आणि असंभाव्य अशा क्रिया या संथ समाजात प्रवेश करतात. मानसिकदृष्ट्या समाजासाठी हे एक मोठे आव्हानच असते. Fyodor Dostoyevsky या रशियन लेखकाने लिहिलेल्या Brothers Karamazov.या कादंबरीत grand inquisitor म्हणून एक दृष्टांत आहे -समाजात अपधर्म अगदी विकोपाला गेलेला असतो तेव्हा ख्रिस्त पुन्हा परतून येतो, लोकांमध्ये मिसळतो, लोक पुन्हा त्याचा आदर करतात, श्रद्धा ठेवतात. तिथल्या चर्चला याची बातमी कळल्यावर चर्चचे अधिकारी येतात आणि ख्रिस्ताला अटका करून दुसऱ्या दिवशी सकाळी शिरच्छेद करायचा आदेश देतात. त्या रात्री तुरुंगाधिकारी येउन ख्रिस्ताला सांगतो की त्याला, न्यायालयाला आणि चर्चला हे माहित आहे कि तू खरा ख्रिस्त आहेस. तुला अटक काही अनवधानाने केलेली नाही. परंतु तुझ्या पुनरागमनाने चर्चचे उद्दिष्ट आणि भवितव्य धोक्यात आलेले आहे. येथे हा अधिकारी पुढे ख्रीस्तास म्हणतो -मनुजास शांती आणि स्वातंत्र्याची ओढ असते, मृत्यू आणि स्वातंत्र्य यात तो स्वातंत्र्याची निवड करेल. स्वातंत्र्य - बरोबर आणि वाईट जाणण्याचे स्वातंत्र्य, सद्सद्विवेक्बुद्धी नुसार जगण्याचे स्वातंत्र्य -- परंतु हेच स्वातंत्र्य मनुजास अपार दुखही देते.
And he describes the mission of the church in the following terms,and it's exactly this problem of freedom So it's: "Man prefers peace and even death,to freedom,to freedom of choice in the knowledge of good and evil.Nothing is more seductive for man than this.His freedom of conscience, but nothing is a greater cause of suffering."
अनिश्चितता मग ती दैनदिन जीवनातील किंवा आध्यात्मिक पातळीवरची असो समाजमानसात त्याचे पडसाद तीव्र असतात, त्याविरुद्ध येणाऱ्या प्रतिक्रिया तीक्ष्ण असतात, आणि हे फक्त मुस्लिम राष्ट्रेच नाही तर सगळीकडे आढळणारे सत्य आहे. एरिक फ्रॉम आणि डुरखाइम यांच्या लेखनातून या संकल्पनांचा वेध घेतलेला आहे. फ्रॉम त्याच्या Fear ऑफ Freedom या पुस्तकात फ्रॉम म्हणतो कि स्वातंत्र्य एक प्रकारे नकारात्मक असते- जाचक परंपरा, रूढी, शासन यांना नाकारून त्यातून येणारे स्वातंत्र्य ! परंतु या स्वतंत्रतेबरोबरच एक प्रकारचा अभाव, रिक्तताहि येते. डुरखायीमने याचे वर्णन Anomie असे केले आहे. या अवस्थेत व्यक्ती व समूहाला मार्गदर्शन करणारे सर्व ढाचे कोसळलेले असतात, समाजमानस आणि समाजव्यवस्थापन यांना बांधणारी यंत्रणा कोसळलेली असते. भूतकाळातील निश्चितता जाउन एक प्रकारची संदिग्धता येते. फ्रोमच्या मते या स्थितीला जर बदलायचे असेल तर नकारात्मक स्वातंत्र्याऐवजी सकारात्मक स्वातंत्र्य आवश्यक आहे. सकारात्मक स्वातंत्र्यात व्यक्ती रचनात्मक कामात सहभागी होते, इतरांबरोबर अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करते. ही सकारात्मक स्वातंत्र्याची ओढ ज्या समाजात तीव्र बदल होतात तिथे अधिक जोमाने असते याचे कारण म्हणजे येणाऱ्या बदलांना स्वीकारत पण लवकरात लवकर आधीच्या निश्चिततेच्या स्थितीत जाण्याची एक निकड या समाजात असते. परंतु या निकडीपायीच हे समाज एकाधिकारशाहीस अंगिकारताना दिसतात. एकाधिकारशाही किंवा हुकुमशाहीत लोकांना काय विचार करावा, कसे वागावे याबद्दल ठोस मार्गदर्शन मिळते. जुन्या समाजव्यवस्थेत असणारी निश्चितता, अधिकारीव्यवस्था आणि जगण्यावाग्ण्याच्या निश्चित पद्धती हुकुमशाहीच्या माध्यमातून निर्माण होतानाचा एक आभास समाजास मिळतो. हा निश्चीततेचा आभास,सामाजिक आणि राजकीय पातळीवरची निष्क्रिय पण दृढ अशी प्रतिमा अशा हुकुमशाही किंवा अरब देशात असणाऱ्या social contract पद्धती वर्षनुवर्षे चालू राहण्यामागचे महत्वाचे कारण आहे.
जर आधुनिकतेमुळे इतके प्रश्न निर्माण होणार असतील तर मग ही आधुनिकता हवीच कशाला ?
आधुनिकतेच्या प्रक्रियेआधी अस्तित्वात असणारी स्थायी स्वरूपाची संरचना जशी होती तशीच का जोपासू नये? बाहेरच्या जगातील घडामोडींपासून सुरक्षित अशी घडी समूहाला किंवा राष्ट्राला लावणे अशक्य आहे का? काही शतकांपूर्वी जपानने हाच विचार करून आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या व अतर्गत विकासावर, संस्कृती जोपासन्यावर भर दिला कारण तिथल्या सत्ताधार्यांना माहित होते हि एकदा परकीयांबरोबर उठबस सुरु झाली कि त्यांच्याबरोबर जपान्यांनाही बदलावे लागेल. वेगवेगळ्या समूहांबरोबर येणाऱ्या संबधात हा स्पर्धात्मक घटक आढळतोच. केनिथ वाल्ट्झ यांनी त्यांच्या Theory ऑफ International Politics या पुस्तकामध्ये आंतराष्ट्रीय व्यवस्थेमुळे होणारे सामाजीकरण यावर सखोल विश्लेषण केले आहे. वाल्ट्झ यांच्या मते कुठलाही घटक मग तो राज्य,आर्थिक कंपनी, विद्यापीठातले विद्यार्थी असोत स्पर्धात्मक वातावरणाचा या सर्वांवर परिणाम होतोच. त्यांची इच्छा नसली तरीही नवीन रचनेत त्यांना सक्रिय सहभागी व्हावेच लागते. अन्यथा या प्रक्रियेत असणार्या इतर घटक नवीन रचनेतील बदल आपल्याला अनुकूल असे वळवून घेतात आणि जे या प्रक्रियेत उदासीन राहतात त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. या स्पर्धात्मक वातावरणाचा परिणाम म्हणजे कालांतराने या नवरचना वेगवेगळ्या समाजात सारख्याच रुजताना दिस्तात. या नवरचना अर्थ- उत्पादन व्यवस्था राज्य-प्रशासनव्यवस्था, लष्कर अशा सर्वव्यापी असतात. उदा. राजेशाही व्यवस्था, सरंजामशाही किंवा सध्या अस्तित्वात असलेली वेस्ट मिनिस्टर प्रारुपातली लोकशाही या रचना जगभरच्या ज्ञात जगात त्या त्या वेळी रुजल्या- थोडेबहुत स्थानीय विभिन्नता असेल परंतु संरचना म्हणून एखादी संकल्पना सगळीकडे रुजू होत असताना स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहणे आणि पुढे जाणे या दोन प्रखर उर्मी त्यात आढाळतात. अर्थातच अशा एकजिनसी संरचनेला विसाव्या शतकात तात्त्विक आणि इतर पातळीवर खूप विरोध झाला आहे. जगभरात अनेक चळवळी पुढे आल्या आहेत. विकल्पात्मक राजनीती, कलाकृती इत्यादीतून या स्पर्धात्मक सरनचनेवर टीका व पर्यायाने आधुनिकतेचा नकार होताना दिसतो. हा खरेतर फार खोलात जाण्याचा, वेगवेगळे मतप्रवाह असलेला विषय मी अगदी थोडक्यात फक्त प्रक्रिया समजून घेण्यापुरताच इथे मांडला आहे, हे वाचकांनी लक्षात घ्यावे.

काय घडतंय मुस्लिम देशांत? प्रस्तावनेचा समारोप

सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. उत्तर इतके मोठे झाले की नवीन पोस्टच लिहिली गेली.
मी प्रयत्न जरूर करेन इथे येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा - पण सगळ्यांचीच उत्तरे नाहीत माझ्याकडे, वाचन आहे आणि काही विचार आहेत. इथल्या प्रतिक्रियाव्यतिरिक्त मला बऱ्याच जणांनी संपर्क करून काही सूचना, प्रश्न आणि अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. स्वतःबद्दल व त्यांच्या मतांबद्दल अगदी प्रांजळपणे लिहिले आहे. मी सर्वांची आभारी आहे कारण यामुळे लिहिण्याचा हुरूप वाढला पण त्याचबरोबर माझ्या मनातल्या काही शंका दूर झाल्या.
एक कबुली आधीच द्यावी असे वाटते. बाकी लिखाणापेक्षा हे लिखाण थोडे गंभीर आहे कारण विषय तसा आहे. या विषयावर खूप सरळसोट, बेछूट असं ऐकण्याची, वाचण्याची तशी सवय आपल्याला आहे. प्रयत्न करूनही मला साधं या विषयावर लिहिता येत नाही. मला स्वतःला लिहिलेलं क्लिष्ट वाटतंय. त्यामुळे इथे आलेल्या प्रतिसादांबरोबर मी सहमत आहे. पण साध्या, सोप्या, रंजक शैलीत सगळंच बसणार नाही त्यामुळे काही गोष्टी रटाळ वाटतील कदाचित. बराच भाग इतिहास आणि या प्रदेशातल्या राजकारणावर आहे. दोन्ही विषयांवर एकमत असणे अशक्यप्राय . घडलेल्या घटनांचे अगदी सतराशे साठ अनुवाद होऊ शकतात. लोकांच्या विचारप्रणाली, अनुभव, माहिती, कुठून माहिती मिळाली त्याचा स्त्रोत या सगळ्या घटकांनुसार घटना, व्यक्ती आणि त्याचे संदर्भ वेगळे असणार. लोकांनी ते जरूर मांडावेत. पण, 'मी असे ऐकले होते, वाचले होते आणि तू असे म्हणत आहेस तर अमक्या तमक्याचा खुलासा आता कर'च' - नाही तर तुझे म्हणणे चुकीचे असा, ' बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल', हा अटीतटीचा सामना रंगवूयात नको!
प्रस्तावनेत म्हणल्याप्रमाणे अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्राच्या संकल्पना, सिद्धांत यांचा आधार घेऊन विवेचन केले आहे. मराठीत यातल्या संज्ञा किचकट वाटतात आणि त्याला काही पर्याय नाही. त्यामुळे फार जांभया आल्या तर एक कॉफी, चहा आपापल्या आवडीप्रमाणे करून घ्या अशी नम्र विनंती.
शुद्धलेखनाच्या चुका राहून जातात. पण या मुख्यतः मराठीत संगणकावर टंकलेखनाचा तितका सराव नाही, त्यामुळे आहेत. अन्यथा मास्तरणीच्या मुलीकडून असा प्रमाद घडणार नाही. गालावर उठलेल्या बोटांची आणि त्याबरोबर मनात उठलेल्या जळजळीत तरंगांची आठवण आयुष्यभर ताजी राहील इतका सराव बाईंनी करून घेतला आहे. एकून 'शिक्षिका' नाव सार्थ आहे या जमातीसाठी -- असले आततायी अनुभव देणाऱ्या बायांना आणखी काय म्हणणार?
थोड्या छुप्या आणि काहीजनांनी उघडपणे व्यक्त केल्याप्रमाणे माझ्या नावावरून काही ग्रह लोकांनी बांधलेले दिसतात म्हणून हा एक खुलासा. माझ्या नावावरून माझी 'सामाजिक - धार्मिक' ओळख मुस्लिम वाटते आणि ते खरे आहे. पण त्यामुळे या समाजात जे काही दिसते, चालते चांगले किंवा वाईट , त्या सगळ्याचे मी प्रतिनिधित्व करत नाही. कदाचित काही गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे थोडं वेगळं ज्ञान असू शकेल, पण ते परिपूर्ण आहे असा माझा दावा नाही. माझा जन्म मुस्लिम कुटुंबातला आणि माझ्या आईकडून माझे धार्मिक शिक्षण झालेले आहे जरूर, पण मला धर्मातील सगळ्या गोष्टींचे आकलन झाले आहे असे मी मुळीच म्हणणार नाही. जिथे आपण जन्मलो, जे संस्कार आपल्यावर झाले आणि आपल्याला अतिशय जवळच्या, वंदनीय लोकांनी सांगितले, शिकवले तेच अंतिम सत्य हे मला पटत नाही. या अर्थाने मुस्लिम ही माझी ' सामाजिक - धार्मिक' ओळख असे मी म्हणते. मुळातच धार्मिक शिक्षण हे फार व्यक्तीवादी असे माझे मत आहे. आपल्याला ज्या कोणाकडून हे शिक्षण मिळते त्या व्यक्तीच्या स्वतःच्या आकलनानुसार, अभ्यासानुसार, अनुभवानुसार तो/ ती आपल्या चेल्यांना घडवत असतो/ते. हेच कारण आहे अगदी लिखित परंपरा असणाऱ्या एकग्रंथी इस्लाम, ख्रिश्चन अशा धर्मांमध्येही अनेक पंथ, अनेक प्रवाद अगदी प्रेषित काळापासून दिसून येतात. धर्मसंस्थापक आणि नंतर प्रसारक जे सांगतात, आपला अध्यात्मिक अनुभव, समज आणि शिकवण ते समजण्याची कुवतही प्रत्येकाची वेगवेगळी असते. उदा द्यायचे झाले तर उद्या परग्रहावर सृष्टी आढळली तर तिथे जी व्यक्ती पहिल्यांदा जाईल ती व्यक्ती पृथ्वीची प्रतिनिधीच. ती पृथ्वीचे वर्णन ज्या प्रकारे करेल त्यावर तिथल्या प्राण्याची ( मनुष्यच असेल कशावरून? ) पृथ्वीची समज बनेल. आता जाणारी व्यक्ती नारळीकरंसारखी शास्त्रज्ञ असेल तर तिचे समजावणे आणि समोरच्या प्राण्याची पृथ्वीची समज वेगळी असेल. पण जर दुसरी व्यक्ती उदा जावेद अख्तर सारखा कवी वगैरे असला तर पृथ्वीचे रसभरीत वर्णन करेल आणि पुढे सोचा है क्या कभी? असे फरहानच्या आवाजातील गाणेही ऐकवेल. स्मित यावरून त्या प्राण्याची समस्त पृथ्वीतलाची व तिथल्या मनुष्य समाजाची धारणा बनेल. अशा समजावण्यात त्या व्यक्तीने बऱ्याच गोष्टी गृहीत धरलेल्या असतात - समोरच्याची भाषा, आकलनशक्ती, समज ई ई कुठलाही अध्यात्मिक किंवा धार्मिक अनुभव व शिक्षण थोडे याच मार्गाने जाते असे मला वाटते. एका अर्थाने माझ्या मां कडून माझे शिक्षण झाले ते चांगलेच. कारण कुठल्याही एका चौकटीत बसणारी ती नाहीच आणि ती जरी काही गोष्टी निग्रहाने पाळत असली तरी तिने आमच्यावर कुठल्या गोष्टीची सक्ती केली नाही. आज ही सगळे धार्मिक विधी ती करते, आम्ही पाळावेत अशी तिची अपेक्षा बोलून दाखवते आणि जेव्हा करायचे तेव्हा एक पालक म्हणून सगळे संस्कार तिने केले. पण खोट्या अभिनिवेशाने येणारा दुराग्रह कधी त्या शिक्षणात नव्हता. सर्व धर्मांचा आदर आणि त्याबद्दल वाचन, विचार चिंतनास माझ्या मां बाबांनी प्रोत्साहनच दिले. कुठल्याही एका पठडीत न बसता वाढण्याचे जसे फायदे असतात तसे काही दुष्परिणाम ही असतात. त्यातून आम्ही अगदी सही सलामत गेलो कारण धर्म, पेशा यातून व्यक्त होणारी दोघांची परोपकारी आणि कर्तव्यनिष्ठ वृत्ती आणि वागणूक आणि त्या आधारावर असणारी सर्व धर्म समुदायातली त्यांची आणि आमची उठबस. यानंतर मुस्लिम म्हणून येणारे काही नेहमीचे अनुभव होतेच - विखारी जातीयवादाचे दाहक चटके ही होते. पण एकुणातच माणुसकीने वागणाऱ्या आणि विश्वासाने हात पुढे करणाऱ्या लोकांची संख्या नेहमीच अधिक होती. वाईट अनुभवांचे वैषम्य उगाळण्यापेक्षा सकारात्मक अनुभव वाढवणे मला जास्त संयुक्तिक वाटते. या अनुभवांवर कधी तरी लिहीन. आपल्यापैकी काहींनी व्यक्तिगत विचारणा केली त्याच्या उत्तरादाखल ही माहिती.
भारतातील मुस्लिम आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या विषयांवर विविध अंगाने लिखाण झालेले आहे. जगातील तिसऱ्या नंबरची मुस्लिम लोकसंख्या असलेला भारत स्वप्नवत अशा नाही तरीही बऱ्याच एकोप्याने अजून तरी एकत्र आहे. फाळणीचा दाह सोसलेली आणि पाकिस्तानच्या द्विराष्ट्रिक सिद्धांतास पुरून उरलेली नवीन मुस्लिम पिढी समाज व राजकारणात भारतीय संविधानाच्या आधारावर घट्ट पाय रोवून उभी आहे. मुंबई, गुजरात, मुझप्फ़रपूर हे घडत असतानाही या देशाच्या विकासाचा आणि भवितव्याचा आपण भाग आहोत हे येथील बहुसंख्याक मुस्लिम जाणतात आणि त्याप्रमाणे आपापल्या परीने प्रयत्नरत असतात. प्रत्येक धर्म व समुदायाचे आपआपले प्रश्न आहेत, समस्या आहेत. परंतु मुस्लिमप्रश्नाला एक आंतरराष्ट्रीय परिमाणही आहे आणि कळतनकळत इथल्या मुस्लिम आणि आम जनमानसावर त्याचा प्रभाव आणि परिणामही आहे. धार्मिक हिंसाचार आणि उन्मादाने हा प्रश्न सुटणारा नाही. त्यातून अधिक जटील समस्या पुढे येणार आणि त्याचा राष्ट्राच्या सर्वच अंगांवर भीषण परिणाम होणार, त्यामुळे काही लोकांना वाटले तरी हा समस्येचा उपाय होऊच शकत नाही. येणाऱ्या काळात देश आणि समाजासमोर असलेली आव्हाने पेलताना त्यांची शास्त्रीय उकल व्हावी, घेतले जाणारे निर्णय हे माहिती व अवलोकनाच्या आधारे घेतले जावेत आणि त्यातूनच भारताची पंचशीलावर आधारित पुरोगामी वाटचाल चालू राहावी अशी कळकळही यांमागे आहे. कुठल्याही समाजात धर्मांधता वाढली की स्त्रिया आणि मुली यांच्या हक्कांचे आणि स्पेसचे नियंत्रण, दमन होतेच. सर्वच धर्मसंस्था आणि त्यावर आधारित रूढी पुरुषप्रधान आहेत. मुस्लिम महिला जीवनाच्या साऱ्या क्षेत्रात अग्रेसर दिसतात परंतु त्यांची एकूण संख्या फार कमी आहे.साक्षरता, अर्थव्यवस्थेत सक्रिय सहभाग, राजकीय सहभाग यांचे प्रमाण त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत कमीच आहे. तीव्र गतीने होणाऱ्या अंतर्गत बदलांमुळे या समाजातील महिलांचे स्थान हे गेल्या अर्ध शतकातील कामाची अगदी वाट लावणारे आहेत. हा माझा जिव्हाळ्याचा विषय आणि म्हणूनच या लिखाणाचे वैयक्तिक पातळीवर परिणाम होणार हे जाणूनही स्पष्टपणे लिहिण्याचा हा खटाटोप !

Thursday, 3 April 2014

काय घडतंय मुस्लिम जगात? लेखमाला -१ प्रस्तावना

 प्रस्तावना

मुस्लिम म्हणले की डोळ्यासमोर कडवे धर्माभिमानी, अतिरेकी, सामाजिकदृष्ट्या मागास, बुरखेवाल्या स्त्रिया, दहशतवादी कृत्ये अशी एक सर्वसामान्य प्रतिमा येतेच. काही वर्षाआधी या वाक्याने कोणी लेखाची सुरुवात केली आहे असे दिसताच माझी पहिली प्रतिक्रिया असायची की हे मुद्दाम मुस्लिम समाजाला एका विशिष्ट दृष्टीकोनातून रंगवण्याचे कारस्थान आहे. लगेचच या विरोधातले दाखले देणे सुरु झाले असते - तो अब्दुल हमीद नाही का देशासाठी शहीद झाला? अब्दुल कलाम नाही का एवढे मोठे शास्त्रज्ञ ? आमच्या ओळखीचे कित्येक मुस्लिम आहेत जे या पठडीत बसत नाहीत ई. ई. आणि हे खरेही आहे. असे अपवाद आहेत. एका समाजाची एकसंघ अशी प्रतिमा रंगवता येत नाही आणि भारतीय संदर्भात तर जाती, प्रदेश, भाषा अशा विविध घटकानुसार सगळेच समाज विभागलेले दिसतात. परंतु राष्ट्रिय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ही प्रतिमा किंवा मुस्लिम समाज म्हणजे पाश्चिमात्य देशांच्या कुटील कारस्थानाचा बळी आणि तिथे जे काही घडते आहे ते या षड्यंतरला त्या लोकांची उस्फुर्त प्रतिक्रिया असे साधारण दोन मतप्रवाह दिसून येतात. मध्य पूर्वेतल्या देशांमध्ये ज्या काही घडामोडी चालू आहेत, Arab Spring म्हणून ज्याचे वर्णन केले जात आहे, त्याकडे बरेच जण आशावादी दृष्टीकोनातून पाहत आहेत. तेलाच्या जोरावर प्रबळ झालेली राष्ट्रे, त्यांच्यातील अंतर्गत राजकारण, शिया- सुन्नी वाद, इराणचे अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला आवाहन, बऱ्याच देशातील राजेशाही किंवा एकाधिकारशाही या सगळ्या गदारोळात नक्की काय घडते आहे, का घडते आहे याचे विवेचन मात्र होताना दिसत नाही. या सर्व घडामोडींमध्ये काही समान धागे आहेत का? इस्लामचा आणि या सर्व अराजकतेचा काही संबंध आहे का? पाश्चिमात्य देशांची संस्कृती, विकासाची धोरणे आणि नमुने याच्या विरोधात मुस्लिम शासनव्यवस्था, अर्थव्यवस्था अशी नवीन मांडणी प्रकर्षाने पुढे येत आहे.- याची नक्की दिशा काय राहणार? फक्त धर्म हाच आधार असलेल्या राष्ट्रामध्ये तो धर्म न स्विकारनारयांची काय स्थिती असणार? येणाऱ्या जागतिक व्यवस्थेत धर्मधिष्ठित राष्ट्रे आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रे यामधील संबंध कसे असतील? आणि जरी धर्म एकच असला तरी वेगवेगळ्या ऐतिहासिक, वांशिक, भाषिक आणि सांस्कृतिक समूहांना तो कितपत एकत्र बांधू शकतो? असे अनेक प्रश्न यातून पुढे येतात. गेली दोन वर्षे इजिप्त,लिबिया, सिरीया, बहारीन येथील हिंसेच्या बातम्या तर गेली दोन दशकांच्या वर चाललेला इराक, अफगाणिस्तान इथला विध्वंस हा त्या त्या देशांपुरता सीमित राहणार नाहीये. आज या घटनांचे तीव्र प्रतिसाद मुस्लिम जगतात आणि बाहेर दिसत आहेत. इंग्लंडमध्ये दीड वर्षाआधी झालेला ली रग्बी या सैनिकाचा दिवसाढवळ्या झालेला खून आणि त्याचे समर्थन, या देशांमध्ये मुस्लिम इतर धार्मिक गटांमध्ये सुरु असलेली अस्मितेच्या राजकारणाची चढाओढ, यातून पसरणारी हिंसा आणि त्याप्रक्रियेत वाढणारे घेटोज सर्वच अंगावर काटा आणणारे आहे. गेल्या दोन दशकात भारतीय मुस्लिम समाजात होणारे बदल हे फक्त हिंदू धर्मांध शक्तींना प्रतिसाद म्हणून आलेले आहेत ही मांडणी पुरेशी नाही. हिंदू धर्मांध राजकारण या प्रवृत्तींना बढावा देत आहे पण त्यापलीकडे जाउन आणखी काही गोष्टींची मांडणी करणे आवश्यक आहे म्हणून हा प्रपंच.
मी काही धार्मिक पंडित नाही आणि राजकारण, समाजकारण यात अनेक मान्यवर संशोधक महाराष्ट्रात आहेत. समोर दिसणाऱ्या प्रश्नांची उकल काही शास्त्रीय आधारावर, अभ्यास विवेचनावर व्हावी आणि त्यातून मानवी समाजाची प्रगती व्हावी एवढी माफक अपेक्षा ठेवणारी समाजशास्त्राची एक सामान्य विद्यार्थिनी आहे. शिक्षण, आरोग्य, आणि सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हा सर्वांचा मुलभूत अधिकार आहे आणि आधुनिक शासनव्यवस्थेत हे अधिकार सर्वांपर्यंत घेऊन जाण्याची कुवत हे आहे हे जाणून अशी यंत्रणा अस्तित्वात असावी म्हणून प्रयत्नरत असणाऱ्या अनेक नागरिकासारखी मीही माझ्या परीने क्रियाशील आहे. रोज टीवी वरच्या बातम्या बघून हळहळणाऱ्या आणि विषन्न होणाऱ्या, परिस्थितीचे आपापल्या परीने अवलोकन करून हे प्रश्न समजून घेणाऱ्यांपैकी मी आहे. या लिखाणातून परस्पर संवाद वाढीस लागेल,निकोप चर्चा व काम वाढीस लागेल अशी आशा जरूर आहे. काहीजणांच्या प्रस्थापित ठोकताळयांना यातून जरूर ठेच लागेल आणि माझा उद्देश नसला तरी काहीजण दुखावले जातील, त्यातून आत्मचिकित्सा व्हावी, वाद्विवादही व्हावेत, कदाचित माझाच दृष्टीकोन परिपूर्ण हे गृहीतक तरी काही अंशी बदलेल, असे वाटते.
हे मराठीतून का तर महाराष्ट्राची प्रबोधनाची परंपरा आहे ज्याचा माझ्या जीवनावर सकारात्मक परिणाम आहे. आज मी जी काही आहे ती बऱ्याच सामाजिक, राजकीय - ज्ञात -अज्ञात लोकांच्या परिश्रमाचे फळ आहे. वैचारिक, राजकीय आर्थिक सुधारणांमुळे मी माझ्या आयुष्याला देऊ शकले, या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकते, ज्या गोष्टी पटत नाहीत त्या निर्भीडपणे मांडू शकते, माझ्यामते ही मोठी देणगी मला अनेक लोकांच्या कामामुळेच मिळाली. या लोकांच्या ऋणातून मुक्तता नाही पण येणाऱ्या पिढ्यांना मला जे फायदे मिळाले ते तरी मिळावेत अशी प्रामाणिक इच्छा आहे. नवीन विचार समजून, त्यावर क्रियाशील व्यवस्था येथे निर्माण होऊ शकते हा माझा अनुभवसिद्ध विश्वास आहे - बऱ्याच गोष्टी उदा दाभोलकरांचा खून आणि वाढणारा धार्मिक उन्माद अशा प्रतिकूल घटनांमध्येही माझा हा विश्वास टिकून आहे कारण बुद्धीनिष्ठ, तर्काधिष्ठित परंपरांची पाळेमुळे इथे खोलवर रुजली आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून प्रत्येक पिढीत कार्यकर्ते, विचारवंत उभे राहताना दिसतात, प्रचलित व्यवस्थेशी टक्कर देताना दिसतात. ही विजीगिषु वृत्तीच येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असे विचार व व्यवस्था निर्माण करेल यात शंका नाही.
जगभर पसरलेल्या मुस्लिम समाजाची आणि प्रामुख्याने मुस्लिम देशांमध्ये सध्या ज्या राजकीय, वैधानिक आणि सामाजिक घडामोडी चालू आहेत त्यांचा परामर्श या लेखमालेत घ्यायचा प्रयत्न आहे. ही सर्व राष्ट्रे त्यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि भौगोलिक स्थान या महत्वाच्या घटकांमुळे बरयाच अंशी एकमेकापासून वेगळी आहेत. यातील प्रवृत्ती प्रत्येक देशाचा इतिहास आणि वर्तमान हा एक सखोल अभ्यासाचा विषय आहे. या लेखमालेत फक्त काही विशिष्ट घटकांचा वविचार केला आहे. ज्यांना यात अधिक रस आहे त्यांनी त्या त्या देशाचा/ घटकाचा स्वतंत्र अभ्यास करावा. या लेखातील बहुतांशी मजकूर मी कोपेनहेगेन विद्यापीठातून केलेल्या Constitutional Struggles in Muslim World या कोर्सवर आधारित आहे*. हा मजकूर वापरण्यासाठीची संमती मी कोर्सचे संचालक प्रा अफसा यांच्याकडून घेतली आहे भारतीय संदर्भातील प्रश्नान्वरची भूमिका मात्र माझी आहे. या विचारमंथनातून निर्माण होणाऱ्या सर्वच प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत, किंबुहना यातून अधिक प्रश्न समोर येताना आपल्याला दिसतील. या प्रश्नांची उकल करण्याआधी काही मुद्दे थोडे स्पष्ट करते .
तीन महत्वाचे मुद्दे - पहिला हा कि संबंधित अभ्यासात एक विशिष्ट वैधानिक किंवा धार्मिक ग्रंथास प्रमाण मानून त्यानुसार परिस्थितीचे विश्लेषण केले नाही. उदाहरणार्थ कुराण किंवा त्या त्या देशांच्या राज्यघटना यांचा संदर्भ जरूर घेतला आहे. परंतु हा संदर्भ काय घडते आहे ते सांगण्यासाठी आहे- काय घडले पाहिजे याचे विवरण करणारे नाही. बहुतांशी इस्लामिक ग्रंथांचा आधार आदर्श समाज आणि राज्यरचना कशी असावी असा असतो -इथे सध्या काय आहे आणि ते तसे का आहे याची चर्चा केली आहे .
दुसरा मुद्दा हा कि ही सर्व राष्ट्रे सार्वभौम राष्ट्रे आहेत, त्यांच्या स्वताच्या वेगळ्या राज्यप्रणाली आहेत. या राज्यप्रणाली, त्यानुसार असलेल्या शासनसंस्था आणि प्रशासनव्यवस्था कितपत विकसित आहेत यावर या देशांचा विकास अवलंबून आहे. या सर्व देशांमध्ये आधुनिक शासनव्यवस्था निर्मितीमध्ये अनेक त्रुटी दिसून येतात ज्यांचा प्रत्यक्ष संबंध लोकांच्या दैनंदिन जीवनावर पडतो. या त्रुटीमागची कारणमीमांसा थोडक्यात केली आहे
तिसरा मुद्दा या देशांमध्ये सध्या जो असंतोष उफाळून आला आहे, त्यांचे आणि त्यातून पुढे येणारे विकल्प याचे विवेचन. बहुतेक ठिकाणचा असंतोष हा लोकांच्या मुलभूत गरजा शासनाने भागवल्या नाहीत या कारणास्तव आहेत - उदा. मुलभूत सोयी, रोजगार, राजकीय सहभागाचा अभाव ईत्यदि.
एक महत्वाची बाब इथे नमूद कराविशी वाटतो - अभ्यसान्तर्गत असलेली सर्व राष्ट्रे जरी मुस्लिम असली तरी ती एकमेकांपासून खूप वेगळी आहेत. मुस्लिम म्हणले की इस्लामची साचेबंद व्यवस्था असेल आणि ती सर्वत्र सारखीच असेल असा एक गैरसमज प्रचलित आहे. याचे एक कारण म्हणजे मुस्लिम व्यक्ती किंवा समाज हा इस्लामच्या नियमानुसारच चालणार आणि म्हणून त्याचे सर्व व्यवहार धर्माच्या निकषावरच घासून बघितले पाहिजेत. बरेच मुस्लिम आणि पाश्चिमात्य विचारवंत इस्लामच्या दस्तऎवजी स्वरूपात सामाजिक आणि राजकीय परिस्थितीची मांडणी करू पाहतात. इथे मात्र सामाजिक आणि राजकीय शास्त्रांच्या प्रचलित प्रणाली वापरून हा अभ्यास मांडण्याचा प्रयत्न आहे कारण इस्लामचा ग्रंथ जरी एक असला तरी त्याचा अनुवाद व अंमलबजावणी व्यक्ती, काळ, स्थळानुसार बदलतेच. मुल्सिम राष्ट्रांच्या इतिहास व भौगोलिक स्थानानुसार काही गटात हा अभ्यास मांडला आहे. एकूण नऊ विभागात ही मांडणी विभागली आहे. प्रत्येक भागातील लोक, इतिहास, सद्यपरिस्थिति, राजकीय आव्हाने यावर सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न आहे. परंतु यातील प्रत्येक घटकावर एक पुस्तक निघेल इतका हा आवाका मोठा आहे. त्यामुळे पुढील अभ्यासासाठी काही संदर्भग्रंथांचा उल्लेख मध्येच केला आहे. प्रांतवार विभागांची सूची पुढीलप्रमाणे आहे
१. ओटोमान साम्राज्य आणि आजचा तुर्कस्थान
२. इजिप्त आणि मगरीब राष्ट्रे - लिबिया, अल्जिरीया, मोरोक्को, टयूनिशिया, मोरेटानिया
३. सौदी अरेबिया आणि गल्फराष्ट्रे
४इराण आणि शिया
५ पूर्वेकडची राष्ट्रे - सिरीया, जॉर्डन, लेबनॉन आणि इराक
६ अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान
७. मलेशिया आणि इंडोनेशिया
८. सब -सहारन आफ्रीका -
९. सार्वत्रिक आव्हाने आणि पुढील दिशा
लिखाणाच्या ओघात बऱ्याच प्रश्नांवर माहिती मिळू शकेल आणि शक्य तसे काही प्रतिसाद मी देऊ शकेन .परंतु द्वेषमुलक किंवा व्यक्तिगत टीकेकडे मात्र मी पूर्णपणे दुर्लक्ष करेन. आधी उल्लेख केल्याप्रमाणे निकोप चर्चा व्हावी एवढाच हेतू या लिखाणामागे आहे.


उद्धरली कोटी कुळे.....

उद्धरली कोटी कुळे.....


तीन वर्षाआधी लिहिलेला हा लेख आज पुन्हा सापडला . इथे पोस्ट करते आहे 

नेहमीप्रमाणे आज सकाळी मेल बॉक्स उघडला. कोणाचे काय स्टेटस अपडेट्स बघत होते--महेश च्या नावाखाली मराठीत ---उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे!

हं, आज १४ एप्रिल, आंबेडकर जयंती!

आंबेडकर जयंती म्हणल्यावर वेगवेगळे चेहरे समोर आले ---त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव त्यांची आजच्या दिवासाबद्दलची प्रतिक्रिया आणि त्यामागची राजकीय भूमिका अगदी स्पष्ट करतात! भारतात खूप divisive politics आहे हे खरे असले तरी त्याचा एक फायदा नक्कीच आहे ...लोकांच्या भूमिका , त्यांची समाजातली सामाजिक आणि राजकीय जागा त्यांच्या या प्रतिक्रियातून अगदी ताबडतोब काही संशोधन न करता कळून येते!

माझी पहिली जयंतीची आठवण म्हणजे बाबा घरी वेगवेगळ्या मंडळांचे बॅनर्स बनवून द्यायचे. त्यांचे अक्षर फारच सुरेख त्यामुळे कुठलीही जयंती --जिला पाचगणीत मिरवणुका निघायच्या त्यांचे बॅनर्स रात्रभर बसून अगदी तन्मयतेने बाबांनी केलेले असायचे. त्याच्या जोडीला जयंती निमित्ताने शाळेत असणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेसाठी मां ने लिहिलेले भाषण पाठ करण्यात आम्ही मग्न असायचो. वक्तृत्व स्पर्धेच्या भाषणाचा प्रत्येकाचा मजकूर वेगळा असला तरी सुरुवात ,' माझे दोन शब्द शांत चित्ताने ( बऱ्याच वेळा चीत्तेने, चीत्याने ) आणि शेवट ,' अशा महापुरुषास माझे विनम्र अभिवादन ' असा असायचा!जयंतीच्या मागचे राजकारण अगदी शेजारी चालले असले तरी त्याची फार जाणीव तेव्हा नव्हती. एकतर राहायला आम्ही 'आंबेडकर कॉलनी' आणि नंतर सिद्धार्थ नगर ला. त्यामुळे नंतर कॉलेजला आल्यावर जे 'दलित राजकारण ' म्हणून अभ्यासले जायचे ते रोजच्या जगण्याचा भाग असल्यामुळे काही वेगळे जाणवले नव्हते. बाबा आणि मां तसे जुन्या पठडीतले शिक्षक. गावातील सगळ्या समाजातील लोक गरज पडेल तसे घरी यायचे. कोणाला कुठल्या कोर्ससाठी पाठवू, आजारपणात कुठल्या हॉस्पिटलात घेऊन जाऊ, अल्पबचत योजनेत पैसे टाकू का बँकेत ठेऊ अशा सगळ्या गोष्टींवर सल्ला घेण्याचे आमचे घर ,'One Stop Shop' होते. पंधरवड्यात एक -दोन वेळा तरी नवरा दारू पिऊन मारतो आहे म्हणून कोणीतरी दार ठोठवायचे किंवा आईचा पगार झाला नाही म्हणून कोणीतरी आमच्या घरी जेवायला असायचे. पाचगणीत सगळी घरे अगदी जातीच्या आधारावर वेगवेगळ्या विभागात असली तरी तेव्हा आम्हाला काही फरक पडला नव्हता. कदाचित पडत असेल तरी तो त्यावेळच्या दैनंदीन जगण्यात जाणवला नव्हता. पुण्यात शिकत असतांना या गोष्टी जाणवल्या तरी तेव्हा कोर्सवर आणि पुढे काय करायचे यावर जास्त लक्ष केंद्रित असल्यामुळे वाचनापलीकडे फार काही विचार केल्याचे आठवत नाही.

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत आल्यावर मात्र या वेगवेगळ्या अस्मिता आणि अस्मितांचे राजकारण फार जवळून बघायला मिळाले आणि अनुभवायालाही! परंतु तेव्हाही आपली नक्की अस्मिता काय हा प्रश्न नेहमी जाणवायचा! तेव्हापासून आणि आता आता पर्यंत ही या प्रश्नाचे एक ठोस उत्तर माझ्याकडे नाही. पण वेगवेगळ्या गटांच्या झुंबडशाही अस्मितेत आपण बसत नाही हे प्रत्येक वेळी कुठल्यातरी गटाशी बांधिलकी बांधण्याच्या प्रयत्नातून झालेली जाणीव! तिथेही असलेल्या दलित गटाबद्दल नेहमीच्या संमिश्र प्रतिक्रिया होस्टेलच्या कुठल्या गटात तुम्ही बसला आहात यावर अवलंबून असायच्या. पण थोडे थोडे आंबेडकर कळायला लागले ते या गटातल्या काही जणांशी बोलल्यावर , थोडा वाद घातल्यावर! त्यात उमानाथनची सांगण्याची पद्धत मात्र फार वेगळी होती. कुठलाही अभिनिवेश न बाळगता, शांतपणे सगळ्या प्रश्नांची उत्तरे तो मोडक्या इंग्रजीत द्यायचा. त्याचा तो हसतमुख चेहरा आणि शांत आवाज यामुळे दलित प्रश्न आणि दक्षिणेकडचे राजकारण यामध्ये खूप इंटरेस्ट निर्माण झाला हे खरे.

त्याच सुमारास जब्बार पटेलांचे दोन सिनेमा पाहिले, मुक्ता आणि आंबेडकर. दलित समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि आज ज्यांना एक प्रेषितासमान लेखले जाते त्यांचे जीवन किती अवघड होते आणि पन्नास वर्षानंतर कितीही बदल झाले असले तरी ते ज्या मूल्यांसाठी झटले ती लढाई अजूनही किती अवघड आहे ते या दोन्ही सिनेमांमधून अचूक व्यक्त झाले आहे. आंबेडकर खरे मनाला भावले म्हणण्यापेक्षा रुतले ते या सिनेमाच्या माध्यमातून!नंतर कामानिमित्त मराठवाड्यातील दलित गटांबरोबर वेगवेगळ्या प्रश्नासंबधी काम करताना आंबेडकरांचा प्रभाव अगदी ठसठशीतपने जाणवला. परंतु दलित आणि दलित- इतर हे इतके टोकाचे dynamics जाणवले की प्रत्येकवेळी तुम्ही किती 'दलीत मित्र' आहात या निकषांमध्येच तुमच्या जाणीवा आणि काम गुरफटताना बघून गुदमरायला झाले होते. या गटांचे राजकारण हा एक चर्चेचा स्वतंत्र विषय आहे आणि त्यावर खूप अभ्यासकांनी लिहिलेले आहे. काही वर्षांनी मी मध्य प्रदेशात अक्शन एड च्या प्रकल्पामधून तिथल्या जातीवर आधारित सामाजिक प्रश्नावर काम करताना परत एकदा आंबेडकर भेटले. मराठवाडा आणि एकूणच महाराष्ट्रात जी चळवळ, एक राजकीय घडामोड जातीच्या प्रश्नावर आहे तशी देशाच्या या भागात नाही. पहिल्यांदा जेव्हा मंद्सोर जिल्ह्यातील जातीवर आधारीत वेश्याव्यवसाय या विषयावरचा प्रकल्प मला दिला गेला तेव्हा भोपाल ते मंद्सोर पूर्ण प्रवासात हा काय प्रकार असेल याचा विचार आणि सोबतच्या सहकार्यांबरोबर चर्चा चालली होती. मध्य प्रदेशात रतलाम, मंदसौर इथे बाछडा आणि मुरेना, धोलपुर (राजस्थान) आणि सागर इथे बेदिया या समाजात देवदासी प्रथेप्रमाणे मुली हा व्यवसाय करतात. अगदी ६-७ वयाच्या मुलीना इथे ट्रेन केले जाते. आधी फक्त गावातल्या जमीनदारांच्या सोयीसाठी निर्माण केली गेलेली ही प्रथा आज मुलींच्या traficking मध्ये एक पुरवठा केंद्र म्हणून प्रस्थापित झाली आहे. इथून मुली मुंबई आणि नंतर देशातल्या इतर मोठ्या शहरात आणि विदेशातही या व्यवसायासाठी पुरवल्या जातात. पहिल्यांदा जेव्हा तिथे बाछडा समाजाच्या लोकांबरोबर बोलायला बसलो तेव्हा हे आमच्या जातीचे भूषण आहे आणि ते चालवणे हेच या मुलींचे काम आहे हे ऐकून प्रश्नाची दाहकता समजायला लागली. त्याचबरोबर आठ -नऊ वर्षाच्या मुली जेव्हा ही जाती परंपरांची समाजसंमत जोखड वाहताना पाहिल्या तेव्हा 'गुलामी मानसिकता' हा आंबेडकरांचा शब्द किती समर्पक आहे, ते जाणवले.

एक्शन एडचा दुसरा प्रकल्प होता तो डोक्यावर मैला घेऊन जाणाऱ्या जातीबरोबर ---तिथेही हे काम म्हणजे आमची परंपरागत 'जहागीर' आहे हे ठासून सांगणारे लोक पाहिले आणि परत हा शब्द आठवला. या दोन्ही जातींबरोबर काम करताना आम्ही 'शैक्षणिक केंद्रे' सुरु केली कारण या दोन्ही समाजातील मुलांना गावच्या शाळेत मज्जाव होता. त्यातही या परिस्थितीवर विचार करणारे, आपल्या आपल्या पद्धतीने काम करणारे युवक पुढे आले आणि ही 'जहागीर', हे 'भूषण' कसे लादले गेले आहे यावर आम्ही थोडे उघडपणे बोलू लागलो. एक प्रश्न नेहमी समोर असायचा या सगळ्या चर्चा ऑफिसच्या सहकार्यांबरोबर किंवा अशा प्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातील इतर संस्थाबरोबर करणे फार सोपे आहे. परंतु आज जर ती मैल्याची टोपली वाहून नाही नेली तर मला आणि दोन्ही मुलांना चौधरीच्या घरची शिळी भाकरी मिळणार नाही --हे सांगणारी लालीबाई मला नेहमी निरुत्तर करायची. परंतु इथेही उत्तर मिळाले ते भिंतीवरच्या मळक्या, धुरकटलेल्या आंबेडकरांच्या फोटोमधून. इथे खूप जणांना ते कोण, कुठले, त्यांचे काय योगदान काही माहित नाही . पण आपल्यातला एक माणूस खूप पुढे गेला आणि आपल्यासाठी खूप काही करून गेला हे नेहमी मिळणारे उत्तर. तोच धागा घेऊन-- पण काय ठेऊन गेला तुमच्यासाठी --यावर बोलता बोलता मला या कामातल्या दिशा दिसल्या. महाराष्ट्रात गावोगावी, झोपडपट्ट्यांमध्ये दलित वस्तीच्या पुढे--'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा ' ही पाटी सर्रास दिसते. तीच ओळ अशा एका बैठकीत म्हणली आणि आमचा पुढचा अक्शन प्लान मिळाला. या कामाबद्दल आणि त्यातल्या निष्पत्तीबद्दल वेगळे लिहिता येईल ....परंतु भुकेल्या पोटी सन्मानाचे जगणे जिण्यासाठीची जिद्द आणि ती लढाई विपरीत परिस्थितीत पुढे नेण्यासाठी लागणारी लगन आणि परिश्रम यासाठीचा प्रेरणास्त्रोत तो धुरकट काळ्या चश्म्यामागच्या आंबेडकरांचा फोटोच होता.

आज उत्तर भारतातील दलित राजकारण, दक्षिणेतील आरक्षण आणि ब्राम्हणविरोधी चळवळ यातून दलित आणि आंबेडकर याबद्दल एक निश्चित मत झाले आहे. बऱ्याचवेळा कुत्सितपने हा विषय छोट्या चर्चातून किंवा मोठ्या वाहिन्यांच्या बातमीजालात चर्चिला जातो. आज ही जयंतीच्या निमित्ताने हा लेखाजोखा होणारच ...


मला मात्र मंद्सोर, रतलाम,सागर मधील बाछडा समाजाच्या काही मुली हा व्यवसाय आम्ही करणार नाही म्हणून ठामपणे उभ्या राहनारया -- पण दुसर्या पर्यायाच्या अभावी जगण्याच्या भेदक लढाईत होरपळनार्या या 'दलीत की बेटी'ना साथ देणारे आंबेडकर आठवतात. इंदोरच्या किंवा गुजरात मधील मैला वाहून नेणाऱ्या कित्येक आई बापांच्या मुलांना --तुम्ही यातून नक्की बाहेर पडू शकता--ही जागीर नाही -गुलामी आहे' हे सांगणारे आंबेडकर दिसतात. आजही कुठलाही अभिनिवेश न बाळगता हसतमुखाने दलित मुलांसाठी होस्टेल चालवणारा, त्यानाही व्यक्तिमत्व विकासाच्या सर्व संधी मिळाव्यात म्हणून झटणार्या उमानाथनला प्रेरणा देणारे आंबेडकर आठवतात....

महेशचा तो स्टेटस ई मेल पाहता पाहता आंबेडकरांची ही विविध रूपे --दिसलेली -भावलेली- समजलेली -समोर येत होती. जयंती निमित्ताने होणारे वेगवेगळे कार्यक्रम आणि भाषणे मग संध्याकाळच्या बातम्यांमध्ये त्यांचे चित्रीकरण असे नेहमीचे या दिवसाचे वातावरण आठवले. या सगळ्या कोलाहलात एक वाक्य सारखे आठवत होते --शाळेतल्या असंख्य भाषणांमध्ये म्हणलेले आणि तेव्हा आणि नंतर असंख्य भाषणातून यांत्रिकपणे ऐकलेले ---'त्या महामानवास विनम्र अभिवादन'.

आज हजारो मैल दूर, त्या सगळ्या वातावरणापासून दूर, मला या उक्तीचा अर्थ जाणवतो आहे!


आगोट

गेले दोन दिवस इकडेही आगोटीचे वातावरण आहे, साहजिकच गप्पाही तशाच, घरात आणि सोशल मिडीयावर . बऱ्याच जणांनी फोटू टाकले, कविता खरडल्या किम्बुहना...